मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

 

    श्री गणेशाय नमः

 

             अर्पण पत्रिका -

            ज्या ज्या भारतीय पूर्वजांनी आजचं सुंदर मॉरिशस उभारण्यासाठी आयुष्य  खर्ची घातली, ज्या आपल्या परिवाराला सुखी करण्यासाठी ते इतक्या दूरवर येऊन राबराब राबले, तो त्यांचा प्रेमळ परिवार----, ती त्यांची मातृभूमी, तो भारताचा किनारा ज्यांना परत कधीच दिसला नाही. भारताचं स्वप्न बघता बघताच ज्यांची आयुष्यच संपून गेली त्या माझ्या भारतीय बांधवांसाठी हे पुस्तक सादर अर्पण  

मॉरिशसच्या अंतरंगात

                       दोन शतकांपूर्वी भारतीय संस्कृतीचं बीज मॉरिशसच्या खडकाळ मातीत जाऊन पडलं. तेथील खडक फोडून ते तिथे रुजलं. नुसतच रुजलं नाही तर भारताच्या मातीतून आपल्या हृदयदलांमधे भरून नेलेल्या भारतीय संस्कृतीच्या वारशावर ते फोफावलंही. मॉरिशसच्या मातीचे, पाण्याचे गुणही त्याने आत्मसात केले. अंगावर आलेल्या अनेक संस्कृतींच्या वादळांशी तोंड देता देता त्याच्या जुन्या फांद्यांची पडझडही झालीपरत जोमाने नवी पालवी फुटली. आज सुंदर दिसणार्या मॉरिशसला सुंदर करण्यासाठी झिजलेली आयुष्य, त्यांच्या कष्टांची ती गाथा, त्यांच्या यशाची कहाणी, मॉरिशसच्या लोकांच्या अंतरंगात त्यांनाही कळत तेवणारी भारतीयत्वाची मंद ज्योत आणि मॉरिशियन लोकांच्या चालण्या, वागण्या, बोलण्यावर पडलेला भारतीय संस्कृतीचा मंद प्रकाश तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात मला ठायी ठायी जाणवत होता.

                  `मॉरिशसमधे नुसता दगड हलवला तरी दगडाखाली सोनं सापडतं' ह्या इंग्रजांच्या भूलथापांना भुलून आपले जे पूर्वज तेथे पोचले त्यांच्या हाती जरी सोनं गवसलं नाही तरी त्यांच्या कष्टांमधून ते पुढच्या पिढ्यांसाठी जमिनीतून उगवलं. ह्या अनिवासी भारतीयांनी प्रयत्नपूर्वक जपलेल्या भारतीय संस्कृतीचं अनमोल लखलखीत सोनं मला मॉरिशसच्या दोन वर्षांच्या मुक्कामात वारंवार हाती लागत राहिलं आणि मोठ्या खजिन्याचा तो अंशही मला आश्चर्यचकित करत राहिला.

                दोनशे वर्षांपूर्वी भारतातून मॉरिशसमधे आलेले आप्रवासी भारतीय भारतातून भारतीय संस्कृती घेऊन गेले खरे पण काळ आणि अंतर यामुळे ते आपल्यापासून दुरावले. तरीही त्यांच्याबरोबर झालेल्या प्रत्येक भेटींमधून आपलच प्रतिबिंब आपणच पहात असल्यासारखं मला वाटत राहिलं. आपणच आपल्यापर्यंत पोचल्याचा, आपणच आपल्याला भेटल्याचा प्रत्यय येत राहिला. जेंव्हा जेंव्हा मॉरिशसच्या अंतरंगात डोकवायला मिळालं तेंव्हा तेंव्हा ते चार क्षणही मॉरिशसच्या बाह्यरंगापेक्षा मला अंतर्मुख करून गेले. पेरलेली बीजं मातीने झाकल्याने दिसत नाहीत पण अचानक उगवून जमिनीबाहेर आली की  अरेच्च्या! म्हणून त्यांचा पत्ता लागतो तसं एवढ्याशा  मॉरिशसमधे दोन वर्ष राहूनही संपूर्ण मॉरिशस पाहून झालं असं कधी वाटलच नाही. दरवेळेस काही तरी नवीन आकर्षण सापडत असे. कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित. मॉरिशसवर निसर्गाचा वरद हस्त आहे. अनपेक्षितपणे कल्पनाही करू शकणार नाही असा निसर्ग किंवा घटना समोर येऊन उभ्या राहत. मॉरिशसचं अंतरंग माझ्या अंतरंगात उमटत जाईमाझ्या मनात उमटलेलं मॉरिशसचं चित्र तुम्हाला दाखवतांना अनेक गोष्टी सुटून गेल्या, काहींना पानांच्या मर्यादा सांभाळण्यासाठी सोडून द्यावं लागलं

                 आपलं प्रतिबिंब आपल्याला स्वच्छ दिसावं म्हणून आपण आरसा पुसून लखलखीत करून ठेवतो. त्याप्रमाणे भारतातून जगभर बाहेर गेलेल्या भारतीय लोकांबरोबर असलेले संबंध परत चकचकीत करून त्याला उजाळा द्यायची आवश्यकता आहे. त्यातून आपणच आपल्याला भेटणार आहोत. अगदी वेगळ्या स्वरुपात. आपल्याला पाहून आपणच चकित होऊन जाऊ. हरखुन जाऊ. आपलाच एखादा नवीन पैलू आपल्याला आश्चर्यचकित करेल. रसिक वाचकांसमोर हे मॉरिशसचं अंतरंग उलगडून दाखवावं एवढा एकमेव उद्देश मनात ठेऊन केलेला हा लेखन प्रपंच. मॉरिशसवर अनेक पुस्तकं लिहीली गेली. त्यातील अनेक पुस्तकं आज उपलब्ध आहेत. अनेक आपण वाचलीही आहेत. पण बाकीच्या कुठच्याही पुस्तकात तुम्ही वाचलं नसेल असं मॉरिशस आज मी तुमच्यापुढे ठेवत आहे. तुम्ही मॉरशसला जाऊन आला असला तरी तुम्हाला जे मॉरिशस अज्ञातच आहे ते मॉरिशस आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही जे मॉरिशस ऐकलं असेल त्याच्यापेक्षा वेगळं मॉरिशस मी तुम्हाला ऐकवणार

 आहे.       

-----------------------------------------------

मॉरिशसचा झेंडा

                                                                                                     Coat of Arms: 


                                                                                               ("Star and Key of the Indian Ocean")


-----------------------------------------------------------------------

 (  पुढचे प्रकरण उघडण्यासाठी खालील नावावर क्लिक करा. ) 

मुंबई  ते मॉरिशस  -----

खाली  दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल

 0  1  3  4  5  6  7  8  10   11 

12  13  14  15  16  17  18  19  20  21.



Comments

Popular posts from this blog

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -