गोवर्धनाची लढाई -

 

गोवर्धनाची लढाई -

उत्तर भारतात झालेल्या बहुतेक भूकंपाचे  केंद्रबिंदु (epicenter) हिंदुकुश पर्वतात असतात. त्याप्रमाणे महाभारतकालीन झालेल्या बहुसंख्य लढायांचा केंद्रबिंदु हा कृष्णामधे स्थित दिसतो. अनेक लढायांची कारणे पाहता ती कृष्णासाठी, कृष्णामुळे, कृष्णाने अशी  कृष्ण ह्या व्यक्तिरेखेभोवती फिरतांना दिसतात. लढाया दरवेळेस रणांगणावरच लढल्या गेल्या असे नाही. काही कालबाह्य झालेल्या परंपरांविरुद्धही लढल्या गेल्या आहेत.

कालौघात कित्येक परंपरांचे महत्त्व संपते. गतानुगतिक चालू असलेल्या अनेक परंपरांचा काळानुरूप पुनर्विचार करावा लागतो. कालबाह्य झालेल्या परंपरा बंद करायचा निर्णय घेऊन त्याऐवजी विज्ञानाधिष्ठित, सद्यस्थितीला अनुरूप अशा नवीन परंपरा सुरू कराव्या लागतात. जनसामान्यांना त्याचे महत्त्व पटवून द्यावे लागते. योग्य प्रकारे त्या जनमानसात रुजवाव्याही लागतात. तरच त्या निर्विघ्नपणे पुढे चालू राहतात. सुदैवाने आपला धर्म इतर धर्मांसारखा ताठर (rigid) भूमिका घेणारा नाही. त्यात काळानुरूप बदल व्हायला पाहिजेत हे गृहीत धरले आहे.

लोकांना , जनसामान्यांना हे सर्व पटवून देणारा कोणीतरी खंबीर नेता लागतो जो सुशिक्षित असेल; सुसंस्कृत असेल; ज्याला योग्य अयोग्याची जाण असेल; लोकांच्या मनाची नस जो चांगल्याप्रकारे जाणत असेल; त्यानुसार होणार्‍या सर्व परिणामांना सामोरे जायची ही त्याची तयारी असेल. हा बदल घडवून आणतांना येणार्‍या सर्व संकटांचा त्याने विचार केलेला असायला हवा. सर्व जन सहभागाचा अवलंब करून  सर्व लोकांना त्या संकटातून हिकमतीने हिमतीने पार करून नेण्याचे संघटन कौशल्यही त्याच्याजवळ असायला हवे. ग्रामवासीयांना बरोबर घेऊन जाणारा असा नेता हा ग्रामणींचा अग्रणीही असतो आणि  पुढारलेल्या शहराचे नागरीकशास्त्र उत्तम जाणणारा, सुसंस्कृत असा नागर ही असावा लागतो. गुणांची खरी पारख असलेली संत मीराबाई कृष्णाच्या ह्या दोन गुणांना सुंदरपणे एकत्रित गुंफुन स्वतःची नाममुद्रा तयार करताना `मीराके प्रभु गिरीधर नागर' म्हणतात ते उगीच नाही. नगरातील, सुसंस्कृत, नागर संस्कृतीचा आणि गोकुळातील गोपांसोबतच्या गिरिधर ह्या ग्राम्य संस्कृतीचा इतका सुंदर मिलाप कृष्णाशिवाय बाकी कोणामधे पाहायला मिळणार नाही.

 कुठल्या जुन्या गोष्टी त्याज्य आहेत हे लक्षात यायला हवं आणि त्या सोडण्याचं धारिष्ट्यही अंगी असायला हवं. दरवर्षी गोकुळात इंद्रयाग केला जायचा. इंद्र ही पावसाची देवता. इंद्रकृपेने मुबलक पाऊसपाणी होऊन धनधान्य समृद्धी येते अशी श्रद्धा असलेले सारे गोकुळवासी इंद्रयाग करीत. त्यासाठी अन्नकोट केला जाई. छपन्न भोग जेवण बनवून त्याचा इंद्राला नैवेद्य दाखवला जायचा. एकदा सर्व वृंदावनवासीयांना कृष्ण म्हणाला,

``मित्रांनो, आपलं सारं जीवनच ह्या गोवर्धन पर्वतावर अवलंबून आहे. आपण पाण्यासाठी, पावसासाठी त्याच्यावर अवलंबून आहोत. ह्या गोवर्धन पर्वतामुळे ढग अडवले जातात. आपल्याला मुबलक पाऊस मिळतो. ह्याच पर्वतावर उगवलेले गवत आणि अनेक औषधी योग्य पोषणमूल्ये असलेल्या वनस्पती खाऊन आपल्या गायी, गुरे पुष्ट होतात. सकस दूध देतात. त्यांच्या दूध, दही लोण्या तूपावरच आपणही सारे निरोगी आयुष्य जगतो. मुले धष्टपुष्ट होतात. डोंगरावरून येणारे पाणी गाळ घेऊन येते, जमिन सुपीक बनवते.  त्या सुपीक जमिनीमुळे आपले पिकपाणी अन्नधान्य चांगले येते. हे  धान्य, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकून आपल्याला धन मिळते. त्या धनातूनच आपल्याला समृद्धी येते. गोवर्धन हा नुसताच पर्वत नाही तर  आपला भाग्यविधाता आहे. सर्वांच्या समृद्धीचे खरे कारण हा गोवर्धन पर्वत आहे. पूजाच करायची असेल तर इंद्राची कशाला? गोवर्धन पर्वताची करू या.'' गोवर्धनाचे संरक्षण, तेथील वनस्पतींची काळजी घेणे, निसर्गाचा तोल बिघडणार नाही असा व्यवहार ठेवणे हीच गोवर्धनाची पूजा. कृष्णाने सर्व वृंदावनवासीयांना पटवून दिले. त्यांना ते पटलेही. सारे नाचू लागले गाऊ लागले,

गोवर्धन गिरी त्राता, देई संतोष गोकुला

रक्षी गायी गुरे सारी, करी आनंदसोहळा ।।

आमुच्या गायींची संख्या कोटींच्यावर जाया

धरी आम्हावरी छाया हे कृपासागरा राया ।।

(गोवर्धन धराधार गोकुलत्राणकारक

विष्णुबाहुकृतोच्छाय गवांकोटिप्रदोभव ।। )

झाले मग इंद्रयागा ऐवजी गोवर्धनपूजेची लगबग सुरू झाली. सारेजण अन्नकोटासाठी बनविलेले अन्न घेऊन गोवर्धन पर्वताच्या तराईच्या क्षेत्रात आले. इंद्राला नैवेद्य देण्याऐवजी कृष्णासहित गुरे राखणार्‍या सर्व बाळ गोपाळांना  प्रथम गोड धोड खायला घालून उत्सवाची सुरवात झाली. घरातल्या मुलांना पहिल्यांदा खाऊ देणं हाच देवाला नैवेद्य नाही का? खुलभर दुधाची कहाणी फक्त दर श्रावणात वाचण्यापुरती थोडीच आहे? ती तर अमलात आणण्यासाठी सांगितली आहे.    बालकांची तृप्ती हीच देवाची तृप्ती नव्हे का? पण देवाला नैवेद्य दाखवण्याआधी मुलांच्या ओठी पदार्थ जातांना पाहून काही महाभाग मात्र अस्वस्थ झाले. उत्सव पाहायला आलेल्या नारदांनी इंद्राकडे जाऊन सर्व इति वृत्तांत सांगितला. `कदाचित कृष्णाच्या मनात उद्या तुझे सिंहासनही बळकावयाचे असेल.' असे सांगितल्याने तर इंद्र फारच अस्वस्थ झाला. ह्या गवळ्याच्या पोराला त्याची जागा दाखवावी लागेल असा इंद्राने विचार केला. एक नव्या लढ्याला तोंड फुटले. इंद्राने वृंदावनावर भूतो भविष्यति अशी वर्षा करण्यास सुरवात केली.

इंद्रकोपाने घाबरून गेलेल्या वृंदावनवासीयांना कृष्णाने धीर दिला. चला, वृंदावनाच्या सखल भागात राहू नका; लवकर आपली गायी गुरे घ्या आणि गोवर्धनाच्या आश्रयाला चला. सामानसुमान, गायीगुरांना घेऊन सारेच वृंदावनवासी सात दिवस गोवर्धन पर्वतावर राहिले. एकमेका सहाय्य करू म्हणत सर्व गोपांच्या मदतीने तेथील गुहा, आडोशाच्या जागांवर तात्पुरते निवारे, आसरे, गुरांसाठी गोठे, चारा छावण्या उभारण्यात आल्या. जन सहभाग हा किती महत्त्वाचा असतो; सर्वांच्या सहभागाने वादळ वार्‍याला सर्वांनी यशस्वीपणे तोंड दिले. एखादा प्रश्न सहज सोडावला की आपण चुटकीसरशी सोडवला असे म्हणतो. कृष्णानेही करंगळीवर गोवर्धन उचलला म्हणतांनाही हेच अभिप्रेत आहे. वृंदावनावर आलेल्या ह्या अस्मानी संकटाला कृष्ण आणि गोकुळवासी एकदिलाने सामोरे गेले आणि मोठे संकट सर्वांच्या मदतीने हा हा म्हणता टळले. कृष्णाने जणु करंगळीवर गोवर्धन उचलला. सर्व गोकुळवासीयांना संकटाला तोंड द्यायला वेळीच सज्ज केले. त्यांचे प्राण वाचवले. त्यांना  कुठलीही क्षति पोहचू दिली नाही. गोकुळवासियांनीही कृष्णाच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी मनोभावे सर्व धनधान्य, गायी गुरे वेळीच उंच असलेल्या पर्वतावर हलवली.

 सखल भगात असलेल्या वस्त्या पाण्याखाली बुडाल्या पण गायी गुरे उंचावर सुरक्षित होती. पुराच्या पाण्यात वित्तहानी झाली नाही.  जीवित हानीही झाली नाही. गायी-गुरे वाहून गेली नाहीत. योग्यवेळेस काळजी घेतल्याने गोवर्धनाच्या छत्रछायेत सारे गोकुळवासी सुरक्षित राहिले. सात दिवस संततधार पावसाने कहर करूनही सारे गोप, त्यांच्या गोधनासह सुरक्षित पाहून इंद्राचा गर्व उतरला. तो दिवस होता, दीपावलीतील बलिप्रतिपदेचा दिवस. उत्तर भारतात त्यादिवशी मोठ्याप्रमाणावर गोवर्धन पूजा केली जाते.

जे जुनं सोन्यासारखं पवित्र, निर्मळ आहे त्याचा त्याग नाही आणि त्यासोबत जे कालबाह्य आहे त्याचा त्याग करून नव्या परंपरा आत्मसात करणं ह्या दोन्हीचा सुंदरसा गोफ कृष्णचरित्रात दिसून येतो. इंद्रपूजा नाकारणारा कृष्ण गोवर्धन पूजेचा आग्रह धरतो. इंद्राला नैवेद्य दाखविण्याऐवजी गायी गुरे सांभाळणार्‍या गोपाळांना प्रथम गोडधोड खाऊ घालायचा हट्ट धरतो. कृष्णाने पूजा, नैवेद्य हे उत्साह निर्माण करणारे उत्सव नाकारले नाहीत फक्त त्यांची गतानुगतिक  चाकोरीतून सुटका केली इतकच. पर्वतांमुळे निसर्ग, ऋतुचक्र, जलचक्र ह्यांचे होणारे रक्षण, संवर्धन पर्वतांचा मानवी जीवनावर होणारा उपकार स्मरणे त्याची काळजी घेणे हे त्याने सहजपणे ग्राम्य जीवनशैलीत रूढ केले.

एखादे मोठे संकट माणसात दडलेल्या त्याच्या सुप्त कार्यक्षमतेला जागवते. सर्व जनतेची क्षमता एकत्र झाली की एखादं अशक्य कोटीतील कार्य साध्य होतं. सर्वांच्या मदतीने आपण गोवर्धनासारखा मोठा पर्वतही उचलू शकतो, एखादे महान कामही सहज करू शकतो हा आत्मविश्वास कृष्णाने साध्यासुध्या गोपांमधे जागवला. इंद्रासारख्या बलाढ्य देवतेनेही कुरापत काढली तरी घाबरण्याचे कारण नाही. आपण एकत्र असलो तर इंद्रालाही माघार घ्यायला भाग पाडू हा विश्वास गोकुळवासीयांच्या मनात निर्माण झाला. निसर्गाच्या कोपाची चाहूल लागताच योग्य वेळी, योग्य प्रकारे आपत्ति-नियोजन कसे करावे ह्याचा कृष्णाने एक परिपाठ, धडा घालून दिला. कृष्णाच्या बालपणी त्याने दाखवलेल्या ह्या नेतृत्वगुणामुळे त्याला गोवर्धनगिरीधारी, गिरीधारी, महाद्रिधृक्, गिरिधरनागर अशी बिरुदावली प्राप्त झाली.

आजही दिवाळीत येणारा परतीचा पाऊस भारताच्या अनेक भागात हाहाक्कार उडवून देतो. त्यासाठी सखल भागात राहणार्‍या लोकांनी पावसात आश्रय घेण्यासाठी उंचावरील स्थळांचा आधीपासूनच  शोध घेऊन संकटाचा सामना करण्याची पूर्वतयारी करून ठेवली पाहिजे. पूर्वापार चालत आलेल्या अनेक civilizations  कडे पाहिले तर  त्या नद्यांच्या तीरावर विकसीत झाल्याचे दिसते. पाण्याचा धोका लक्षात घेऊन जवळ एखादा मोठा डोंगर असायला हवा असा विचारही शहरे वसवतांना करायला हवा. अशा डोंगरांवर लोकांना आश्रयाची सोयही असायला हवी.

आपल्या समृद्धीत निसर्गाचाही मोठा वाटा आहे त्यामुळे आपल्या वाढणार्‍या समृद्धीसोबतच निसर्गाची काळजी, पर्वतांचाही आदर, पर्वतपूजेच्या रूपाने गोवर्धनपूजेच्या रूपाने आजपर्यंत चालू राहिला. पर्वतांचं संरक्षण , त्यावरील विविध वृक्ष वल्लींच संगोपन अनेक पशुमात्रांचे संवर्धन, संगोपन ही गोवर्धनपूजेची अंगे आजमात्र लयाला गेलेली दिसतात.

--------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

भौमासुर / नरकासुर वध –

ललित लेख (अनुक्रमणिका)