फळरुची , खाद्यरीती
फळरुची
, खाद्यरीती
भारतात
ऋतुमानाप्रमाणे विविध फळांची रेलचेल असते. प्रत्येकाची फळ खाण्याची आपली
आपली खास रीत असते.
काश्मीर आणि हिमालयीनन थंड प्रांत सोडले तर केळ हे भारताचं फळ म्हणायला हरकत नाही. केळ खायचा आनंद मात्र प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे घेत असतो. कोणी थोड थोडं केळ सोलून सालातून मोकळा झालेला गराचा दंडगोल चवीचवीने खात असतो तर कोणी हाताने त्या दंडगोलाचा तुकडा मोडून तोंडात घालत असतो. अशाने केळ उष्टे होत नाही आणि कोणी आले तर त्याच्याबरोबरही शेअर करता येतं. पण जस जसं केळ संपत येतं तसं Setter किंवा Hound जातीच्या कुत्र्याच्या लांबलचक लोंबत्या कानाप्रमाणे केळाची लोंबती साल कोणा कोणाला आवडत नाही. ते आधीच केळाला पूर्ण सालहीन करून आतील गराचा संपूर्ण दंडगोल हातात धरून आत्मानंदी टाळी लागल्या सारखा खात राहतात. कोणी रस्त्यात केळ विकत घेऊन तिथेच त्याचं पूर्ण साल काढून, ते वाटेतच भिरकावून आपल्याच तंद्रीत केळ खात पुढे निघून जातात.
पेरूवाल्याकडून आपल्याला हवा तसा खोबरी, कडक वा
पिकलेला पेरू घेतला की त्याच्याकडूनच सुरीने त्याचे चार भाग करून त्यात आपल्या आवडीप्रमाणे तिखटमीठ घालून घेऊन रस्त्याने गप्पा मारत एक एक फोड खात जावे आणि मधेच मित्र भेटला तर त्याच्याही
समोर धरावा. तो एक फोड काढुन घेऊन ``फलयज्ञात’’ सामील होतो. पेरूच्या बागेत मात्र झाडाचा आवडता
पेरू आपल्या हाताने तोडून सरळ दात रोवून खायला पाहिजे. एकदा
आमच्याकडे आलेल्या वयस्कराने पेरूच्या गर,बिया काढून फक्त
बाहेरचा भाग खाल्ला तर कोण्या एकाने
फक्त गर बियाच गोड असतात बाकी भग खाण्याच्या योग्यतेचा नाही म्हणून टाकून दिला.
हे दोघे जर एकाच वेळेला आले तर बरे असे वाटून गेलं.
केशरी
रंगावर आलेल्या भरघोस अननसाचे
अननसवाला त्याच्या लवलवत्या धारदार लांबलचक सुरीनी सरासर पण अत्यंत नजाकतीने पातळ सालं काढायला लागला की बघत रहायला होतं. सफाईनी त्याची सालं काढली की काटे
काढणं म्हणजे अननसावर नक्षीकाम असतं. काट्यांच्या जागी तिरक्या
सरींच्या नक्षीची शाल अननसाला अंगभर
लपेटली जाते. स्लाइस करून पाहिजेत
म्हटलं की एकसारख्या जाडीच्या चांदण्या तयार होतात. ही
दातेरी चाकं वा चांदण्या हातात घेऊन खायच्या का त्याचेही
चौकोन कापून त्यावर चिजची छोटी पातळ चकती ठेऊन टूथपिकनी
टोचून बरोबर खायची ही प्रत्येकाची रीत वेगळी.
डाळींबावर
पृथ्वीच्या मेरिडिन प्रमाणे पाच उभ्या चिरा घेऊन
त्याच्या छोट्याशा मुकटाभोवती गोल सुरी फिरवून तो काढून तेथे दोन्ही अंगठे
घालून फाकवून मग लालबुंद माणिक वाटीत वा काचेच्या देखण्या भांड्यात गोळा करणं झकास वाटतं. आपल्याला थोडं नवीन असलेलं
कमलम्/ड्रॅगन फ्रुट थोड ह्याच पद्धतीनी पण चिरा घेतल्यावर साल ओढून काढलं की मोकळं
होतं.
सीताफळ
मऊ झालं की हातानी थोडं दाबून दोन भाग करून
चमच्यानी स्कूप काढून खाता खाता
बीया टाकण्याची प्रत्येकाची रीतही
वैयक्तिक प्रतिष्ठितपणासोबत बदलत जाणारी.
चिक्कू
वा
पेरू साल काढून खाणारे किचकट
प्रकारात मोडतात असं वाटतं. करकरीत
हिरवीगार कैरी, रायआवळे, चिंचेचा
आकडा एक डोळा मिटून नुसते किंवा मीठ लावून खायला पाहिजे. पण
वाळत घातलेल्या चिंचेतूनच चिंचेचा गोळा चोरूनच खायला पाहिजे.
सुरीनी
हापुसच्या आंब्यांचं गोल गोल गोल पट्टीसारखं साल काढत जाऊन नंतर त्या फळाच्या
चौकोनी फोडी कापून बोलमधे सजवून काटाचमच्यानी खाणं ही जशी आनंददायी रीत असते. तशी कोणाला विळीवर त्याच्या दोन्ही खापा कापून त्यावर सुरीनी चौकट ओढून,
बशीत ठेऊन चमच्यानी स्कूप करून तो एक एक आम्र क्यूब खायला आवडतो. आढीतला आंबा साल हातानी ओढून
काढल्यावर हातात उरलेला गराचा गोळा सरळ दात उमटवत गट्टम् करणं आणि नंतर कोय चोखत
बसणं मुला माणसांना प्रियच असतं तसा तो बिलबिला करून चोखणं स्वर्गस्थित
देवांनाही नशिबी नसतं. पायरीचे डझन दोन डझन आंबे पितळी बादलीत
पाण्यात थोडावेळ भिजत ठेऊन, त्यांना छान अंगोमंगो घालून,
देठाच्या जागी अंगठा ठेऊन त्यांना बिलबिलं करून, त्यांचं नाक साफ करून त्यांचा केशरी रस चांदीच्या जाडजूड पातेल्यात नाहीतर
छानशा काचपात्रात काढून पंगतीत पुरीचा चमचा करून खाणं स्वर्गीय आनंद देणारं.
सफरचंद
हे फळं आपल्याकडे जरी फोडी करून खात असले तरी सफरचंदांच्या प्रदेशात अख्ख करकरीत
सफरचंद दातानी खाणच मंजूर असतं. आपल्याकडे हॉटेलच्या
काउंटरवर जशी सुपारी बडिशेप ठेवलेली असते; आणि जातांना ती हातावर घ्यायला
परवानगीची गरज नसते तशी, अमेरिकन हॉटेल काउंटरवर बास्केटमधे सफरचंद ठेवलेली असतात. येणार्या जाणार्याने खुशाल उचलून घेऊन खात जावं.
सुपारीचा विषय निघाल्यामुळे सांगावसं
वाटलं की, कडक सुपारी अडकित्यानी बारीक
कातरणारी मंडळी मात्र आता काळाच्या पडद्याआड गेली आणि सुपारी बारीक कातरायची कलाही
गेली.
फणस
कापावा तो गरे विकणार्या माणसानेच.
फणसावर चिरे घेऊन फाकवून दांड्यालगत सोडवत जाऊन मधे दांडा
जसाच्या तसा ठेवत कापत कापत कमळाप्रमाणे उमलवत नेलेला फणस कित्येकवेळा दादरला मी
काम विसरून बघत बसे.
ताडगोळ्यांचीही
तशीच तर्हा. कोवळे ताडगोळे निवडून द्यायचं काम फक्त आपण
करायचं. पुढचं कौशल्य विक्रेत्याचं!
त्याच्या धारदार कोयत्यानी आतल्या कोवळ्या ताडगोळ्याला धक्का न लावता बाहेरचं जाड
साल काढून, कोयत्याची कड हळुवार फिरवत आतले तीन ताडगोळे
पूर्वी केळीच्या पानावर काढून सावकाश बांधून दिले जायचे.
ह्या ताडगोळ्याचं वरचं पातळं साल काढून तो न फुटता पूर्ण तोंडात
घालणं हे कौशल्याचं काम मात्र आपलं! ताडगोळा फुटला तर
त्याच्यातील चमचा दोन चमचे गोड पाणी सांडून जातं.
पपईचं
बाळंतपण करणं माझ्यासाठी मोठा सुखद अनुभव असतो. चांगल्या आकाराची,
पातळ सालीची लाल केशरी, पपई उभी कापली की
तिच्या नावेप्रमाणे होणार्या दोन भागांकडे नीट पाहिलं तर एखाद्या मानवी
गर्भाशयाप्रमाणेच दिसतं. पपईच्या आतल्या भागावर एक छानसं
गुबगुबीत अस्तर वाढलेलं असतं. त्या अस्तरावर पपईच्या प्रत्येक
बियांची नाळ जोडली गेलेली असते. स्नायू जसे हाडाच्या दोन्ही
बाजूंना बांधले गेलेले असतात त्याप्रमाणे हे अस्तरही मानवी Tendon
प्रमाणे असलेल्या जरा जाडसर धाग्यांनी पपईच्या
दोन्ही कडांना बांधलेलं असतं. हे धागे सोडवून घेतले तर
हे अस्तर हळु हळु पपईच्या पोटापासून विलग करून छान गुंडाळलं जातं. पपईचं पोट जखमी न करता पपईच्या बियांसकट गुंडाळत हे
अस्तर सुरी वा चमच्याच्या कडेने सावकाश काढलं तर तिच्या पोटावरील
वळ्याही छान दिसतात. जरी ती कापून खायचीच असली तरी तिचं हे
साग्रसंगित बाळंतपण मी कौतुकाने करते. फळ खाण्याच्या
कौतुकाएवढच त्याचं ड्रेसिंग
आनंददायी असतं.
अष्टमीच्या
चंद्रासारखी कलिंगडाची अर्धगोल खाप दाढीमिशांवर रसोत्सव करत खायची का बीया बीया
काढून, पूर्ण साफसफाई करून चौकोनी तुकडे
बोलमधे घेऊन खायची हा ही प्रतिष्ठेप्रमाणे बदलत जाणारा विषय! कलिंगड वा खरबुजाच्या
विषुववृत्तावर सुरीने नागमोडी डोंगरा डोंगराप्रमाणे कापत जाऊन सरतेशेवटी दोन लाल वा केशरी
कमळं तयार करण्याची कला फक्त चैत्रागौरीच्या हळदिकुंकवात देवीसमोर मांडतांनाच दृष्टीस
पडते.
नारळ, कवठ, बेलफळ ही फोडायला लागणारी फळं. पण त्यातही कोयत्याने नारळावर अचूक मारत दोन सारख्या गोल वाट्या करून त्याच्या पोटातील पाणी हलु न देता हातातील खालच्या वाटीत नारळाचं सगळं पाणी जमा करणं हे ही कलात्मकच!
बी न कापता लिंबू कापणं असो, हरबर्याचे घाटे न तोडता फांदीवरच सोलून त्यातील हरबरे काढणं असो, ह्या छोट्या छोट्या गोष्टीही कलात्मक रीतीने केल्या तर मनाला किती सुखावून जातात. पहाणार्याच्या डोळ्यालाही ''व्वा!'' अशी दाद द्यायला लावतात.
एका छोट्याशा फळाचाही कलात्मक रीतीने घेतलेला आस्वाद मनाला इतका खुलवणारा असेल तर --------!
एक विचार माझ्या मनात सतत पिंगा घालत राहिला. आपण म्हणतो की, आपल्याला मिळालेलं आयुष्य हे पूर्वजन्माच्या कर्माचं फळ आहे. असं असेल तर हातात आलेल्या ह्या फळालाही नजाकतीने सजवता आलं पाहिजे. त्यातील पूर्वग्रहाच्या साली काढून टाकता आल्या पाहिजेत. मत्सराचे बोचणारे काटे अननसाच्या काट्यांप्रमाणे कौशल्याने काढत, सुरेख सळयांची नक्षी उमटवता आली पाहिजे. द्वेषाची बीज काढून, सजवून त्याचा आस्वाद घेता आणि देता आला पाहिजे. ही कलाही साध्य व्हायला पाहिजे.
------------------
लेखणी
अरुंधतीची -
Comments
Post a Comment