भौमासुर / नरकासुर वध –

 



 भौमासुर वध

एका राजाकडून काय अपेक्षा ठेवाव्यात? असं कोणी विचारलं तर मला सर्वप्रथम श्रीरामांची आठवण येते. वनवासाच्या काळात दंडकारण्यातून हिंडतांना त्यांनी ऋषी, मुनींच्या सत्कर्मात अडथळा आणणार्‍या अनेक राक्षसांना जरब बसवली. अनेकांना यमसदनाला धाडलं. रामरक्षा स्तोत्रात श्रीरामांचा उल्लेख रणकर्कश म्हणजे रणांगणावर शत्रूचा कर्दनकाळ असा सापडतो. सुशासन निर्माण करण्यासाठी जी काही कठोर पावलं उचलायला लागतील ती त्यांनी उचलली. जे काही कठोर निर्णय घेणं आवश्यक होतं ते त्यांनी घेतले. हे निर्णय घेतांना त्यांचं मन कधीही विचलीत झालं नाही. विश्वामित्रांसोबत जात असतांना वाटेत ऋषींच्या अस्थींचे ढीग पडलेले होते. राक्षस आपल्या स्त्रियांना पुढे करून हल्ले करीत असत. ह्या स्त्रियांवर ऋषी, मुनी हात उचलणार नाहीत ह्याची त्यांना खात्री होती. त्या उलट ऋषींच्या यज्ञात अडथळे आणण्यात, ऋषींना ठार मारण्यात, ऋषींच्या स्त्रिंयांना, मुलींना किंवा सुनांना पळवून नेण्यात राक्षस किंवा राक्षस स्त्रिया आघाडीवर होत्या. ``अशा दुष्ट स्त्रियांवर दया नाही. त्या नियमानुसारही अवध्य नाहीत. त्यांना यमलोकी धाडायलाच पाहिजे. रामा बघतोस काय, मार ती त्राटिका.’’ विश्वामित्रांनी निक्षून सांगितले. धर्माचा कुठलाही किंतु बाळगता रामाने त्राटिकेला ठार मारले शूर्पणखा स्त्री असूनही तिने तिच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. सीतेला काकडीसारखं कच्च खाऊन टाकायला ती धावली. माणूसपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्यावर, सोडल्यावर रामाने लक्ष्मणाला तिचं नाक कापून कुरूप करण्याचीही आज्ञा दिली. एक स्त्री म्हणून तिची गय केली नाही. सुग्रीवाच्या पत्नीचे अपहरण करणार्‍या रामभक्त वालीलाही रामाने ठार मारले. वालीला बाण लागल्यावर त्याने श्रीरामांना प्रश्न केला, `` हे महाबाहो! सुग्रीवाइतकाच मीही आपला भक्त होतो. असे असूनही मला हे असे मरण का?'' श्रीराम उत्तर देतांना म्हणतात,

 ``मी राजा आहे. जेथे कोठे नियम मोडले जात असतील तेथे तेथे त्यांच्यावर कडक कारवाई करणे माझे कर्तव्य आहे. जेथे कोठे अत्याचार होत असतील ते दूर करणे दुष्टाला शासन करणे हे माझे कर्तव्य आहे. ते मी केले नाही तर त्या दुष्टांच्या पापाच्या दहाव्या हिश्शाचा मीही भागीदार ठरेन. एखाद्याची पत्नी पळवून नेणं हा मृत्यूदंड देण्यायोग्य अपराध आहे. तो अपराधी माझा भक्त जरी असेल तरी माझ्या त्या भक्ताला प्राणदंड देणं हे माझं कर्तव्य आहे.'' मृत्यूपंथावर असलेल्या वालीला श्रीरामांनी परखडपणे सुनावले. श्रीरामांचा न्याय ऐकून वालीच्या मनाचे समाधान झाले.

जंगलात अहल्या एखाद्या दगडासारखी भावनाशून्य होऊन जगत होती. तिचा अपराध नसतानाही पतिने त्याग करावा अशी नामुष्की ह्या पतिव्रतेवर आली होती. रघुनंदनाने तिच्याही जीवनात सुखाचे नंदनवन परत फुलवले.

रावणाने सीतेला जबरदस्तीने पळवून आणले होते. राक्षस  दुसर्‍यांच्या स्त्रियांचा अपहार करणे ह्याच अधर्माला आपला धर्म मानत असत. सीतेचे अपहरण करण्याच्या अपराधासाठी रावण आणि त्याची पाठराखण करणार्‍या सर्व दैत्यकुळाचा नाश करून श्रीरामाने  त्यांना असा धडा शिकवला की त्यानंतर  अनेक शतकं दुसर्‍याच्या स्त्रीला पळवून न्यायची राक्षसकुळातील कोणाचीही हिम्मत झाली नाही.

--------------------------------------

श्रीकृष्णाने सोळासहस्र स्त्रियांशी लग्न केलं म्हणून त्याची वग, गवळणी, कविता आणि असंख्य प्रकारच्या माध्यमातून नेहमीच काही ना काही थट्टा, हेटाळणी  केली जाते. सोळासहस्र बायकांचा दादला योगीश्वर कसा म्हणावा? अशी विनोदाची कारंजी उडवली जातात. ज्या भौमासुराने सर्व नियमांची पायमल्ली करून, सोळा सहस्र स्त्रियांना त्यांच्या इच्छेविरुद्ध, त्यांच्या सम्मतीची, मनाची पर्वा न करता, अन्यायाने, जुलुम जबरदस्तीने आपल्या जनानखान्यात डांबले, कोंबले त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढले; त्याच्याविरुद्ध संताप, चीड व्यक्त करणारे लेखन मात्र वाचनात नाही. ज्या हृषीकेशाने ह्या सोळाहजार स्त्रियांची नरकयातनातून सुटका केली तो मात्र बायकांमागे धावणारा बायल्या?

ह्या सोळासहस्र लावण्यवती कुठल्याना कुठल्या देशाच्या राजकन्या होत्या. कुठल्या राजांच्या भूतपूर्व राण्याही होत्या. कोणाच्या बहिणी होत्या, वहिनी होत्या, नातलग होत्या. एकदा का स्त्रीला पळवून नेलं  किंवा  तिच्यावर बलात्कार झाला की स्त्री नासवली गेली असं म्हटलं जातं. पण तो नासवणारा पुरुष मात्र कुणी नासका ठरत नाही. उलट तो शक्तिशाली, बलिष्ठ असल्याचंच एकमुखाने मान्य केलं जातं. दुर्दैवाने नरकासुरापासून किंवा त्याच्याही आधीपासून चालत आलेली ही परंपरा अगदी आत्ता आत्ताच्या नजिकच्या काळात अल्लाउद्दिन, अकबर, टिपू किती म्हणून किती नावं घ्यावीत? सलग चालूच राहिली आहे. ज्यांचा मोठ्याप्रमाणावर धिक्कार व्हायला पाहिजे होता त्यांच्या दुष्कृत्यांचा आजही काही लोक उदोउदो करताना दिसतात.

भौमाने पळवलेल्या स्त्रियांचे नातलग होते. अस्तित्वात होते. त्यांनी त्यांच्या ह्या प्रिय स्त्रीला सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले ह्याचा कुणी खुलासा मागत नाही. त्याचा इवलासा सुद्धा धागा इतिहासात सापडत नाही. सोळा हजार स्त्रियांचे नातलग आणि त्या नातलगांच्या सेना जर एकत्र येऊन, एकदिलाने, प्राणपणाने ह्या नराधम भौमासुरावर तुटून पडल्या असत्या तर काय बिशाद होती भौमाची कोणा स्त्रीकडे वाकड्या नजरेनी पहायची! पण तसं झालं नाही. प्राणपणाने लढायचे सोडाच पण अत्याचार झालेल्या बलात्कारित स्त्रियांना घरचा रस्ता बंद झाला. त्या कलंकित ठरल्या.

भीष्मांकडून अनवधानाने हरण केल्या गेलेल्या राजकुमारी अंबेस भीष्मांनी सन्मानाने शाल्वराजाकडे परत पाठवल्यावर भीष्मांकडून पराभूत झालेल्या, अहंकार दुखावला गेलेल्या शाल्वाने ``मी भीष्मांनी दान दिलेली वस्तू स्वीकारत नाही'' म्हणत अंबेला अक्षरशः लाथाडत स्वतःच्या पुरुषी अहंकाराचे आणि नामर्दपणाचेच प्रदर्शन केले. अंबा काय वस्तू होती? स्वतःच्या अहंकारापुढे त्याला स्वतःची (प्राणापेक्षा प्रिय?) प्रेयसीसुद्धा तुच्छ वाटली. अंबेला जिवंतपणी जाळून घेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. आजही अशा स्त्रियांना कलंकिता ठरवत लग्नाच्या बाजारात नाकारले जाते. इतकेच नव्हे तर आपल्या पित्याचे घरही बंद होते. ह्या सडक्या परंपरा, रीतींना धर्म कसे म्हणावे? हा तर उघड उघड अधर्म.

पिता, पती भाऊ ह्यांच्या डोळ्यादेखत, नाकासमोर उचलून नेलेल्या ह्या मुलींना त्यांचे पिता, पती, भाऊ वाचवू शकले नाहीत तर  त्यांच्या पिता, पती भाऊ यांचा समाजाने धिक्कार करायला पाहिजे कारण ती त्यांना लांच्छनास्पद बाब आहे. त्यांचा षंढ, नाकर्तेपणा जगासमोर उघडा करणारी बाब आहे. पण होते उलटेच. अशा भेकड, नामर्द, निर्दयी, अंधश्रद्ध लोकांना आजही समाज सामावून घेतो आणि बलत्कारित, ज्यांना खरोखरच आधाराची गरज आहे ज्यांच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे, कणखरपणे उभे रहायला पाहिजे, ज्यांना अत्याचारांच्या दलदलीतून सोडवायला पाहिजे त्या स्त्रिया मुलींनाच समाज दूर लोटतो. जन्मदात्या पित्याने नाकारलेल्या, सात जन्म साथ देण्याची शपथ घेतलेल्या पतीने ठोकरलेल्या, बहिणीच्या चारित्र्याची सदोदित काळजी वाहणार्‍या भावांनी पाठ फिरवलेल्या, सार्‍या समाजाने नाकारलेल्या स्त्रिया वाट पहात होत्या-- गोविंदाची. घनदाट काळोखात एकच आशेचा किरण त्यांना दिसत होता आणि तो म्हणजे, कंसान्तक, मधुसूदन श्रीकृष्ण! तोच आमची ह्या नरकातून सुटका करेल, आमचं जिणं नरकपुरी करून टाकणार्‍या ह्या भौमासुराला, ह्या नरकासुराला हाच त्रिविक्रम नरकाचा रस्ता दाखवू शकेल. सोळा सहस्र स्त्रिया प्राण कंठाशी आणून द्वारकाधीशाची वाट बघत होत्या. त्यांचा निरोप कोण पोचवणार? नारदाने त्रिभुवनभयहारी, भूमिभारापहारी श्रीमुरारीला नरकासुराच्या अत्याचारांची खबर पोचवली.   त्यांनी मनोमन घातलेली पूर्वेची आर्त हाक पश्चिमेला द्वारकाधीशाच्या  महालात घुमली. ज्या सोळासहस्र स्त्रियांचा आकांत बाकी कोणाला ऐकू आला नाही, ज्या सोळा सहस्र स्त्रियांवर केले जाणारे पाशवी अत्याचार कोणालाही दिसले नाहीत. किंवा दिसूनही प्रत्येक जण डोळ्यावर कातडे ओढून आणि कानात बोळे घालून तरी बसला होता, त्या सोळासहस्र  स्त्रियांच्या नरकयातना ऐकून हा दीनबंधू कळवळला. दैत्यांचा कर्दनकाळ असलेला अजेय जगदीश ``परित्राणाय साधूनाम् विनाशाय दुष्कृताम्’’ म्हणत सज्ज झाला.

 

``जायलाच पाहिजे, अत्याचार थांबवलेच पाहिजेत. नाहीतर हा भौमासुर अजून किती स्त्रियांचं जिणं हराम करेल सांगवत नाही. हा नराधम स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून मी आज ह्या शत्रूंना मारलं उद्या त्यांनाही मारीन. मी बलवान आहे सर्व सुखं ही माझ्यासाठीच आहेत. मीच त्यांचा उपभोग घेईन. ह्या भ्रमात आहे.

असौ मया हतः शत्रुः हनिष्ये चापरान् अपि

ईश्वरोऽहम् अहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी ।।

 

शत्रू मी मारिले माझे । रिपु मारीन अन्यही

श्रेष्ठ मी! ईश मी! सज्ज । बलवान सुखीच मी ।।

 

ह्या पाशवी वासनेचा अंत झालाच पाहिजे.'' असं म्हणत हा उग्रधन्वा महावीर निघाला. श्रीकृष्ण आणि श्रीरामात हेच साम्य आहे. अत्याचार कोठेही होत असो. अधर्माला दंड देणे आपले कर्तव्य आहे ही जाण ठेऊन त्यांनी अशा अधर्मी लोकांचा नायनाट केला आहे.

परिस्थितीचं गंभीर्य सत्यभामेने ओळखलं.  ``रणांगणावर जाणार असाल तर मी पण येते.'' म्हणत राणी सत्यभामाही तयार झाली. राणी सत्यभामा  युद्धात निपुण होती. सारथ्य करण्यातही तरबेज होती.

तरीही आजची वेळ वेगळी होती. सोळा हजार स्त्रियांचा प्रश्न सोडवायचा असेल तर राणीला आपल्या प्रजेचा आपत्याप्रमाणे विचार करायलाच पाहिजे. सतत दबावाखाली जगलेल्या, अधिकाराच्या वरवंट्याखाली सतत ठेचल्या गेलेल्या, अहंकाराच्या दर्पाने अत्याचारित, दडपशाहीने चिरडल्या गेलेल्या स्त्रियांना दिलासा  देऊन त्यांच्याशी आत्मीयतेने कोण बोलणारत्यांचे प्रश्न एका स्त्रीशिवाय कोणाला जास्त चांगल्याप्रकारे उमजणार? कित्येक निर्णय श्रीकृष्ण एकट्याने कसे घेऊ शकणार? त्यांच्या निर्णयाला पत्नी म्हणून माझी मान्यता लागेल हे जाणूनच सत्यभामा यदुनाथाच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती.

प्राग्ज्योतिषपुरच्या भौमासुराचा दरारा मोठा होता. भौमाकडे कुबेरापेक्षाही कितीतरीपट सम्पत्ती होती. भौमासुराचे राज्य अजिंक्य मानले जायचे कारण त्याच्या राज्याला जल, अग्नी आणि विद्युत्भारित तटबंदी होती. भौमासुराच्या राज्याला सर्व बाजूंनी उंच उंच पहाड तटबंदीसारखे काम करत. तटालगत असलेला खोल खंदक पाण्याने भरलेला होता. त्याच्या बाजूने सर्व सीमा विद्युत्भारीत असल्याने शत्रू आत येणे शक्य नव्हते. तो तेथेच जळून गेला असता. तरीही शत्रू आत आलाच तर त्याचा खातमा करण्यासाठी विविध यंत्रे तेथे  बसवली होती. भौमासुराला प्रत्युत्तर द्यायला श्रीकृष्णाकडेही त्या योग्यतेची शस्त्र, अस्त्र, तंत्र असलीच पाहिजेत; नाहीतर त्याचा टिकाव लागणे कठीण.

श्रीकृष्णाने सरळ तटबंदीवरच हल्ला चढवला. शिल्पशास्त्रविशारद म्हणजे ह्या सुरक्षा यंत्रणेचा नकाशा बनवून तो अमलात आणणारा मुर राक्षस तेथेच पाण्यामधे असलेल्या महालात विश्रांती घेत होता. द्वारकाधीशाच्या पाञ्चजन्याची हृदय विदीर्ण करणारी ललकारी ऐकून तो खडबडून उठला शस्त्रसज्ज होऊन बाहेर आला. मुर महाभयंकर दैत्य होता म्हणुन त्याला पाच तोंडे होती असे  म्हटले जाते. मुर क्रोधाने फुत्कारणार्‍या एखाद्या विषारी काळसर्पाप्रमाणे श्रीकृष्णावर धावून गेला. सिंहाने डरकाळी फोडावी असा भीषण आवाज मुखातून काढत हातातला त्रिशूळ वेगाने फिरवत महा भयानक वेगाने त्याने यादवरायावर हल्ला चढवला. पण सावध असलेल्या श्रीहरीने तात्काळ बाण सोडून त्याच्या त्रिशूळाचे तुकडे तुकडे केले. मुर आणि श्रीकृष्णात अत्यंत घनघोर युद्ध चालू झाले. मुराने मोठ्या आवेगाने गदा चालवायला सुरवात केली पण श्रीहरीच्या तीक्ष्ण बाणांनी तिचेही तुकडे तुकडे झाले. आत्तापर्यंत श्रीहरीच्या बाणांनी मुर घायाळ झाला होता. आता अस्त्रहीनही झाला. आपल्या दोन्ही भुजा पसरून तो श्रीहरीवर धावून गेला. तेंव्हा ह्या चक्रधराने आपलं सुदर्शन चक्र त्याच्यावर चालवून हसत हसत मुराचे शिर धडापासून अलग केले. मुर पडला. एखादा पर्वत समुद्रात कोसळावा तसा मुर पडला. ह्याच प्रसंगाने श्रीहरी आता मुरारी ह्या नावाने प्रसिद्ध झाले. पित्याच्या मृत्यूने त्याचे शोकाकूल झालेले पुत्र (ताम्र, अन्तरिक्ष, श्रवण, विभावसु, वसु, नभस्वान, अरुण) भौमासुराच्या आदेशानुसार पीठ नावाच्या दैत्याला आपला सेनापती बनवून विजयी श्रीहरी मुरारी वर चालून आले. पण कोणाचाही ह्या चक्रधर मुरारी समोर टिकाव लागला नाही. हे कळताच अत्यंत मदमस्त अशा हत्तीदळासह भौम स्वतःच श्रीहरीवर चालून आला. सत्यभामा सारथ्य करत आहे. साक्षात श्रीहरी मुरारी हातात सुदर्शनचक्र घेऊन उभे आहेत हे पाहून भौमाने शतघ्नी नावाची शक्ती श्रीहरी मुरारीच्या दिशेने सोडली. पण अनेक प्रकारचे बाण वापरून श्रीहरीने त्याच्या दिव्य शक्तीचे नुसते तुकडेच केले नाहीत तर बाणांचा वर्षाव करून भौमाला जायबंदी बनवले. आपलं काहीच चालत नाही पाहिल्यावर भौमाने गदा उचलली; पण सुदर्शनाने भौमाचं शिर धडावेगळं केलं. आपला राजाच पडला हे पाहून निर्नायक झालेली सेना पळत सुटली. त्याच्या सर्व सैन्यात  हाहाःकार उडाला. भगदत्त हा भौमाचा मुलगा अत्यंत भयभीत झाला होता. त्याला मुरारी श्रीहरीने अभय दिले. ह्या महावीराने जी जी युद्धे केली त्यात कोणतीही स्वार्थबुद्धी ठेवली नाही. कुठलेच राज्य त्याने स्वतः बळकावले नाही. उलट वध केलेल्या राजाचा जो योग्य वारसदार असेल त्याला त्याने परत राज्यावर बसवले आहे. `योग्य वारसदारही संकल्पना फार महत्त्वाची.

 जेथे सोळाहजार स्त्रिया बळजबरीने भौमाने ठेवल्या होत्या त्या भौमाच्या आलिशान महालातील कोंडवाड्यात श्रीहरीने प्रवेश केला. श्रीहरीचे अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्त्व पाहून दुःखाने पिचून गेलेल्या त्या स्त्रियांच्या मनाला उभारी आली. श्रीहरीच्या आणि राणी सत्यभामेच्या आश्वासक वागण्या बोलण्याने बोलायला धीर आला. सार्‍याजणी म्हणू लागल्या, ``हे अनाथांच्या नाथा, हे पतितपावना, हे दीनोद्धारा, हे महावीर, हे सर्वदर्शी, भौमाच्या पाशातून आम्हाला सोडविण्यासाठी आपल्याला शत शत नमन आणि धन्यवाद! पण हे श्रीहरी, आम्हाला भविष्य काय? कोणीच आम्हाला ठेऊन घेणार नाही. आमचे मागचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. आता आपल्या आधाराशिवाय आम्हाला कोणाचाच आधार नाही. आम्हाला वार्‍यावर सोडू नका. आपणच आम्हाला आश्रय द्या. आपणच आमचा स्वीकार करून आम्हाला स्थैर्य प्राप्त करून द्या. नाहीतर उडत्या पाखरावर ससाण्याने हवेतच झेप घ्यावी त्याप्रमाणे समाजात टपून बसलेले असंख्य दुर्जन आमची वाट लावतील. परत एकदा आमचं आयुष्य नरकपुरी सारखं दारूण होऊन जाईल.’’

श्रीहरीची लाडकी राणी सत्यभामा खंबीरपणे ह्या स्त्रियांच्या पाठीशी उभी राहिली. प्रजापालन हे राजाच पहिलं कर्तव्य आहे. राजाच्या कर्तव्य पालनामधे त्याच्या राणीने स्वतःहून पुढाकार घेणे ही केवढी मोठी गोष्ट! ह्या सोळाहजार स्त्रियांना प्रजाभावनेने पंखाखाली घेऊन त्यांचा व त्यांच्या अनौरस मुलांचा स्वीकार करून समाजापासून तुटलेला एक मोठा वर्ग समाजाच्या मूळ धारेत आणायला  तयार होणारी सत्यभामा मला कायम आदरणीयच वाटते. ह्या सर्व स्त्रियांचा, त्यांच्या अनौरस मुलांचा स्वीकार करून द्वारकाधीशाने त्यांचे पितृत्त्व स्वीकारले. आणि सत्यभामेने मातृत्त्व. ज्या क्षणी ह्या स्त्रियांना समाजात वावरण्यासाठी कुंकवाचा धनी म्हणून कृष्णाच्या पत्नीपदाचा दर्जा प्राप्त झाला त्याक्षणी त्यांच्याकडे हीनपणे बघण्याची समाजाची नजर बदलून आदरयुक्त झाली. दीन अनाथ लाचार मुले एका क्षणात सनाथ, कुलीन झाली.  हे कोणालाही मान्य करावे लागेल. सोळाहजार स्त्रियांना सनाथ करून त्यांना समाजामधे ताठ मानेने हा माझा पती आहे, हा माझा रक्षणकर्ता आहे, माझा पती सर्वश्रेष्ठ द्वारकाधीश आहे. असे सांगायला मिळणे हेच केवढे भाग्याचे. ह्या उदात्त घटनेला कोणी उपभोग आणि कामवासनेच्या खालच्या पातळीवरून बघत असेल तर ती त्यांची रूचीहीनता दाखवते. श्रीहरीच्या दिव्य विचारांना त्याने बाधा येत नाही.

ह्या सर्व स्त्रियांना उत्तमोत्तम वस्त्र, आभूषणे देऊन पालख्यांमधून द्वारकेला आणण्यात आलं. आजपर्यंत लढाई जिंकल्यानंतर राजाच्या विजयाचा डंका वाजवत हत्तीवरून निघालेल्या मिरवणुका आपल्या अनेक पूर्वजांनी अनेकवेळेला पाहिल्या असतील पण समाजाने पाठ फिरवलेल्या, अत्याचारीत स्त्रियांना इतक्या सन्मानाने, प्रेमाने, उजळ माथ्याने आपल्या घरी घेऊन येणारी ही मिरवणुक एकमेवाद्वितीयच म्हणावी लागेल. त्यासाठी स्वर्गस्थ देवांनी नक्कीच ह्या वासुदेव कृष्णावर , राणी सत्यभामेवर आणि ह्या सोळासहस्र स्त्रियांवर पुष्पवृष्टी केली असेल.

 पूर्वापार अनाथ मुलांना राजाने आपली मुले म्हणूनच सांभाळले आहे. ह्यासाठी कृप आणि कृपी उदाहरणही आहेच. पण स्त्रियांना? कधीच नाही. समाजात एक नूतन आदर्श परंपरा निर्माण करणार्‍या श्रीरंग-भामिनीला स्मरून त्यांचे दाखले देऊन आपले पूर्वज वागले असते, भारतातील लाखो पळवलेल्या, बाटवलेल्या , अत्याचारित स्त्रियांचा, मुलांचा परत स्वीकार केला असता तर आजचा भारत काही वेगळा असता.   

 भौमाची प्रचंड सम्पत्ती, तसेच ऐरावताच्या कुळातील अत्यंत बलशाली आणि वेगवान असे 64 पांढरे हत्ती द्वारकेला रवाना झाले. सोळाहजार स्त्रिया आणि त्यांच्या मुलांना जे कष्ट सोसायला लागले त्याचे एवढेतरी परिमार्जन व्हायला पाहिजेच ना! हक्काचं घर, योग्य सन्मान उपकाराच्या ओझ्यासारखा नव्हे तर सन्मानपूर्वक अत्मीयतेने मिळवून देणारा, सामर्थ्यशाली श्रीहरी हा खरा दीनबंधु होता. खरा भक्तवत्सल होता. ज्यांनी त्याला सखा मानलं, ज्यांनी त्याला जिवलग मानलं त्यांची त्याने कधीच फसवणूक केली नाही उलट त्यांच्यावर संकटे आल्यावर कायम तो त्यांच्या मदतीला पहिल्यांदा धावून आला आहे. त्यांची संकटे त्याने आपल्या खांद्यावर घेतली आहेत. उपकारांच ओझं वाटणार नाही अशाप्रकारे  कळत मदत केली आहे. त्यात स्त्री पुरुष असा भेदही केलेला नाही. हे सुदाम्याच्या प्रसंगाने सर्वांना माहितच आहे.

सामान्य प्रजाजन आणि राजा ह्यांच्या नीती, धर्मात वेगळेपण असणारच आणि असायलाही हवा. कामवासनेच्या आहारी जाऊन तीस तीस बेगमांचा जनाना ठेवणारा माणूस हा अत्यंत हीन दर्जाचा अधम असतो. परंतु सोळा हजार अपहृत स्त्रियांना आणि त्यांच्या मुलांना पोटाशी घेणारा, आपलं म्हणणारा राजा हा लोकोत्तर आणि आदरणीयच असतो. ही घटना भारताच्या  इतिहासातील एखाद्या सोनेरी पानासारखी अत्यंत अभिमानास्पद, अत्यंत अनुकरणीय  समजली पाहिजे.

पण हाय! पुढे श्रीकृष्णासारखा उदारचरित राजा अभावानेच झाला. मुसलानांनी केलेल्या प्रत्येक आक्रमणांमधे लाखो लाखो लोक, स्त्रिया, मुले भरडून निघाले. बाटवले गेले. बाटवणे, धर्मांतर ही कल्पनाच आपल्या सरळमार्गी धर्मात नव्हती. त्यामुळे बाटवलेल्या, अनन्वित अत्याचार झालेल्या स्त्रियांना परत आपल्या धर्मात घेण्यासाठी काही नियमच नव्हते. नंतर महर्षी देवल आाणि आचार्य मेधातिथिंनी तसे नियम केले आणि अनेकांना परत आापल्या धर्मात घेतले पण  अनेक राजांना जनमतापुढे झुकावं लागलं. राजांनी, महात्मा म्हणवून घेणारया नेत्यांनी आपल्या लाखो लाखो स्त्रियांकडे परत ढुंकूनही पाहिलं नाही. त्यांना नरकयातनात खितपत मरावं लागलं. ‘क्षमा शक्तस्य भूषणम्।’ म्हणत वारंवार सापांवर दया केली. पण स्वतःच्या कुलीन स्त्रियांची आमच्या पूर्वजांना दया आली नाही.

 

अनाठायी अहिंसा ह्या चीड यावी अशा दुर्गुणाने डसणार्‍या सापालाही क्षमा केली. पण!---  ‘‘आम्हाला धर्मात परत घ्या’’ म्हणुन वारंवार विनवणार्‍या लाखो लाखो हिंदू परिवारांकडे सपशेल पाठ फिरवणार्‍या दुबळ्या नीतीने असंख्य असंख्य स्त्रियांमुलांवर अत्याचारांची कमाल झाली. असंख्य लोकांना सक्तीने आणि शक्तीने बाटवले गेले. पण आपल्यावर जबरदस्तीने थोपवलेल्या अहिंसेचा पाठपुरावा करत त्यांना परत घरी घेण्याचे दरवाजे बंद करून टाकले गेले.

आजही आपल्या अत्याचारित, बलात्कारित, फूस लावून पळवून नेलेल्या, क्षणिक मोहात अडकून फसलेल्या आणि पश्चात्तापाने पोळलेल्या, धर्मबाह्य केलेल्या/झालेल्या आपल्या मुलींना सन्मानाने परत जवळ करण्याची जरुरी आहे. आमचा धर्म अमृतासारखा पाहिजे. कशानेही नासणारा. कोणीही कितीही प्रयत्न केला तरी आमच्या प्रजेला नासू देणारा. आमचा धर्म पाण्यासारखा पाहिजे.---- कोणीही कितीही लाठी मारली तरी न तुटणारा. परत प्रत्येकाला सामावून घेणारा. धर्माचे दरवाजे सदोदित ह्या पीडितांसाठी उघडे पाहिजेत. या आमच्या बंधुंनो, आमच्या माता बहिणींनो या, कधी काळी आम्ही तुम्हाला राक्षसांनी पळवून नेतांना नाही वाचवू शकलो. कधी काळी जाती जातीमधे विभागून आम्ही तुम्हाला दूर लोटलं. आज आमची मन अशी क्षुद्र राहिली नाहीत. आमचे विचार असे कोते राहिले नाहीत. हे तुमचे हिंदू भाऊ बहीणी तुम्हाला भेटायला आतुर आहेत. तुमच्या विना आमचा धर्म अपूर्ण आहे. आजही कृष्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपल्या धर्मात फोफावलेल्या ह्या दुर्विचारांच्या घातक विषवल्ली मुळासहित खंदुन काढल्या पाहिजेत.

आपण आपल मानसिकता बदलणार का; हा खरा प्रश्न आहे. ज्या गुणसदृश दोषांनी आपला विनाश ओढवला त्या आत्मघातक विचारांचे विवेकाने, स्थळ काळ वेळेप्रमाणे पुनर्मूल्याकन केले पाहिजे. जे अत्याचारित आहेत त्यांना  जवळ करून अत्याचार करणार्‍यांना आपण कठोर शासन केले तरच आपल्या धर्माला आणि हिंदूना गतवैभव प्राप्त होईल. आणि खरी दीपावली साजरी होईल.

-----------------------------------------

 लेखणी अरुंधतीची -

 

Comments

  1. फार छान आणि सुंदर mam 🙏

    ReplyDelete
  2. सुगम सोपी भाषा आणि खूप चांगले विवेचन.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती