पुडीचा कागद
पुडीचा कागद
माझ्या लहानपणी फुलपुडी हिरव्यागार पळसाच्या पानात बांधून यायची. देवाला
फुल वाहिली की, ते मऊ मऊ केसांची लव असलेलं पान लगेच टाकून देववत नसे. मुंबईला आलं
की फुलमार्केटमधे पळसाऐवजी गजरा कर्दळीच्या पानात गुंडाळून मिळायचा तर कधी केळीच्या!
सोनटक्क्याची नाजूक लांबदांडीची फुलं चाफ्याच्या किंवा कुठल्याशा कसल्याशा लांबट पानात
गुंडाळलेली असत. ही फुलांना लपेटणारी पानं जवळपासच्या जागांमधे मुबलक प्रमाणात उपलब्ध
असल्याचं ते प्रतिनिधित्व करत होतं; निदर्शक होतं. मुंबईला फूल-मार्केटपासून दूर रहायला
गेल्यावर नरिमन पॉइंट असो वा वाळकेश्वर असो वा चर्चगेट! फुलपुडी कागदात गुंडाळून यायला
लागली आणि लपेटणारी पानं महाग असावीत किंवा नसावीत किंवा जवळ असलेली केळी कर्दळ जाऊन
तिथे सिमेंटची जंगलं उगवल्याची पहिली वर्दी पुडीच्या कागदाने दिली. हळु हळु त्याचीही
सवय झाली आणि पुडीच्या कागदाशी कधी मैत्री जोडली गेली हे कळलच नाही.
पुडीचा कागद हा माझा फार आस्थेचा विषय झाला. फुलपुडी असो नाहीतर छोट्या
मोठ्या गोष्टीला लपेटून आलेला कागद; मी कधी लगेच फेकून देत नाही. गडबडीत असेल तर तो
कागद जरा सरळ करून त्याची घडी घालून एखाद्या कोपर्यात खोचून ठेवते. थोडा वेळ मिळाला
की तो उघडून बघते. कधी तरी पाच स्टारवालं सूडोकू असलं तर पुढचा काही वेळ सूडोकू सोडवण्यात
घालवणं हा माझा विरंगुळा असतो. कारण ते सोडवायचा त्रास कोणी घेतलेला नसतो. मोठ्ठ्या
वृत्तपत्रापेक्षा हा छोटा तुकडा हातात सांभाळायला सोपा जातो. येता जाता इवला टिवला
मजकूर वाचून होतो.
नुकता नुकता भूतकाळात गेलेला वर्तमान (Immediate past) घेऊन येणारा
हा तुकडा कधी कधी गेल्याच आठवड्यातील बातमी पुन्हा मनावर ताजी करतो. अरे खरच की! आठवड्यापूर्वीच
ही घटना घडली तेव्हा, मी `काय भयंकर बातमी आहे, पुढचे वर्षानुवर्ष पुसली जाणं कठीण
आहे’ असं म्हटलं होतं; पण काय वेगानी विसरले मी! म्हणत मी त्या चिठोर्यावरची अर्धीच
बातमी परत वाचून काढते. परत तो विषय मनात ताजा करते. नेमकी अर्धी बातमी पुढे 12 व्या
पानावर असते. जी मला वाचायला मिळणार नसते. तसं काही बिघणार नसतं बातमी माहित असते.
पुडी बांधतांना वेडावाकडा झालेला, सुरकुतलेला
कागदाचा तुकडा माझ्याशी काय काय बोलत असतो. बरेच दिवस फुलपुडीला बांधून येणारा कागद
मुलांच्या फुलस्केप वहीचा, परीक्षेचा पेपरचा यायला लागला की मला आजूबाजूला असलेल्या
शाळांची माहिती आणि महती सांगत असतो. मुलांच्या परीक्षा होऊन गेलेल्या दिसताएत. सुट्टी
चालू असावी म्हणूनच सर्व रद्दी बाहेर निघाली असावी. उत्तर तपासून दिलेले मार्क पहायच्या
आधी मी मुलांनी लिहीलेली उत्तर वाचते. फार मौजेच असतं. कधी गालाल्या गालात हसू येतं
तर कधी अरे ह्या विद्यालयात जाऊन ह्या मुलाला भेटता येईल का? अशीही उत्सुकता वाटते.
न पाहिेलेल्या मुलानी छान सुवाच्य अक्षरात लिहीलेलं पत्र, शाळेत चालू असलेल्या सुलेखन
वर्गात प्रवेश देण्यासाठी मुख्याध्यापक कापरे सरांना केलेला अर्ज असतो. मागे save
water विषयावर भाषण मला आजूबाजूला असलेल्या मराठी शाळांची माहिती देतो; त्याप्रमाणे
मराठी शाळेत जाणारी गरीब वस्तीतील मुलं इतकी सुंदर लिहू शकतात पाहून जीव ही सुखावतो.
ह्या शाळेत जाऊन भेटूनच यावं कापरे सरांना असं वाटायला लागतं. कधी एकदम जवळपासच्या
चेस्ट हॉस्पिटलचा फॉर्म वाचतांना इथे जवळ चेस्ट हॉस्पिटलही आहे बरका म्हणून मला नवीन
माहिती देतो. मी त्याच्यावरचा फोन नं माझ्याकडे सेव्ह करून ठेवते.
कधीकाळीच्या अगम्य जागांवर फ्लॅटस् बंगले, फार्म हाऊसेस आजच बुक कराच्या
जाहिराती आता सर्व जागा सुगम झाल्याची नोंद मनात करतात तशी लोकसंख्येच्या लाटांखाली
किती जमिन पोटत घेतली जात आहे हयाचेही भय दाखवतात. लोकांच्या खिशात खुळखुळणारी श्रीमंती
मजा करणयाइतपतच वाढली आाहे त्यातून नवनिर्मितीचा ध्यास लागलेला नाही हेही सांगतात.
वर वधू पाहिजेच्या जाहिरातीमधील मुलामुलींच्या शैक्षणिक डिग्र्या समाजातील
शैक्षणिक प्रगतीची चढती भांजणी दाखवत असतांनाच; पत्रिका पाहणे आहे असा काहीसा मजकूर, मुलामुलींची वयं समाजातील आ वासून
उभ्या असलेल्या नवीन समस्येची भयानकता मांडत असतात.
कधी फिल्मफेअरसारख्या इंग्रजी वर्गवारीत मोडणार्या चित्रांमधून गुंडाळून
येणारी फुलं मला बाहेर वावरणार्या ब्युटीपार्लर-सुंदरींच्या जगात आल्याची जाणीव करून
देतात. तीच चित्र हिंदी मासिकांवरच्या कागदात आली की, जवळपासच्या राज्याबाहेरून आलेल्या
लोकसंख्येची, लोकस्तराची, लोकरुचीची माहिती देत राहतात; तर सध्यानंद प्रकारात मोडणारा
फुलांभवती लपेटलेला कागद, आनंद शोधता शोधता आयुष्याच्या संध्येसमीप आलेल्या मेटाकुटीच्या
आयुष्यांची चाळ वा अनधिकृत वस्ती जवळच असल्याचं सांगत असतो.
आंबेवाल्यानी कितीही ठासून सांगितलं की, आंबा देवगडचा आहे तरी मी पेटीतला
कागद बघत असते. कागदावर चकल्या दिसल्या की आंबा मद्रास जवळ दक्षिणेकडून तर उर्दु पेपर
असेल तर हैद्राबादच्या जवळून आला आहे आणि गुज्जु पेपर दिसला की तो बलसाडचा आहे हे वेगळं
सांगायला लागत नाही. महाराष्ट्र टाइम्स कोकणाची खूण सांगून जाते. त्यामुळे हापूसचे
आंबे देवगडचे का मद्रासचे का बलसाडचे हे ठरवायची ही सोपी पद्धत मला आवडते. पुडीचा कागद
खोटं बोलत नाही.
राजा हरिश्चंद्राची एक गोष्ट ऐकली होती. राजा एकदा शिकारीला गेला असता
वाट चुकतो. जवळ असलेल्या एका अंध ऋषींच्या आाश्रमात येतो. ऋषी कोण आहे विचरतात. ऋषी
भूत भविष्य, वर्तमान जाणतात हे कळल्यावर तो त्यांना स्वतःची ओळख एक वाटसरू इतकीच करून
देऊन त्यांना आापला हात पाहण्याची विनंती करतो. त्याचा हात हातात घेताच ऋषी हसतात आणि
म्हणतात, राजा, तू कितीही लपवलस तरी तुझा हात खोटं बोलणार नाही. तू राजा आहेस हे तू
न सांगता तुझ्या हातावरच्या रेषांच्या स्पर्षातून मला कळलं.
त्याप्रमाणे पुडीचा कागद मजकुरातून असंख्य गोष्टी सांगत असतो. आजूबाजूचा परिसर, तेथील आर्थिक स्थिती, सामाजिक
परिस्थिती-------बरच काही अजूनही! बदली सोबत अनेक घरं बदलतांना पुडीसोबत येणारा कागदही
बदलत जातो. पुडीसोबत सामना येतो का लोकमत का सकाळ का पुढारी का आणखी कोणता हे मी रहात
असलेल्या गावाप्रमाणे बदलत राहतात आणि त्याप्रमाणे तिथल्या लोकांची वस्तीही! पुण्याला
मिंट मधे गुंडाळलेली फुलपुडी मला जवळ बरेच `टेकी’ तरूण असल्याचं सांगते तर मुंबईला
आपण साऊथ मुंबईत असल्याची ग्वाही देते. एकदा मला हवा असलेला पत्ता आमच्या ड्रायव्हरनी
मला आाणून दिला. एका दुकानदारानी त्याच्याकडच्या
एका चिटोर्यावर लिहून दिला होता. ड्रायव्हरनी तो मला दिला. चिटोर्याच्या पाठीमागे
गुरुमुखी पाहून मी त्याला विचारलं ``गुरुद्वारा आणि शीख वस्ती आहे का तिथे?’’ ``हो!
तुम्ही कधी गेला होता तिथे?’’ त्यानी मला विचारलं. मी इवलासा चिटोरा वाचत नसते तर त्या
त्या परिसराची लोकसंख्येची नस आणि त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची धडधड ऐकत असते, अनुभवत
असते. तो तुकडा मला तेथील डेमोग्राफी लख्ख सांगत असतो.
जोपर्यंत वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स वा तत्सम ब्रेनवॉश करणार्या
इथल्या न्यूजपेपरमधे बांधलेली फुलपुडी येत नाही तो पर्यंत, भारतातील मोठ्याप्रमाणात
असलेले जनसामान्य भारतीय भाषांमधे सर्व व्यवहार सुरळीत, आरामशीरपणे करत राहतील ह्या
कल्पनेनी मी आश्वस्त असते. हारवर्डहून सोडलेल्या जहरिल्या सापांनी कितीही फुत्कार टाकले;
इंग्रजी विद्वानांनी त्याच्या विद्वत्ता कितीही पाजळल्या आणि भारताचे तुकडे करण्यासाठी
कितीही इंग्रजी आडकित्ते हाती धरले तरी अजून
तरी काहीकाळ प्रजा सुरक्षित असल्याची भावना मला क्षणभर तरी सुखावते.
------------------------
लेखणी अरुंधतीची -
Comments
Post a Comment