साद देती हिमशिखरे

 

साद देती हिमशिखरे

             ``कुंगा, हिमालयाच्या आणि जगातल्या सर्वोच्च शिखरावर - - एव्हरेस्टवर तू चढलीस त्या क्षणी कसं कायं वाटलं गं तुला? सर्वप्रथम काय विचार मनात आला? '' मी राहून प्रश्न विचारला.

 ''काही  नाही! - - - कधी एकदा खाली येते असं वाटलं !'' कुंगा भुतिया सहज बोलून गेली. आणि नंतर आपण काही भलतच तर बोलून नाही ना गेलो ह्या भावनेनी तिने लांब जीभ काढून लाजत तिचे चिमुकले डोळे आणि तिचा हसरा चेहरा हाताने झाकून घेतला. मला वाटलं on the top of the world! I did it!! किंवा जितं मया!,  - - -असं काही म्हणेल. -  काल घोरपडीसारखे कडेकपारीला घट्ट नखं रुतवणारे तिचे पंजे आज बालसुलभ वृत्तीने तोंड झाकून घेत होते आणि डोंगरी एडक्यासारखी सराईतपणे चढून जाणारी पावलं, आज पावला खालची नसलेली माती उकरण्याचा प्रयत्न करत होती. कळीसारखी नाजुक पोर- - -तिच्याकडे बघून कोणाला वाटणारही नाही की काल ही एव्हरेस्टच्या शिखरावर उभी होती. - -तिच्या चारपाच साथीदारही तिच्या बरोबर होत्या

           10 मे 1993 ला  Indo Nepali Woman's Expedition तर्फे बच्चेंद्री पालच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट चढायला निघालेल्या या मुली असा काही  अचाट पराक्रम करून येतील असं कोणाला वाटलंही नसेल. किंबहुना तसं वाटलच नव्हतं. उलट त्यांच्या किरकोळ शरीरयष्टीकडे पाहून, “ह्या काय एव्हरेस्ट चढणार आहेत? एव्हरेस्ट म्हणजे खाऊ आहे का? भल्या भल्यांना त्याच्यापुढे माघार घ्यायला लागते.” अशी अनेक प्रकारे त्यांची हेटाळणीच झाली होती. पण कमळाला कुठे त्रास होतो बेडकाच्या ओरडण्याचा? त्याचं लक्ष फक्त सूर्याकडेच असतं. सूर्य हसला की ते हसतं. एका वेळेला सात जणी चढल्या एव्हरेस्ट. डिकी डोल्मा फक्त अठरा-एकोणीस वर्षांची. कुंगा भुतिया तिच्यापेक्षा दोन-तीन महिन्यांनी मोठी. दीपु शर्मा वीशीला स्पर्श करणारी. निमा डोल्माही अशीच! एव्हरेस्ट चढण्यासाठी करावा लागणारा  `advanced course in mountaineering' करताच डिकी डोल्माने एव्हरेस्ट सर केलं. पुढच्या वर्षी 94 मधे तिने तो कोर्स पूर्ण केला.  पण एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी ही मुलगी हिमाचल मधील लाहोल स्पितीला असलेल्या तिच्या छोट्याशा खेडेगावातही कधी जाऊ शकली नव्हती. हिवाळ्यात तीस-चाळीस फूट बर्फ पडणार्‍या या सुदूर गावात  तिच्या नातेवाईकांना त्यांच्या डिकीनी केलेला जागतिक पराक्रम कळलाही नव्हता. आज जवळ जवळ बावीस वर्षांनतंरही एव्हरेस्ट चढून जाणारी सर्वात कमी वयाची गिर्यारोहक महिला हा तिचा किताब कोणी हिरावलेला नाही. तर बच्चेंद्री पालने दुसर्‍यांदा एव्हरेस्ट सर केल्याचा विश्वविक्रमही अद्भुतच होता. तोही अजून अस्पर्शितच आहे. तिसरा विक्रम म्हणजे, सात महिलांनी एकाचवेळी एव्हरेस्ट चढायचा विक्रम - - कोहिनूरसारखा एकमेवच!

               ह्या सगळ्या बालिका एव्हरेस्ट मोहिम फत्ते करून दिल्लीला आल्या होत्या. पंतप्रधान, राष्ट्रपती यांना भेटून आमच्याकडे आल्या होत्या.त्यांच्या Expedition मधे त्यांची काळजी घेणार्‍या सरस्वतीमॅडम त्यांना आमच्याकडे घेऊन आल्या होत्या. शहरी हवेचा स्पर्श झालेल्या, देशाच्या कुठल्याशा कानाकोपर्‍यात राहणार्‍या या मुलींना मोठ्या फिसर्सचाही सहवास मिळावा म्हणून! पण प्रत्यक्षात आम्हालाच त्या ग्रेट भेटीचं अप्रूप मोठ्ठ होतं.

 ज्या सहजपणे एव्हरेस्टवर पाय रोवून उभ्या राहिल्या त्याच सहजतेने जमिनीवर वावरत होत्या. राष्ट्रपतींनी भेटायला बोलावलं म्हणूनही त्या चढून गेल्या नव्हत्या किंवा आमच्याकडे यायचं म्हणून हरखून गेल्या नव्हत्या वा नाही ही म्हणत नव्हत्या.

हिमालयाच्याच कुशीत राहणार्‍या या मुलींना हिमालयाच्या कडेखांद्यावर चढतांना हिमशिखरांची साद ऐकू येत राहिली आणि `जाऊन येते गं आई मी मैत्रीणीकडे' अशा सहजपणे त्या गिरीजा हिमशिखरांना भेटायला निघाल्या. हिमालयानेही त्यांची कडक परीक्षा घेतली. हिमवादळं, कडे कोसळणं, हिमपात ह्या सगळ्यापुढे त्यांचा मनाचा निर्धार मोठा ठरला. अजूनही मी मनाशी विचार करत होते की त्यांचा कोणता गुण मोठा? निर्धार का अनन्यभाव?

            विचारांच्या एका थांब्यावर विसावत मन म्हणालं - -- - - खर तरं त्यांचा अनन्यभावच मोठा! वासराला गायीवाचून जगच नसतं. वासराच्या या एका गुणामुळेच गायीला त्याच्याविषयी प्राणापलीकडे प्रेम असतं.  त्या सगळ्याजणींमधील सामाईक असलेली एक गोष्ट राहून राहून मनाला वेधून घेत होती. हिमालयातून वाहणार्‍या एखाद्या प्रसन्न झर्‍यासारखा पारदर्शीपणा! कुठलाच अहंकार, अभिमान, भय, चढाओढ, - -या कशाचाच स्पर्श त्यांना झाला नव्हता. आणि म्हणूनच त्याच्या वागण्यातला सहजपणा मोहक होता. हिमालयाविषयी असलेल्या अनन्यभावामुळेच हिमालयाच्या कडे खांद्यावर त्या एखाद्या निर्झरासारख्या बागडत होत्या. आणि त्याच वात्सल्याने तो हिमालय त्यांना जपत होता. मांजराचे दात पिलाला कुठे लागतात?

आयुष्यात पहिल्यांदाच कोणाचा तरी हेवा वाटला मला. त्यांच्यासारखं नितळ पारदर्शक अनन्य मन आपल्यालाही पाहिजे असं वाटलं. -- - - निसर्गानी घातलेल्या सादेला सहज प्रतिसाद देणारं? - -नाही -- नाही - - -निसर्गाशी एकरूप झालेलं!

------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -