विचारांचा जन्मोत्सव

 

विचारांचा जन्मोत्सव

प्रोफेसर श्टायनर विचारत होते, `` तुम्हाला विचार केंव्हा सुचतात? '' आत्तापर्यंत हा प्रश्न मला कोणी कधीच विचारला नव्हता. आपल्याला  विचार सुचण्याची काही खास वेळ आहे का? आणि असली तर कोणती?  असा विचार मीही केला नव्हता.  किंबहुना विचारांना इतकं महत्त्व आपण आत्तापर्यंत कधीच कसं दिलं नाही असं नव्यानी वाटलं.  आपल्याकडे विचारात गढलेल्या माणसाला तंद्रीबहाद्दर ठरवलं जात.

मला अचानक नाटककार राम गणेश गडकरी आठवले. लोकांनी वेळी अवेळी येऊन त्रास देऊ नये म्हणून अनेकवेळेला ते घराच्या दरवाजाला पाटी लावून ठेवत की , ``गडकरी घरात नाहीत. किंवा गडकरी कामात आहेत.'' एकदा ते त्यांच्या घराच्या सज्जात शांतपणे बसले होते. मनात विचारांची अनेक आवर्तनं चालू होती. त्याचवेळेला बाहेरची पाटी वाचून एका गृहस्थाने त्यांना टोकलं, `` अहो गडकरी तुम्ही तर घरातच आहात की.'' तेही शांतपणाने म्हणाले हो पण मी खूप कामात आहे.'' ``तुम्ही तर शांतपणे मजेत बसलेला आहात'' - तो `` मी जेंव्हा शांतपणाने बसलेला असतो तेंव्हाच खूप कामात  असतो. ''  गडकर्‍यांच्या वाक्यात विचारांच्या जन्मोत्सवाला दिलेलं महत्त्व आज मला प्रकर्षाने जाणवत होतं.

 प्रोफेसर श्टायनर हे प्रवीणचे अमेरीकेतील ड्यूक विद्यापीठाचे प्रोफेसर. त्यांनी शिकवलेले रोचक किस्से प्रवीण मला सांगत असे.  त्यांचा विचार करण्याचा एक पूर्ण वेगळा angle, 180 अंशात फिरलेला नवीन दृष्टीकोण मला फार आवडे. प्रवीणनेही `अरुंधतीला तुमचं लेक्चर आवडत' असं सांगितल्यावर त्यांनी मोठ्या आग्रहाने मला रोज त्याच्या लेक्चरच आमंत्रण दिलं. त्यांच्या तासाला मलाही घेऊन यायला सांगितलं आणि नंतर मीही त्यांच्या लेक्चरर्सना जाऊ लागले. कधी कधी आपण असे रोज कसे जावे ह्या विचाराने मी गेले नाही तर ते  प्रवीणला घरी पाठवून मला घेऊन यायला सांगत. (त्यावेळी आमच्याकडे मो.फोन नव्हते.)

 प्रोफेसर कधी कधी सर्व मुलांना (7-8) घरी जेवायला बोलवीत. त्यांची पत्नीही हुशार होती. तिचीही पुस्तके छापली गेली होती. (असं सांगायच कारण म्हणजे तेथे publish or perish ह्या म्हणीची शिक्षणजगतात फार कडक अम्मलबजावणी होते. ) एखाद्या भारतीय सुगृहीणीप्रमाणे ती सांगत होती की, ``श्टायनरना मुलांना घरी जेवायला बोलवायला फार आवडतं. जेवणाच्या टेबलावर होणारा अभ्यासाचा तास हा विशेष रोचक आणि नवनवीन विचारांचा असतो.'' (झालंही तसच. नवनवीन विचारांचा पाऊस पडला.)  ``मी गेली 40 वर्ष मुलांचं असं हे जेवण, भांडी घासणे आणि नंतर टेबलक्लॉथ आणि टेबलमॅटस् धुणे आणि इस्त्री करणे हे काम करत आहे. मला आता त्याची सवयच झाली आहे. आता मात्र आमची वय पाहून मुलं अनेक पदार्थ बनवून आणतात.'' दोघांनी पंचाहत्तरी ओलांडली होती.

प्रो. श्टायनर सांगत होते, `` मी एकटाच पहाटे जंगलात (तेथे woods ही कल्पना परिचित आहे. ) लांब फिरायला जातो.'' `` खर तर तुम्ही मॅडमनाही घेऊन जायला पाहिजे.'' त्यांच्या वयाचा विचार करीत प्रवीण म्हणाला. ``नाही-- नाही! मी एकटा असतांनाच मला नवनवीन विचार आणि कल्पना सुचतात. '' प्रोफेसरांच्या पत्नीनेही हसून दुजोरा दिला. ``मला मात्र आम्ही दोघंजणं फिरायला गेलो की विचार सुचतात.'' प्रवीण म्हणाला. एवढ्या वर्षात त्याचा माहित नसलेला एक नवीन स्वभाव-विशेष एवढ्या वर्षांनंतर मला कळावा ह्याचं माझंच मला आश्चर्य वाटलं.

मी विचारांचा विचार करत असतांनाच माझ्या मनातील अनेक गोष्टींची दालनं प्रो. श्टायनरनी उघडली होती.

एक लहान मुलगा गावातील तंटे बखेडे फार उत्तम रित्या सोडवतो अशी वार्ता एका दूताकरवी भोज राजाला मिळाली. मोठ्या कुतुहलाने वेष पालटून राजाही दूतासोबत त्या गावात गेला. खरोखरच एक दहा बारा वर्षांचा मुलगा एका शिळेवर मोठ्या ऐटित बसून दोन्ही बाजूंचा सर्व युक्तिवाद ऐकून घेऊन मोठ्या धैर्याने त्यांना उलटतपासणीचे अचूक प्रश्न विचारत होता. थोड्याच वेळात कोण योग्य आहे हे समोर येत होते. मुलगा उत्तम न्यायदानाचे काम करत होता.

त्या मुलाचे काम संपल्यावर झाडाआडून पाहणारा राजा पुढे आला आणि त्या मुलाला त्याच्या अलौकिक प्रतिभेचं रहस्य विचारू लागला.  मुलगा म्हणाला, `` नक्की मला सांगता येणार नाही पण ह्या शिळेवर बसलं की मला योग्य विचार स्फुरू लागतात. आणि मला न्याय्य आणि अन्याय्य बाजूंचे चांगले ज्ञान होते. '' राजालाही आश्चर्य वाटलं आणि तोही त्या शिळेवर बसला. काय आश्चर्य राजालाही राज्यसुधारणेच्या अनेक नवनवीन कल्पना मनात येऊ लागल्या. लोक-कल्याणाचे विविध उपाय दृष्टिपथात येत आहेत असं वाटायला लागलं. शिळेवरून उठल्यावर मात्र ते सर्व विचार थंडीत आकाशात विरून जाणार्‍या अभ्राप्रमाणे विरूनही गेले. राजाने दोन-तिनदा ह्याचा अनुभव घेतला आणि त्या शिळेखाली खोदकाम करायचा निर्णय घेतला. खूप खोदल्यावर त्याला सोन्याच्या 32 पुतळ्या जडवलेलं सुवर्ण सिंहासन सापडलं. ते सिंहासन अत्यंत गुणी आणि न्यायी राजा विक्रमादित्याचं होतं.

विक्रमादित्य मरण पावल्यावरही जणुकाही त्याच्या न्यायीपणाचा, त्याच्या सत्शीलतेचा अंश त्या सिंहासनात उतरला होता की जो त्याच्यावर बसणार्‍या कोणालाही नुसत्या दुर्विचारांपासून दूरच करत नव्हता तर त्या व्यक्तिच्या मनात न्यायी आणि सद्विचारांचा झरा निर्माण करत होता.

छोट्याशा ध्रुव बाळाची खडतर तपस्या पाहून विष्णू प्रसन्न झाले त्यावेळेला त्याला आपण ह्या भगवान नारायणाची स्तुती तरी कशी आणि काय करावी हे उमगेना. त्यावेळेला विष्णूने आपल्या हातातील शंखाचा स्पर्श ध्रुवबाळाच्या गालाला केला. त्याच्या निःशब्द मनात विचारांचा झरा वाहू लागला. `योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां -- --' अशी सुंदर स्तुती त्याच्या मुखातून बाहेर पडली.

2000 साली प्रवीण नागपूरला असतांना गजलाकार कविवर्य सुरेश भट अनेक वेळेला त्यांच्या मनात आलं की आमच्याकडे गप्पा मारायला येत. प्रवीण नसला तरी हक्काने बर्‍याचवेळ गप्पा मारून जात. ``एवढ्या मोठ्या गावात गप्पा मारायला मला एकही माणूस मिळत नाही तुझ्याशी गप्पा मारून बरं वाटतं'' म्हणत. मीही जरा हसून त्यांचे शब्द फार मनावर घेत नसे. प्रवीण आणि मी सर्व कामे घरीच करतो हे पाहून त्यांना आश्चर्य वाटे. एकदा त्यांनी आमच्या दोघांवर उत्स्फूर्तपणे केलेले काव्य ऐकून ( जे मी लिहूनही घेतले नाही याचे आज वाईट वाटते.) मी जरा अवघडून त्यांना म्हटले भटसाहेब माझ्यावर काव्य करू नका. मी काही कोणी ग्रेट माणूस नाही. ते ऐकताच उसळून ते म्हणाले, ``माझी प्रतिभा तुझी बटिक नाही. ती मुक्त आहे. तिने केंव्हा स्फुरण पावावं, प्रकाशित व्हावं आणि केंव्हा नाही हे तू सांगू शकत नाहीस.'' दबून घाबरून गप्प बसले मी. पण आज त्यांच्या म्हणण्याचा अर्थ मला कळायला लागला. ``तुझ्याशी बोलतांना मला नवननीन विचार सुचतात. तूही लिहीत जा. एका अर्थाचे अनेक शब्द सतत आठवत रहा.''  असं ते का म्हणायचे ते आज थोडं थोडं कळायला लागलय.

 कवी बा. भ. बोरकर झोपतांना सुद्धा जवळ एक कागद पेन ठेवत. कधी कधी रात्रीच नव विचारांनी, नवीन कवितेच्या ओळींनीच जाग यायची आणि तेही त्या ओळी अंधारातच जशा जमतील तशा कागदावर उतरवून ठेवायचे. कारण विचारांचं प्रकटीकरण इतक्या अल्प अवधीत होऊन जातं की दिवा लावायला उठलं तरीसुद्धा मनातले विचार कापरासारखे उडून जातात. परत आठवत नाहीत. त्यांनी केलेला मेघदूताचा अनुवाद एका श्लोकासाठी अडला होता. काही वर्षे ते काव्य तसेच पडले असतांना अचानक रात्री त्या श्लोकाचा अनुवाद म्हणतच ते उठले.

ग.दि.मा. आणि पाडगावकर बसमधे असतांना बसमधल्या धामधुमीतही तिकिटाच्या मागच्या बाजूवरही काव्यपंक्ति लिहायचे.

 दुर्गाबाई भागवतही अंतिम श्वासापर्यंत स्वतःजवळ कागद पेन ठेवत. प्रतिभेचं स्फुरण कधी होईल सांगता येत नाही.

आता मीही माझ्यावर लक्ष ठेऊन होते. मला काही नवीन विचार सुचतात का? कधी? काही नक्की वेळ? माझं लक्ष आहे पाहून माझं मनही दोन दिवस मला गुंगारा देत राहिल. आणि हे काय?  एका बेसावध क्षणी माझ्या लक्षात आलं, पॉपकॉर्नच्या मशीनमधून लाह्यांचा ढीग ओसंडून जावा तशा विचारांच्या लाह्या माझ्या मनातून ओसंडून जात आहेत. अत्यंत घाई गडबडीच्या वेळेला, प्रवीणला इतक्याच वाजता जायचं आहे, हातात पंधराच मिनिट आहेत, स्वयंपाक बनवत आहे मी. पोळ्या भराभर लाटतीए -- - हे काय! माझे हात काम करताएत. हाताच्या वेगासोबत माझा मनाचा वेगही वाढतोय. पण मी एका ट्रॅकवर आणि ते अस कस भलत्याच ट्रॅकवर भरधाव वेगाने धावतय? मनाने सरळ सरळ बगावत केलेली. एवढा द्रोह! एवढी बंडखोरी? मी भराभर पोळ्या लाटतीए. पाहुण्यांसकट लोक जेवायला बसलेले आहेत आणि माझ मन आनंदाने हिंदोळ्यावर झोके घेत विविध विचारांचा जन्मोत्सव साजरा करतय! फार भयंकर! मना माझ्याशी एवढा असहकार!

मन शांतपणे म्हणाल,``मला तुझी बटिक समजलीस काय; तू म्हणशील तसं वागायला? पूर्वी तुला ही साधी साधी कामंही येत नव्हती तेंव्हा प्रत्येक गोष्ट तू मला विचारून करायचीस. सतत मला सल्ला विचारायचीस. मीठ किती घालू? साखर किती घालू? प्रत्येक कामात तुला माझी मदत लागायची. आता तुला घरकाम करतांना माझ्या सल्याची जरुरी वाटत नाही. तुझ्या हातांना माहीत असतं काय केंव्हा करायचं आहे. नजरेला अंदाज असतो मीठाच्या दाण्यादाण्याचा, कळत असतं तुला मी न सांगता किती वेळात कोणतं काम होणार आहे. किती वेळ, किती मिनिटं अजून लागणार आहेत. तुझ्या कामाच्या मधे मधे येणारे फोन, बेल, ---- सगळ्या सगळ्याचा तुला अंदाज आला आहे. मेंदूत सर्व प्रोग्रॅम्स लोड करून झालेले आहेत. आता माझं काय काम?''

``पण मी कसा स्वस्थ बसणार?  गांजा प्यायलेल्या माकडाला स्वस्थ बसायला सांगता येईल का?  वार्‍याला बांधायला कोणी दोर बनविल्याचं ऐकिवात आहे का? मी कसा स्वस्थ बसणार? एकवेळ माजलेल्या रेड्याला वेसण घालणं सोप आहे. मला नाही. मदमस्त झालेल्या हत्तीला साखळदंडांनी बांधण एकवेळ जमेल. मला नाही. माझा तिळपापड होत होता. मी नको नको ते विचार करून तुला भंडावून सोडत होतो. मग तू घरात जिकडे तिकडे चिटोरी चिकटवलीस कवितांची, स्तोत्रांची, श्लोकांची. मला काम लावून दिलस. पाठांतराचं! त्या शब्दाशब्दावर मी विचार करतोय. आता तू तुझं काम कर मी माझं.'' मी गोधळून गेले. असं का होतय? माझ्या मनानं  कधीच फारकत घेतली आहे माझ्यापासून. मला कस कळलं नाही? हिंडत असतं कुठल्या कुठल्या बेटांवर. रोज नवनवीन विचारांचे जन्मोत्सव साजरे करत. त्याचं आणि माझं जगच वेगळं आहे.

रात्री झोपेशिवाय तळमळत असतांना मनाने उठवलं. ``उठ!'' ``कुठे?'' ``चल मी सांगतो.  आज मित्र होऊ एकमेकांचे. ही लेखणी घे हातात. आजपासून ही अरुंधतीची लेखणी. तू काम करत रहा मी जग बघत राहीन. आगगाडीत बसून बाहेरचं धावत जग बघावं तसं निर्लेपपणे.  बघत राहीन विमानातून खाली डोकावून बघतांना लहान लहान लहान होत ढगात विरून जाणार्‍या नद्या गाव बघावीत तसं अहेतुकपणे! मी पाहून आलेलं जग तुला सांगत राहीन तू लिहीत जायच. माझे अमूर्त विचार मूर्त स्वरूपात उतरवायचे. मी सांगेन तेंव्हा. मनाने दिलेली लेखणी स्वयंपाकघराच्या, बाथरूमच्या टाइल्स, चिटोरे, तिकिटं, मिळेल त्याच्यावर मनाने सांगितल्या सांगितल्या लिहू लागली. कधीही -- रात्री दोन, पहाटे चार, बाहेर चहाला आलेले पाहुणे बसलेले असतांना मी त्यांच्याबरोबर तर लेखणी स्वयंपाकघराच्या टाईल्सवर टिपून ठेवतीए काहीही.  नंतर सामसूम झाली की कॉम्प्युटरसमोरच्या विक्रमादित्याच्या सिंहासनावर विराजमान होत भन्नाट कल्पनांचा, विचारांचा जन्मोत्सव आम्ही दोघे साजरा करू लागलो.

काही दिवसापूर्वी माझा पाच वर्षांचा नातू एकटाच सुट्टीत रहायला आला होता. त्याच्याशी गप्पा गोष्टी करतांना अचानक म्हणाला, ``आज्जीईईई--- ! माझ्या ह्या डोक्यात नंऽऽ नेहमी कसल्या कसल्या आयडियाज येत असतात.'' तो स्वतःशीच हसत होता. मी कुतुहलाने बघतच राहिले.

बघा विचार करून तुमच्या डोक्यात अशा भन्नाट आयडियाज येतात तरी कधी? कुठल्या वेळेला? तुम्ही त्या लिहून ठेवता का?

-----------------------------------------------------------

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -