संस्कृतचे महत्त्व
संस्कृतचे महत्त्व सुहृद हो , सध्या सोशल मिडियावर संस्कृतच्या बाजूनी किंवा संस्कृतला दूषणं देणार्या खूप पोस्ट फिरत असतात . संस्कृत निरुपयोगी मृत भाषा आहे इथपासून संस्कृत मेलीच पाहिजे इथपर्यंत ! प्रचंड ज्ञानभांडार असलेल्या आपल्या पुस्तकालयांना जाळून त्यावर हात शेकत बसणारे तेव्हाही होते आणि आजही कमी नाहीत . पण कावळ्याच्या शापानी गाय मरत नाही म्हणतात . संस्कृत मेली नाही . आणि मरणारही नाही . कोणी म्हणे ही कधी बोलीभाषाच नव्हती . आजही नाही . असलीच पाहिजे अशी काही सक्ती , जुलूम जबरदस्ती पण नाहीए . रोज वापरण्यासाठी आपण कामात शालू शेले थोडेच नेसतो ? ते काही खास कार्यक्रमासाठी , पूजेसाठी वापरले जात . पूर्वी चंदनाच्या पेटीत ठेऊन दिलेले असत . पूर्वीच्या शालू शेल्यांची जर खरी असायची . माझी आई मखमलीत गुंडाळून ट्रंकेत ठेवायची , दवणा किंवा केवड्याची पात त्याच्यात ठेवायची . ती कधी मधी पाडवा , श्रावणातल्या पूजेला नेसली तर त्याला तो मंद सुगंध येत रहायचा . संस्कृत आम्ही रोज नाही वापरत . पण आज एखाद्या भाषणात संस्कृतचा एखादा श्लोकही भाव खाऊन जातो . तो आमच्या संस्कृतीची गर्भश्रीमंती दाखवायला पुरेसा...