संस्कृतचे महत्त्व

 

संस्कृतचे महत्त्व

सुहृद हो ,

सध्या सोशल मिडियावर संस्कृतच्या बाजूनी किंवा संस्कृतला दूषणं देणार्‍या खूप पोस्ट फिरत असतात. संस्कृत निरुपयोगी मृत भाषा आहे इथपासून संस्कृत मेलीच पाहिजे इथपर्यंत! प्रचंड ज्ञानभांडार असलेल्या आपल्या पुस्तकालयांना जाळून त्यावर हात शेकत बसणारे तेव्हाही होते आणि आजही कमी नाहीत. पण कावळ्याच्या शापानी गाय मरत नाही म्हणतात. संस्कृत मेली नाही. आणि मरणारही नाही. कोणी म्हणे ही कधी बोलीभाषाच नव्हती. आजही नाही. असलीच पाहिजे अशी काही सक्ती, जुलूम जबरदस्ती पण नाहीए. रोज वापरण्यासाठी आपण कामात शालू शेले थोडेच नेसतो? ते काही खास कार्यक्रमासाठी, पूजेसाठी वापरले जात. पूर्वी चंदनाच्या पेटीत ठेऊन दिलेले असत. पूर्वीच्या शालू शेल्यांची जर खरी असायची. माझी आई मखमलीत गुंडाळून ट्रंकेत ठेवायची, दवणा किंवा केवड्याची पात त्याच्यात ठेवायची. ती कधी मधी पाडवा, श्रावणातल्या पूजेला नेसली तर त्याला तो मंद सुगंध येत रहायचा. संस्कृत आम्ही रोज नाही वापरत. पण आज एखाद्या भाषणात संस्कृतचा एखादा श्लोकही भाव खाऊन जातो. तो आमच्या संस्कृतीची गर्भश्रीमंती दाखवायला पुरेसा असतो.  

ज्यांनी गीता सांगितली ते भगवान श्रीकृष्ण आज आमच्यात नाही; ह्यानेही काही फरक पडत नाही. तो विवेकरूप कृष्ण आज सर्व भारतीयांच्या हृदयस्थानी आहे. मग ती भारतीय व्यक्ती भारतात असो वा परदेशात. गीता सांगितली कृष्णानी पण त्याचं लिखित रूपात जतन करायचं आणि लोकांपर्यंत पोचवायचं काम महर्षी व्यासांचं!

हृदयाचं काम प्राणवायूयुक्त रक्त पुरवठा करणं. पण हृदयापासून रक्त पुढे न्यायचं काम मात्र जवनिकेचं (AORTA).  ह्या जवनिकेला पुढे फाटे फुटत फुटत फुटत प्रत्येक अवयवाला, प्रत्येक पेशीला प्राण देणार्‍या केशवाहिन्यांच जाळच तयार होतं. मघाशी म्हटल्याप्रमाणे विवेकरूप कृष्ण हा भारतीय संस्कृतीच्या म्हणजे आमच्या हृदयस्थानी आहे. भारतीयांचं हृदय आहे. त्यानी सांगितलेल्या गीतेचं पुस्तकरूपात documentation करायचं काम, लोकांपर्यंत पोचवायचं काम महर्षी व्यासांनी केलं. कृष्णानी सांगितलेली गीता महर्षी व्यासांच्या लेखणीतून उतरल्यावर अनेक भाषांच्या अनेक संतांच्या  लेखणीतून झरत झरत भारतीय समाजाच्या अंगा प्रत्यंगाला बळकटी देणारं केशवाहिन्यांप्रमाणे एक सशक्त, सबळ असं वाङ्मयजाल तयार झालं आहे.

मराठीत अभंग, ओवी, काकडा, भारूड, गवळण, विरहिणी, असतील हिंदीत  दोहे, चौपायी असेल छप्पय असेल, दक्षिणेत अंडालची थिरुप्पवाई असेल. त्यागराजाच्या अनेक कृती असतील----  अशा अनेक माध्यमातून भारतीय तत्त्वज्ञान भारतीयांच्या मनाचं पोषण करत राहतं. केशवाहिन्यांमार्फत ज्या प्रमाणे प्रत्येक पेशीला पोषण मिळतं, तशी प्रत्येक पेशीतले Toxic / विषारी कण /नको असलेली द्रव्य काढूनही घेतली जातात.

 जे हृदयात आहे ते अवयवांपर्यंत, पेशी पेशीपर्यंत पोचणारच! जे भारतीय संस्कृतीच्या हृदयाच्या आडात आहे, जे ज्ञानवापीत आहे ते तत्वज्ञान आमच्या कृतीच्या पोहर्‍यात दिसणारच. त्यामुळे कोणी गीतेला कितीही नावं ठेवली तरी आचरणातून तो गीतेचं तत्वज्ञानच जगत असतो.

कोणी मला विचारलं तुमच्या गीतेचा आणि संस्कृतचा आवाका तरी केवढा आहे. मीराबार्ईच्या अभंगातील तिची नाममुद्रा मला प्रश्नाचं उत्तर देऊन गेली. मीराके प्रभु गिरीधर नागर!  आपल्या वनवासी, ग्रामीण, अशिक्षित खेडुत सख्यांसाठी त्यांच्या दुःखाचा डोंगर करंगळीवर उचलणारा गिरीधर कृष्ण वनवासी होता. तर सोन्याच्या द्वारकेचा द्वारकाधीश कृष्ण नागर संस्कृतीचं प्रतिक होता. म्हणजे अत्यंत कानाकोपर्‍यातल्या वनवासी संस्कृतीपासून ते थेट सुसंस्कृत नागर संस्कृतीपर्यंत अशा सर्वांना हृदयाशी धरणारा, हवाहवासा वाटणारा, त्यांना जोडणारा कृष्ण आम्हाला आमच्या संस्कृतीचा, संस्कृतचा, गीतेचा आवाका दाखवणारा आहे. असा प्रभु, असा स्वामी मीराबाईला वंद्य आहे.

बा.. बोरकर एकदा गोव्याच्या साहित्यिकांशी बोलतांना म्हणाले, जो पर्यंत तुम्ही संत साहित्य वाचत नाही तो पर्यंत तुमच्या लेखणीला परीसस्पर्श होणार नाही. आणि खरच जे जे लेखक, कवी आपल्याला आवडतात, त्यांच्या साहित्यात संतवाङ्मयाचं ठळक प्रतिबिंब पडलेलं दिसत. अनेक स्वगतं --- सध्या तरी मला आठवतय ते म्हणजे ---- मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना? ----- हे ज्ञानेश्वरीतलं निरूपण आहे.

असो आज गीता आपल्यापर्यंत संतांनी कशी पोचवली हे पहाणं मला फार अद्भुत वाटतं. आनंददायक वाटतं. एखाद पक्वान्न कितीही रुचकर असलं तरी त्याचे छोटे छोटे  घास करून बाळाला भरवायला लागतं. ज्याला जे पचेल तेच त्याला द्यायला लागतं. त्या प्रमाणे गीतेचं तत्त्वज्ञान छोट्या छोट्या घासात , स्तोत्रांच्या  रूपात, श्लोकांच्या माध्यमातून आपल्या पर्यंत कसं पोचतं त्या अगणित उदाहरणांपैकी फक्त दोन उदाहरणं देते.

गीता- अध्याय 5 श्लोक 18

विद्याविनय सम्पन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि ।

शुनिचैव श्वपाके च  पण्डिताः समदर्शिनः ।।  

पंडिताः समदर्शिनः ।  जे खरोखरचे विद्वान असतात ते सर्वांकडे सारख्याच दृष्टीनी पाहतात. कोणाकडे?  विद्यासम्पन्न नम्र ब्राह्मण असो, वा गाय असो, हत्ती असो, कुत्र असो वा एखादा दलित असो.  हाच विचार मनीषापंचकम् मधे  शंकराचार्यांनी मांडला आहे. लोकं असं सांगतात की ते एकदा गंगेवरून अंघोळ करून येत असताना  एक दलित जोडप समोर आलं. आचार्य त्यांना दूर हो दूर हो असं म्हणाले. तेव्हा त्या दलित माणसानी त्यांना विचारलं,

``बाबा रे तुझं शरीर अन्नापासून बनलं आहे. माझंही अन्नापासून बनलं आहे. तुझ्यामधे जे चैतन्य आहे तेच माझ्यातही आहे. मग काय कशापासून दूर करू? अन्नमयापासून अन्नमय का चैतन्यापासून चैतन्य! सांगा द्विजवर सांगा!

अन्नमयात् अन्नमयम् अथवा चैतन्यम् एव चैतन्यात् ।

द्विजवर दूरीकर्तुं वाञ्छसि किं ब्रूहि गच्छगच्छेति।।3

 

आहे ब्राह्मणजातिहीन दुसराना  भेद आत्म्याप्रती

कैसा रे मग भेद हा तव मनी जो भ्रामवी बुद्धिसी।।4.2

जे चैतन्य प्रजापतीतचि असेमुंगीत तेची वसे

साक्षीभाव धरून राहत असे ,चैतन्य ते मी असे

होते जाणिवभोगतो नच खरेमी एक साक्षी असे

नाही नश्वर देह मी मुळिच हा ; मी ब्रह्म चैतन्य हे

   श्री संत एकनाथ महाराजांनीही ह्याच तत्त्वाचा पुरस्कार करणारा मोठा सुंदर अभंग लिहिला. ते अजून सोप करून सांगतात. ``अरे दलितानी हात लावला तर तुमचा देव विटाळतो का रे? तोच देव पाण्यानी धुवुन घेतला तर ओवळा होतो? पाणी देवाहूनही तू श्रेष्ठ केलस? तुझं ज्ञान किती दुर्बळ आहे तू दाखवून दिलस.’’  

 

नीचाचेनि स्पर्शे देवो विटाळला । पाणिये प्रक्षाळुनी सोवळा केला

देवापरिस जळ सबळ केले । ज्ञान ते दुर्बळ होऊनि ठेले

एका जनार्दनी साच नाही भाव । संशयेचि देव नाही केला ।।

 

 दुसरं उदाहरण सांगते  

आपल्याकडे अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. आपण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो. सत्त्व, रज, तम हे तीन प्रकारचे आहार आणि त्यानुसार लोकांचं  स्वभाव वर्णन केले आहेत. 17 व्या अध्यायात 8, 9, 10 ह्या श्लोकां मधे काय खावं काय खाऊ नये हे दिलं आहे.

आयुः सत्त्व बलारोग्य सुखप्रीति विवर्धनः

रस्याः स्निग्धा स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः 

तर आद्य शंकराचार्य चित्तप्रसाद ह्या स्तोत्रात तेच सांगतात.

तिखट, आंबट,, खारट, उष्ण, झणझणीत, कोरडं, जळजळणारं, आंबलेलं, शिळं खाऊ नका.

 त्याच्याही पलिकडे जाऊन उपदेश पंचकात श्री आद्य शंकराचार्य म्हणतात, भूक हा रोग समजा आणि त्याचा उपचार म्हणून प्रतिदिन/रोज अन्न खा. प्रत्येक रोगाला, प्रत्येक व्यक्तीनुसार  जसे औषधा आणि मात्रा वेगळी असते. त्याप्रमाणे प्रत्येकाला जितकी जरुरी तितकच जेवा.

क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यतां, प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यतां

 

आहे भूकचि रोग हे समजुनीव्याधीस या नाशण्या

भिक्षा हा उपचार त्यास बरवा सेवीच तो अल्पसा ।

आवडणारे रुचकर पदार्थ मात्र  मागून घेऊ नका. मिळाले तर जेवढे एकदा लाभले असतील तेवढेच ठीक. परत नको.

 

स्वाद्वन्नं  तु याच्यतां, विधिवशात्प्राप्तेन संतुष्यताम् 

मिष्टान्नी लव हाव ना कधि धरीमागू नये ती पुन्हा

दैवाने तुज प्राप्त त्यात मनुजा संतुष्ट तू रे रहा।।4.1

बहुतेक वेळेला मुलं आम्हाला आई वडिलांनी काय दिल? असा प्रश्न विचारतात आणि त्या नतद्रष्टांप्रमाणे काहीजण आम्हाला संस्कृतनी काय दिल? गीतेनी काय दिलं? असा निरर्थक प्रश्न विचारतात. मोहरांनी भरलेला हंडा तुमच्या जवळ आहे पण तुम्ही त्याचा उपयोगच केला नाही तर काय होणार?

अहो मातीला घटामठांचे कोंब फुटत नाहीत. कुंभाराच्या मनातली कल्पना त्या मातीतून आकाराला येत असते. त्याप्रमाणे आपल जीवन हे ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणे! त्याला सुबक सुंदर आकार द्यायचं काम संस्कृत, गीता आणि आपलं भारतीय तत्त्वज्ञान करत असतात. सौंदर्य लहरींमधे पार्वतीच वर्णन करतांना आद्य शकराचार्यांनी एक शब्द वापरलाय- पुरुषिका

वेल चढण्यासाठी तिला वृक्षाच्या खंबीर आधाराची गरज असते. पण वृक्ष खंबीरपणे उभा राहण्यासाठी त्या वृक्षामधे त्याच्या जैविक तत्त्वातूनच एक उमदा जोम असावा लागतो. त्या ताकदीच्या जोरावर तो डौलात / (सुप्रतिष्ठित) उभा असतो.

 ह्या सुप्रतिष्ठित भक्कम वृक्षासारखा शिव  मंगलमय, कल्याणकारी, सर्वांना सुखी करणारा आहे. विश्वंभर आहे. सार्‍या विश्वाच असणं किंवा नसणं हे त्याच्यावर अवलंबून आहे. ह्या पूर्णपुरुषाच्या ह्या डौलामागे जी खरी पुरुषी ताकद आहे, जो त्याचा मूर्तिमंत अहंकार, जी पुरुषिका आहे, ती म्हणजेच त्रिपुरसुंदरी पार्वती.

पुरुषिका असलेली पार्वती शंकराच्या कर्तृत्त्वाचा, अहंकाराचा  Robust Gene किंवा DNA बनून त्याच्या धमन्या धमन्यांमधून अखंड वाहते आहे. नसानसातून सळसळते आहे. शिवाची चेतना शक्ती होऊन त्याला कार्यक्षम करते आहे.

प्रचंड क्षमतेतून निर्माण होतो तो, `मी करू शकतो' हा अहंकार. असीम क्षमतेतून निर्माण झालेल्या अशा अहंकारासोबत येतो तो नम्रपणा. सर्वांविषयी पराकोटीचं वात्सल्य. अशी ही विनीत असलेली साक्षात विश्वंभराची पुरुषिका आहे

शिवाचे ओजस्वीपण सकल उत्साह तयिचा

अगे माते तू त्या परम पुरुषाची पुरुषिका ।। 7.5

आज आम्हाला, भारतीय समाजाला आम्ही अशक्य ते शक्य करून दाखवतो असा जोम, असा अहंकार देण्याचं काम संस्कृत आणि गीता करत असतात. आपल्या माननीय पंतप्रधान मोदीजींचं भाषण ऐकत होते. ते सांगत होते, की ते बाहेरच्या देशात गेले की त्या देशातील मान्यवरांना काही गिफ्ट द्यायला लागते. ते म्हणाले मी गीतेचं पुस्तक भेट देतो. त्यांच्याच शब्दात सांगते. मोदीजी म्हणाले, ``गीतासे बढकर  देनेके लिए  मेरे पास कुछ नहीं हैं और गीतासे बढकर  पानेके लिए  विश्वके पास और कुछ नहीं हैं।''

मित्रांनो म्हणून एकच वाक्य मी म्हणेन, गीता सुगीता कर्तव्या ।

------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -