महाबळेश्वर -

 

महाबळेश्वर -

कुरुम् कुरुम् कुरुम् प्रत्येकाच्या पावलांचा पाचोळ्यावर होणारा आवाज!  प्रत्येकाच्या चालण्याच्या सफाईनुसार प्रत्येकाचा कुरुम कुरुम वेगळा. पुढे कमलेश आमचा वाटाड्या कसा सफाइदारपणे पाचोळ्यातून जात होता. त्याचा जेवढा पाहिजे नेमका तेवढाच पाय माफक जोर देत पाचोळ्याला टेकत होता. गळून पडलेल्या वाळक्या पानांवरही त्याची पावलं जपून पदन्यास करत होती. पानांना दुखावल्यानी पानंही त्याच्या पावलांची कमी तक्रार करत होती. त्याच्या कुरुम कुरुम कुरुमला एक लय होती. एक हळुवारपणा होता. आमचे मात्र प्रत्येक पाऊल बच्चकन् पाचोळ्यात पूर्ण बुडून वर येत होतं. पाचोळाही जणु दुखावला जाऊन कुर्रुऽऽम्म ओरडत होता. पाचोळ्याची गादी जिथे पातळ होती तिथे पाचोळा नरमाईने बोलत होता. पाचोळ्याची गादी जरा पिंढरी-पोटरी एवढी जाड झाली की कुर्रुऽऽम्म च्या आवाजाची जाडीही वाढत होती.

डोक्यावर हिरव्या पानांचा मांडव असा घातला होता की त्यातून आकाशही गाळून मगच खाली उतरत होतं.  सूर्यप्रकाशाचा असह्य दाह पानजाळीत अडकून, गाळलेला मवाळ सूर्यप्रकाश तेवढा आत येत होता. पानापानांच्या जाळीने  तापदायक सूर्यालाही अनेक पदरा पदरातून गाळून मृदु मुलायम बनवलं होतं.

महाबळेश्वरला गेलं की उजाडता उजाडता सहा सव्वासहालाच असं रानवाटांमधून दोन तास तरी भटकंती करणं म्हणजे मोक्ष मुक्ती मिळवणं असतं.

कमलेश कदम  आणि संजय पार्टे हे आमचे येथील दोस्त. रानवाटा त्यांच्या नेहमीच्या पायाखालच्या. सारं महाबळेश्वर त्यांना `हातावर ठेवलेल्या आवळ्यासारखं  सार्‍या बाजूंनी स्वच्छ, पूर्ण दिसत असतं. प्रत्येक बंगला, प्रत्येक जागा त्याच्या ओळखीची. महाबळेश्वरचा इतिहास, त्याच्या अनुषंगाने अनेक गोष्टी त्यांच्या सहजगत्या बोलण्यातून नवीन माहिती देत राहतात. इतरवेळेला त्यांचा राजधानी ट्रेकर्सचा ग्रुप पोलिसांच्या मदतीला कटिबद्ध असतो

आपल्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याची ओळख आलेल्या पाहुण्याला आगत्याने करून द्यावी त्याप्रमाणे रानात शिरल्या शिरल्या एका काडीच्या आधाराने वरती सरळ चढलेल्या छोट्याशा वेलीकडे अंगुली निर्देश करून कमलेश म्हणाला, `` हा बेडकीचा वेल. ह्याची पानं खूप कडू असतात. रोज दोनचार जरी पान खाल्ली तरी डायबिटिस होत नाही आणि असला तर जातो. त्याच्या कडू चवीने साखरेची सुद्धा चव लागत नाही. '' त्याने माहिती सांगता सांगता वेलीची तोडलेली चार पाने हातावर ठेवली आणि तो ``आत्ता नको आत्ता नको'' असं म्हणत असतांनाही विना विलंब मी ती मटाकावली. कडु पानं खाऊन माझं तोंड किती प्रमाणात वाकडं होत आहे त्यानुसार, त्याच्या समप्रमाणात बेडकीच्या वेलाचा कडुपणा तोडण्यासाठी सारे माझ्या चेहर्‍याकडे बघत होते. मीही काहीच झालं नाही अशा थाटात तो घशात उतरलेला कडुपणा शिवाच्या धैर्याने हसत हसत दाखवत नसले तरी एक गम्मत माझ्या लक्षात आली. मिरची तिखट लागली की कालीमातेसारखी जिभ बाहेर काढून हॅ हॅ करतांना, जिभेचा शेंडा आणि जिभेच्या कडांवर  मिरची तिच्या खट पणाचा प्रभाव दाखवत जिभेचं टोक आणि कडा लाल करून  टाकते; तर साखर जिभेच्या मध्यावर एक गुळचट राप ठेऊन जाते. ही बेडकीची पानं जिभेच्या मुळापाशी म्हणजे घशाला सुरवात होते तेथे पडजिभेच्या जवळ कडु चवीचा ट्रेल ठेऊन पोटात गेली.

पाचोळ्यात कुणाचा पाय घसरणीला लागतोय हे पाचोळ्याच्या आवाजानेच ताडून  मागे वळून पाहताच कमलेशने खिशातून कटर काढला. एका झाडाजवळ जाऊन तिला सरळसोट फुटलेली एक फांदी तोडली. ``ही मेडशिंगी म्हणजे मेदशृंगी. येथे बाहेर ज्या काठ्या विकतात त्या मेडशिंगीच्या असतात. आत्तापर्यंत माझ्या हातात आलेली मेडशिंगीची काठी चांगलीच कडक, मजबूत, लपकणारी जड असल्याचं लक्षात आलं. ``येथील मुसलमान जमात  कलाकुसरीचं काम छान करते. ह्या काठ्यांवर कोरीव काम करून त्यांना मुठी बसवून, छान पॉलिश करून त्या काठ्या बाजारात चांगली किंमत मिळवून देतात. आमच्या येथील मुसलमान हे अफजलखान फौज घेऊन जावळीला आला तेंव्हा त्याने बाटवलेले मुसलमान आहेत. त्यांना येथे धावड म्हणतात. ते दोन्ही धर्मांबद्दल चांगला आदर सलोखा ठेऊन असतात.'' - कमलेश. तेवढ्यात कमलेशने खाली वाकून एक तेलकट चमकदार दगड उचलून आम्हाला दाखवला. ह्यात लोखंड असतं. पूर्वीचे लोक असे दगड गोळा करून त्यातून लोखंड  गाळायचे. भाल्याची टोकं, धनुष्य बाण . बनविण्यात येथील लोक तरबेज होते.

आमच्या सर्वांच्याच पायाच्या आवाजाने आत्तापर्यंत एक लय धरली होती. एक तालबद्ध पाचोळा संगीत सुरू असतांनाच, त्या व्यतिरिक्त पाचोळ्याचा  खिसफिस खिसफिस अजून कोणाचा हा आवाज? छोटा प्राणी असावा. कमलेशने झाडीमधे नुसतं बोट दाखवलं. रान कोंबडी तिच्या तीन चार पिलांसह डावीकडून उजवीकडे रानवाट ओलांडून गेली. पाचोळा गप्प बसत नाही. त्यावरून चाळणार्‍याच्या वजनाचा आणि पर्यायाने आकारमानाचाही अंदाज सांगतो. आमच्या पायांचे आवाज जसजसे जवळ येऊ लागले  तसतसे आवाज ऐकून घाबरलेली कोंबडी परत तिच्या बाळांसह उजवीकडून डावीकडे आम्हाला आडवी गेली. आम्ही जवळ येत आहोत हे पाहून सर्वजण उडून झाडावर जाऊन बसले.  नंतर जागोजागी रानकोंबड्या रानकोंबडे, त्यांची पिले दिसत राहिले. कधी पाचोळा उकरतांना तर कधी हिंडतांना, उडतांना, झाडावर बसलेले.

कुर्रम्म कुर्रम्म च्या आवाजाने लय धरली असतांनाच पाचोळ्यावर आवाजाचा एक झपाटा ऐकू आला आणि समोरून भेकर रान वाट ओलांडून पळत गेलं. शहरात राहणार्‍या आम्हाला कावळे, कुत्री पहायची सवय. भेकर, रानकोंबडे ह्यांच अप्रूप होत.

रानवाटेने जाणं फारच सुखद असतं. रानात इतके प्राणी असूनही रान कुठे अस्वच्छ वाटत नाही. कुठले वास भरलेले नाहीत की कुठे घाण नाही. आलाच तर झाडांचा, रानफुलांचा, पिकलेल्या जांभळीचा मंदमंद सुवास दरवळत राहतो. मधुनच एखादा घमघमणारा सुवास मोगरी सारख्या एका फुलवेलीवरून येऊन प्रसन्न करून जात होता.

``हे अंजन!'' त्याच्या फादीला लागलेली छोटी छोटी फळे कमलेशने माझ्या हातात ठेवली. `` खाऊ नको हं!'' पतिदेवांनी आधीच रेड अ‍ॅलर्ट इश्यू केला. `अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा' म्हणत जिभेने राहून ``येथे करवंद असतात का?'' म्हणून कमलेशकडे चौकशी केली. ``इथे नाही पण खाली असतात.'' ``आज हा ट्रेक करतांना उतरून आपण खाली जाणार का?'' - मी. ``नाही नाही. त्यासाठी खूप खाली जायला लागेल.''  कमलेशने आधीच स्पष्ट केलं. करवंद नाही तर नाही पण कुर्रुम्म कुर्रुम्म आवाजाची पावलांना लाभलेली सततची संगत बहार आणत होती.

जाता जाता कमलेश कुठली फळं, फुल, पान आमच्या हाती देत होता. ``हे नरक्याचं झाड. ह्याची साल कॅन्सरसाठी चांगल औषध आहे. हा काळा गुर्‍हा. ही वेल दिसते ना ती चिमट. चिमटच्या वेलीला वाघनखीसारखे काटे असतात. पटकन जाणार्‍याच्या कपड्यात  अडकते.'' कमलेश आमच्या पुढे चालत होता आणि मधे येणार्‍या अशा चिमट बिमटच्या वेली त्याच्याकडच्या कटरने कापून रस्त्यातील अडथळा दूर करत होता. मधेच तो झाडात तयार झालेली ढोली दाखवायचा. ''ह्या पोकळ ढोलीत रानातल्या मधमाशा पोळं बनवतात.'' तेथील स्थानिकांना हे चांगलं माहित असतं. अशा ढोल्यांमधील मध काढण्यात ते चांगलेच हुशार असतात. मधेच एक आडव झालेलं झाड पाहून तो हळहळला. कोणीतरी नवख्याने झाडाच्या ढोलीतील मध काढण्यासाठी झाडच पाडलं होत. जाता जाता दगडामधे तयार झालेली एक गुहा दाखवत त्याने त्या दिशेने एक दगड भिरकावला. ``काल येथून गेलो तर ह्या गुहेतून एक रानडुक्कर बाहेर पडलं. '' कमलेशने दगड भिरकावूनही त्यातून कुठला प्राणी बाहेर पडला नाही त्यामुळे हुश्शच वाटलं. ``नको बाबा! दगड बिगड मारता जाऊ. उगीच डुक्कर बिक्कर अंगावर आलं तर विनासायास करवंदीच्या जाळ्यात जाऊन पोहोचू.''- माझं स्वगत. ``हे गेळ्याचं झाडं. गेळ्याला चांगले बाभळीसारखे अणकुचिदार लांबसडक काटे होते. जातांना रानवाटेच्या दोन्ही बाजूला काही कमरेएवढ्या उंचीच्या नुसत्या बारीक बारीक काटक्याच दिसत होत्या. पण हिरव्या होत्या. येथे कोण ही बारीक बारीक झाडं कापून गेलं?  ही व्हायटीची झाडं. गव्यांनी खाल्ली आहेत. व्हायटी आणि कारवची पान चरत गवे तेथून नुकतेच गेले असल्याची ही बातमी होती.

बघता बघता आम्ही एका माळरानावर पोचलो. समोरून हरीण धावत गेलं. समोरचं एवढं मोठ माळरान ओलांडून जायला त्याला अर्धा मिनिट तरी लागलं तेवढा अर्धा मिनिट तरी आम्ही त्याची दौड वासून आणि डोळे विस्फारून पाहिली. हरीण निघून गेल्यावर समोरची प्रचंड डोंगररांग आणि त्याने तयार झालेली खोलच खोल दरी , दाट झाडी, त्यावर तयार झालेला उन सावलीचा खेळ बघत असतांना दरी पलिकडच्या डोंगरावर मस्त भरारी घेत एक मोठा पक्षी झाडीत शिरला. डोंगरावर काही ठिपके हलतांना दिसत होते. नीट पाहिलं तर माकडांचा एक मोठा परिवार ऊन खात खडकावर बसला होता. रस्ता जाणणारा फक्त कमलेशच होता. त्याच्यामागे जाता जाता चार डोंगर पार केल्याचे त्याने दाखवू दिलं. ` त्या तिथून आलो आपण' कमलेशनी दाखवलं. मागे वळून बघताना `व्वा! बरच अंतर चाललो की आपण’ अशी आत्मप्रौढी मनाला सुखावून गेली.

वाटेत वाघाची पावलं उमटलेली दिसली. त्याच्यापाठोपाठ छोटी पावलंही उमटली होती. आईसोबत बच्चूही होता तर. ``परवाला आम्ही आलो तर वाघ ह्या इथे बसला होता.'' हाताएवढ्या अंतराकडे बोट करून कमलेश कोणाच्या घरची मांजरच उन्हात बसल्याचं पाहिल्यासारखं सहजपणे सांगत होता. ``साधारणपणे वाघ माणसाला काही करत नाही.'' वाघ माणसाला काही करो वा ना करो आज आत्ता तो उन खायला येथे बसला नाही ह्याबद्दल देवाचे आभार मानले. आपल्या इवल्याशा जीवाला आपण कित्ती जपतो नाही?  वाघाची पावलं पहायला मिळायच कारण पुढे दिसलं. एक निर्मळ झरा वाहत होता. जरा डोळ्याला पाणी लावून चेहर्‍यावरून ओला हात फिरवला तर थंडगार स्पर्शाने एकदम ताजतवाने होऊन गेलो. कमलेश आणि त्याच्या टिमने गेल्याच आठवड्यात कुदळी फावडी आणून ह्या झर्‍यातील गाळ, माती, पालापाचोळा  काढून त्याला वाहता केला होता. त्यामुळेच सर्व प्राण्यापक्षांची ये जा तेथे चालू झाली होती. मघाशी दिसलेलं हरीणही त्याचच फलित होत तर. परत एकदा कमलेशने आम्हाला  मूळ रानवाटेवर लीलया आणल. खडकाळ माळरानावरून पाय परत कुरुम्म कुरुम्म पाचोळ्या वाटेवर आले. परत झाडांची छत्री डोक्यावर उघडली.  झाडाच्या हिरव्या छत्रीत लपलेलं शेकरूचं घरटं दिसलं. मग अशी कितीतरी घरटी सापडत गेली. इतरवेळेस माणसांपासून पळून जाणार्‍या शेकरूंना जांभळं खाण्याचा मोह सोडवत नव्हता. दोन तीन शेकरूंच्या लांब गोंडेदार शेपट्या झाडामधून खाली लोंबत होत्या. एखादं मशिन चालावं त्या गतीने तोंडं हलत होती आणि झाडावरची जांभळं खाऊन संपत होती.  जाता जाता चन्यामन्याच्या आकाराचं रानलिंबू `खायचं नाही' ह्या बोलीवर खांद्यावरच्या धोपटीत घातलं. त्याच्या सोबत पिशाच्या लाल बीयाही धोपटीत गोळा झाल्या. डाकाची भुईमुगाच्या शेंगेसारखी फळही ``टाकून दे टाकून दे'' कडे दुर्लक्ष करून धोपटीत गेल्या, पिशाच्या बीयांपासून इंग्रजांच्याकाळी तेल काढून ते कशाला तरी वापरलं जायचं. बरच महाग असायचं. डाकाची फळं वटवाघळांना खायला फार आवडतात म्हणे. पुढच्या वळणावर अंजनाच्या बीया, बाळहिरडे माझ्या धोपटीत गुडुप्प झाले. रामेट्याला मात्र मला कोणी हात लावू दिला नाही. आपल्याकडे तिला दातपाडी म्हणतात. ह्या वनस्पतीच्या कुठल्याही भागाने दात घासले तर लगेच दुसर्‍याच दिवशी दात पडून जातात. तेवढ्यात जमिनीवर उगवलेल्या पानांच्या दाटीतून कमलेशने रान कढीपत्ता तोडून माझ्या हातात ठेवला. तो तोडतांनाच मस्त सुगंध दरवळला. ``व्वा! कढीपत्ता! हल्ली बाजारात येणार्‍या कढीपत्त्याला कसा जराही सुवास नसतो उलट कडवटच चव असते'' म्हणत मी कढीपत्ता धोपटीत सरकवला. ``काय करणार आहेस त्याच? उगीच घरात कचरा----!'' असल्या वाक्यांकडे मी जराही लक्ष देत नाही. मला घरी जाऊन किंवा खोलीवर जाऊन तो सारा खजिना टेबलावर मांडून उजळणी करायची असते. ह्या अंजनाच्या बिया, हा डाका ----------- असं बरच काही. त्यासोबत Iron ore चा चकचकीत metallic दगड. पायाखालच्या कुर्रुम्म कुर्रुमची साथ सोडून आम्ही डांबरी सडकेवर पोचलेलो असतो. एखाद मारुतीचं किंवा गणपतीचं शांत देऊळ मन प्रसन्न करत होतं. आत लावलेल्या समयीच्या मंद प्रकाशात देवाच्या मूर्ती सुबक, सुंदर, शांत,प्रसन्न दिसत होत्या. हात आपोआप जोडले गेले. दिड दोन तासांच्या ट्रेक नंतर रेस्टहाऊसवर जाऊन आपल्या हाताने आपल्या प्रमाणात बनवलेली एक कॉफी आणि नंतर वीजेच्या वेगानी नाहिशा झालेल्या वीजेमुळे महाबळेश्वरच्या थंडगार पाण्याने शंभोऽऽऽऽ!!! आहाहा!!!

---------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -