सफर पृथ्वीची -

 

सफर पृथ्वीची -


(वाचक हो, हा लेख भाषाबिशा कशाला महत्त्व न देता, तसेच कोणालाही दुखावण्यासाठी लिहीलेला नसून निखळ गम्मत म्हणून लिहीलेला आहे. तरी फार मनावर न घेता वाचा. इतकच! तुमच्या दुःखाचं कारण कळून त्यातून तुम्ही मनाने दूर झाला तर आनंदच!)

 

सीन 1

चित्रगुप्त काहीतरी डिक्टेशन देत आहे. त्याच्यामागे त्याची लेखनिका चित्रलेखा नावाची अप्सरा पामटॉपमधे सारखी काहीतरी एन्ट्री करत आहे.

 आजुबाजूला नुसताच गलका ऐकू येतोय पण कोणी दिसत नाहीए.  सगळे चैतन्य गोलक आनंदानी बागडत आहेत. त्यांच्या गलक्यातून काही काही  वाक्य ऐकू येत आहे. आहाहा! काय ही सुंदर पृथ्वी! किती निळी निळी सुंदर दिसतीए उगवतांना. चित्रगुप्ता आम्हाला पृथ्वीची सफर घडवून आण. अजून एक आवाज- किती वेळ लागेल? फार दूर नाहीए ना! सकाळी गेलं की दुपारी परत येता येतं असं ऐकलय. अरे यूँ जायचं आणि यूँ यायच! दुपारपर्यंत कशाला? अरे बाबांनो तेथली वर्ष म्हणजे आपला एक क्षण असतो फक्त तो.

चित्रगुप्त हो आता तेथे करोनाच्या निमित्ताने बरेचजण इकडे परत आले आहेत. आता नवीन माणसांची बॅच पृथ्वीवर पाठवायला ड्यू आहेच. हे बघा  कोणाकोणाला पृथ्वीवर जायचं असेल त्यांनी लेखाकडे आपले फॉर्म सबमिट करा. आणि हे बघा तेथे तुम्हाला काय काय पाहिजे ते इथेच नीट भरा. एकदा का पृथ्वीवर पोचला की काहीही बदलून मिळणार नाही.

चित्रलेखाहे बघा, पृथ्वीवरची माणसं चंद्रावर, किंवा अंतराळात जाण्यासाठी स्पेससूट घालतात. तरच त्यांना अंतराळात जाता येत. त्यांना आपल्यासारखं कुठूनही कुठेही जाता येत नाही. तुम्हाला पृथ्वीवर जाउन काही काळ तिथल्या प्राण्या, पक्ष्या, माणसांसारखं रहायचं असेल,  तर एक वेगळा पृथ्वीसूट घालावा लागेल. त्याला काया, शरीर किंवा देह म्हणतात. काही जण बॉडीही म्हणतात. पृथ्वीवरल्या पृथ्वीवरही नुस्ता हा गोंधळ! पृथ्वीवर असेपर्यंत तुम्हाला कायम त्याच्यातच म्हणजे तिथल्या प्राणी, पक्षी, माणसं, झाडं ह्याच जगात वावरायला लागेल. हे पृथ्वीसूट किडे, मुंग्या, पक्षी, बेडूक, साप---- माणसं ---- अशा अनेक आकारात आहे. तुम्हाला अगदि छोटा आकार पाहिजे, का हत्तीचा मोठा पाहिजे का माणसाचा पाहिजे ते तुम्ही जी राईड ठरवाल त्याप्रमाणे मिळेल. इथे कॅटलॉग ठेवले आहेत. त्यात पाहून तुम्हाला कोणती राईड पाहिजे , किती वेळाची पाहिजे ते निश्चित करा.

तेथे असलेल्या चैतन्यगोलकांना परीपूर्ण आनंदाशिवाय बाकी काहीच माहिती नसल्याने त्यांची एकमेकांशी आनंदाने नुसतीच किलबिल चालू आहे.

ए, तुला कुठली राइड पाहिजे, तुला काय व्हायचं आहे? पृथ्वीवर जायचं तर तिथे म्हणे दिवस रात्र असतात. मधुन मधून हास्याचे फवारे उठत आहेत. ए मला मुंगळा व्हायचय! मला खार, मला वाघ, मला माणूस!!! --------- असंख्य आवाजांनी न चिडता चित्रलेखा  त्याना उत्तर देत असते. आणि प्रत्येकाला काय पाहिजे ते पामटॉप मधे सेव्ह करत असते.

चित्रलेखा – हे बघा, ज्यांना माणसांव्यतिरिक्त काही व्हायचं आहे त्यांना  थोडाफार इथला बॅकअप असेल. त्यांना इथली काही कामापुरती जुजबी माहिती आठवत राहील तर काही त्यांच्या इलेक्ट्रॉनिक चिप मधे साठवली जाईल. माणसाची राईड घ्यायची असेल तर मात्र इथला मागचा काहीही बॅकअप मिळणार नाही. त्याच्या एक कोर्‍या करकरीत इलेक्ट्रॉनिक चिपमधे त्याने येथे काय काय मागितलं होतं तेवढच मी सेव्ह करीन. तेवढच त्याला मिळेल. हे बघा आता ज्यांनी माणसाची सगळ्यात थ्रिलींग, अंगावर काटा आणणारी राईड मागितली आहे त्यांनी ह्या इथल्या दालनात जमा. मी त्याची थोडी माहिती देते. आणि तुम्हाला काय पाहिजे त्याची डायरेक्ट त्यांच्या त्यांच्या चिपमधे नोंद करते.    

पृथ्वीवरची माणसं अजून तेथेही इवल्या इवल्या राईड्स अरेंज करतात.  काय म्हणे तर एस्सेल वल्ड, ------------ चित्रलेखा त्याची माहिती देते. सगळ्यांचे चेहरे ब्लँक!

·        White-knuckle wonders. ...

·        Red Force, PortAventura, Spain. ...

·        Tigris, Busch Gardens, Florida, USA. ...

·        The Steel Curtain, Kennywood, Pennsylvania, USA. ...

·        Hair Raiser, Ocean Park, Hong Kong. ...

·        Fujiyama, Fuji-Q Highland, Japan. ...

·        The Millennium Falcon, Disneyland Park, California, USA. ...

·        Alpine Coaster, Glacier 3000, Switzerland.

 

 पृथ्वीवरच्या माणसांना सतत भीती वाटणार्‍या, थ्रिलींग, पोटात गोळा येईल अशा विविध राईडस् फार आवडतात. जेवढी भीतीदायक तेवढी गम्मत आली गम्मत आली म्हणतात. तेथे त्यांच्या जत्रा भरवतात. त्यांच्या जत्रेच्या दालनात  गेला की माणसांना आपण आहोत तसे न दिसता चमत्कारीक आरशांमधे लंबूटांगे तर कधी बुटकबैंगण, कधी ढोल असं पहायला फार आवडतं.

तसं पृथ्वीच्या ह्या राईडमधे कोणाला सुंदर व्हायचय? कोणाला कुरूप? कोणाला दुःख पाहजे? कोणाला सुख पाहिजे? इथेच सांगा. इथेच सर्व बुकिंग होईल. सुख, दुःख, सुंदर, कुरूप हा भेद तेथील कोणाला कळत नव्हता. त्यामुळे जो ज्याला वाटेल आणि जे तोंडाला येईल ते सांगत होता. सुख हा शब्दही मिळमिळीत असल्याने अनेकांनी मला दुःख पाहिजे, मला दुःख पाहिजे म्हणून एकच गलका केला. सतत वाटणारी भीती, दुःख अशी थ्रिलींग राईकोणाला पाहिजे? ही राईड अर्धा तासाची आहे पण पृथ्वीवर मात्र हा अर्धा तास तुम्हाला खूप मोठा वाटेल. तथे पंधरा मिनिटं झाली की लोक `साठीझाली म्हणून एकमेकांचे सत्कार करतात. हार घालतात.  सगळे जोरजोरात हसत होते. कोणी म्हणे चित्रलेखे आम्हाला यू गेलो आणि यू आलो अशी छोटिशी किड्याची राइदे. कोणी म्हणे, लेखे, मला झुरळाचा आऊटफिट दे. कुणी माणसाचा! कोणालाच काहीच कल्पना येत नसल्याने नुसती धम्माल चालू होती. सर्वांची हसून हसून पुरेवाट होत होती. भीती, दुःख अशा थ्रिलींग राईडचं बुकिंग संपत आलयं हं! कोणाला श्रीमंत व्हायचयं? कोणाला दरिद्री? तेथे श्रीमंत माणसांकडे खूप सोनं असतं. कागदी नोटा असतात. आणि दरिद्र्याच्या अंगावर फाटके कपडे. म्हणजे पृथ्वीवर जाण्यासाठी बड्डे सूट घालायचा आणि त्यावर अजून जीर्ण कपडे! ---- सगळेजण नुसतेच हसत होते.  कोणाला काहीच बोध होत नव्हता. मला जीर्ण कपडे. मला भर्जरी---- मला दरिद्री व्हायची राईड पाहिजे. कोणीतरी म्हणालं. त्याच्यासोबत अजूनही काही मी दरिद्री मी दरिद्री म्हणून ओरडत होते. चित्रलेखा गालातल्या गालात हसत प्रत्येकाच्या राईड डिटेल्स टिपून ठेवत होती.

चित्रलेखा- ``कोणाला नवरा व्हायचय?’’ काहीच कळत नसल्याने उत्साहाने काही हात वर. हमम! लेखाने नोंद केली. आता कोणाला बायको व्हायचं आहे? खिदळत काही हात वर झाले. हे बघा कोणाला कोणाचा नवरा कां बायको व्हायचं आहे ते इथेच ठरवा. तिकडे तुमची गाठ पडेल. – चित्रलेखा. आम्हाला नवराही व्हायचं नाही आणि बायकोही ही नाही --- काही गोलक! चित्रलेखा तिच्या पामटॉपमधे नोंद करता करता हसत हसत म्हणाली ,- फाच गम्मत येणार आहे मला तुम्हाला इथून मॉनिटर करायला. टाळ्या वाजवत फिरत राहणार तुम्ही! हो हो हो !! आम्हाला टाळ्या वाजवायच्याएत – ते स्पसिफिक गोलक उड्या मारू लागले. हसू लागले. 

 पुढचा प्रश्न – कोणाला तिरशिंगराव नवरा पाहिजे? तिरशिंगराव शब्दाचा खुमासदारपणा आवडून अर्ध्याअधिक चैतन्यगोलकांचा मला मला म्हणत एकच गलका. कोणाला काळजीवाहू? --- एखादा दुसराच हात वर आला. कोणाला झांटिपी बायको पाहिजे?  परत एकदा हास्याचा कल्लोळ—मला मला मला---! कोणाला सतिसावित्री? ---- परत एखादा दुसरा हात वर.  कोणाला टोमणे मारणारा नवरा? – टोमणे हा शब्दच ऐकायला टुणटुणीत वाटून अनेक चैतन्य गोलकांची  पंसती. चित्रे तू अशी गालातल्या गालात का हसतीएस? अरे चैतन्य गोलकांनो, तुमची जी मज्जा होणार आहे तीच दिसून मला आत्ताच हसू येतय.  आत्ता जरी तुम्ही आनंदगोलक असला तरी पृथ्वीवर जाऊन  भांडभांड भांडणार आहात. मला भांडायचय----- मला भांडायचय एकच गलका!

 चित्रलेखा – आत्ता जरी तुम्ही एकमेक आनंदानी आम्ही नवरा बायको आम्ही नवरा बायको असं उड्या मारून मारून आनंदानी सांगत असला तरी पृथ्वीवर  भांडी आपटाल, मारामारी कराल, काही नाही तर ‘तो अस्स्सा ती अश्शी’ अशा क्षणोक्षणी फे. बु. वर पोस्ट टाकाल. 

 

 चित्रे, अगं जरा आम्हाला थोडसं ट्रेलर का काय ते  दाखव ना! तू सांगत होतीस ना पृथ्वीवरच्या पृथ्वीवर  सहलीला जातांना त्यांना तेथे काय सोयी आहेत ह्याची चित्र दाखवतात म्हणून! चित्रलेखा म्हणाली, मग तुमची पृथ्वीच्या  राईडची सगळी मजाच संपून जाईल. भीती, दुःख अशी थ्रिलींग राईड ज्यांनी घेतली आहे त्यांना तेथे खूप रडू येईल. तसं इथून जातांना मारे तुम्ही अशी तशी राईड मागता तेथे जाऊन रडता. रडू येईल म्हणजे काय होईल हे कोणालाच माहित नव्हते. त्यामुळे  सगळेच खोखो हसत होते. तेथे फक्त ब्रह्मानंदच असल्याने कोणालाच लवभर भीती माहित नव्हती. मला घाबरट व्हायचयं. मला रडू कसं येतं ते पहायचं आहे. तशीही अर्ध्याच तासाचीच राईड आहे ना मग धम्माल च धम्माल!

हे बघा! येथून जाण्यापूर्वी तुमची ब्रह्मांनंदाची चिप काढून घेतली जाईल. त्यामुळे तिकडे गेला की तुम्हाला इकडचं काही आठवणार नाही. तेथे तुम्ही कोणी एकमेकांना ओळखणार नाही. भांडाल एकमेकांमधे. कोणी चिमुटभर मातीसाठी. कोणी कागदी नोटांसाठी, कोणी सोन्यासाठी. सगळे एकमेकांकडे आश्चर्याने पाहून हसत होते. प्रत्येकानी चूज केलेल्या शरीराचा आऊटफिट तुम्हाला घालायला लागेल. तुमच्या सर्व राईडची माहिती दुसर्‍या चिप मधे लोड करून ती कपाळावर तळहातावर मिनिट टु मिनिट नोंदवलेली आहे. तुमच्या राईडची वेळ संपली की तुम्ही परत याल. जसे जसे पृथ्वीवरून राईड संपवून चैतन्यगोलक परत येतील तसतसे  येथून पुढच्या चैतन्य गोलकांना म्हणजे तुम्हाला पाठवलं जाईल. तेथे गेल्यावर परमब्रह्माची अस्फुट लेखा-- तुमची आई तुमची काळजी घेईल. तुम्हाला चांगलं बोलता येईपर्यंत इथलं सार काही आठवत राहील.एकदा का बोलायला लागला की सगळं मागचं वॉशआऊट होईल. परत इथे आला की तुमची चिप बदलेपर्यंत तुम्हाला मागची आठवण राहील आणि आपण कशी गम्मत केली हे तुम्ही आपापसात बोलाल. चिप बदलली की फिरून फक्त ब्रह्मानंद!

 तर काय मित्रांनो जशी चित्रलेखेकडे राईड आपण तुपण मागितली तशी राईड तुम्हाला मला आणि आपल्या सर्वांना मिळाली आहे. बक्कळ भांडा. धूमशान कडकडाट करा, खळ्ळ खट्याक होईपर्यंत हैदोस घाला! चिक्कार रडा,  फे. बुं. वर चिक्कार कागाळ्या लिवा. परत ऐसी थ्रिलिंग राईड कधी मिळेल न जाणो.

नंतर चैतन्य गोलक, परमानंद गोलक म्हणून आपण भेटणारच आहोत आनंदाच्या किनार्‍यावर. चित्रलेखा सध्या जाम एन्जॉय करतीए स्पेस विंडोत बसून.

 सीन दुसरा – तेथे पोचले की लिहीनच!

----------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -