शनी -

 

शनी -

                    काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आई हातात पंचांग घेऊन बसली होती. ती त्यात काय  काय बघायची देव जाणे. पण तिचा वेळ छान जात असेल म्हणून बरं वाटायचं. ``काय म्हणतय तुझं पंचांग?'' मी जाता जाता तिला विचारल. पंचांगातून नजर बाहेर काढून माझ्याकडे बघत काळजीने म्हणाली, ``पुढच्या आठवड्यापासून शनी येतोय तुझ्या घराला.''

``अरे वा! मग स्वागताला काय कराव?'' मी हसत हसत म्हणताच रागावली माझ्यावर ``अगं साडेसाती चालू होईल तुला. काळजी घे. तुझ्या राशीची साडेसाती कडक असते.'' पन्नाशीच्या मुलीची ऐंशी वर्षाच्या आईला इतकी काळजी वाटावी ह्याची गम्मत वाटली.

आईच्या चेहर्‍यावरची काळजी पाहून तिला फार दुखवायला नको म्हणून विचारलं, ``काय काळजी घेऊ? तेलबिल घालायला कुठल्या पारावर मात्र पाठवू नकोस हं!''   ''रोज शनी महात्म्य वाचत जा.'' थोड्याच दिवसात माझ्याकडे शनी महात्म्य, नवग्रह स्तोत्र, अजुन कुठली कुठली स्तोत्र, पोथ्या जमा झाल्या. बर्‍याच दिवसांनी गोष्टीचं पुस्तक वाचल्यासारखी विक्रमाची गोष्ट आधाशासारखी वाचून झाली. (शनी घरी यायच्या आधीच.) विक्रमाचा आकाशात उडणारा वारु, दीप राग म्हटल्यावर उजळणारे दिवे, मज्जा आली. रोज रोज मात्र तीच तीच गोष्ट वाचणं शक्य नव्हतं. त्यातल्या त्यात व्यासांचं नवग्रह स्तोत्र छोटसं होत. ते ठीक वाटलं. अर्थात छोटसं असलं तरी डोक्यात अर्थाचा पत्ता नव्हता. शेवटी आप्ट्यांचा शब्दकोश आणला.

जपाकुसुम म्हणजे काय? इथपासून सुरवात. जपाकुसुम म्हणजे जास्वंदीचं फूल. सूर्योदयाचा सूर्य आणि सूर्योदयाला उमलणार्‍या जास्वंदीच्या फूलात साधर्म्य दाखविणार्‍्या व्यासांचं आश्चर्य वाटलं. निसर्गात पडलेलं सूर्याचं जिवंत प्रतिबिंब जास्वंदीच्या रूपात पाहणार्‍या व्यासांशी क्षणात मैत्री होऊन गेली. बघता बघता व्यासांमागे जात, मी निसर्ग भ्रमण करून आले. स्वयंपाकघरापासून, परसातल्या बागेतून, समुद्र किनार्‍यावरून थेट हिमालयातील हिमकणांचे सौंदर्य पाहून आले. सर्व ग्रहांचं इतकं सुंदर वर्णन निसर्गासोबत जोडलेलं पाहून सर्व विषयांचं एकत्रित ज्ञान (integrated approach ) किती सुरेखपणे मांडता येत ह्याचं कौतुक वाटलं. आकाशातले ग्रह पृथ्वीवरचे संदर्भ देऊन शिकवणं फारच सुरेख! (त्यातल्या त्यात बुध आणि केतूच्या वर्णनाने विस्मित होऊन गेले.)

          सध्या शास्त्रज्ञांना सर्वात सुंदर वाटणारा ग्रह आहे शनी. त्याचा सुंदर निळसर रंग, त्याच्या भोवतालची चमकदार सुंदर कडी, त्याच्याविषयीचं गूढ आकर्षण अजूनच वाढवितात. त्याच्या निळसर  सौंदर्यात भर घालतात. शनीसारख्या सुंदर ग्रहाचं व्यासांनी कौतुक का केलं नाही ह्याचं कारण आईच्या काळजीयुक्त चेहर्‍याने दिलं.

   प्रत्यक्षात मनातला शनी वेगळाच आहे. सूर्य आणि सावलीचा हा मुलगा आहे. (छाया-मार्तण्ड-सम्भूतं) उजेड आणि अंधार, ज्ञान आणि अज्ञान, कळतय आणि कळत नाही अशा सभ्रमातून मनात उत्पन्न होणारी काळीकुट्ट काजळासारखी (नीलाञ्जन-समाभासं ) भीती हेच त्याचं स्वरूप आहे. अर्धवट प्रकाशात,अंधारात एखादि दोरीच साप वाटते. दोरीवर आभासित होणार्‍या सापाला हा विषारी हा बिनविषारी अशी वर्गवारी नसते. तसे मनातल्या संभ्रमातून उत्पन्न होणारं भय सर्व मनालाच, मनाच्या कानाकोपर्‍यालाही विषारी करते.

      शनीला ` कोणस्थ' म्हणतात. कोण म्हणजे कोपरा. `स्थ' म्हणजे राहणारा. प्रत्यक्षातला शनी पृथ्वीपासून दूरच्या कोपर्‍यात असला तरी मनातल्या शनीचा मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात  मुक्काम असतोच. तो `विशालाक्ष' म्हणजे मोठ्या डोळ्यांचा आणि ` दीर्घ देह' म्हणजे विशालकाय आहे. मनाला वाटणारी भीती वाढत वाढत संपूर्ण मनालाच व्यापून टाकते. जगाला माहित नसलेली अनेक गुपितं आपल्या मनाच्या कोपर्‍यात बसून आपलच मन कुरतडत राहतात. मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आपल्यालाच दरडावीत राहतात. शनी हा `यमाग्रज' म्हणजे यमाचा मोठा भाऊ आहे. यम म्हणजे नियमानी वागणारा. आपल्या कृत्याकृत्याचा हिशोब ठेऊन  योग्यवेळी आपल्याला त्याचा जाब विचाराणारा यम बरा असा हा त्याचा थोरला भाऊ सदसत् विवेकबुद्धीच्या रूपाने आपल्या मनात राहून आपल्या प्रत्येक दुष्कृत्यांचा, आळसाचा, अहंकाराचा जाब सतत आपल्याला विचारत राहतो. मनातल्या पापवासना धिक्कारत राहतो. मनुष्य प्राणी जन्माला आला की हाडावर चिकटलेल्या मांस आणि कातड्याप्रमाणे अहंकारही चिकटलेला असतो. तो पूर्णतया दूर करता आला नाही तरी नियमांच्या बंधनात ठेऊन काही अंशी तरी ताब्यात ठेवता येतो.

शनैः शनैः म्हणजे हळु हळु. शनी हळु हळु चालतो. त्याचं कारणही गमतीशीर. एखादी सडसडीत तरुणी भरभर चालत जाईल. पण तिच्या कडेवर, हाताशी, पायात मधे मधे करणारी चारपाच मुलं असली तर तिची चाल मंदावेल. शनीचंही तसच आहे. त्याला किमान दिडशे तरी लहानमोठे उपग्रह आहेत. त्या सर्वांना सांभाळत जायचं म्हटलं की तो हळुहळुच जाणार. मनातला शनीही `मंदचार' असा आहे. म्हणजेही हळु हळु चालणारा, धीम्या गतीने सरकणारा. आकाशातला शनी कितीही सुंदर असला तरी मनातला शनी (म्हणजे मनाच्या कोपर्‍यात लपलेली भीती वा दुष्कर्मांची कबुली, पाप) मात्र कितीही दूर सारायचा प्रयत्न केला तरी अजिबात लवकर हलत नाही. `जगसे कोई भाग ले प्राणी मनसे भाग पाये' असा हा शनी!

हा शनी डोळ्यात घालायच्या अंजनासारखा आहे. (काजळासारखा काळेकुळे कपडे घालणारा नाही. वा वर्णाने काळा नाही. ) नील हा शब्द निळा आणि काळा ह्या दोन्हींना वापरला जातो. आकाशाला शनी सुंदर निळा तर मनातला शनि काळा आहे. असं म्हणतात की, काही अंजनं अशी असतात की ती घातली की खूप झोंबलं तरी पृथ्वीच्या पोटातलंही दिसायला लागतं. डोळे एवढे प्रखर होतात की इतरांना न दिसणारंही दिसायला लागतं. शनीचंही तसच आहे. अंजनासारखा नेत्रांना झोंबणारा असलां तरी जीवनाचा योग्य मार्ग दाखवणारा मार्गदर्शक आहे. जे कधी जाणवलं नसतं, लक्षात आलं नसतं अशी जीवनाची न दिसणारी बाजू दाखवणारा असतो. त्यातूनच योग्य मार्ग निवडण्यास मदत मिळते. शनी माणसाचा अहंकार घालवून त्याला सत्याचं दर्शन घडवतो. अहंकाराचा अंधार संपला की माणसाला उजाडतं.

मनातल्या भीतीदायक शनीला उतारा म्हणजे आकाशस्थ शनी. रोग जेवढा बलवान तेवढं औषधही प्रबळ पाहिजेच ना! मनातल्या बिबत्स शनीला आकाशातला सर्वात सुंदर ग्रह शनी हा किती सुंदर उपाय आहे.

मनातल्या शनीला उतारा म्हणजे मारुतीरायाची भक्ती.  आरत्या ओवाळणारी नाही. शारिरीक आणि मानसिक बळ वाढविणारी बलोपासना. म्हणजेच खणखणित व्यायाम! व्यायामाने शरीर बळकट आणि मन धडधाकट झालं की; स्वच्छ सूर्यप्रकाश पडल्यावर दोरी नीट दिसून सर्पाभास मावळतो त्याप्रमाणे मनातील सर्व भास आणि भय मावळतं. ज्ञान जन्माला येतं. बळ आणि ज्ञान प्राप्त झालं की अवाजवी भीती, नैराश्य दूर होऊन आकाशस्थ शनी आपल्याला योग्य मार्ग दाखवितो.

नीलाञ्जन-समाभासं रविपुत्रं यमाग्रजम्

छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्।।7

 

झोंबे चुरचुरे भारी  काळ्या त्या अंजनापरी

भेदून जाई पृथ्वीसी   देई दृष्टी अशी परी  ।। 7.1

सामान्यांसी दिसे ना जे  दाखवी सत्य ते भले

मोठा भाऊ यमाचा हा  नीलांजनसमा असे ।। 7.2

सावली आणि सूर्याचा  पुत्र चाले धिमे धिमे

शनी देवास त्या माझे   नित्य वंदन मी करे ।। 7.3

------------------------------------------------------------

व्यास महर्षिनी दाखविलेले आकाशस्थ सुंदर ग्रह आणि त्याची पृथ्वीवरच्या फुलांशी, घातलेली सांगड बघण्यासाठी  बघा-

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -