नुस्ती अरुंधती दीक्षित

           

नुस्ती अरुंधती दीक्षित        

एक घडलेला प्रसंग मला आठवतोय. घरी पाहुणे आले होते. नव्या जागी आल्यामुळे त्यांचा तीनचार वर्षांचा लहान मुलगा सारखा आईला चिकटून चिकटून होता. त्यांना नीट बसताही येत नव्हतं किंवा दोनचार मिनिटं बोलताही येत नव्हतं. ``अरे ह्याला जरा तुमच्याबरोबर खेळायला घेऊन जा बरं’’. घरच्या आई, काकू कोणीतरी हाक मारली. थोड्याचवेळात घरची मुलं त्या लहान मुलाला त्यांच्यासोबत खेळायला घेऊन गेली. `` ए नाव कायए तुझं?’’ एका त्यातल्या त्यात ताईनी( वय वर्षे 5-6) त्याला विचारलं. ``नारायण!’’  सगळी मुलं विचारात पडली कारण जमाना बदलला होता. नारायण, बळवंत, त्र्यंबक, भास्कर, बल्लाळ, मोरोपंत अशा वजनदार लांबपल्याच्या नावांचा जमाना ओसरून रिकी, चिंकी, पिंकी, सोनु, मोनुचा जमाना चालू होता. नारायण नाव त्यात बसत नव्हते. मुलांना सत्यनारायण माहित होता पण हा नारायण नवीन होता. त्यामुळे  दुसर्‍या एका चुणचुणीत मुलीनी त्याला निरागसपणे विचारलं, तू कुठला नारायण आहेस? सत्यनारायण आहेस का अजून कुठला नारायण आहेस? तो छोटुकला ही त्या प्रश्नाने जरा गोंधळून गेला. विचारात पडला. मग सरळ आईकडे येत त्याने आईलाच विचारलं, आई मी कुठला नारायण आहे? सत्यनारायण का अजून कुठला? आई हसून म्हणाली, ``अरे तू सत्यनारायण नाही नुस्ता नारायण आहेस.’’ त्या लहानग्याचं समाधान झालं होतं. आपल्या नावापुढे डॉ. प्रोफे. अशी प्रतिष्ठेची बिरुदावली जोडली जावी त्याप्रमाणे छाती पुढे काढून मोठ्या ऐटित त्याने ``मी नारायण नाही. सत्यनारायणही नाही तर नुस्ता नारायण आहे.’’ असे सर्वांना सांगितले. खरतर शब्दांना अर्थ नसतोच. सांगणारा त्या शब्दात प्राण ओतावा तसा जणुकाही अर्थ ओतत असतो. त्या लहानग्याला ``नुस्ता’’ चा अर्थ माहित नव्हता. पण आईने सांगितल्यामुळे त्या शब्दाला फार मोठा गहन अर्थ प्राप्त झाला होता. केवढं वजन प्राप्त झालं होतं. मी खूप काही चांगला, मोठा, हुशार आहे आणि ते फक्त आईलाच माहिती ह्यावर त्या लहानग्याचा अतूट विश्वास होता. त्यामुळेच मी नुस्ता नारायण आहे हे सांगतांना जणुकाही त्याला स्वतःची खरी ओळख त्यातून झाली होती. त्याची क्षमता, शक्ती प्रचंड वाढली होती.  मुलांचेही समाधान झाले.

           दोन दिवसांपूर्वी मलाही अशाच प्रकारची माझी ओळख मिळाली आणि मी सुखावून गेले. एका लेखासंदर्भात माझे एकांशी बोलणे झाले होते. whatsapp वर संपर्क करतो असे त्यांनी कळवले. मीही ठीक म्हटले. दुसर्‍यादिवशी त्यांचा एक निरागस मेसेज होता, ``तुम्ही डॉ. अरुंधती दीक्षित आहता का नुसत्याच अरुंधती दीक्षित आहात?’’ लेख छापायचा म्हटलं की नावामागे असलेल्या बिरुदावल्यांचं वजन जेवढं जास्त, तेवढी छापणार्‍याची आणि छापील प्रतिची प्रतिष्ठा वाढते. त्यामुळे त्यांचं  बरोबरच होतं. मागच्या बिरुदावल्या वाढल्या की वाचकांचं प्रमाण वाढणार होत. माझ्यागे कुठलीही बिरुदावली नाही हे सांगतांना मला कुठलाच गंड त्रास देणार नव्हता. तशाही वर्षानुवर्ष न वापर झालेल्या डिग्र्या ह्या मुदत संपलेल्या औषधांसारख्याच निरुपयोगी झालेल्या असतात. असं मला वाटतं.

मी नुस्ती अरुंधती दीक्षित आहे ह्या विचारांनी आज मला फारच हलकं फुलकं वाटतय. माझ्या पायातल्या मणामणाच्या बेड्या खळखळा तुटल्यासारख्या वाटल्या. माझ्यावर ना पन्नास शंभर किलोच्या शिक्षणाचं ओझं ना सतराशेसाठ नात्यांची ओझी. मी अमक्यी मुलगी नव्हते. तमक्याची बहीण नव्हते. कोणाची पत्नी नव्हते किंवा कोणाची आई, नातेवाईक, जवळची, लांबची कोणी नव्हते. एका प्रतिष्ठित पतीची पत्नीही नव्हते. नुस्ती मी!

  तातो  माता  बन्धुर्न दाता

 पुत्रो  पुत्री  भृत्यो  भर्ता।

 जाया  विद्या  वृत्तिर्ममैव

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ।।1

 

नसे माय ना तात माझे कुणीही

 नसे आप्त वा बंधु नात्यात कोणी

मुले ना मुली पोटचे वा कुणीही

 अभीष्टास देईच दाता असाही।।1.1

 

 

धनी ना मला ना असे दास-दासी

  पत्नी   विद्या मला जीविका ही

असे ध्येय तू वाट तू आसराही

 मला एक तू एक तूची भवानी।।1.2

 इलेक्ट्रोप्लेटिंग करून पितळ्याच्या मुखवट्यावर चांदीचा मुलामा चढवतात तसा कुठल्याही प्रतिष्ठेचा मुलामा ``नुस्त्या’’ अरुंधती दीक्षितवर नव्हता. तसाही मुलामा चढवतांना हलक्या धातूवर उच्च धातूचा मुलामा चढतो. मुलामाच नाही म्हटल्यावर आपला धातू उच्च का कणसर हाही प्रश्न नाही. ``नुस्त्या’’ ह्या एका शब्दाने मला माझा अस्सलपणा लाभल्यासारखा वाटला. मी कुठल्यातरी मूलद्रव्याची बनले आहे. तो कुठला का मूलघटक असेना पण त्या मूलद्रव्याचे गुणधर्म माझ्यात आहेत. तो मूलघटक जाणून घेण्याची उत्सुकता माझ्या मनात निर्माण झाली. संयुगं तयार झाली की मूद्रव्याचे सारे गुणधर्मच संपून जातात. प्राणवायू/Oxygen  आणि उदजन/Hydrogen एकत्र आले की पाणी बनतं. Oxygen  जाळतो तर Hydrogen जळतो. पाणी जळतही नाही जाळतही नाही. सापडलेल्या न सापडलेल्या 118 मुलद्रव्यांपैकी मी कुठलंतरी मूलद्रव्य असेनच की. भले माझे गुणधर्म काहीही असोत. भले मी जाळणारी असेन  वा जळणारी असेन, धातू सारखी चमकदार असेन किंवा नसेन.

 

कमळाची कळी चिखलातून बाहेर येतांना तिला जसा चिखलाचा थोडासाही अंश चिकटलेला नसतो तसं आपल्याला काहीही चिकटलेलं नाही ह्या कल्पनेनीच मला निर्मळ वाटलं. अर्जुनाला दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभं राहून गीता सांगतांना भगवंतानी त्यांच्या रथाभोवती एक सुरक्षाआवरण तयार केलं होतं ज्यामुळे अर्जुनानी विचारलेल्या सर्व प्रश्नांची त्याला यथासांग उत्तर मिळून तो ``गतसंदेह’’ होईपर्यंत कृष्ण त्याला समजावत होता. त्यावेळच्या त्या सुरक्षा-आवरणासारखा हा ``नुस्त्या’’ शब्द बाहेरून होणारे सर्व मारे चुकवत होता. एक अस्खलित मी खाली उरत होते.

मला लगेचच कळवावसं वाटलं की मी ``नुस्त्या अरुंधती दीक्षित’’ आहे. पण एक गोष्ट नक्की होती की लेख छापला गेला की मग मात्र कोणी लेखाखाली ``नुस्त्या अरुंधती दीक्षित’’ अशी माझी ओळख लिहीणार नाही. त्यामुळे मी चार दिवस थांबणार आहे. नुस्त्या अरुंधती दीक्षित अनुभवणार आहे. त्यावेळात माझ्यावर कुठलेलही बाह्य Force / जोर, शक्ती,ताकद काम करत नसतील. खरोखरच गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानीअशी एक माझी मला गती असेल. ध्येय असेल.

-------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 


Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -