भारताचा स्वातंत्र्य दिन

 

                 भारताचा स्वातंत्र्य दिन -     

                 लग्न झालं आणि माझी सणांची प्राथमिकता बदलून गेली. नेहमी पहिल्या नंबरवर असणार्‍या दिवाळीच्या डोक्यावर पहिला नंबर लावायला वेगळेच सण आले. पहिल्या नंबरवर आला 15 ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिन तर दुसर्‍या नंबरवर आला 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. प्रवीण दीक्षित भारतीय पोलीस सेवेतून महाराष्ट्र राज्याला लाभलेले ऑफिसर असल्याने तिसर्‍या नंबरचा सण होता 1 मे महाराष्ट्र दिन. दसर्‍याला प्रवीण दीक्षितांसोबत कोतमधे जाऊन खर्‍याखुर्‍या शस्त्रांची पूजा करायला मिळणं हे मला कायम अभिमानास्पद वाटायचं. कोत म्हणजे शस्त्रागार. कदाचित कोतवाल हा शब्द त्यावरूनच आला असावा. शस्त्रास्त्र सांभाळणारा कोतचा मुख्य म्हणून कोतवाल. आधी ज्या आदराने, श्रद्धेने माहेरी आपल्या स्वर्गस्थ आप्तजनांचे श्राद्ध केले जायचे त्याच आदराने व श्रद्धेने आता पोलीस बलिदान दिवस मला आपला वाटू लागला.

            शाळेत असतांना 15 ऑगस्ट शाळेत साजरा होत असला तरी मोठे झाल्यावर मी ह्या स्वतंत्र भारताचा नागरीक आहे अशी अभिमानाची जाणीव करून देणारा 15 ऑगस्ट मला फार आनंददायी वाटायचा आणि अजूनही वाटतो. आई तिच्या शाळेच्या आठवणी सांगतांना त्यांना युनियन जॅकसमोर ``भो भो पंचम जॉर्ज ही प्रार्थना कशी म्हणावी लागे’’ हे सांगतांना हळूच पदराने डोळे पुसत असे. त्या अश्रूंमधे पारतंत्र्यात व्यतीत केलेल्या काळाबद्दल विषाद असे;  स्वातंत्र्यासाठी किती हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या, किती किती जण डोळ्यासमोर मेले, मारले गेले ह्याबद्दल दुःख, संताप, खेद असे; किती जोखमीने महत्त्वाची कागदपत्रे ह्या शाळकरी मुली त्यांच्या उशीच्या अभ्र्यातून अथवा अन्यत्र लपवून सहज घेऊन जात होत्या त्याचा थरार असे; तर अखेर स्वातंत्र्य मिळालं ह्याचा तो आनंद असे. अभिमान असे. अनेक भावनांनी संपृक्त झालेले ते अश्रू तिच्या पदरात अलगद शोषले जात. जाता येता आईच्या पदराला तोंड पुसतांना त्या सर्व भावना अलगद हृदयात झिरपत जात. त्यामुळे प्रवीण दीक्षितांच्या पोलीससेवेत जेवढ्या वेळेला, जितकी वर्ष मला झेंडावंदनाला जायची संधी लाभली, ती देशाशी प्रेमानी जोडलं जायची एकही संधी मी सोडली नाही. दिल्लीला असतांना लाल किल्ल्यावरून होणार्‍या पंतप्रधानांच्या प्रत्येक भाषणाला मी प्रवीण दीक्षितांसोबत जात असे. रक्षामंत्रालयाने मोठ्या सन्मानाने दिलेल्या आमंत्रणाला हजर राहणे ह्याइतकी भाग्याची गोष्ट नाही असे वाटे. ह्या लाल किल्ल्यावरून आम्ही भारताच्या माननीय श्री. नरसिंहराव, देवेगौडा, अटलबिहारी बाजपेयी, इंद्रकुमार गुजराल, मनमोहनसिंग अशा अनेक पंतप्रधानांची भाषणं ऐकली. श्री नरसिंहरावांची भाषणं मला तेंव्हा विशेष आवडत असत. गेल्यावर्षी काय काय योजना अमलात आणायच्या ठरविल्या होत्या, ह्यावर्षी त्यातील किती अमलात आणल्या ह्या सर्वांचा लेखाजोखा सांगणारं अत्यंत वास्तवदर्शी आणि पारदर्शी भाषण असे. माननीय अटलबिहारीजीँचं भाषण म्हणजे तर काव्यच असे. त्या काव्यावर अलगद स्वार व्हावं आणि त्यांच्या मनातल्या समृद्ध भारताची सफर करावी.

                    त्यावेळचा लालकिल्ल्यावरचा माहोल काही औरच असे. कडक युनिफॉर्ममधे येणारे Army, Navi, Air Force चे officers, खाकी मधे Police ऑफिसर्स, परदेशी वकिलातीतील राजदूत, गळाबंद black and black सुटमधे  IAS officials आणि इतर महत्त्वाचे सरकारी अधिकारी त्यांच्या ranks  प्रमाणे त्यांच्या गाड्यांवर फडफडणारे झेंडे, तारे, त्यांच्या खाद्यांवर असलेल्या वाढत्या जबाबदार्‍याच्या समप्रमाणात त्यांच्या खांद्यांवर वाढत जाणारे तारे, सिंह, तलवारींचे बॅजेस किंवा रँक्स, केलेल्या पराक्रामाचे निदर्शक असलेले छातीवरील बॅजेस, सर्व सेनांची बँडपथके, अत्यंत शिस्तीत आणि मिनिटांच्या हिशोबात वेळेत चाललेला कार्यक्रम --- सर्व पाहतांना , अनुभवतांना आपण स्वतंत्र भारतात जन्मलो म्हणून अभिमानाने मान ताठ होई. भारताच्या रक्षणासाठी आता आपण सज्ज आहोत हे पाहतांना आनंदाने संपृक्त झालेला, अभिमानाने छाती भरून आलेला एखादा तरी अश्रु डोळ्यातून निसटून खाली येई. आईसारखाच मी तो पदराला पुसत असे. कार्यक्रम संपला की आकाशात सोडले जाणारे पांढरे, केशरी, हिरवे फुगे पाहतांना तेथे आलेल्या हजारो शाळकरी मुलांच्या डोळ्यातील आनंदाचे भाव टिपतांना अजून आनंद होई.                                

               भारताचा चाळीसावा, पन्नासावा, आणि साठावा अन् सत्तरावा स्वातंत्र्य दिवस मला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पण अत्यंत उत्साहाच्या वातावरणात अनुभवता आला. भारताचा चाळीसावा स्वातंत्र्य दिन मी दिल्लीत अनुभवला तर पन्नासावा स्वातंत्र्य दिन तेवढ्याच उत्साहात मॉरिशसच्या भारतीय दूतावासाच्या प्रांगणात साजरा केला. साठाव्या स्वातंत्र्यदिनी नागपूर तर सत्तराव्या स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्राच्या राजधानीत मंत्रालयासमोर प्रवीण दीक्षितांसोबत ध्वजवंदना करण्याचे भाग्य लाभले. आजही भारताचा तिरंगा फडकतांना दिसला की वाटते अहो! आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच.

--------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -