हे गणेशा माझे एवढे मागणे मान्य कर

 

हे गणेशा माझे एवढे मागणे मान्य कर -


हे देवा गणेशा! रोज मी तुझे कसे आणि किती आभार मानू हेच मला कळत नाही. मला अरुंधती म्हणून जगायला सर्वसामान्यांप्रमाणे जेवढी आवश्यक मर्यादित बुद्धी पाहिजे होती तेवढी तू दिलीस आणि माझ आयुष्य सुंदर केलस.

लहान असतांना आईबाबांच्या कडेवरच त्यांनी माझे दोन्ही हात जोडत `चला बाप्पाला जय जय करा.' म्हटलं असेल. आणि मीही हात जोडले असतील. बाबाआई म्हणतील त्यावर विश्वास ठेऊन जोडले असतील. समोरच्या मूर्तीत असलेलं देवत्त्व त्याचवेळेला नकळत आईबाबांनी माझ्या आयुष्याला जोडून दिलं. जसा अंगात त्राण नसलेला विळविळीत दोरा सुईत ओवल्या ओवल्या सुईच्या मागे धावत भराभर कापडाच्या रंध्रा-रंध्रामधून फिरत कापडाचे तुकडे जोडत राहतो  आणि सरते शेवटी एक सुंदर वस्त्र शिवून तयार करतो, हे पतितपावना, तसच तुझ्यात ओवून दिलेल माझ्या आयुष्याचं सूत्र तुझ्यामागे फिरत राहिलं. आणि माझ्या आयुष्याचं एक सुरेख महावस्त्र तयार झालं. ते तयार झाल्यावर प्रत्येक तुकड्याला जोडणारा हा दोरा `मीच' आहे, माझ्यामुळेच हे सगळे तुकडे सांधले गेले हे मी कसं म्हणावं? कधी सुई होऊन तू माझ्या जीवनसूत्रात सुंदर फुलं ओवत गेलास. ओवता ओवता कधी त्याचा गेंदेदार सुंदर हार तयार झाला ते कळलच नाही. आज तो तुझ्याच चरणी अर्पण! 

हे एकदंता, कणा नसल्यासारखा माझा जीवनधागा जीवनपटावर नुसता टेकवला की मुडपुन जात होता, माझ्या विचारांची अनेक सुतं मूळ धाग्यातून निसटून एकमेकांपासून वेगवेगळ्या उंचीवर एकमेकांपासून फटकून वागतांना पाहून माझ्या आई वडिलांनी कदाचित शिस्तीच्या कात्रीने कापून जीवनसूत्राचे सारे `प्लाय' एकसोबत आणून तुझ्यात ओवले असतील. तोच एकरूप धागा तुझ्यावरील श्रद्धारूपी सुईमधे ओवला जाताच अनेक गोष्टी भेदायला सज्ज झाला असेल.  जेव्हा मला तारुण्याच्या वस्त्रावर सुबक कशीदा काढायचा होता तेंव्हा तू नाजूक कशिद्याची सुई झालास. आणि जेंव्हा विदारक परिस्थितीच दडस कातडं भेदायचं होतं तेंव्हा तूच दाभणही झालास. तुझा हा सूईसारखा भेदक मजबूतपणा माझ्या जीवनसूत्राच्या अशक्तपणावर सशक्त उपाय होता आणि आजही आहे.

घराचा पत्ताही माहित नसलेलं मूल जसं बापाचा हात धरून त्याच्या घरापर्यंत पोचतं तस माझ्या माहित नसलेल्या गन्तव्यापर्यंत तू मला चालवत आहेस. पण माझा मार्ग भरकटलेला नाही हे मला माहीत आहे. फक्त माझा हात मात्र सोडू नकोस. ज्या लेकराला स्वयंपाक कसा करावा हेही कळत नाही त्याला आई स्वतः रुचकर पदार्थ बनवून स्वतः भरवत असते त्याप्रमाणे हे गजवक्त्रा, माझ्या सर्व इच्छांची पूर्ती तू नेहमीच करत असतोस. तरीही आज मला अजून काही मागायचे आहे.

पुष्पदंत गंधर्व त्याच्या शिवमहिम्न स्तोत्रात म्हणतो की हे देवा तुझं खरं रूप कोणाला कळू नये म्हणून ब्रह्मदेवानेच कुतर्क करणारे वरवर पंडित भासणारे मूढ लोक तयार केले. आणि हे जग त्यांच्या नादी लागून त्यांच्याच हो मधे आपला हो मिळवू लागले.

करी ब्रह्मा जेंव्हा जगत नव निर्माण सगळे

जना -समान्यांच्या हृदि उमटण्या सम्भ्रम नवे

कधी मूढांनाही हिणकस कुतर्कांसचि असे

वदाया लावे तो जगत करण्या मोहित वचे ।।5.

 

हे कृष्णपिंगाक्षा, कृपया अशा मूढ लोकांच्या नादी मी लागणार नाही ह्याची तू खबरदारी घे. ह्या साठी तरी तू माझा हात सोडू नकोस.

प्रमेय किंवा रायडर सोडवतांना त्यात काही गोष्टी ह्या गृहीत असतात. त्या तशा धरायलाच लागतात. नाहीतर गणित सुटत नाही. उत्तर मिळत नाही. त्या गृहीत गोष्टी कायम स्वरूपी असतात. त्यांची किंम्मत, जागा काही काही बदलत नाही त्याचा आधार घेत पुढचं रायडर सोडवलं जात. माझ्या आयुष्याच्या गणितात तू अचल, स्थाणु आहेस. तुझा आधार घेत मी माझं आयुष्याचं गणित सोडवत राहते. मला गणित सुटत जातं. उत्तर मिळत राहतं. भलभलते प्रश्न मला सतावत नाही. हे भालचंद्रा, सूर्य, पृथ्वी, चंद्र हे सारे गतीशील आहेत हे माहित असूनही त्यांच्या परस्पर गतीसंबधीचे गणित सोडवतांना सूर्य, पृथ्वी किंवा चंद्र कोणाला तरी एकाला स्थिर मानावे लागते. हे  गणित तज्ञही मान्य करतील.  म्हणूनच मी माझे आयुष्याचे गणित सोडविण्यासाठी तुझ्यापायी असलेल्या माझ्या श्रद्धेला स्थिर करत असेन तर त्यात वावगे काय? मलाही समाजातल्या वाईट गोष्टी जाणवत असतात. पण जबरदस्तीने श्रद्धा पुसून त्यांची उत्तर मिळतील असं मला वाटत नाही.

गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या हॉस्पिटलला भेट दिल्यावर ते सांगत असलेले अनुभव थक्क करणारे होते. त्यांनी सर्व सोयींनी युक्त हॉस्पिटल बांधूनही आदिवासी तेथे येण्यास तयार नव्हते. त्यांना विचारल्यावर कळलं की जेथे त्यांच्या देवीचं देऊळ नाही तेथे ते येणार नाहीत. ह्याला अंधश्रद्धा कशी म्हणावी? शेवटी बंग पतीपत्नी काही आदिवासींच्या समवेत दंतेवाडा येथे गेले तेथे जाऊन त्यांनी दंतादेवीची सुबक मूर्ती बनवून आणली. आदिवासी परंपरेप्रमाणे तिची प्राणप्रतिष्ठा केली. आजही हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर एका सुंदर देवळात ही मूर्ती विराजमान आहे. स्वतः डॉ. राणी बंग रोज ह्या देवीसाठी सकाळी हार गुंफतात, वाहतात, तिची पूजा करतात हे पाहून आता तेथे सर्व आदिवासी तेथे उपचारार्थ येतात. ह्या अढळ श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणायचे ढोंग मला सुचू देऊ नकोस.

आमच्या सैन्याच्या तुकड्यांना सीमारेषेवर अनेक दुर्गम गावात राहतांना तेथील स्थानिक लोकांचे सहकार्य घेतल्याशिवाय काम करणे अशक्यच असते. त्यांनाही तेथील परंपरांचा उपहास करू नका, त्यांना नावे ठेऊ नका, तेथे दुधात साखरेप्रमाणे मिसळून रहा अशाच सूचना असतात. तेंव्हा हे कृपाळू आनंदघन विघ्नहरा, सर्व समाजाचे हित होवो हे मागणे मागण्याची प्रार्थना ज्यात आहे अशा  सत्यनारायणाच्या पूजेला लाथ मारयाची कृतघ्न बुद्धी देवा तू मला देऊ नकोस.

हे दीनबंधो वक्रतुण्डा, माझी श्रद्धा डळमळीत करू नकोस. एकदा का श्रद्धेचं श्राद्ध घातलं की संशयाची पिशाच्च डोळ्यासमोर नाचायला लागतात. आपल्या पारंपारिक ज्ञानाच्या ठेव्याला झिडकारलं की भोवतीचं अज्ञान माझ्याभोवती पिंगा घालून मला स्वस्थ बसू देणार नाही. ह्या जगात एक नाकारलं तर दुसरं स्विकारावच लागत. काहीही करायचं नाही असं जरी ठरवलं तरी नुसतं बसून तरी रहावच लागत. जशी कुठे निर्वात पोकळी राहू शकत नाही तशी डोक्यात विचारांचीही पोकळी राहू शकत नाही. मी विवेकी आहे असं म्हणत अहंकाराचा मुकुट डोक्यावर चढवला की डोक्यातील विवेकी, पारंपारिक चांगले विचार बेकार म्हणून उपहासाच्या काठीने हाकलवून दिले जातात. तसं झालं की धुस्सकन भलभलते दुसरे विचार तेथील जागा बळकावतातच.

मला माझ्या मुलाचं नाव कुठल्याही पारंपारिक ऋषी, मुनी, देव, देवतांचं ठेवायचं नाही असं ठरवलं की आपल्या सस्यशामला मातृभूमीत खोल खोल गेलेली मूळ तटतटा तोडून कुठल्या तरी दळभद्री वैराण संस्कृतीच्या तणांना किंवा कुठल्या तरी दलदलीतील लव्हाळ्यांनाच आंजाराव गोंजारावं लागत. आम्ही कशी नाविन्याची कास धरतो अशी स्वतःचीच पाठ थोपटत परकीय नावाचा पर्याय चिकटवून घ्यायलाच लागतो. ज्वारी, बाजरी गहू नाकारला तर ओट रिचवायलाच लागतो आणि शेंगदाणा तेलाला नाकं मुरडली तर ऑलिव ऑयलची टिनं भले किती भंकस असली तरी न्युट्रिशन न्यट्रिशन म्हणत स्वाहा करायला लागतात.

हे दयाळा, मला इतकीच मर्यादित बुद्धी दे की ज्यामुळे माझ्या बुद्धीचा पाया सतत तुझ्या अचल श्रद्धेवर विसावलेला राहील. मला इतकीच दृष्टी दे की जी माझ्या देशहिताव्यतिरिक्त काहीच पाहू शकणार नाही. माझ्या मनात मातृभूचे इतके प्रेम जागव की माझ्या सस्यश्यामला मातृभूमीचे तृणांकूरही मला वंद्य असतील. हे भालचंद्रा, श्रद्धेचा प्रकाश संपला की रातांधळेपणा लाभलेला बुद्धीवादी दिसेल त्या दोरालाच साप साप म्हणून झोडत राहतो आणि प्रत्यक्षात खरा साप चावून मृत्यूमुखी पडतो.

कॅलिफोर्नियात Gravity Park मधे Mystery Spot आहे. तेथे एका डोंगर उताराचा फायदा घेत distorted orientation  वर बांधलेल्या घरात सरळ जमीनीवर चढ भासायला लागतो तर चेंडू खालून वर जात आहे असा भास होतो. पाणी Gravity च्या विरुद्धदिशेने वर वर चढत आहे असं वाटायला लागतं. जे जे नियम आहेत त्याच्या त्याच्या विरुद्ध होणारया गोष्टी डोळ्यांना दिसायला लागल्या की नियमांवरचा विश्वास उडायला लागतो.

हे धूम्रवर्णा, बुद्धीसुदधा अती झाली की बुद्धीचा पाया तिरकातारका होऊन जातो. Distorted orientation च्या पायावर विवेकी म्हणविणार्‍या लोकांनाही भलभलते भास व्हायला लागतात. प्रत्येक चांगली गोष्ट समाजातून हद्दपार करण्याची त्यांची स्पर्धा सुरू होते. मुलांचे श्रद्धास्थान असलेल्या शाळा, विद्यापीठातील देवाच्या मूर्तींनी ह्यांचा पोटशूळ उठतो. पवित्र मंत्रोच्चारांनी त्यांच्या डोक्याला झिणझिण्या येतात. सरस्वतीवंदनेनी अंगावर जळमटं चिकटतात. आणि मेल्यावरही स्वतःच्या निर्जीव प्रेताला जाळून घ्यायची त्यांना भीती वाटते.  पण खरोखरच्या वाईट गोष्टी त्यांना दिसत तरी नाहीत किंवा त्यांनाच खरेपणाचा अंगारा फासून डोक्यावर घेऊन ते नाचत राहतात.

तुझे आभार की, बुद्धिमंताप्रमाणे मला तल्लख बुद्धी देऊन तू माझ्या आयुष्याचं मातेर केलं नाहीस. शाळेत गेल्यावर देवा तुझे किती सुंदर आकाश म्हणतांना हे देवाचच आकाश का? राक्षसाचं का नाही असे भलते प्रश्न नाही पडले. सुंदर प्रकाश तूच देऊ शकतोस. तो माझ्या अकलेच्या तार्‍यांचा नाही हे वेगळं सांगायला लागलं नाही. तुझ्यात ओवलेल्या गेलेल्या श्रद्धेला इतके दिवस नाही नाही ते प्रश्न नाही पडले. आताही ते पाडू नकोस. माझ्या बुद्धीचा कणखर, अचल पाया होऊन, स्थाणु होऊन तू सतत माझ्याशी एकरूप रहा. माझ्या देशाचे लचके तोडून त्यातील अर्धामुर्धा तुकडा आपल्याला मिळावा ह्या भणंग आशेने परकीयांच्या तुकड्यांवर जगणार्‍या लोभ्यांशी सामना करायचे बुद्धीबळ आम्हा भारतीयांना दे. लंबोदरा, माझे हे मागणे मान्य कर.   हे वक्रतुंडा, जे जे वक्र म्हणजे वाकडे, अयोग्य, हानीकारक आहे त्यांचे तू तुण्डन करतोस म्हणजेच नाश करतोस हे जर सत्य असेल तर माझ्या भारतभूवर रोखलेल्या दुष्ट नजरांना जाळून टाकण्याची कर्तव्यबुद्धी आम्हा भारतीयांना दे. माझ्या मातृभूमीचे लचके तोडण्यासाठी आसुसलेल्यांचे निर्दाळण करण्याची ताकद आम्हास दे. माझ्या मातृभूमीला आतून पोखरणार्‍या दुर्विचारी किड्यांना नष्ट करणारे औषध तू मलाच बनव. हे माझे मागणे तू मायमाऊली होऊन पुरव गणेशा. नाहीतर तुला मिळालेली वक्रतुण्ड ही पदवीही खोटी ठरेल.

----------------------------------------------------------

 लेखणी अरुंधतीची -


Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -