तो आणि ती

 

 तो आणि ती -               

   हैद्राबादला सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अ‍ॅकॅडमी आहे. (SVPNPA) प्रवीण दीक्षितांसोबत चार- पाच वेळा तेथे गेले. तेथे गेलं की कोणाच्या ना कोणाच्या आग्रहास्तव सालारजंग म्युझियम पाहिलं जायचं. चार पाच वेळा तरी सालारजंग पाहून झालं पण तेथील विविध उंची वस्तू, दर तासाला दरवाजा उघडून ठोके देणारा माणूस असलेलं घड्याळ, हत्यारे, छानछोकीच्या वस्तू यातून एकच शिल्प दरवेळी माझ लक्ष वेधून घ्यायचं. परत परत पाहिलेल्या अनेक वस्तुंच स्मरणही विस्मरणाच्या दालनात सरकवलं जायचं, पण हे शिल्प माझ्या मनाला इतकं घट्ट का चिकटून रहावं? एक स्त्री आणि एक पुरुष यांच एकत्र शिल्प होतं ते. फार भव्यही नाही. जेमतेम तीन फुटाचं. (तेही नीट लक्षात नाही.) पण शेजारी शेजारी उभे नाहीत. छत्तीसाच्या आकड्यात. पुढून पाहिल तर पुरुष मागून पाहिलं तर बाई. पाठीला पाठ टेकवून उभे असलेले. एका नाण्याच्याच दोन बाजू असल्यासारखे. अभिमानाने, अहंकाराने, पुरुषाचे खांदे मागे झुकलेले, छाती पुढे काढून उभा असलेला तो.  तो जेवढा मागे रेलून उभा तेवढीच ही पुढे झुकलेली. तो जेवढा बर्हिगोल तेवढीच ती अंतर्गोल. त्याची दर्पोक्ती तर तिचं दबलेलंपण. जगभर पुरुष आणि स्त्रीचे असेच स्वभाव आहेत का? दरवेळी ते लाकडात कोरलेलं शिल्प पाहिलं की माझ्या मनात स्त्री बद्दल वाटणारी सहानुभूती जास्तच गडद होत जाई.

            आज अचानक शाळेतील एक खूप जुनी मैत्रीण अनेक अनेक वर्षांनी भेटली. शाळेत असतांना ती पहिल्या बाकावर असे तर मी शेवटच्या. तिची हुशारी आणि उत्साह समुद्राच्या लाटांसारखा. तिचं कुठल्याही समस्येला भिडणं पुढे तिला डॉक्टरकीच्या राजपथावर घेऊन गेलं. तेथेही तिच्या अंगभूत गुणांनी अनेक क्षेत्रात ती चमकत राहिली. मग काळाच्या वावटळीत मैत्रिणींचीही पांगापांग झाली. काही दिवस कोणा ना कोणाकडून तिची खबरबात कळत राहिली. मग तेही संपलं. शेवटचं शेवटचं कुणी तरी सांगितलं तेंव्हा तिचं लग्न होऊन तिला दोन मुलं झाली होती. तिच्या ‍ऑरथोपेडिक नवर्‍याने एक हॉस्पिटल चालवायला घेतले होते. ही मात्र घर्‍ आणि मुलं सांभाळत होती.

``अग, किती दिवसांनी भेटतोय आपण.'' तिच्या वाक्याने मी भानावर येत म्हटल, ``निर्मला,किती बदललीस तू! कस काय ओळखणार तुला?'' ``तू मात्र आहेस तशीच हं! चल रस्त्यात उभं राहून गप्पा मारण्यापेक्षा घरी चल. समोरच आहे. आज मी तुझं काही ऐकणार नाही.'' असं म्हणत हात धरून ती तिच्या बंगल्यात घेऊन गेली. बंगला तिच्या नवर्‍याच्या प्रॅक्टिसची साक्ष देत उजळला होता. पण तिचं स्फुंल्लिंग ? -- -असं विझलं का? माझ्या मनात सालारजंगमधील ती साकार झाली. मनात ती आणि तो चं शिल्पही जागं झालं.

 

मला प्रेमाने कोचावर बसवत असतांनाच नजरेनेच तिने खुणावलं आणि घरी काम करणारी बाई लगेचच पाणी घेऊन आली.

``निर्मला, किती वर्षांनी  -- -- -!''   माझं वाक्य अर्ध्यात तोडत म्हणाली, ``अग, वर्षांनी काय, किती दशकांनी असं म्हण!'' ती उत्साहा उत्साहाने मला तिच्या कर्तृत्ववान नवर्‍याच्या हॉस्पिटल बद्दल , तिच्या दोन्ही डॉक्टर मुलांबद्दल, तिच्या डॉक्टर सुनांबद्दल सांगत होती. मधेच तिच्या गोड नातवंडांचे फोटो दाखवून त्यांचंही कौतुक सांगत होती. ``ए आज जेऊन जायचं हं! मी तुझं काही ऐकणार नाही'' म्हणत मधेच ती उठली आणि आतमधे मी जेवणार आहे हे तिच्या बाईला सांगून आली.

मी मात्र ह्या सौदामिनीला नभातच विरुन जातांना पाहून अस्वस्थ होत होते. परत परत `ती' आणि `तो'चं शिल्प माझी मनःशांती ढवळून टाकत होतं. मी माझ्याच विचारात गढलेली असतांना स्वयंपाकघरातून ती परतली. ``कसला विचार करतीएस एवढा?'' तिच्या बोलण्याने मी दचकले. भानावर येत  चेहर्‍यावर स्मित आणत म्हटलं, ``अग, एका शिल्पाचा विचार करत होते. सालारजंग म्युझियममधल्या.'' ``कुठल गं शिल्प? विक्रमची बहिण हैद्राबादला असल्याने अनेकवेळा मीही ते म्यझियम पाहिलं आहे.'' - ती ``एका स्त्री-पुरुषांचं!'' - मी  ``म्हणजे एका बाजूने पाहिलं तर पुरुष आणि दुस र्‍याबाजूने पाहिलं तर स्त्री तेच ना?'' ``हो!'' - -- माझे डोळे चमकले. हे शिल्पच मला निर्मलाच्या हृदयापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवणार होतं तर.

``माझ्या मनावर चिकटुन बसलय ते. जगभर स्त्रीची प्रतिमा अशीच असावी न?  - - सदैव वाकलेली. पुरुष मात्र आपल्याच अल्प कतृत्वाच्या अहंकाराने ताठलेला !'' - मी

``छे छे तसं नाहीए ते शिल्प! तू नीट पाहिलं नाहीस कदाचित. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव पाहिले असतेस तर उमगलं असतं तुला.'' निर्मला एकदम भावनावेगाने म्हणाली. ``तुला काय उमगलं त्या शिल्पातून?'' मी आश्चर्याने विचारलं. ``तुला वाटतं तसं नाहीए ते. त्या स्त्रीच्या चेहर्‍यावर तुला दुःख, लाचारी, कारुण्य किंवा ओझ्याचा तिटकारा, तिरस्कार काहीतरी दिसलं का? किंवा त्याच्या रेट्याने ती कोलमडून पडलेलीही नाही.'' कदाचित निर्मला ते शिल्प स्वतःच जगली होती. मी परत ते शिल्प नजरेसमोर आणत म्हणाले, ``होऽऽगं! तिच्या चेहर्‍यावर असे कुठलेच भाव नाहीत. शांतपणे ती खाली झुकलेली आहे.''

``तीच तर खरी गम्मत आहे. जरी ते शिल्प दोघांचं असलं तरी त्या दोघांमधे अनेकजण आहेत.'' ``अनेकजण? ते कसे काय?'' ``ते प्रत्यक्ष डोळ्याला दिसत नाहीत. पण आहेत.'' ``हे अनेकजणं कोण?'' ``अरुंधती, एखादि सगळ्यांनाच माहित असलेली कवितेची ओळ किंवा म्हण  लिहितांना बर्‍याच वेळेला आपण त्याचा पहिला शब्द लिहितो मग मधे टिंब टिंब टिंब काढून इ. (म्हणजे इत्यादि) असं तरी लिहतो किंवा शेवटचा शब्द तरी लिहितो तसं ह्या शिल्पातला तो म्हणजे प्रचंड मोठ्या शिल्पाचा सुरवातीचा भाग असून ती म्हणजे शिल्पाचा Tail end शेवटचा भाग आहे. हे शिल्प एका प्रचंड मोठ्या सुसज्ज सेनेचं आहे. स्टेजवर ज्या दोघांचा संवाद दाखवतात त्यांच्यावरच प्रकाशझोत टाकलेला असतो. तसा हया शिल्पाचा प्रकाशझोत ह्या दोघांवर आहे इतकच. म्हणून मधे कोणी नाही असं वाटतं एवढच.'' ``म्हणजे काय ? मी नाही समजले. प्रचंड सैन्य काय? त्याचं शिल्पात रुपांतर काय? जरा समजाऊन सांगितलस तर कळेल.'' मी जरा गौंधळून वैतागून म्हणाले.

``अरुंधती, मनात असो, समाजात असो किंवा जगात असो; कायम चांगल्या शक्ती विरुद्ध दुष्ट प्रवृत्ती यांची लढाई सुरूच असते. ह्या दुष्ट प्रवृत्तींविरुद्ध लढायला सगळे सद्गुण एकत्रित आले पाहिजेत. ह्या सद्गुणांमधे सर्वात महत्त्वाचा सद्गुण आहे अभय, निर्भीडपणा. हा तर सर्व सद्गुणांचा प्राण किंवा आत्माच आहे. निर्भीडपणा, धाडस नसेल तर सर्व सद्गुणांचे त्राणच निघून जातील. लहान असतांना आपण गोष्टी ऐकायचो की एका राक्षसाचा प्राण कुठल्याशा गुहेत लपवलेल्या एका पिंजर्‍यातल्या पोपटात आहे म्हणून. अगदि तशीच ह्या सर्व सद्गुणांची खरी ताकद आहे अभय. त्यामुळे सर्व सद्गुणांच्या सैन्याचे अधिपतीपद, सेनापतीपद ह्या निर्भीड अभय नावाच्या पुरुषाला दिले आहे. दुर्गुणांशी, दुष्टांशी लढायला खांदे मागे झुकवून छाती पुढे काढून, पाय खंबीरपणे रोवून हा उभा आहे. अगदि सीना तानके! त्याच्या नेतृत्वाखाली बाकीचेही चोवीस सद्गुण त्याच्या मागे उभे आहेत. ते निर्भयाच्या स्वयंप्रकाशात लोपल्यासारखे वाटतात इतकच. हे मी नाही विनोबांनी सांगितलं आहे. बावळट! नेहमीप्रमाणे खळखळुन हसत निर्मला म्हणाली. माझ्याही चेहर्‍यावर अभावितपणे हसू उमटलं. निर्मलातील वीज चमकायला लागली होती. ``मग ती कोण? पुढे झुकलेली?''मी विचारलं

 ``शत्रू सैन्याशी लढतांना नुसती पुढची फळी नीट असून काय उपयोग? मागची फळी तेवढ्याच जबाबदारीने सांभाळणारी कोणी व्यक्ती पाहिजेच की. जेंव्हा हे सद्गुण एकवटतात तेंव्हा अहंकार छुपेपणाने मागून हल्ला चढवतो ह्या सेनेवर.  सैन्य गाफिल असेल तर जिंकलेली लढाईही हातची निसटते. अहंकारावर सदा विजय मिळवणारी हीच ती नम्रता मागची फळी सांभाळतांना दिसेल.''

 मी भारून गेल्यासारखं तिचं बोलणं ऐकतच राहिले. निर्मला एका निर्मळ उत्साहाने पुढे बोलतच राहिली. 

``माझं ते फार आवडत शिल्प आहे. मला Antagonist muscles सारखं वाटतं ते.''  ``निर्मला, मी काही तुझ्यासारखी डॉक्टर नाही Antagonist म्हणजे काय?'' तिला एक बारीक चिमटा काढत मी म्हणाले.

``तू आत्ता पाणी पितांना ग्लास तुझ्या ओठांपर्यंत नेऊन खाली टेबलावर ठेवतीएस ना? तुझ्या ह्या हाताची ही वरखाली हालचाल ह्या शिल्पासारख्याच दोन स्नायूंमुळे होतीए. हाताचा आतला स्नायू आकुंचन पावतो, वाकतो ह्या स्त्री सारखा त्याचवेळेस बाहेरचा स्नायू प्रसरण पावतो. त्या दोघांची हलचाल अशी एकमेकांना पूरक झाली की तुझा हात हलतो. सहजपणे. आपण हात हालवत आहोत ही जाणीवही होत नाही तुला. त्याप्रमाणे जगातल्या सर्व स्त्री पुरषांच्या पूरक वागण्याने जग चालतं.''

 आज निर्मलामधली सौदामिनी परत तळपतांना पाहून मलाच खूप आनंद झाला. जोंधळा पेरला. त्याला कणीस आलं. मग तो संपला की फोफावला ह्याचही उत्तर मिळालं.

----------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -