जगन्नाथ पंडित –

 

   जगन्नाथ पंडित –

  वाराणसीला सूर्यास्ताला गंगेची आरती बघण्यासाठी दशाश्वमेध घाटावर माणसांची आणि घाटाच्या समोर गंगेच्या पात्रात होड्यांची गर्दी झाली होती. दिवसभरच्या काशीदर्शनाने मनात कुठे तरी निराशा आली होती. इथेही घाटावर लोकांची आणि पाण्यात होड्यांची गर्दी झाली होती. सगळ्या होड्या एकमेकीना चिकटुन चिकटुन उभ्या होत्या. टोपल्यामधे काहीतरी विकायला घेऊन आलेल्या बायका , छोटी मुलं लाटांवर वरखाली होणार्‍या होड्यांमधून एका होडीवरून दुसर्‍या होडीवर लीलया फिरत होती. दरवेळी त्यांच्या पाय ठेवण्याने होडी थोडीशी पाण्यात अजुन खाली जाई पाय उचलला की वर येई. डचमळणार्‍या होड्यांवर लीलया फिरणारी ही छोटी मुलं पाहून मला कमळाच्या पानांवरून सहज  तुरुतुरु फिरणार्‍या बगळ्यांची आणि पाणपक्ष्यांची आठवण होत होती.  त्यांच्या टोपल्यांमधे पानाच्या द्रोणात फुलं आणि त्यावर छोटे छोटे दिवे विकायला ठेवलेले होते. होड्या इतक्या चिकटून उभ्या होत्या की हे दिवे पाण्यात सोडायचे तरी कुठुन? दिवा लावायला काडेपेटीही नव्हती. तरीही सगळे लोकं दिवे घेत होते. उन्हं उतरणीला लागली. पश्चिम क्षितीजावर सूर्यानेही निरोप घेतला. काळोखाचा अम्मल वाढायला लागला. होड्या होड्यांवर दिवे पेटायला लागले. होड्याच्या चंद्रकोरीसारख्या बाकदार कडा एकमेकींना चिकटल्या असल्या तरी कुठेतरी छोट्या छोट्या मोकळ्या जागांमधून खाली पाणी डचमळत होते. तेथे हात घालून लोकांनी दिवे सोडायला सुरवात केली. हे दिवे बाहेर कसे पडणार? इथेच अडकून रहाणार नाहीत का? असं वाटत असतांना लाटेचं बोट धरून सारे दिवे नावांच्या जंजाळातून कधीच बाहेर पडले. आर्मीच्या बँडमधे बॅगपायपर्सचा जथा  धुन वाजवतांना जसा डावीकडे उजवीकडे डुलत डुलत जातो तसे सारे दिवे लाटांवर डोलत पुढे चालले होते. नावांच्या भाऊगर्दित अडकून राहता त्यांचं असं निर्लेपपणे बाहेर पडणं, गंगाजल नेईल तसं संथ वहात जाणं बघतांना मनातले बाकीही विचार गंगेने कधी धुवून टाकले कळलंच नाही. भानावर आल्यावर मन इतक शांत झालं होतं की एका अद्भुत पावित्र्यानी उजळून निघाल्यासारखं वाटलं.

                       परत यायला निघालो. अंधारातही गंगेच्या विशाल पात्राची आणि अथांग खोलीची जाणीव होत होती. नाव पाणी कापत चालली होती. गंगेच्या संथ वाहण्यात एक दमदारपणा होता. वल्ह पाण्यात बुडताच त्याचा होणारा डुबुक डुबुक आवाज आणि पाण्याचा खळबळ आवाज शांतता चिरत चालले होते. नावेत सारे शांत बसले होते. गंगेचं गारुड मनावरून जात नव्हतं. शेजारून जाणार्‍या नावेतही सारे जण शांतच बसले होते. भारल्यासारखा त्यातील कोणीतरी अंधारातही चमचमणार्‍या पाण्याकडे बघत म्हणाला, `मैया बहती है।' त्याचं ते वाक्य मला जगन्नाथ पंडितांच्या गंगालहरीपर्यंत मागे घेऊन गेलं.

ब्रह्मा ध्यानस्थ बैसो, विष्णू शेषावर गाढ झोपो, शिवाचे तांडव चालू राहो. लोकांच्या हिताची चिंता करत गंगा सर्वकाळ वहात आहे. गंगा जागी आहे. सदासर्वकाळ जागी आहे. ``मैया बहती है।''

सुखे ब्रह्मा बैसो नयन मिटुनी ध्यान करण्या

हरी झोपो शेषावर, शिव करो तांडव सदा

नको प्रायश्चित्ते तप यजन दाने करु नका

असे गंगा जागी जगि अशुभ दुःखांसि हरण्या  ।।23

 

                        पेरुभट्ट आणि लक्ष्मी ह्या अत्यंत विद्वान तेलंगी ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी जन्मलेला जगन्नाथराय हा मुलगा गङ्गालहरी ह्या काव्याचा जनक. वडिलांनाच महागुरू मानून त्यांच्याकडूनच जगन्नाथाने विद्या संपादन केली. (त्यांच्या रसगंगाधर ह्या ग्रंथात वडिलांचा महागुरू असा उल्लेख आहे.) जगाला दिपविणारी विद्वत्ता, उत्तम शरीरसंपदा आणि तारुण्य असलेल्या ह्या सरस्वतीच्या पुत्रावर लक्ष्मीची कृपादृष्टी नव्हती. अर्थातच त्याच्या महत्वाकांक्षी मनाला स्वस्थ बसणे मानवले नाही. त्याने सरळ दिल्लीची वाट धरली.

             मोगल साम्राज्यात शहाजहानच्या पदरी तो स्थिरावला. हिंदू धर्म हा सर्व धर्मांमधे सर्वश्रेष्ठ आहे हे सप्रमाण सिद्ध करण्यासाठी उर्दुचाही सखोल अभ्यास करुन त्यातही त्याने प्राविण्य मिळवलं. बादशहाची सर्वांगसुंदर मुलगी लवंगिका ह्या तडफदार कवीवर भाळली. एक दिवस बादशहा शहाजहान आणि जगन्नाथ पंडित बसलेले असतांना अचानक लवंगिका तेथे आली. बादशहाने ह्या शीघ्रकवीला स्वतःच्या मुलीवरच त्याक्षणी काव्य करुन दाखवायची आज्ञा केली. जगन्नाथ पंडिताची रसवंती पाझरु लागली. त्याने केलेले ते उत्तम काव्य ऐकल्यावर प्रसन्न झालेल्या बादशहाने त्याला `काय वाटेल ते माग' असे सांगितले आणि जगन्नाथ पंडिताने लवंगिकेचीच मागणी केली. लवंगिका मनोमन सुखावली. नाईलाजाने बादशहाला त्याची मागणी पूर्ण करायला लागली. एकतर बादशहासाठी जगन्नाथपंडित काफिर आणि दुसरी अडचण म्हणजे तो वयाने  लवंगिकेपेक्षा बराच मोठाही होता. बादशहाने दिलेला शब्द मोडला नाही.  बादशहाने जगन्नाथ पंडिताला जहागिरीही दिली. पण  एका यवन कन्यबरोबरचा तो विवाह हिंदू आणि मुसलमान दोन्ही पक्षांना सारखाच अमान्य होता. औरंगजेब राज्यावर  आल्या आल्या त्याने  जगन्नाथ पंडिताची जहागिरी, संपत्ती जप्त केली. दोन्ही समाजाने वाळीत टाकलेला  जगन्नाथ पंडित उघड्यावर पडला.

               त्यावेळी सर्वश्रेष्ठ पंडित कोण ह्या वादात भट्टोजी दीक्षित ह्या व्याकरण पंडितांने  हा कसला कवी म्हणून जगन्नाथ पंडितांची वारंवार अवहेलना केली होती. हा तर कामाचा पुतळा, धर्माचा मारेकरी म्हणून टवाळी केली होती.

  आज जगन्नाथ पंडिताचा राजाश्रय सुटला. बांबूच्या टोकावर चढलेल्या माणसाला बांबू वाकून जसा दुसर्‍याचक्षणी खाली आणतो त्याप्रमाणे कीर्तीच्या शिखरावर चढलेल्या माणसालाही चंचल लक्ष्मी कधी खाली आणेल सांगता येत नाही. कोणालाही आश्रयाची, धनाची भीक न मागता जगन्नाथ पंडिताने लवंगिकेसह काशीला गंगामातेच्या किनार्‍य़ाचा आश्रय घेतला.

                   एक दिवस भट्टोजी दीक्षित गंगेत स्नान करून पायर्‍या चढून वर येत होते. त्याचवेळी लवंगिकेच्या उरलेल्या एका वस्त्रावर स्वतःच्याही शरीराची लाज झाकत गाढ झोपलेल्या  जगन्नाथ पंडितावर त्यांची दृष्टी गेली. त्याला  अशा अवस्थेत पाहून मनात करुणा येण्याऐवजी त्याला जागे करीत भट्टोजींनी त्याची निर्भर्त्सना करायला सुरवात केली. `` अरे अजूनही तू निर्लज्जपणे इथे झोपला आहेस? स्त्रीसोबत असे वस्त्रहीन अवस्थेत उघड्यावर झोपायला तुला लाज कशी वाटत नाही? '' जेवढा शक्य होता तेवढा अपमान त्यांनी केला.

``भट्टोजी बादशहाने माझी जहागिरी काढून घेतली. माझी विद्या नाही काढून घेता येत कोणाला. माझं पांडित्य कोणीच हरण करु शकणार नाही. `न राज हार्यं नच भ्रातृभाज्यं' असं लखलखतं धन अजूनही माझ्यापाशीच आहे. त्याचीही आपल्याला प्रचिती येईल. ''

 

 जगन्नाथ पंडिताने गंगेची स्तुती म्हणण्यास सुरवात केली. ``हे माते, तू म्हणजे प्रत्यक्ष विवेकाच्या मनात स्फुरणारा आनंद आहेस, ज्या सर्व पावन , पुण्यदायी गोष्टी असतील, त्यांचे वैभव तू आहेस.

विवेकाच्या चित्ती नित स्फुरत जो मोद सुभगे

असे तोची तू गे असशि धन तू पुण्य कृतिचे

क्षणार्धी नेई गे कुमति विलयासी जल तुझे

मनीच्या क्षोभाला तव तनुलता स्पर्श करु दे ।।18

हे माते माझ्या मनात काम, क्रोध अग्नी ज्वाळांसारखे नुसते धगधगत आहेत. हे माते, हे जललते, तुझ्या पाण्यावर खेळणारा वारा तुझ्या पाण्याचे तुषार आसमंतात उधळत आहे. त्या जलरूपी तुषारांचे मोती माझ्या अंगावर बरसू देत. त्यानेच माझ्या अंगा अंगात धगधगणारा हा वणवा शमेल.

मनी कामक्रोधे धगधगत आहेच वणवा

जयाच्या ज्वाळा ह्या उसळुनि करी दग्ध तनुला

जलासंगे खेळे पवन उधळे मौक्तिक वरी

तुषारांनी त्या तू मम हृदय-दाहास शमवी ।।26

 

आई गं! मी किती पापे केली असतील त्याची गणतीच नाही. मला पाहून तीर्थक्षेत्रांनाही शरम वाटली असेल. देवांनी तर कानावर हात ठेऊन `शिव शिव शिव ! हा पापी आमच्या नजरेसमोर नको.' असं म्हटलं असेल. पण तू नाही ना गं मला दूर करणार?

मला पाहोनी गे शरमतिहि तीर्थे मनि त्वरा

करा ठेवी कानी `शिवशिव' म्हणे देवगण हा

अशा पाप्याला म्या कर पुनित हे जाह्नवि पुन्हा

दरिद्री तीर्थांच्या हरण करि गर्वासि शुभदा ।।28

 

हे जननी,  तुला विसरून मी भलतीकडेच भटकत राहिलो. भलत्याच मार्गावर जाऊन वाट चुकलो. पण हे माते, लेकरु चुकलं तरी आई परत त्याला पोटाशी घेते. मला झालेला पश्चात्ताप परत मला तुझ्याकडे घेऊन आला आहे.

 

धनाची धुंदी ज्या नृपति पदि त्या नित्य झुकलो

असे बुद्धी खोटी तव चरण सेवा विसरलो

तुला धिक्कारीता तळमळत राही हृदय हे-

वियोगाने माते, क्षणभरचि कृपादृष्टि सुख दे ।।19

 

हे माते माझ्या नेत्रांनी तुझे हे सुंदर रूप मी कधि निरखलेच नाही. कधी माझ्या कानांनी तुझ्या लाटांचा हा नाद ऐकलाच नाही. धिक्कार असो माझा.

 

मनासी मोही गे जलमय तुझी सुंदर छबी

परी त्या रूपा जी कमलनयने ना निरखिती

न नादा ऐकी जे खळखळ जलाच्या मधुरशा

मिळे कैसी त्यांना सुखद अनुभूती तव पहा ॥32.1

 

टपोरे डोळे ते असुन उपयोगी न लव ते

नसे त्या कानांसी सुमधुर उद्देश्य कुठले

फुका गात्रे ऐशी  असुनि नसल्यातीतचि जमा

नसे कामाचे ते अवयवचि धिःकार तयिचा ।।32.2

 

हे माय! आता मात्र सर्व सर्वजग सोडून मी तुझ्या पायापाशी आलो आहे. तुला जे योग्य वाटेल ते तू कर. पण तू मला जवळ केलं नाहीस तर मात्र तू दयाळू आहेस ही तुझी कीर्ती लयाला जाईल

 

दिल्या सोडोनी मी  हित अहित चिंता तुजवरी

नको सोडू माझ्या बिकट समयी तूच मजसी

तडा विश्वासासी जननि जर गेलाच तर गे

दयाळू सर्वांसी’  अशि विमल कीर्ती तव बुडे ।।39

 

           माते, आजवर अनेक पतितांचा तू उद्धार केलास त्यातीलच अजून हा एक असे उपेक्षेने तू माझ्याकडे बघू नकोस. मी महा पापी आहे. तुझा शेला कमरेला करकचून बांध. माझी पापे पाहून तुझ्या माथ्यावरील चंद्रकोरही लटपटायला लागेल. नागांनी तिला तुझ्या डोक्यावर घट्ट बांध. आणि माझ्या उद्धारासाठी सिद्ध हो. माय! माझी घटका भरली आहे. ह्या जगन्नाथाच्या उद्धाराची वेळ येऊन ठेपली आहे.

 

तुझा शेला बांधी  कसुनि कमरेसी भरजरी

विषारी सर्पांनी करकचुन बांधी शशि शिरी

असे पापी साधा अशि मम उपेक्षा नच करी

जगन्नाथाची या (जगाच्या नाथाची) भरलि घटिका मोक्षसमयी।।47

 

               वाटेल तसा भटकत राहिलो मी. कुठे विश्रांती मिळालीच नाही. हे माते खूप काळ जागा आहे गं ! खूप दमलो आहे. एकवार, अखेरचं अगदि अखेरचं मला तुझ्या मांडीवर झोपायचं आहे. गाढ झोपायचं आहे. तुझ्या पदराने, तुझ्या या नीर-वस्त्राने मला वारं घाल. अंगाई म्हण. मला तुझ्या मांडीवर शांत चिरकाळ झोपव. ह्या तुझ्या लेकराला शांत झोपू दे.

 

इदानीमुत्सङ्गे मृदुपवनसञ्चारशिशिरे

चिरादुन्निद्रं मां सदयहृदये शायय चिरम्।।46

 

तुझे पाणी प्यालो महति परि त्याची न मजला

तुला सोडूनी मी फिरत बसलो मूर्ख जगि या

परी विश्रांती ही पळभर कुठे ना गवसली

म्हणोनी आलो मी दमुनि तव तीरी परतुनी ।। 46.1

 

तुझ्या अंकी वारा मृदुल मृदुला शीतल गमे

बहू जागा मी गे मजसि निजवी प्रेमभरि गे

सुदीर्घा निद्रा ही जननि तव अंकीच निजु दे

दयाळू माते हे मजवरि कृपा तूच करि गे ।।46.2

 

भट्टोजी दीक्षितांना उत्तरादाखल जगन्नाथ पंडिताने गंगेवर एक एक श्लोक रचण्यास प्रारंभ केला. असे म्हणतात त्याच्या प्रत्येक श्लोकागणिक गंगा एक एक पायरी वरती चढत आली आणि शेवटच्या श्लोकाला जगाने दूर लोटलेल्या ह्या आपल्या पुत्राला लवंगिकेसह तिने आपल्या पोटात घेतले.

इतके दिवस गंगा कशी वर येईल असा अविश्वासाचा विसंवादी सूर मनात कुठेतरी होताच. मघाशी जातांना मात्र नावाडी घाट दाखवतांना सांगत होता, `` आत्ता जरी आरती येथे घाटावर खाली होत असली तरी गंगेला पूर आला की हे दोन्ही मजले पाण्याखाली जातात. तेंव्हा जगन्नाथ पंडिताची गोष्ट मनाला चटका लावून गेली.

  `दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वाम्हणजे मी दिल्लीश्वराच्या पायी तरी राहीन किंवा जगदीश्वराच्या तरी पायी लीन होईन असे म्हणणारा हा महाकवी संस्कृत साहित्याला मोलाचे योगदान देऊन गंगेत विलीन झाला.  

   शिखरिणी ह्या वृत्तात केलेल्या गंगालहरी गंगेसारख्याच वरून शांत पण प्रवाही आहेत. गंगेचं रेखाटलेलं शब्दचित्र आज इतक्या वर्षांनीही मनाला मोहून टाकल्याशिवाय रहात नाही. गंगादशहरा ह्या गंगेच्या उत्सवानिमित्त माझी ही सुमनांजली गंगेला अर्पित.

-----------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -