नास्तिक

नास्तिक -

                 मूल स्वतःहून खेळात रमले तर त्याला घरची आठवणही होत नाही. घरी आपली काळजी घेणारी आई आहे. बाबा आहेत; ही भावना त्याच्या मनाच्या कोपर्‍यात घट्ट असते. किंबहुना त्या मजबूत मानसिक आधाराच्या पायावरच ते बाहेर इतके दिलखुलास वागत असते. कित्येकवेळा तर बाहेर रमलेल्या मुलाला ओढून घरी आणून सक्तीने अभ्यासाला बसवावे लागते.

                   पण आई कामात, गडबडीत असल्याने बाळाकडे जरा दुर्लक्ष झाले की ते बाळ कुरकुर करायला लागते. रुसते. गाल फुगवून आईला दिसेल असे कोपर्‍यात जाऊन बसते आणि आईचे लक्ष वेधण्यासाठी `` मी नाऽही तुझ्याशी बोऽऽलत  जा! ‘’असे वारंवार म्हणते. खरे तर ते आईशीच बोलत असते. आईचेच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते.

                  त्याप्रमाणे ज्या माणसाचे सर्व काही सुरळीत, व्यवस्थित चालू असते तो माणूस ``मी आस्तिक आहे, श्रद्धाळु आहे , माझी देवावर अपार श्रद्धा आहे. मी रोज देवपूजा करतो ----. .’’  वारंवार जगजाहीर करत नाही. त्याची त्याला आवश्यकता वाटत नाही. काही माणसे भेटली की काही वेळातच ती कधी बढाईखोरपणे तर कधी वैतागून तर कधी स्टेटस सिम्बॉल म्हणून आपल्याला सांगतात की, ``मी नास्तिक आहे. मी देवपूजा करत नाही!’’

                        ठीक आहे. नको करूस.  तुला कोणी विचारलं? कोणी देवपूजा करावी का न करावी हे ज्याचं त्याचं ज्याने त्याने ठरवावं. ह्या गोष्टी वैयक्तिक ज्याला जशा पटतील तशा कराव्यात. दिवसातून पाचवेळा देवापुढे बसून जमिनीवर डोकं टेकवण्याची किंवा आभाळाकडे तोंड करून हात पसरायची आपल्याला कोणी सक्ती केलेली नाही.

                         ``तू नास्तिक आहेस म्हणजे काय आहेस?’’ असं त्यांना विचारलं की त्यांना  ``मी देव मानत नाही. माझा देवावर विश्वास नाही.’’ ह्या वाक्यापलिकडे  काही सांगता येत नाही.  खरतर अशा लोकांचं काहीतरी बिनसलेलं असतं. कसल्यातरी न्यूनगंडानी ( वा अहंगंडानी ) त्यांना पछाडलेलं असतं. सगळ जग माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे असं तरी वाटतं किंवा सर्वांनी माझ्याकडे पाहून माझच कौतुक करावं, माझ्या प्रत्येक वेडगळ वाक्यालाही मान डोलवावी असं त्यांना वाटत असत.  ह्या लाडावलेल्या वा मोठ्या अपेक्षा ठेवणार्‍या माणसाला त्याच्या अपेक्षेएवढं यश मिळालेलं नसतं; त्यामुळे समाजाबद्दल एक सूक्ष्म आढी, देवाबद्दल तेढ त्यांच्या मनात असते. आणि म्हणूनच जेवढं मिळालं आहे त्याबद्दल ते कृतज्ञ नसतात.

                          लहान मूल ``मी तुझ्याशी बोलत नाही’’ असं आईच्या विशेष लक्षात येईल असं सांगत राहतं. तसं  ``मी देव मानत नाही’’ ह्या वाक्यातच त्यांनी देवाचं अस्तित्त्व मान्य केलेलं असतं. कारण देवच नसला तर त्याला मानण्या न मानण्याचा आणि दवंडी पिटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

                         देवाच्या देवळात चाललेली बजबजपुरी न आवडणं मी समजू शकते पण चंदनाला वेढणारे भुजंग म्हणजे चंदन नव्हेत. चिखल म्हणजे कमळ नव्हे.  पण ते तसं म्हणत नाहीत. कधीतरी आयुष्यात आलेल्या वाईट प्रसंगांचं खापर ते देवावर फोडत असतात. मी देवाचं इतकं केलं पण देवाला माझं काहीच नाही. सर्वांचं चांगलं झालं माझंच का असं वाईट व्हावं? त्यांना सबूरी नसते. त्यांना चांगल घसघशीत फळ म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीचा( कधी कधी न केलेल्याही) मोबदला देवाकडून त्यांना पाहिजे असतो. अभ्यास न करता देवा मला पाव म्हणत परीक्षेचा पेपर सोप्पा यावा आणि फक्त मलाच उत्तम मार्क मिळावेत असा विचार करणार्‍या विद्यार्थ्यांसारखे  ते वागत असतात.                                

             आपल्याकडे देव आणि सद्वर्तन ह्याची आपल्या पूर्वजांनी एक छानशी सांगड घातली आहे. देवावर श्रद्धा ठेवायची म्हणजे  यम नियम पाळावे लागतात. ते  नियम ह्या नास्तिकांना जाचक वाटत असतात. मनमुक्त वागण्याच्या, छंदीफंदी पणाच्या, अनेक व्यसनांना हायफाय चा उच्च दर्जा आणि बढती देण्याच्या आड येत असतात. आपण फार पुढारलेलो आहोत हे दाखवण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांना आस्तिकपणा मागास ठरवतो असे त्यांना वाटते. मग ते कंठरव करून सांगतात, वारंवार दवंडी पिटतात, मी नास्तिक आहे होऽऽऽ !!!  जणु काही हे त्यांच्या शुद्धतेचं स्वयं घोषित प्रमाणपत्र आहे असं त्यांना वाटतं.

             कित्येकवेळा पाश्चिमात्य संस्कृतीच्या वावटळीत सापडलेले काही विद्वान नास्तिक आपल्या संस्कृतीच्या अज्ञानामुळे किंवा पाश्चिमात्यांनी ठासून सांगतलेल्या चार चरबट गोष्टींमुळे आणि त्यांनी तोंडावर फेकलेल्या -  फॅरिन ट्रिप, परदेशी विद्यापीठात एखादा विचार परिवर्तन करणारा कोर्स इ. ., काही नाही तर तुमच्या प्रगाढ पांडित्याची (?), आवळा देऊन कोहळा काढण्यासाठी केलेली वाहव्वा!  अशा चार तुकड्यांमुळे त्यांनाच महान मानू लागतात. एकदा का आपली चांगली गोष्ट नाकारली की मग कुठलीतरी हीणकस गोष्ट स्वीकारावीच लागते.     

                आपण महणजे काय सुपर स्पेशल पुढारलेले आहोत हे लोकांना पटविण्यासाठी ``देवपूजचा गावंढळपणा मी करत नाही. इतकच का मी ते देव घरातही ठेवले नाहीत’’ हे सांगणं म्हणजे त्यांच्या दृष्टीनी खड्ड्यातून समतल भूमीवर येण्यासारखं असतं. उच्चभ्रूच्या पुढच्या सुपरस्पेशालिटीच्या पुढारलेल्या पायरीवर चढण्यासाठी ह्या गावरान गोष्टी नाकारण्यासोबत मी घरी दारूचा बार भरून ठेवला आहे. किंवा मी फक्त इंग्लिश मूव्हीज बघतो, फक्त फॉरिनचीच पुस्तकं वाचतो अशा किती कणसर गोष्टींना आलिंगन द्यायला लागतं हे सांगू नये हे बरे.

            कधी कधी मी इतरांपेक्षा कसा वेगळा आहे हे दाखविण्याचा हा अट्टाहास केवळ एक केविलवाणा प्रयत्न असतो. एका महाभागाने ``मी लग्न कसे कुठलाही शुभ मुहुर्त नाही तर उलट गटारी आमावास्या आहे हे पाहून केले’’ असे सांगितले. ठीक आहे. तू शुभ नाही तर अशुभ मुहुर्त तर शोधलाच ना?  बहुतेकांच्या आयुष्यात लग्न ही एकदाच येणारी आनंदाची वेळ असते. ती  आठवतांना चांगल्या आठवणी याव्यात का दुर्महुतार्वर वशाट आणि बिअरच्या? हा ज्याच्या त्याच्या रुचीचा प्रश्न आहे.

                      आमच्या मुलांची नावे  आम्ही  आमच्या धर्मातील पद्धतीने ठेवणार नाही म्हटलं तरी नाव ठेवायलाच लागतं. नरवीर तानाजी , राणा प्रताप  शेमफुल वाटत असेल तर तनवीर, अन्नीस, बाबर, तुघलक बिघलक अशी नावं शोधावीच लागतात. तसे करून हे नास्तिक दुसर्‍या धर्मियांना मान्य होतात का? तर तसेही नाही.  जो पर्यंत तुम्ही हिंदु धर्माची उणीदुणी काढता तो पर्यंतच तुमचा हा शिमगा आणि तुम्ही इतर धर्मियांना आवडता. त्या साठी ते अशा नतद्रष्टांना प्रोत्साहनही देत राहतात. अंधश्रद्धानिर्मूलन वगैरे उपक्रम सुरु करायला हरकत नाही. पण त्यातही मखलाशी ही असते की ते फक्त एकाधर्मातच दोष शोधत राहतात.

              आता आम्ही तुमच्या गटात आहोत सांगून असे नास्तिक  बाकी धर्मात दोष शोधायला लागून त्यांच्या  इवल्याशा जरी गोष्टीवर बोट ठेवतील तर त्यांच्या खांद्यावर असलेलं उपड मडकं सुपडं झाल्याशिय राहणार नाही. मोराची पिसं शेपटीत खोचलेल्या आणि मोरांसोबत नाचायला जाणार्‍या कावळ्यासारखी त्यांची गत होईल हे ही ते जाणून असतात.

                          त्यांच्या वेड्यारख्या वागण्याकडे दुर्लक्ष करावे म्हणावे तर त्यांचे सर्व वेडेपण  स्वतःच्या वैय्यक्तिक आयुष्यापर्यंत मर्यादित राहिलं तर त्यावर कोणालाच आक्षेप असायचं कारण नाही.  पण हे लोक धर्माचे कुठचेही नियम धर्मग्रंथात स्वतः न वाचता न खात्री करता त्यांना विरोध मात्र ठामपणाने करत असतात. किंवा वाचलेच तर त्यातील अर्धेमुर्धे तोडून, भलत्याचेच संदर्भ भलतीकडेच देऊन वा कशा प्रकारे संदर्भहीन केल्याने मोठा हाहाःक्कार माजवतील ह्याची विशेष दक्षता घेऊन अशा प्रकारे लोकांपुढे मांडतात की सर्व सामान्यांना सभ्रम उत्पन्न झालाच पाहिजे.

      आईनी लक्ष दिलं नाही तर मूल जस आदळआपट करून काहीतरी नुकसान करायला लागतं, तसे हे लोक  आपल्यावर समाजाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी. सगळीकडे नाक खुपसायला लागतात. छे छे शाळेत सरस्वती नको. ऑफिसमधे कुणी त्याच्या टेबलावर वा त्याच्या गाडीत जरी गणपती ठेवला तरी भयंकर!  ऑफिसमधे सत्यनारायण? छे छे आपण निधर्मी आहोत. सत्यनाराणाचा शिरा गिळतांना घशात बेडुक अडकल्यासारखे वागणारे हेच लोकं केक, वाईन, कबाब शीरकुर्मा सर्वधर्मसमभावाला शिरोधार्य धरून चवीचवीने गिळंकृत करतात. असो!

घटं भिंद्यात् पटं छिन्द्यात् । कुर्यात गर्दभरोहणं

येन केन प्रकारेण । प्रसिद्ध पुरुषःभवेत् ।।

खळ्ळ् खट्याक करा, कपडे फाडा, गाढवावर बसून  स्वतःचीच धिंड काढा पण कसेही करून मिडियाच्या व लोकांच्या चर्चेत रहा.

                                     असा हा सहज प्रसिद्धिचा उपाय असेल तरी ठीक पण  आदळआपट करून घरातील  चांगल्या गोष्टींचा विध्वंस करायचा माथेफिरू तर्कटी प्रकार असेल तर, आई जो रणचंडीचा अवतार धारण करून वेड्यासारख्या वागणार्‍या आपल्याच मुलाला दोन तडाखे द्यायलाही मागे पुढे बघत नाही त्याप्रमाणे सार्‍या समाजाने ह्या वेड्याविद्र्यांना धडा शिकविणे आवश्यक असते.

----------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -


Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -