विष्णू आणि लक्ष्मी

 

विष्णू आणि लक्ष्मी

एकदा विष्णू आणि लक्ष्मी एकमेकांशी अत्यंत प्रेमाने संवाद करत असतांनाच नारदमुनी तेथे अवतरले. `` ये नारदा ये'' दोघांनीही अत्यंत प्रेमाने नारदाचं स्वागत केलं. ``नारायणऽऽऽ नाराऽऽयण ---! '' नारद सुखावले. नारद नुकतेच पृथ्वीवरून स्वर्गात आले होते. पृथ्वीवरच्या अनुभवांच्या अमलाखाली असल्याने, अत्यंत प्रसन्नपणे एकमेकांशी बोलणार्‍या, प्रेमाने एकमेकांशी वागणाऱ्या आपल्या माय तातांकडे पाहतांना नारदमुनींच्या मनात एक शंका तरळून गेली, ``माझ्या माय-तातांचं हे प्रेम कायमस्वरूपी टिकणारं असेल ना? त्यात कधी बाधा तर येणार नाही ना? पृथ्वीवर तर सर्व पती-पत्नींमधे प्रेम कमी आणि संशय, व्यवहारीपणा, भांडणं हेच दिसत होत. बहुतेकांच्या चारित्र्याची तर ऐशीतैशीच होती. पाहूच या ना थोडीशी परीक्षा! नारदाने अत्यंत नम्रपणे दोघांनाही अभिवादन केलं आणि लक्ष्मीकडे पहात म्हणाले, ``माते, मला कायम एक शंका येते.'' ``काय रे नारदा? कसली शंका?'' लक्ष्मी हसत हसत म्हणाली. `` राहू देत. नकोच विचारायला. कदाचित नाही आवडणार तातांना.'' ``बोल बोल नारदा'' विष्णूही गालातल्या गालात स्मित करत म्हणाले, ``मनात काही ठेऊ नकोस. ''

दोघांचा अंदाज घेत नारद म्हणाले, ``माझं तर तुमच्या दोघांवरही सारखच प्रेम आहे. त्यामुळे मला हे कळत नाही की तुमच्या दोघांमधे श्रेष्ठ कोण? माझी माता की माझे तात?'' कळ लावायचं काम नारदाने करून टाकलं.

विष्णू म्हणाले, `` अरे, `सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति।' म्हणजे, नारदा कुठल्याही देवाला केलेला नमस्कार शेवटी माझ्यापर्यंत येऊन पोचतोच त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तुला अगदि स्पष्टच आहे.'' लक्ष्मी मात्र म्हणाली, ``असं कस? नारदा लोक सतत मी येण्यासाठी प्रार्थना करत असतात.'' दोघांमधे थोडंसं वैचारीक अंतर पडतय पाहिल्यावर हा अजून प्रश्न चिघळावा म्हणून नारदांनी साळसूद पणाचा आव आणला आणि म्हणाले, ``मला वाटत आपण कोणाची लोकप्रियता जास्त आहे ह्या निकषावर कोण श्रेष्ठ हे ठरवायला पाहिजे.'' थोड्याच वेळात विष्णू आणि लक्ष्मीमध्ये मोठा वाद माजला आणि त्यांच्या ह्या भांडणाची मौज बघत उभ्या असलेल्या नारदाने आगीत तेल ओतायचे काम अजून चालूच ठेवलं. ``अरेरे!! असे भांडू नका. मी आलो आणि हे काय होऊन बसलं! मी तुम्हाला एक उपाय सुचवतो. तुम्हाला दोघांनाही मान्य असेल तर बघा.'' ``कसला उपाय?'' दोघेही म्हणाले. `` म्हणजे आपण पृथ्वीवर जाऊ. तेथील एका गावामध्ये एक महिनाभर राहू. तेवढ्या अवधीत तुम्ही दोघांनी तेथील लोकांवर तुमचा किती प्रभाव पडतो हे दाखवून द्यावे. शितावरून भाताची परीक्षा. एका गावाच्या सर्वेक्षणामधून आपल्याला मतदारांचा कल लक्षात येईलच. हो, पण कोणी आपले खरे रूप प्रकट करायचे नाही. तुम्हाला मान्य असल्यास मी तुमचा पंच म्हणून काम बघेन. आहे कबूल?'' विष्णू आणि लक्ष्मी दोघेही ह्या गोष्टीस तयार झाले.

तिघेही जण आपले रूप पालटून पृथ्वीवरील एका गावात येऊन दाखल झाले. गावाबाहेरच्या एका मंदिरात त्यांनी मुक्काम टाकला. संध्याकाळच्या सुमारास विष्णूबुवांनी एका कीर्तनकाराचा वेश घेतला आणि गावातल्या एका देवळामधे प्रवेश केला. लोकं यायला अजून उशीर होता पण आपल्या खड्या सुरेल आवाजात विष्णुपंतांनी कीर्तन गायला सुरवात केली. त्या आवाजाने भारून जाऊन आसपासचे नागरीक तेथे येऊन बसले. कीर्तनकारबुवांचे अत्यंत तेजस्वी रूप, आवाज, विषय खुलवत नेण्याची हातोटी पाहून श्रोते मंत्रमुग्ध झाले. बुवांना रोज कीर्तन करण्याचा आग्रह करू लागले. त्या रात्री सर्व गावामधे नवीन कीर्तनकारबुवांचीच चर्चा रंगली. कीर्तनाला आलेले श्रोते हळहळले. सारे दुसरऱ्या दिवसाची उत्सुकतेने वाट बघत होते. संध्याकाळ झाली आणि देवळाचा सभामंडप श्रोत्यांनी नुसता फुलून गेला. कीर्तनकारबुवा आले. त्यांचं जरीकाठी शुभ्र धोतर, उपरण आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व पाहूनच श्रोते आनंदून गेले. बुवांनी सूर लावला `जय जय राम कृष्ण हरी -----' त्या आवाजात अशी काही जादू होती की श्रोते डोलू लागले. गाऊ लागले थोड्याच वेळात बेभान होऊन नाचूही लागले. हरीकीर्तनाच्या गोडीने सारे जणु हरीमय झाले. रोज असं घडू लागलं. बघता बघता सारं गाव विष्णुपंतांमागे वेडं झालं. दुपारपासूनच जागा धरण्यासाठी लोक देवळात येऊन बसू लागले. रोज विष्णुपंतांचा प्रभाव बघण्यासाठी श्रोत्यांच्या शेवटच्या ओळीत वेश बदलून सामान्य नागरिकाचा वेश घेऊन नारद मुनी आणि लक्ष्मी माताही बसत असत. लक्ष्मीही प्रत्यक्ष विष्णूचं कीर्तन ऐकून भारून गेल्या. आनंदाने डोलू लागल्या. हे पाहिल्यावर नारद लक्ष्मीमातेला जरा टोकण्यासाठी म्हणाले, ``माते माझ्या तातांचा प्रभाव केवढा आहे! मी तर थक्क झालो आहे. मला वाटते आपणही माघार घेतलेली दिसते.'' बघता बघता नारदाने लक्ष्मीच्या मनातील मत्सर जागृत केला. `` नारदा, आत्तापर्यंत तू फक्त तुझ्या तातांची करामत पाहीलीस. उद्यापासून माझाही प्रभाव बघशील.

दुसर्या दिवशी कीर्तनाला येता लक्ष्मी एका गरीब म्हातारीचा वेश घेऊन त्या गावामधे फेरफटका मारायला बाहेर पडली. सर्व गाव सुनसान होत. एका घरात मात्र दिवा लागलेला दिसत होता. त्या घरासमोर येऊन तिने हाका मारायला सुरवात केली. `` आहे का कोणी घरात? खूप भूक लागली गं माय! काही खायला देशील का?'' आतून खोकत खोकत एक म्हातारी बाहेर आली. ``बाई , आज सारं गाव हिंडलीस तरी तुला कुठे खायला मिळणार नाही. सार गाव त्या कीर्तनकारबुवांच्या कीर्तनाला लोटतं हो हल्ली. मला बरं नाही त्यामुळे मला कीर्तनाला कोणी नेलं नाही. माझ्या खोकण्याचा कुठे सर्वांना त्रास द्यावा म्हणून घरीच राहिले. ही घे भाकरी खा पण त्या देवळात कीर्तनकारबुवा काय सांगतात ते मला सांगशील का?'' --- बोलता बोलताच तिला खोकल्याची उबळ आली आणि म्हातारी पार हेलपाटून गेली. लक्ष्मीने तिच्या पाठीवर हात फिरवला म्हणाली, ``माय गं, बरं वाटेल तुला ह्या म्हातारीचा आत्मा तू तृप्त केलास. थोडं पाणी देशील का?'' लक्ष्मीचा हात पाठीवर फिरल्यामुळे म्हातारीला एकदम तरतरी आली ती ``आणते आणते'' म्हणत पाणी आणायला तुरुतुरु घरात गेली. पाणी घेऊन आली आणि बघते तो काय ती गरीब बाई तेथे कुठेच दिसेना. इकडे तिकडे पाहिलं पण छे! बाहेर जाऊनही पाहून आली. कुठे मागमूस नाही. तेवढ्यात तिचं लक्ष त्या गरीब वृद्धेला भाकरी दिलेल्या त्या थाळीकडे गेलं. हे काय? -- ती थाळी तर चमकत होती. हातात घेऊन पाहते तो काय! थाळी सोन्याची झाली होती. तिचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. अरे, मघाशी मला तर चालवत नव्हत मग मी इतकी भराभर चालले कशी? म्हातारी विचार करत असतांना तिच्या लक्षात आलं की तिच्या पाठीचा बाक, खोकला सर्व काही गायब !! आनंदाने म्हातारी नाचायला लागली. इतक्यात कीर्तनाहून परत येणाऱ्या मुला-सुनांनी सासूबाईला नाचतांना पाहिलं. सासूची तब्बेतही टुणटुणीत झालेली पाहून सुनाही आश्चर्यचकित झाल्या. मग तिने ती सोन्याची थाळी दाखवली आणि घडलेली हकिगत त्यांना सांगितली. सुनांकडून दुसर्‍या दिवशी त्यांच्या शेजार्‍यांनाही ही बातमी कळली. त्यादिवशी त्यांच्या घरातील म्हातारीही संध्याकाळी कीर्तनाला जाता खोकत खोकत घरीच बसली. पूर्वीसारखच घडलं. तिची थाळी सोन्याची झाली.

बघता बघता ही बातमी वार्‍यासारखी गावात पसरली. आणि विष्णुपंतांच्या कीर्तनाला येणार्‍या माणसांचा ओघ अचानकच मंदावू लागला. आज तर विष्णुपंतांचं कीर्तन ऐकायला देवळातल्या मूर्तीशिवाय दुसरं कोणीच हजर नव्हत. शेवटी कीर्तनाशिवायच आपला गाशा गुंडाळत असतांनाच नारदमुनी तेथ आले. ``देवा हे हो काय? सर्व लोकांना आपल्या भजनी लावता लावता सर्व लोक माझ्या मातेच्या मागे निघून गेले?'' लक्ष्मीमाताही मागे हसत हसत उभ्या होत्या. काही बोलता विष्णू निघून जाऊ लागले. त्याचवेळेला लक्ष्मीने मोठ्या प्रेमाने हाक मारली ``देवा, असे एकटेच कुठे चालला?'' लक्ष्मीच्या नजरेत इतके आतःप्रोत निःसीम प्रेम भरले होते की विष्णू सर्व जय पराजय विसरून गेले.

वसंत ऋतुत सरळ, उंच वाढणार्‍या सावळ्या गडद चमकदार पानांच्या तमालवृक्षाला निळ्या कळ्यांचा बहर यावा त्याप्रमाणे त्याप्रमाणे लक्ष्मी आणि विष्णूची नजरानजर होताच विष्णुच्या सर्व अंगावर रोमांच उभे राहिले. पुलकित झालेला विष्णू त्या तमालवृक्षासारखा सुंदर दिसू लागला. तर तमालावर दाटी करणाऱ्या भुंग्यांसारखी रमेच्या काळ्याभोर डोळ्यातून बाहेर पडणारी नजर हरीरूपावरून हलायलाच तयार नव्हती. ती हरीलाच निरखत राहिली.

जैसा तमाल बहरे मधुमास स्पर्शे

सर्वांग नील कलिकामय होय त्याचे।

तैसी मुकुंदतनु श्यामल कोमला ही

दृष्टीस दृष्टि मिळता पुलकीत होई।।1.1

भृंगोत्सवा बहर ये तरु पाहताचि

तैसीच दृष्टि तव ही निरखी हरीसी

ऐश्वर्य एकवटले तव दृष्टिमध्ये

कल्याण ती मम करो कमले सदा गे।।1.2

मातेच्या त्या ऐश्वर्यसंपन्न दृष्टीकडे पाहतांना नारदाला आपली चूक उमगली. तो वारंवार नमो नमः म्हणू लागला. `` अरेरे! हे तात, मी व्यर्थ परीक्षा पाहिली. सूर्य आणि त्याची प्रभा वेगवेगळे नसतात, चंद्र आणि त्याचं चांदणं हे दोन नसतात माते. मी व्यर्थ पाणी आणि त्याचं पातळपण वेगळं करायला गेलो. साखरेतून त्याची गोडी वेगळी करायला गेलो. हे मायबापा, तुम्ही एकरूपच आहात म्हणूनच तुम्ही दोघं जिथे रहाल तेथे स्वर्गच असेल. विष्णू म्हणाले, नारदा अरे बाळाचा हट्ट पुरवायचा म्हणजे आई वडिलांनाही थोडेसे लटिके वागायला लागते.'' लक्ष्मीमाता म्हणाल्या, नारदा, सारे मला चंचल म्हणतात. प्रत्यक्षात जेथे सारे गुण एकवटलेले असतात तेथेच मी कायम राहते. म्हणूनच जेथे माधवाचा वास तेथेच ही रमा असू शकते.'' रमा-माधव दोघेही अदृश्य झाले.

नारद वैकुंठात त्यांच्या दर्शनाला पोहचले तेंव्हा शेषावर झोपलेल्या विष्णूकडे बघणारी रकमेची दृष्टी पाहून असं वाटत होत की

जैसी सहस्रदल-पद्म-सुधाचि घ्याया

ये जा करी लगबगे भ्रमरावली गा

मुग्धा तशीच तव रम्य कटाक्षमाला

चंद्रासमान हरिसी निरखे झुके वा।।2.1

प्रेमे सलज्ज झुकती तव लोचने ही

जाती पुन्हा परतुनी हरि आश्रयासी

लज्जा दे निरखु विष्णुमुखा तरीही

औत्सुक्य हे हृदयिचे प्रकटेच नेत्री ।।2.2

दृष्टीस ना मिळतसे स्थिरता जराही

धावे निरंतर हरी मुख पाहण्यासी

ऐसीच दृष्टि तव मंगलकारि माते

मांगल्य देइ मजसी नित सिंधुकन्ये।।2.3

जैसीच अस्फुट कळी अति कोमलाही

इंदीवराचि उमले मृदु नीलवर्णी

राजीवलोचन तसे कमले तुझेची

अर्धोन्मिलीत करुणारसपूर्ण स्नेही ।। 3.1

इंद्रासि इंद्रपद जी मिळवून देई

ऐश्वर्य सर्व जगतातिल जेथ राही

दृष्टी दयार्द्र अति कोमल इंदिरा ही

देण्यास तत्पर असे सुख तेच लोकी।।3.2

विश्वा प्रफुल्लित करी तव स्निग्ध दृष्टी

आनंद कंद हरिसी सुखवी विशेषी

ओथंबली नजर प्रेमभरे तुझी ही

माझ्यावरीच पडु दे क्षण एक लक्ष्मी।।3.3

नारदाच्या मनातील भावना कदाचित श्री आद्य शंकराचार्यांना उमगल्या असव्यात . त्यांनी रचलेल्या ह्या कनकधारा स्तोत्रातील रमेची ही ऐश्वर्यसम्पन्न नजर आपणा सर्वांस सुखी करो.

-------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -