एक सोहळा मरणाचा

 

एक सोहळा मरणाचा -

                     भूषण--- लहानपणचा एक व्रात्य मुलगा! गंगेवर मनसोक्त पोहायचं, मुलाबरोबर हुंदाडायचं भूक लागली की भूकभूक करत घरी यायचं, वहिनीनी बनवलेलं सगळं फस्त करून पसार व्हायचं. एक दिवस वहिनी पानावर मीठ वाढून पुढच्या पानावर मीठ वाढण्यासाठी पुढे गेली आणि भूषणंनी मीठ खाऊन टाकलं. वहिनी मीठ! “  असं कसं झालं बाई! विसरलं वाटतं! म्हणत वहिनीनं परत मीठ वाढलं. परत फस्त करत भूषण ओरडला वहिनी मीठ !! दोनचारदा न बोलता मीठ वाढणारी वहिनी आता मात्र संतापलीकाहीही काम न करता भावाच्या कमाईचं मीठ खायला लाज नाही वाटत?’’ घाव भूषणच्या वर्मी बसलावहिनी इतक्याशा मीठावरून तू मला बोललीस? ठीक आहे. जेव्हा माझ्या कमाईचं मीठ मिळवीन तेव्हाच घरी येईन.’’ ताडताड भूषण घराबाहेर पडला. ह्या एका क्षणानी भूषण बदलून गेला. रात्रंदिवस अभ्यास करून, गुरूंकडून उच्च कोटीची विद्या मिळवून कवी भूषण झाला.

                        वरदराज मुदलीयार ह्या मठ्ठ आणि आळशी विद्यार्थ्यापुढे गुरुंजीनीही हात टेकले नवनवीन  विद्यार्थी  येत राहिले. वरदराज काही पुढच्या तुकडीत सरकेना. शेवटी एके दिवशी गुरुजी म्हणाले“ वरदराज आता पुरे! आता तू घरी जा. तुझ्या बरोबरचे सर्वजण विद्यापारंगत झाले. मला दुःख आहे की, मी तुझ्यात काही प्रगती घडवू  शकलो नाही आणि घडवू शकेन असं मला वाटत नाही.’’ विमनस्क मनाने वरदराज निघाला. वडील, आजोबा सर्वच शास्त्री पंडित! ---- आणि मी हा असा अशिक्षित!---- सारेजणं मला काय म्हणतील?” वरदराज विचार करत घराच्या दिशेने जात असतांना, तहानेने व्याकूळ होऊन एका विहीरीवर पाणी प्यायला थांबला. रहाटगाडग्याची दोरी विहीरीच्या बांधाला जिथे सारखी सारखी घासत होती तेथे दगडही झिजलेला पाहून वरदराजाला वाटलंदोरी परत परत घासून जर दगड सुद्धा झिजत असेल तर मग माझ्यात सतत मेहनत केल्याने फरक का बरं नाही पडणार?’’ वरदराज परत गुरुजींकडे आला. त्यांच्या पायावर डोकं ठेऊन म्हणाला, गुरुजी एकच संधी द्या. मी मनापासून अभ्यास करीन.’’ गुरुंजींना दया आली. आळशी वरदराज त्या एका क्षणाने’’ अभ्यासू कष्टाळु वरदराज झाला.  पाणीनीचं व्याकरण वरदराजानं सोपं करून जगापुढे ठेवलं.

                             एका हुशार पण उद्धट राजकुमारीचा माज उतरवण्यासाठी दरबारी पंडितांनी गोर्‍यागोमट्या पण मूर्ख लाकुडतोड्याला शोधून आणलं. लाकूडतोड्या ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता. राजकुमारी त्याच्या दिसण्याला आणि त्याच्या पांडित्याच्या आभासाला फसली. लग्नानंतर त्याचा मूर्खपणा कळला आणि संतापाने तिने त्या लाकूडतोड्याला हाकलवून दिलं.  “ ज्ञान संपादन केल्याशिवाय मला तोंड दाखवू नकोस’’ म्हणाली. लाकूडतोड्याचं आधीचं नावही जगाला माहीत नाही. पण वर्मी घाव लागलेल्या त्या वेड्याला नंतर कवीकुलगुरू कालिदास म्हणून लोकांनी डोक्यावर घेतलं.

                           अरे सर्वांमध्ये एकच चैतन्य असतं म्हणतोस तर ह्या रेड्यामधेही तेच असेल की. मग हा रेडा वेद म्हणू शकेल का? आमच्या मुंजी करा म्हणार्‍या चार अनाथ सन्याशाच्या  मुलांना  मोठ्या मोठ्या शास्त्री पंडितांनी प्रश्न विचारला. होय म्हणेल की! आणि रेड्याने वेद म्हटलेही. पण मग मुंजीचं कारणही उरलं नाही आणि कोणापुढे हात पसरायचंही ! जळून गेलं मन सगळं. कोत्या आणि खोट्या मनांनी भस्म केलं. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान , मुक्ताईला परत जगाकडे भीक मागायला लागली नाही.

                 मित्रांनो, जगात साधनांची कमी नसते. ती अमूप असतात.  पण साधनं अमूप असतात. म्हणून कोणी लेखक होईल पंडित हईल वा कोणी उच्च शिक्षित होईल असं नाही सांगता येत. रक्त, मांस, हाडं सर्व एकत्रित करून एकवेळ सिंह बनवता येतो पण त्याच्यात प्राण नाही ओतता येत. बंद पडलेल्या हृदयाला एक वीजेचा सणसणीत शॉक द्यायला लागतो. शॉक बसताच हृदयाचं मशिन सुरू होतं. 

                    द्विज म्हणजे जो दुसर्‍यांदा जन्माला येतो तो. पक्ष्यांना द्विज म्हणतात आणि विद्‌वान पंडितालाही द्विज म्हणतात. अंड आणि पक्षी ह्यात काही साम्य नसतंं. जणु काही अंड हा पहिला जन्म आणि अंड फोडून बाहेर येणार्‍या पक्ष्याचा तो दुसरा जन्मच असतो.  समित्पाणी म्हणजे समिधांप्रमाणे मनाला शुष्क करून, सर्व कामनांचा त्याग करून आचार्यांकडे गेलेल्या शिष्यातून एक नवा द्विज तयार होतो.  ज्याप्रमाणे सुरवंट आणि फुलपाखरात काहीही साम्य नसतं त्याप्रमाणे तो पहिल्यांदा मूर्ख होता, आळशी होता, खोडसाळ होता का अजून काही होता ह्याचा त्याच्या आत्ताच्या जीवनाशी संबंधच राहात नाही. खर तर त्याचा कोणाशीच संबंध राहात नाही. तो एकटाच स्वयूंर्ण, स्वयंसिद्ध असतो.

 

                   रागही जळून गेलेला असतो. ज्याने त्याला घाव घालून मरण दिलेलं असतं त्याच्याबद्दलही खेद नसतो. असलाच तर अत्यंत कृतज्ञपणा. ज्ञानाने तेजस्वी झालेला कालीदास एकदाच त्याच्या पूर्वपत्नीला भेटला. ती त्याच्या पांडित्याने भारून अत्यंत आनंदी झाली. पण कालीदासाने तिला साष्टांग नमस्कार घातला. हे जननी तुझ्यामुळे मी ज्ञान संपादन केले.” राजकुमारी संतापाने थरथरत होती. शाप देऊन म्हणाली एका स्त्रीकडूनच तुला मृत्यू येईल. कालीदासाला शापवाणीही शिरसावंद्य होती. 

                             घाव असा बसायला पाहिजे की मन जळून जळून  मेलं पाहिजे. शेपटीवर घाव बसला तर मनाची नुसतीच तडफड, तगमग, लाहीलाही आणि अजून काय काय होत राहते. अहंकार मेला की   दुःख संपत. मेल्या मनाला जळणाचं भय उरत नाही. मग त्याच्या जळण्यातून ते स्वतः प्रकाशित होऊन उठतं आणि दुसर्‍यांनाही प्रकाश देतं. हे चंदन, हे बाभूळ का हे शेण हा भेद जळण्यापूर्वीचा. आगीत पडले की भेद संपले. सर्वच अग्नी होउन राहतात. आपल्या मरणाचा सोहळा जिवंतपणी पाहतांना तुकोबाही म्हणतात,

आपुले मरण पाहिले म्या डोळा। तो झाला सोहळा अनुपम्य।। १।।

आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवने। सर्वात्मकपणे भोग झाला।।

एकदेशां होतों अहंकारे आथिला। त्याच्या त्यागे जाला सुकाळ हा।। २।।

फिटलें सुतक जन्ममरणाचें। मी माझ्या संकोचें दुरी झालों।। ३।।

नारायणें दिला वसतीस ठाव। ठेवूनियां भाव ठेलों पायी।। ४।।

तुका म्हणे दिलें उमटूनि जगीं। घेतले तें अंगी लावूनियां।। ५।।

             एकदा का आपलच मरण आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहीलं की त्याचे सर्व भवबंधच गळून पडतात. मेलेल्यालाच नवीन जन्म मिळतो. नवीन कोणी दैवी मायबाप त्याच्यामागे उभे राहतात. मग त्याच्या प्रचंड सामर्थ्यशक्तीचं आश्चर्य काय करावं? सरस्वतीच आई म्हणून मिळाली तर तो मुका कसा राहील? कामधेनूच ज्याची आई त्याला अप्राप्य काय? आता त्याचं सर्व न्यून जाऊन ज्ञान पूर्णत्वाला येतं.

                    सती आपल्याच वडीलांच्या दक्ष प्रजापतीच्या यज्ञात अपमानांच्या उसळणार्‍या ज्वालांमधे जळून गेली. माझे वडिल किती मोठे हा अहंकार चूरचूर झाला. सती मेली. आणि नवीन सती जन्माला आली आता आता दक्ष तिचा बाप नव्हता, तिचे आई, भाऊ बहिणी तिचे कोणीच उरले नाहीत. आता ती पार्वती झाली. नगाधिराज हिमालय तिच्या पाठीशी  पिता म्हणून उभा राहिला. आता ती जगज्जननी झाली.

           लाकुडतोड्याला साक्षात कालीमाता माता म्हणून लाभली. ज्ञानाचा वरदहस्त तिने बाळाच्या डोक्यावर ठेवला आणि तो कालीदास झाला. त्याचा भूतकाळ जळून गेला. नावासकट जळाला. भोजराजासारखा उत्तम मित्र त्याच्यावरून जीव ओवाळून टाकू लागला. भूषणला शिवराज लाभले आणि तो कवी भूषण झाला. ज्ञानराज तर स्वतःच सार्‍यांची माऊली झाले. निवृत्तीनाथांचे एकुलते एक झाले. निवृत्तीनाथ भाऊ न राहता गुरू झाले.

---------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

भौमासुर / नरकासुर वध –

ललित लेख (अनुक्रमणिका)