गणपती आणि कुबेर ( गोष्ट )

 

गणपती आणि कुबेर  ( गोष्ट )  -

                 कुबेर हा रावणाचा भाऊ. त्याच लंकेचं राज्य रावणाने बळकावलं. तो देवांचा खजिनदार झाला. असं असूनही त्याच्या मनात एक खंत होती. त्याला कोणी देवपण द्यायला तयार नव्हते. यक्ष म्हणून मिळणार्‍या दुय्यम स्थानामुळे  सर्वात श्रीमंत माणूस असुनही तो उपेक्षितच होता. तो रावणाचाच भाऊ असल्याने तो रावणाइतका नसला तरी महत्त्वाकांक्षी होता. त्याच्या मनात सर्वांनी आपल्याला मान द्यावा ही सुप्त इच्छा होती.

                        एकदा काय झाल! कुबेर त्याच्या अलकापुरी नावाच्या राजधानीत त्याच्या भव्य प्रासादात बसून विचार करु लागला, मी केवढा श्रीमंत. माझं वैभव पाहून देवांचेही डोळे दिपून जातील. माझी अलकापुरी स्वर्गात राहणार्‍या इंद्राच्या इंद्रपुरीहूनही सुंदर आहे. माझं ऐश्वर्य सारे देवही डोळे विस्फारून बघत राहतील. मी उत्तर दिशेचा लोकपाल आहे. देवांच्या तिजोरीच्या किल्या सांभाळणारा, त्यांचा खजिनदार मीच आहे.

               त्याच वेळेस सर्व देवांनी आपल्याला मान द्यावा , आपल्या ऐश्वर्याचे गुणगान करावे ह्यासाठी त्याला एक उपायही सुचला. आपण सर्व देवांसाठी एक भोजन आयोजित करावे आणि त्यासाठी देवांचाही देव अशा महादेवाला आमंत्रित करावे. महादेव येणार म्हटले की सर्व देव अपसुक येतीलच.  मग त्यांना माझ्या ह्या अलकापुरीचे ऐश्वर्य  दिसेल. मत्सर वाटेल देवांना माझा हा बडेजाव पाहून. चडफडतील ते माझी सत्ता पाहून. आज जशी एखाद्या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री यांना बोलावलं जात तसे कुबेराने महादेवांना निमंत्रण देण्याचं ठरवलं.

लगेचच भरजरी कपडे घालून रेशमी उपरणं पांघरून, उत्तमोत्तम, भारी भारी दागिने घालून तो महादेवांकडे कैलासावर जाण्यास निघाला. कैलासावर आला तर महादेव डोळे मिटून तप करत बसलेले. काय कराव बर! कुबेर तेथेच येरझार्‍या घालत राहिला.  महादेवांनी डोळे उघडले. ``कुबेरा, कधी आलास? काय काम काढलेस माझ्याकडे?'' त्यांनी कुबेराला हसत हसत विचारले. ``महादेवा! '' म्हणत कुबेराने साष्टांग दंडवत घातला. `` देवा, मला आपली फार फार आठवण झाली. आपल्याला कधी भेटतो असे मला झाले. म्हणून आपले दर्शन घेण्याच्या अनावर इच्छेने मी इथवर आलो. देवा आपली माझ्यावर कृपा असु द्यावी. ''

कुबेराच्या मनात काय आहे हे महादेवांनी बरोबर ओळखले होते. ते स्मित करीत म्हणाले, ``कुबेरा, काय तुझ्या मनात असेल ते निःशंकपणे सांग.'' हात जोडून अतिशय नम्रपणे कुबेर म्हणाला, ``महादेवा आपण माझ्याकडे येण्याची कृपा करावी. माझ्या अतिथ्याचा स्वीकार करावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. आपले पाय माझ्या नगरीला --- अलकापुरीला लागले तर मी धन्य होईन. कसेही करा पण उद्या माझ्याकडे भोजनाला यायचे आपण मान्य करा.''

``अरे कुबेरा, मी तर असा तपश्चर्येत गुंतलो आहे. माझं येणं जरा कठीणच दिसतय.'' `` नका नका! असं करु नका. आपण मान्य केले नाही तर मी आपले पाय सोडणार नाही.'' कुबेराने महादेवांचे पायच धरले. कुबेराचे खरे कारण महादेवांना बरोबर कळले होते. महादेवांच्या शेजारीच गणपतीबाप्पा उभे होते. त्याच्याकडे कटाक्ष टाकत महादेव कुबेराला म्हणाले, ``ऊठ, ऊठ कुबेरा. अरे मी जरी कैलास सोडून येऊ शकत नसलो तरी माझा हा पुत्र गणेश तुझ्याकडे येईल.'' त्यांनी गणेशाकडे अंगुली निर्देश केला. `` हो येईन की मी भोजनाला. '' गणपती बोलला. चला महादेव नाहीत तर त्यांचा मुलगा जरी आला तरी चालेल. सर्व देवांना सांगता येईल, स्वतः महादेवांनी गणेशाला माझ्याकडे भोजनाला यायचा आदेश दिला आहे. कुबेराने महादेवांचे पाय सोडले. ``धन्यवाद! मी पावन झालो. आपण परम कृपाळु आहात, सर्वांवर आपला कृपाकटाक्ष असतो. गणेशा उद्या आपण या. मी वाट पहात आहे'' असे म्हणून कुबेर आनंदाने अलकापुरीला परत आला. त्याने सर्व देवांना निमंत्रणे धाडली. त्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून साक्षात शिव शंकरांनी गणेशाला हजर राहण्यास सांगितले आहे. हेही कळवले. उद्याच्या मेजवानीची जंगी तयारी सुरु केली. त्यासोबत त्याचे ऐश्वर्य ठिकठिकाणी नजरेत भरेल अशी सर्व नगरी सजविण्याची आज्ञा दिली.

                    उद्या सर्व देव आले की माझ्या संपत्तीकडे डोळे विस्फारून बघत राहतील. त्यांच्या तोंडून अलकापुरीच्या सौंदर्याच्या, वैभवाच्या प्रशंसेचे बोल कान तृप्त होई पर्यंत ऐकायला मिळतील अशी स्वप्न रात्रभर तो मनातल्या मनात रंगवत होता. सकाळ झाली. तसे स्वतःच्याच नामी युक्तीवर खूष होत त्याने भारी पोशाख घातला. रत्न, माणिक, हिरे यांचे दागिने घातले. केशर कस्तुरीची उटी लावली. अजुन सर्वजण यायला बराच अवकाश होता.

                  एवढ्यात घाबरे घुबरे होऊन धावत धावत काही सेवक आले. `` महाराज कोणी तरी एक बालक वेगाने इकडे येत आहे. आम्ही त्याला अडवायचा प्रयत्न केला पण त्याने आम्हालाच त्याच्या नुसत्या हातानेच दूर लोटले. तो अतिशय रागावला आहे आणि `कुठे आहे तुमचा मालक कुबेर?' असे विचारत  इकडेच येत आहे.''   तो पर्यंत गणेशबाळ तेथे पोचलाही. ``यावे यावे गणेशा'' म्हणून त्याचे स्वागत करायच्या आतच गणेश म्हणाला, ``कुबेरा मला खूप भूक लागली आहे. कुठे आहे तुझी भोजनाची तयारी?'' ``बसावे देवा.'' कशी बशी गणेशाची समजूत काढत गणेशाला आसनावर बसवत कुबेर म्हणाला.

``माझी भोजनाची व्यवस्था कर. बाकी मला काही माहीत नाही.'' कुबेराने भराभरा गणेशासाठी भोजन आणण्यास सेवकांना फर्मावले. सेवक धावत जाऊन भोजन घेऊन आले.  गणेशाने ते सर्व संपवले. ``कुबेरा भोजन!'' कुबेराचे सेवक धावत होते. पातेली भर भरून भोजन आणत होते आणि काही वेळातच गणेश ते संपवून कुबेराकडे भोजनाची मागणी करत होता. भूक भूक भूक ! गणेशाची भूक भागत नव्हती. शेवटी गणेश उठला आणि सरळ स्वयंपाकघरात जाऊन त्याने सर्व पातेली तोंडाला लावून  होते नव्हते ते सर्व फस्त केले. आता कुबेर  घाबरून गणपतीकडे बघत होता. गणेशाने कुबेराच्या सर्व अन्नधान्य साठवलेल्या कोठारावर मोर्चा वळवला. त्याचे सर्व अन्न भांडार फस्त केले. ``कुबेरा भूक!'' आता तर तो कुबेराकडे पहायलाही थांबला नाही जे दिसेल ते त्याने फस्त करायला सुरवात केली. दालनात असलेल्या सर्व गोष्टी त्याने पोटात रिचवल्या. सोन्याची आसने, सिंहासने, सजावटीसाठी मांडलेल्या गोष्टी, पडदे,  रत्नभांडार, सुवर्णभांडार बघता बघता सर्व गोष्टी गणेशाच्या पोटात चालल्या होत्या. त्याने कुबेराचे धन भांडारही शोधून काढले. तेही रिचवले. सोने, चांदी जे दिसेल ते तो खात सुटला. सगळा महाल ओस पडला. शेवटी अलकापुरीत सर्वत्र हिंडून त्याने जे दिसेल ते खायला सुरवात केली. कुबेराला कापरेच भरले. भीतीने तो थरथर कापू लागला. अलकापुरीत संपूर्ण खडखडाट करून ठेवल्यावर गणेशाने आता त्याचा मोर्चा कुबेराकडे वळवला. ``कुबेरा प्रचंड भूक लागली आहे. आता काय खाऊ? इथे तर काहीच दिसत नाही. काही तरी खायला दे नाही तर तुलाच खाऊन टाकतो.'' कुबेर घाबरुन पळायला लागला. गणपती त्याच्या पाठीमागे धावायला लागला. ऐश्वर्यात लोळणार्‍या कुबेराचा देहही थुलथुलीत, स्थुल  झाला होता. त्याला जोरात पळताही येत नव्हते. पळतांना जागोजागी पडत होता. ठेचकाळत होता. मागे वळुन पहावे तर गणेश मागे पाठलाग करत आहे. गणेशाच्या तावडीत सापडू ह्या भयाने कुबेर खाली पडला तरी परत उठून पळत होता. त्याच्या अंगावरचे भारी भारी कपडे आता जागोजागी फाटले होते. त्याचे अमूल्य दागिने वाटेत जागोजागी गळुन पडले किंवा पळतांना ओझे कमी व्हावे म्हणून त्याने आपणहूनच फेकून दिले. त्याचे सर्व अंग धुळीने भरले होते. मागे पळत येणारा गणेश त्याची फजिती पाहून जोरजोरात हसत होता.

``वाचवा वाचवा! महादेवा मला वाचवा!! हे कैलासपती माझे रक्षण करा!  हे कंठनीळा मला संकटातून सोडवा! हे शूलपाणी आता आपल्यावाचून माझा कोणी त्राता नाही!'' असा शंकराचा मनापासून धावा करत कुबेर कैलासावर पोचला. त्याने शंकराचे पाय धरले. ``महेश्वऽऽरा वाचवा!'' त्याच्या तोंडुन अजुन शब्दही बाहेर पडेना. त्याला भयंकर धाप लागली होती. कुबेराने हृदयापासून मारलेली हाक  महादेवांपर्यंत पोचली. महादेवांनी त्यांचे नेत्र उघडले. कुबेराची दुर्दशा बघत त्यांनी काळजीने विचारले, `` अरे कुबेरा हे काय? तुझी एवढी वाईट अवस्था कशी झाली. अरे, देवांचा तू खजिनदार! रथातून,  पालखीतून यायच्या ऐवजी असा भणंग भिकार्‍यासारखा कसा काय आलास? तुझी ही दुरावस्था कोणी केली?'' कुबेराचा उर भयाने धपापत होता. भात्यासारखी त्याची छाती वरखाली होत होती. ``गणेश!  - - -गणेश - - पाठलाग करत आहे. ''  इतके बोलून महादेवांच्या पायावर तो कोसळला.

तोपर्यंत गणेश ही कैलासावर पोचला होता. `` गणेशा काय झाले?'' महादेवांनी गणेशाला विचारले. ``कुबेराने मला जेवायला बोलावून उपाशीच ठेवले. मला भूक लागली आहे.'' काय झाले हे महादेवांनी जाणले. त्यांच्या मुखावर स्मितरेखा उमटली. गणेशाला म्हणाले, ``जा पार्वतीमाता भोजनासाठी तुझी वाट पहात आहे. '' गणेश कुबेराकडे पाहून हसत हसत निघून गेला. कुबेराला उठवत महादेव म्हणाले, ``कुबेरा ऊठ! मी देवांचा खजिनदार! माझ्या एवढा श्रेष्ठ आणि श्रीमंत कोणी नाही असा तुला अहंकार झाला होता. तुला तुझ्या ऐश्वर्याचे प्रदर्शन मांडून देवांना हिणवायचे होते. अरे धन तर देवांचे. तू फक्त राखण करणारा आणि योग्य विनियोग करणारा खजिनदार. तू मला जेवायला बोलवायला आलास तेंव्हाच तुझा उद्देश मी ताडला. म्हणूनच  गणेशाला मी तुझ्याकडे जेवायला पाठवले होते. जा परत जा. गणेश तुला त्रास देणार नाही. तुझे ऐश्वर्य तुला परत मिळेल. पण त्याआधी सर्व देवांची माफी मागायला लागेल तुला.'' `` देवा मी चुकलो. मी सर्व देवांची माफी मागेन'' कुबेराने मान खाली घातली. ``जा अलकापुरीला परत जा. सारे देव तुझी वाट पहात आहेत.'' महादेव म्हणाले. कुबेर मान खाली घालून अलकापुरीला निघाला. तेथे सारे देव त्याची वाटच बघत होते. ``कुबेरा, आम्हाला जेवायला बोलावलस पण हे काय? येथे तर काहीच दिसत नाही. तूही कुठे गेला होतास? तुझी अलकापुरी स्वर्गाहून सुंदर आहे असं ऐकून होतो आम्ही. इथे तर सगळाच खडखडाट दिसतोय. आम्हाला बसायलाही आसन नाही. आणि हा काय रे तुझा अवतार. फाटकं नेसून तुटक पांघरून तू आमचं स्वागत करणार का?'' कुबेराच्या डोळ्यातून अश्रु वहात होते. हात जोडून नम्रपणे त्याने सर्व देवांना नमस्कार केला. झालेला सर्व प्रसंग कथन केला. त्यांची माफी मागितली. आता त्याच्या मनात अहंकाराचा लवलेशही राहिला नाही. सर्व देवांनीही कुबेराला आशीर्वाद दिला. आणि काय आश्चर्य कुबेराचे अन्नभांडार, धनभांडार, रत्नभांडार सर्व काही पूर्वी होते त्यापेक्षाही अधिक वैभवाने भरून गेले. त्याची अलकापुरी  पूर्वीपेक्षा सुंदर दिसू लागली. त्याचा प्रासाद ऐश्वर्य आणि वैभवाने  भरून गेला. त्याने आनंदाने महादेवांची आणि गणेशाची प्रार्थना करून त्यांचे आभार मानले.  सर्व देवही सुग्रास भोजन करुन कुबेराचे तोंडभरून कौतुक आणि स्तुती करत परत गेले.

------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -