बापू देसाई -

 

बापू देसाई -

`विक्रमादित्याच्या सिंहासनावर आज तरी मी विराजमान होणारच.' असं ठरवून रोज भोजराजा जात असे पण दर वेळेला तो सिंहासनावर बसायच्या आधीच सिंहासनाचा अविभाज्य भाग असलेली, त्या सिंहासनाच्याच कलाकुसरीचा भाग असलेली एखादि पुतळी सजीव होऊन त्याला रोखत असे. ``थांब भोजा, तुझ्याकडे विक्रमादित्याकडे असलेला मी सांगते तो गुण आहे का? तरच ह्या सिंहासनावर बस अन्यथा नाही.''

 

अशाच एका अदृश्य सिंहासनावर बसायचा जेंव्हा जेंव्हा मी प्रयत्न करत असते, तेंव्हा तेंव्हा इतरवेळी सामान्य जनसागरात मिसळून गेलेली एखादि आकृती पुढे येते आणि मला ``थांब!'' म्हणून मागे ओढते. ही माणसं कोणी ग्रेट नावाजलेली नसतात. पण त्यांच्या एखाद्या असामान्य गुणाच्या परिमाणाची इतकी उंच रेघ माझ्या शेजारी ओढून जातात की मला माझं खुजेपण पाहून लाज वाटायला लागावी.  विक्रमादित्याच्या सिंहासनाला बत्तीसच पुतळ्या होत्या पण माझ्या समोर दिसणार्‍या सिंहासनाला अगणित अगणित पुतळ्या जोडलेल्या आहेत. त्यातलीच एक बापू देसाई.

कोण हा बापू देसाई?

----------------------------

माझ्या वडीलांना दरवर्षी  external examiner म्हणून एक दिड महिना कुठल्या कुठल्या लांबच्या कॉलेजेस् मधे जावे लागे. ते जेथे जातील तेथे लगेचच तेथील कॉलेजमधल्या तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्‍यांची चौकशी करत. बहुतेक कर्मचारी हे सावकाराच्या घट्ट पाशात अडकलेले असत. कर्जाच्या न फिटणार्‍या डोंगराखाली गाडले गेलेले असत. त्या सर्वांचा गट बनवून पहिल्यांदा स्वतःचे शंभर रुपये घालून ते त्या सर्वांची जवळच्या बँकेत खाती उघडून देत. सर्वांना जेंव्हा पाहिजे असेल तेंव्हा कर्ज मिळणे, फेडणे हे त्यांना समजावून सांगत. अनेक कॉलेजचे कर्मचारी अशाने कर्जमुक्त होत. योग्य दराने त्यांना कर्जही मिळत राहे. नंतर अनेक वर्ष ते नासिकच्या कॉलेजमधे जात असल्याने तेथील सर्व कर्मचार्‍यांची कर्जमुक्ती झालेली पाहून त्यांनाही आनंद होई आणि सर्व कर्मचार्‍यांनाही त्यांच्याबद्दल आदर वाटे.

बाहेर असले तरी ते स्वतःचे जेवण स्वतः बनवीत. एकदा त्यांना खोलीवर भेटायला एक काळासावळा चुणचुणीत तरुण आला. `` सर, आत येऊ? '' ``येरे ये.''  ``सर, मी बापू देसाई. येथील कॉलेज कँटिनचा मॅनेजर आहे. आपण येथेच कँटिन असूनही एकदाही माझ्याकडे  आला नाही म्हणून मी आलो.'' ``अरे नाही नाही तसं काही नाही. पण मी बाहेरचं कधीच काही खात नाही. माझं माझं जेवण मी बनवून घेतो. स्वतःचं जेवण स्वतः बनवण्याने वेळही चांगला जातो.'' बराचवेळ तो गप्पा मारत होता. सर जेथे जातील तेथे एका महिन्याभरात सर्व कर्मचार्‍यांची, त्यांच्या परिवाराची चौकशी करून प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन करून मदत करतात हे पाहून त्यालाही कुठेतरी जवळीक निर्माण झाली होती. ``सर, --- थोडसं चाचरत तो म्हणाला. काही सांगायचं होतं तुम्हाला. हसणार नाही ना?'' ``नाही नाही बोल ना.'' विद्यार्थ्यांच्या मनातलं बोलतं करण्याचा वडिलांचा हातखंडा  होता. त्यांच्याकडे खूप अनुभवही गाठीला होता. आणि प्रत्येकाबद्दल आस्थाही. वडिलांच्या आपुलकीच्या वागण्याने थोड्याचवेळात  बापू मनाने जरा सैलावला आणि म्हणाला, ``सर, मी तुम्हाला खूप वर्ष बघत आहे. तुम्हाला कर्मचारीवर्गाबद्दल असलेली आस्था मी अनेक वर्ष पहात आहे. अगदि ह्या कँटिनमधे मी भांडी घासणारा पोर्‍या होतो तेंव्हापासून. तुम्हाला भेटल्यापासून मला कोणीतरी फार जवळच माझ्याजवळ आहे असं वाटतय. आत्तापर्यंत मी माझी कहाणी कधी कोणाला सांगीतली नाही पण का कोण जाणे मनातील सर्व आज तुम्हाला सांगावं असं मला वाटलं.'' घशात आलेला आवंढा गिळत बापू खाली मान घालून शांत बसला. उठून त्याच्या पाठीवर हात ठेऊन वडील म्हणाले, ``सांग बापू जे काही सांगायचं असेल ते सांग. मन मोकळं कर. बरं वाटेल तुला.''  बापू सांगू लागला,

``सर, मी नासिक पासून जवळ असलेल्या सिन्नर पासूनही आत एका छोट्याशा खेडेगावात राहयचो.  गाव दुष्काळाने सतत होरपळतच असायचं. पाण्याचं बारा महिने दुर्भिक्ष्य. माझ्या आईला पाण्यासाठी रोज मैलोन् मैल पायपीट करावी लागे. आम्ही मुलंही थोडीफार मदत करत असू. बाबा दुसर्‍यांच्या शेतात राब राब राबत तेंव्हा कुठे पोटाला दोन घास मिळत. उन्हाळ्यात तर आमचे हाल कुत्रा खात नसे. पाणी टंचाई तर इतकी की आम्हाला जी काय दोन तपेल्या पाण्यात अंघोळ करावी लागे ती सुद्धा खाटेवर बसून करायला लागे. खाटेखाली  घमेलं ठेवलेलं असे. खाली साठलेलं घमेल्यातील पाणी घरातील झाडांना, किंवा संडासला वापरावं लागे. स्वच्छतेच्या अभावाने खरूज आणि इतर रोग जगणं असह्य करून सोडत.

``एकदा आमच्या गावकीमधले आमचेच जवळचे नातेवाईक काशी यात्रेला गेले. (गोष्ट खूप जुनी म्हणजे किमान 45 वर्षांपूर्वीची असल्याने तेंव्हा काशीयात्रा ही किती अलभ्य आणि अवघड होती ह्याचा अंदाज करता येईल.) आमच्या गावातील काशीला जाऊन येणारे ते पहिलेच असतील. आल्यावर त्यांनी मांव्द घातलं. . गाव छोटंस होत. कुठे काही कार्यक्रम असेल तर सार्‍या गावालाच निमंत्रण असे.  सगळ्या गावाला बोलावलं. माझे आईबाबा पण गेले होते.  गंगेची पूजा झाली झाल्यावर गुरुजींनी सर्व वडिलधार्‍यांच्या पाया पडायला सांगीतलं.  गंगेला जाऊन इतकं पुण्य मिळवून आलेल्या त्या तरुण बाई सर्वांच्या पाया पडत असतांना तेथेच उभ्या असलेल्या माझ्या आईच्या पाया मात्र पडल्या नाहीत. खरतर माझी आई सर्व गावाला मदत करणारी, योग्य सल्ला देणारी होती. कोणालाही काही दुखलं खुपलं, मूल आडवं आलं तर धावत सारे आईकडे येत. घरात गरीबी असून सुद्धा आईन कधी कोणाला एक पै मागितली नाही. गावात माझ्या आईबद्दल सर्वांनाच आदर होता. प्रथम आईला वाटलं की चुकून राहिलं असेल. पण नंतर तेथेच असलेल्या दुसर्‍या बाईंनी तिला सांगितल्यावरही तिने पूर्ण दुर्लक्ष केलं. इतकच नाहीतर डोळ्यानेच त्या बाईंना इशारा करत तिच्या कृतीचं समर्थनही केलं.  सर्वांसमक्ष झालेल्या अपमानाने आईला तेथेच रडू येईल की काय असं वाटायला लागलं. माझी आई घरी आली ती रडत रडतच. सर, दरिद्री माणूस कोणाला दिसत नाही म्हणतात तेच खर. सर्वजण त्या काशीवालीचच कौतुक करण्यात गढले होते.

 ``माझ्या देखतच ही घटना घडली होती. सर, आमच्यावर एकीकडे वरुणराजाने पाण्याची अवकृपा केली होती तरी दुसरीकडे आम्हा गरीबांवर दारीद्र्यदेवाची एवढी कृपा होती की डोळ्यातून वाहणार्‍या पाण्याच्या झर्‍यांना खळ नव्हता. हृदयाचं तळं आसवांनी सतत तुडुंब भरत होतं. लहान होतो मी पण निश्चय केला आणि गाव सोडलं. पाई पाई कधीतरी नासिकमधे आलो. बारीकसारीक कामं करत पोट भरत होतो. तेंव्हा ह्या कॉलेजच्या कँटिनच्या मालकानी नोकरी दिली. दिवसभर भांडी घासयची त्याबदल्यात दोन वेळचं जेवण तरी मिळू लागलं. काही दिवसांनी त्यालाच विनंती केली की मला रात्रीच्या शाळेत शिकायचय. मला फीचे पैसे देत जा. आता मला अडिच रुपये मिळू लागले. त्यात माझी फी आणि थोडीफार पुस्तकं येऊ लागली. दिवसभर काम करून एवढा दमायचो की रात्री वर्गात झोप येऊ लागे. त्याचवेळेस आईचा अपमान जागे करी आणि मी लिहू वाचू लागे. सर, SSC. with Distinction पास झालो. कँटिन मालकालाही आनंद झाला त्याने माझा पगार वाढवला आणि सरांशी बोलून माझी ह्याच कॉलेजमधे अ‍ॅडमिशनही करवली. मी वेटरचं कामं करू लागलो. एव्हाना कँटिनमधे येणार्‍या मुलांना मी माहीत झालो होतो. त्यांनीही मला नोट्स, पुस्तके अशी मदत केली. माझ्या बुडणार्‍या क्लासच्या नोट्स ही मुले मला देत. कोणी कपडे देत. माझा सर्व पगार मी वाचवू लागलो. काही आईला पाठवत असे काही बँकेत. सर रोज वर्तमानपत्रात येणार्‍या काशी तीर्थयात्रेला नेणार्‍या  यात्राकंपनीच्या जाहिराती मी बघत असे. एकदा माझ्या लक्षात आलं की माझ्या आईबाबांना तीर्थयात्रेला पाठविण्याइतके पैसे माझ्याकडे जमले आहेत. लगेचच मी त्या यात्राकंपनीत जाऊन माझ्या आईवडिलांचे पैसे भरले. गावाला जाऊन त्यांना घेऊन आलो. गावाबाहेरचं जग न पाहिलेल्या माझ्या आईवडिलांना आपल्याला आपला पोर काशीला पाठवत आहे हे कळल्यावर त्यांच मन सूपाएवढं मोठ झालं. कारण अजूनही आमच्या गावाची परिस्थिती तशीच होती. त्यात तसूभरही फरक पडला नव्हता. सर तोपर्यंत मीही ह्या कँटिनचा मॅनेजर झालो होतो. जिथे भांडी घासली तेथे मॅनेजर म्हणून कँटिनचा सर्व कारभार अत्यंत चोखपणे बघत होतो. सर्व सांभाळून MA  चा अभ्यास करत होतो. माझे आईवडिल महिनाभर काशीच्या तीर्थयात्रेला जाऊन आल्यावर त्यांना झालेला आनंद सर मी शब्दात सांगण कठीण आहे. त्यांना घेऊन मी आमच्या गावी गेलो आणि मोठ्ठ मांव्द घातलं. आई वडलांना नवीन कापडं घेतली आईला नवीन लुगडं आणि सगळ्या गावाला बोलावल. सारा गाव येऊन माझ्या आईच्या पाया पडत होता. सर, मी कोपर्‍यात उभं राहून त्या `काशीबाई'ची वाट बघत होतो. सर ती आली.  काशीला जाऊन आलेल्या माझ्या आईच्या पाया पडली आणि सर, माझा बांध फुटला. इतके वर्ष राखून ठेवलेले अश्रू घळाघळा गालांवरून ओघळायला लागले. आतल्या खोलीत जाऊन ढसाढसा रडलो सर. गरीबीनी, दुःखानी, कष्टानी एवढं रडवलं नव्हतं सर, पण आज माझा प्रतिशोध पूर्ण झाला आणि मनाचा बांध फुटावा तसा मी रडत होतो. आईच्याही डोळ्याला आनंदाश्रूंचा पूर लोटला सर.''

 बापूची कहाणी संपली आणि सगळ्या खोलीत शांतता पसरली. खाली मान घालून कहाणी सांगणार्‍या बापूने मान वर केली तर  त्याच्या सरांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. भानावर येत बापू पटकन उठला आणि पाया पडत म्हणाला, ``सर काही चुकलं काहो माझं ?'' ``नाही रे पोरा!  तुझं आभाळाएवढं मोठ्ठ मन पाहून मलाही शब्द सुचत नाहीएत.'' आपले अश्रू पुसत वडिलांनी बापूला उठवलं. ``बापू आज कँटिनमधे नको आज माझ्याकडे चहा घेऊन जा.'' आईने सोबत दिलेल्या लाडूच्या डब्यातील लाडू वाटित घालून बापूच्या हातात ठेवत वडिल म्हणाले. ``खूप मोठा हो. ''

नंतर बापू  देसाई त्याच कॉलेजमधे प्रोफेसरही झाला. आज ह्या घटनेला इतकी वर्ष झाली की सत्तर पंचाहत्तर वर्षांचा बापू निवृत्त होऊन त्याच्या नातवांसोबत खेळत असेल कदाचित त्याच्या विद्यार्थ्यांना फावल्यावेळात मार्गदर्शनही करत असेल

पण आजही तो काळासावळा काळ्याभोर बोलक्या डोळ्यांचा तरुण बापू देसाई  माझ्या मनातील एका अदृश्य सिंहासनाची पुतळी बनून सजगपणे उभा असतो जेंव्हा जेंव्हा माझ्या मनातील स्वभावजात प्रतिशोधाची भावना जागी होते, जेंव्हा जेंव्हा मन सूडाच्या भावनेने मन पेटून उठत, जेंव्हा जेंव्हा मी `त्याला शिकवीन चांगलाच धडा' असं म्हणत असते किंवा त्याला वठणीवर आणल्याशिवाय मी नावाची अरुंधती नाही असं म्हणत म्यानातून काढलेल्या धारदार तलवारीसारखा माझा प्रतिशोध तळपत बाहेर येतो तेंव्हा तेंव्हा माझ्या समोर अदृश्यपणे ठेवलेल्या सिंहासनाची `बापू देसाई' नामक एक पुतळी सजीव होऊन माझ्यासमोर उभी राहते. ` असा प्रतिशोध घेता येत असेल तर जरूर घे --- सिंहासन तुझ्यासाठीच आहे. ' आणि आवसानघात झाल्यासारखं मन तडफडत राहतं. सिंहासनाच्या  न संपणार्‍या पाय र्‍या मला हसत राहतात.

-----------------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -