बब्या

 

श्री बब्यामहाराज प्रसन्न

फार दिवसांनी बब्या भेटला. पहिलीपासून बब्या आणि मी एकाच वर्गात होतो पण दोन वर्षांनी बब्या तिसरीतच अडकला. मी पाचवी पास झाले तरी बब्या तिसरीतच होता. मग कधितरी तिसरीच्या चक्रव्यूहातून बब्या कायमचा सुटला. बब्या रस्त्यावर टामाटु विकतो तर कधी बब्यानं पानपट्टीचा ठेला लावल्याच्या चर्चा ऐकिवात येत.

बरीच वर्ष गेली आणि मनातला बब्याही पुसला गेला. आणि अचानक अनेक वर्षांनी मी रस्त्याने जात असतांना ``तॉईऽऽऽतॉऽऽई'' अशा मागून येणार्‍या अस्पष्ट हाका स्पष्ट होत होत माझ्यापाशीच येऊन थांबल्या. तोंड पानानी भरलेलं आणि रंगलेलं. मला पाहून भरलेलं तोंड रस्त्यावर रिकामं करत बब्या बोलला, ``ताई, आपुन अजुन बी तुमाला ओळखतो बर का!'' ` माझ्या चेहर्‍यावर अपरिचित भावांच्या रेघा पाहून बब्या म्हणाला, ओळखलं न्हाय? मी बब्या.'' आज कित्येक वर्षांनी साक्षात बब्या समोर उभा. `` हे रे काय बब्या!'' बब्याच्या त्या(रस्त्यावर तोंड मोकळ करायच्या) कृत्यावर घोर नाराजी व्यक्त करत मी. माझ्या कपाळावर आठ्यांच जाळं आणि चेहर्‍यावर नापसंतीच्या तीव्र रेघा उमटल्या.

मी पुढे काही बोलायच्या आधीच जराही डगमगता बब्या एकदम टेंभुर्णीच्या लढाईचा निकराचा पवित्रा घेत म्हणाला, ``ताऽऽई, ते काय बी सांगू नगा.''

``का? का? काय सांगू नका? '' मीच जरा बिचकत अडखळत बोलले. अत्यंत आवेशाने हातवारे करत बब्या म्हणाल,- ``राजस्थानात जयपूर का कोनच्यातरी शिटीला म्हने मोठ्या कौतुकानं पिंक शिटी म्हनत्यात. त्या शिटीचा इंड्यातच काय पन थिकडं थ्येट फारीन पत्तुर बोलबाला लावलाय! त्यांचा त्येवढा उदो उदो! तिकडे पिंक शिटी मंग हामच्याकडे काय रं लेकानु? हामच्याकडे तर प्रत्येक शिटी पिंकच पिंक. प्रत्येक जागा पिंकांपिंक.'' बब्याच्या अवताराकडे मी डोळे फाडून बघत होते. पहिलीत बब्याच्या तोंडातून शब्द फुटत नसे. मी काही बोलायच्या आत बब्या सुरू -

``म्हंजी ताई, तुमी बगा! लई दिसापासून मी बारीकपने निरीक्षन का काय ते करतुया. कुठला प्रानी दिसला की मी त्याच्या त्वांडाकडेच बघाऽऽऽत र्‍हातो. हा आमचा मोत्या, हितकी हातभर लांब जिभली काढून कवाधरनं हॅ हॅ हॅ हॅ करीत बसतो. पन तेला थुकायला सांगितलं तर थुकता येत का ? - - न्हाई. मांजर थुकताना येकदा तरी बघित्ल का? आता आमच्याकडची कपिला! दिसभर खाल्लेल्या पलास्टिकच्या पिशव्या अन् खरकट रवंथ करत राहते. ती बी पलास्टिक खाईल पन थुकनार न्हाय. परवा हामच्या कालनीत माकडं शिरलं. हुप हुप करत सारी लेकरं धावत होती त्यामागं. कोनी केळ कोनी मुंगफली देत हुतं. सगळं गालात दडवून ठेवत होतं. पन ते बी थुकल नाही! आरऽऽऽहिच्या! म्हन्ज्जी त्याला बी थुकता येईना की राव.

वाघ न्हाय शिंव्ह नाय, शिंगरु न्हाय, कोकरु न्हाय, हत्ती बी न्हाय. हत्ती पासून छिट्टीपर्यंत कोनाला बी थुकाया जमत न्हाय. थुक् म्हनलं तरी कोनी थुकत न्हाई. अंगासं! कस थुकनार?''---- आपल्याच डाव्या तळहातावर उजवी मूठ आपटत बब्या पुढे, ``मी म्हनत्यो कस्स थुकनार? द्येवानं त्यांस्नी खाली धाडतांनाच नरडं आत ओढून पाठवलं हाय! ''

``नरऽड? आत ओढून पाठवलय? म्हणजे काय रे बब्या?'' मी बिचकत माझं शंकासमधान होईल का ह्याच्या प्रतिक्षेत. पण बब्यावर परिणाम नाही.

``आता मला खातर झाली हाय की थुकायचं वरदान भगवंतानं फकस्त एकट्या मानसालाच दिलय!'' ह्या वरदानाची शान आपुनच ठ्येव्ली पाहिजे का न्हाय? '' बब्यानं घशातून भला मोठ्ठा आवाज काढला आणि जिभेवर आलेल्या दैवी वरदानाचा मान ठेवला.

बब्याच्या ह्या परम गहन शोधावर मी आश्चर्याने दिग्मूढच झाले. मघाशी तिरस्कृत वाटणारा बब्याचा चेहरा आता मला दैवी पुरस्कृत आणि वेगळाच भासू लागला. बब्याच्या चेहर्‍यावर लालबुंद सूर्यासारखं लाल तेज झळकत होत. त्याच्या लाल तेजाचे कवडसे त्याच्या पांढर्‍या झब्ब्यावर ठिकठिकाणी उठून दिसत होते. ``बब्या बब्या अरे कुठे आहेत रे तुझे चरणारविंद?'' - मी.

``काय? कुठले चणे? कसला चण्याचा कंद? चण्याला कंद नसतो ताऽऽऽऽई. तुमी शिकलेली मान्स! पन कायच्या काईच बोल्ता. ह्यॅ ऽऽऽ ह्यॅ ऽऽ ह्यॅ ! आपले डाळींबाच्या दाण्यांसारखे लाल डाळिंबी दात दाखवत बब्या हसला.

``अरे चणे नाही रे बाबा चरण --चरण - - चरणारविंद!! म्हणजे तुझे पाय कुठे आहेत?''

``हात् तिच्या मायला! माजं पाय काय मला सोडून जानार काय? त्ये तर कायमचे माझ्या संगटच र्‍हाहनार. पर ते कश्शापायी?''

``तुझ्या पायांवर डोक ठेवते.''

``ह्रावु द्यावा. ह्रावु द्यावा. मी द्येव थोडाच हाय? आणि काहीतरी आठवल्यासारखा बब्या एकदम म्हणाला, ``हा पन बर आता मला ह्ये सांगा, सध्या द्येव काय करतात? म्हन्जी कुठ्ठ असत्यात?''

``काहीतरीच काय बब्या?'' मी जरा मुरकायचा आणि लाजायचा प्रयत्न करून म्हणाले,- ``बब्या, माझं सासरचं आडनाव देव नाही. ह्यांचं आडनाव दीक्षित आहे.''

बब्यावर फारसा परिणाम झाला नाही.

``म्यॅडम द्येव! द्येव! म्हन्जी आपल्या देव्हार्‍हयातले द्येव! त्ये कुठ्ठ असतात म्हनत्यो मी.''

``कुठे असतात?'' - जड मूढ पणे मी

``द्येवांनी घर सोड्लऽऽऽऽऽ!'' - बब्या

मी घाबरलेच. ``बब्ब्ब्या ! काय सांगतोस काय?'' -मी डोळे विस्फारून काळजीच्या सुरात.

व्हय! गणेश, दत्त,मारुती साईबाबा सम्दे द्येव झाडून आता कोपर्‍या कोपर्‍यावर बसलेले असत्यात.

मी वरमले. ``होय होय आता त्यांच्यावर जिन्याचे आणि भिंतींचे संरक्षण सोपविले आहे. माझा जीव भांड्यात पडला. ( नाहीतर मी आजपर्यंत केलेली स्तोत्रांची भाषांतर फुक्कट जायची) बर्‍याच दिवसात भारतात संतानीही जन्म घेण्याचे postpone केलेले दिसते. नाही तर त्यांना `देव देवळात नाही देव नाही देवालयी देव जिन्यात बैसला पिंका झेलीत ओंजळी।।' अशा अभंगांच्याही सुधारीत आवृत्या काढायला लागल्या असत्या.'' - मी

``न्हाय न्हाय न्हाय! बब्याने डरकाळी फोडली. द्येवांच्या खर्‍या खुर्या भक्तांना भ्येटन्यासाटीच द्येवान द्येवळातून एक्झिट घ्येतली हाय.'' बब्याच्या इंग्रजीवर मी डोळे फाडून फाडून बघत राहिले. ``आमच्या सारख्या भक्तगणांना भेटन्यासाठीच. '' मी अवाक

पण काहीही म्हणा. बब्याने दिलेल्या नव्या ज्ञानाने माझाही दृष्टीकोण अमूलाग्र बदलून गेला. आणि मला देवाने दिलेल्या देणगीचा पुरेपूर उपयोग करणार्‍या ह्या थुंकसांप्रदायी समाजाबद्दल नितांत आदर वाटू लागला. शेवटी देवाची देणगी ! त्याचा मान आपण ठेवायलाच पाहिजे.

बब्याच्या विचांरांपासून प्रेरणा घेऊन `पिंक सिटी'च्या रस्त्यांवरून चालावे कसे ह्याचे आद्ययावत ट्रेनिंग देणारा अमेरिकेतील एक वर्षाचा `पिंक वॉक' हा एम्.एस् चा कोर्स मी नुकताच पूर्ण केला. ( अर्थात स्पॉनसर्ड बाय बबनराव हं! ) प्रोफेसर बनारसीदास पानवाला आणि लखनवी लाल छिटेवाला अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या प्रोफेश्वरांनी माझा `बंद अकल का ताला ' असा काही `खोलला' म्हणता की सध्या भारतात `पिंकवॉकमधे' माझा पाय धरणारा कोणी सापडणार नाही. बस थांबा असो अथवा रिक्षा थांबा तेथील जास्वंदीच्या फुलांप्रमाणे घातलेल्या लाल लाल रांगोळ्यांचे नुकसान करता माझ्या सारखं नजाकतीनं चालणं साक्षात करिना कत्रिनालाही जमणार नाही. बसथाब्यांवरती यथेच्छ रांगोळी घालायचे पावन कर्म उरकून बस सुरू झाल्या झाल्या बसच्या खिडक्यांमधून चौफेर रंगाची उधळण पाहून राधेप्रमाणे बावरून जाणारे वाहनस्वार बसच्या पिंकझोन मधे येणार नाही अशी काळजी घेत असतांना मी मात्र `खईके पान बनारसवाला /

`गाव तिथे रस्ता

रस्ता तिथे स्टॅंड

स्टँड तिथे पिंक

पिंक तिथे --- ये इंडिया हमारा हैं --- ह्या ठेक्यावरती झिंच्याक झिच्यांक --थू! थू!! हा शेवटचा पिंक तिय्या घेत सफाईदारपणे उतरते.

पिंक चुकवत कधी टाचेवर तर कधी चौड्यावर कसे चालावे, तर खास भारतीय रस्त्यांवरच करायच्या ह्या `रसियन' बॅलेमधे पायाच्या नुसत्या अंगठ्यावरच नव्हे तर पायाच्या एका करंगळीवर सर्व शरीर तोलून पदन्यास कसा करावा ह्यात मी भलतच प्राविण्य मिळविलं आहे. `माऊटन गोटस्' ह्या कंपनी मधील दहा आठवड्याची माझी इंटर्नशिप माझ्या `छलांग' ह्या प्रॉजेक्टसाठी मला भलतीच उपयोगी पडली. दातांवर दात ठेऊन चरर्र आवाज काढीत मारलेल्या लांब पल्याच्या पिंका अथवा दोन समांतर ओठांच्या फटीवर तर्जनी आणि मध्यमा अधिक च्या खूणेप्रमाणे ठेऊन फक्त बोटांची फट कमी जास्त करीत `पिंक लेंथ' अडजेस्ट करून मारलेल्या पिंका माउंटन गोट प्रमाणे छलांग मारून कशा ओलांडाव्यात ह्यात मी मिळविलेलं प्राविण्य पाहून लखनवी लाल छिटेवालांनी त्यांचा मलमलका कुर्ता मला बहाल केला. त्याच्यावरील पूर्वापार चालत आलेल्या लाल छिट्यांमुळे बस शेजारून जातांना मलमलच्या कुडत्यावर नव्या पिंकांचे चार चाँद लागले तर ते कसे शोभून दिसतील हे त्यांनी तोंडात पान घोळवत मला सांगितल्यावर मलाही माझ्यावरील त्यांच्या प्रेमाने गहीवरून आल्याशिवाय राहिलं नाही.

मी अमेरीकेहून पिंक वॉकचा अभ्यासक्रम पूर्ण करून परत येत असल्याचा निरोप बब्बयाला गेला मात्र; बब्या स्वतः माझ्या स्वागताला विमानतळावर हजर होता. हातामधे पानपट्ट्यांचा गुच्छ आणि विड्यांचा हार पाहून मला गहिवर लोटला. बब्या बब्या अरे किती रे हे कौतुक?'' (असं मी मनात म्हणाले. प्रत्यक्षात मात्र मी बबनराव असाच उल्लेख केला)

नेहमीच्या प्रमाणे डरकाळी आवाजात बब्या हंबरला,

``तॉऽऽई ! शीतामाई असो वा रानी रखमाबाय त्या बी `ईडा घ्याहु नारायना' म्हनत्यात. न्हाय म्हंजे त्याशिवाय त्यांचा दिस उजाडत बी न्हाय अन् संपत बी न्हाय. तर मंग मी माझ्या तॉईंचं पान- ईड्यानी स्वागत नग करायला?''

मीही आजुबाजूच्या लोकांची पर्वा करता ( किंबहुना ते माझ्याकडेच कसे पहातील ह्याचा अंदाज घेत ) खड्या आवाजात ललकारी दिली, ``बब्या महाराज की -- - बब्या बरोबरचे चार इमानदार टपोरेही लगेच किंचाळले जऽऽऽय!

(ता. . - शिंच्यांनु! ताईंच्या ह्या पोस्टला लाइक करनार्‍याला बब्याच्या मुच्छड पान ठेल्यावर येक मसाला पान फरी - ही आफर फकस्त आज. उद्याची बात न्हाय - साक्षात बब्या. )

---------------------------------------

लेखणी अरुंधतीची

 

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -