निळावंती

 

 निळावंती

``तू निळावंती पुस्तक वाचलयस?’’ कुणी तरी मला विचारलं.

``नाही बा! काय आहे त्या पुस्तकात?’’ - मी

``प्राणी आणि पक्ष्यांची भाषा आहे असं म्हणतात. जो कोणी ते पुस्तक वाचतं तो वेडा तरी होतो नाही तर मरतो तरी असं म्हणतात. भारत सरकारने म्हणे बंदी घातली आहे.’’ अजून महिती मिळाली. खरं खोटं तोच जाणे.

प्राण्यांच्या आणि पक्षांच्या बोली कळायला पुस्तक कशाला लागतं? मला माहित नाही. प्राणी पक्षी आणि झाडं अत्यंत निर्मळ असतात. सरळ असतात. त्यांच्या पोटात एक ओठात एक असे दोन विचार नसतात; खायचे एक दाखवायचे एक असे दोन दात नसतात. जे त्यांना सांगायचं असतं ते त्यांच्या प्रत्येक कृतीतून, डोळ्यातून, आवाजातून ते व्यक्त करत असतात. त्यांची अभिव्यक्ती इतकी पारदर्शक असते की थेट त्यांच्या अंतरंगात पोचवते. आणि आपल्याही अंतरंगात उमटते. त्यांना गमतीनी फसवलेलं जराही खपत नाही. एकवेळ माणूस कळणार नाही. पण प्राण्यांचं आणि झडांचं गूज लपून रहात नाही. काहीवेळा हे इवलेसे प्राणीपक्षी तुमच्याकडून सेवाही वसूल करतात.

दिल्लीला घरात खूप चिमण्या येत. मी पोळ्या करायला लागले की माझ्या शेजारी बसून भराभर कणिकेच्या गोळ्याला चोची मारून कणिक खाणारी चिमणी, मी पोळ्या करतांना माझ्या खांद्यावर बसायलाही कमी करायची नाही. मला कायम ती गरम तव्यावर तर बसणार नाही अशी भिती वाटे. तिची घरात हिंडायची धिटाई पाहून माझी शेजारीण मला कायम म्हणे, Arundhati, one day you will have roasted sparrow for your lunch!” पण सुदैवाने तसं झालं नाही. ही चिमणी अखंड बोलत असे.  आणि मीही तिच्या गप्पांना काहीतरी उत्तर देत असे. आज मात्र ती काहीतरी प्रश्न विचारत आहे असं मला उगीचच वाटत राहिलं. ``मला नाही कळत बाई! काय विचारतीएस तुझं तुलाच माहित.’’ मी म्हणायला आणि भुर्रर्रऽऽऽ ती उडून गेली. दहा मिनिटात एका गुबगुबीत गोड बावळट पिल्लाला घेऊन आली. बघता बघता ते घरात टुपुक टुपुक उड्या मारु लागलं. नुकतच उडायला शिकलं असावं. त्याच्या हलचालीतून अपरिपक्वता लगेच जाणवत होती. ``अगं ह्या पिसांच्या गोळयाला आणु का विचारत होतीस का?’’ मी तिला विचारलं तरी तिचा प्रश्न विचारणं चालूच!   ``छान आहे गं तुझं पिल्लु!’’ मी कौतुकानी त्या गोलुरामकडे पहात महटलं आणि तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तिने त्याला मस्त खाऊ घातलं. त्यांना वाटीत ठेवलेल्या पाण्यातून पाणी प्यायला शिकवलं चोचीतुन गळत गळत तेही पाणी प्यायलं. किचनमधे एक खुर्ची ठेवलेली असे ती माझ्या शेजारणीसाठी. कारण माझं काम होईतो ती स्वयंपाकघरात बसून माझ्याशी गप्पा मारत असे.  आता त्या खुर्चीखाली छान उन्हाची तिरीप आली होती. त्या गोळोबाला  बरच काही सांगून चिमणीने त्या खुर्चीखाली उन्हात बसवलं. मला चिवचिव करून बरच लेक्चर दिल आणि आपण  भुर्रर्रऽऽऽ उडून गेली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिच्यात आणि माझ्यात तिचं पिलू सांभाळायचा करार करून गेलीए ती. पिलू निर्धास्त डोळे मिटून उन्हात झोपलही. मी मात्र आश्चर्यचकित! एकदा शीट टाकून परत थोडं सरकून अंग फुगवून स्वारी डोळे मिटून गाढ झोपली. काही वेळाने त्याची चोच जमिनीला लागेपर्यंत त्याची मान खाली लवंडली. अर्ध्या तासात चिमणी आली आणि पिल्लाला घेऊन गेली. बहुधा चिवचिव करून असच रोज नीट सांभाळायचं असं सांगून गेली असावी कारण दुसर्‍यादिवशी प्रश्नोत्तरांच्या शिवायच कालचा सांभाळायचा कार्यक्रम झाला आणि पिलू मोठं होई तो 10-15 दिवस रोज चालू राहिला.

नंतर हा प्रकार मी विसरले. 10 वर्षांनंतर मॉरिशसला गेले. तेथे लाल बुंद चिमण्या पाहून गम्मतच वाटली. थोडे तांदूळ टाकले तर रोज घोळक्याने यायला लागल्या.  काही धीट स्वयंपाकघरातून थेट हॉलमधे जाऊ लागल्या. एक दिवस ओट्यावर बसून एक चिमणी प्रश्न विचारतीए असं वाटलं आणि थेट दिल्लीच्या चिऊची आठवण झाली. अगं पिल्लाला आणणार आहेस की काय? मी तिला विचारायला आणि ती उडून गेली दहा मिनिटांनी खरोखरच तिच्या बाळाला घेऊन आली. मला चिमणीचा प्रश्न कळला होता तर!  हॉलमधल्या सोफ्यांच्या पाठीवर छान कॉटनच्या सोफाबॅकवर रोज पिलू बसायला सुरवात झाली. ते शीट करून सोफाबॅक खराब करायचं म्हणून प्रत्येकावर जुना नॅपकीन टाकायचं कामच होऊन बसलं. असं दुसर्‍याची बाळं सांभाळायचं काम मी जन्मात केलं नसतं पण ह्या इवल्याशा जीवांनी ते माझ्याकडून करवून घेतलं.

यशदात आम्ही आणि एका मांजरीनी एकदमच गृहप्रवेश केला. ती आम्हाला अजिबात नको होती. पण थोड्या दिवसात आम्ही एका घरात सोबतीने राहू लागलो. सकाळी दीक्षितसर तासभर खुर्चीत बसून सर्व वृत्तपत्रे वाचत असतं. हे पाहून मांजर तिच्या पिलांना त्यांच्या मांडीवर आणून बसवे. ``ए चल!!!’’ करून त्यांना हातानी खाली लोटून दिलं तरी परत ती मांडीवर स्थानापन्न होईपर्यंत मांजर पिलांना घशातून काही आवाज काढून सांगे.  आणि पिल्ले परत परत मांडीवर चढाई करत. त्यांना खाली काढून टाकल्यावर मांजर दीक्षितांनाही  दटावून जात असे. वाचनात गढून गेलेल्या ह्या माणसाच्या मांडीवर काहीवेळाने ही पिल्ले शांत झोपलेली पाहून मला हसू लोटे. ज्या ऑफिसरला सगळे घाबरतात त्याला मांजर रागावतांना पाहून गम्मत वाटे. पिल्ले फक्त आईच्या डोळ्यांकडे पाहून ती सांगेल तसच करत. शेवटी  पिल्लांची अशी परत परत विजयी चढाई आणि निवांत झोप होईतो मांजर बाहेरून ऐटित परत येई आणि परत घशातून गुगुरगुर आवाज काढून ``चला रे बाळांनो, काय बिशाद हा माणूस तुम्हाला सांभाळणार नाही असं म्हणून घेऊन जात असे.’’       

असे अनेक पक्षी बोलू लागले आणि त्यांची थोडीफार बोली कळूही लागली. दिल्लीला शेजारी राहणार्‍या पेगुंचा मिठ्ठू रात्री अपरात्री ओरडायला लागला की धावत जाऊन खालून चढणार्‍या मांजराला एक खडा मारून हाकलवून द्यायचं असतं हे मला झोपेतही कळू लागलं. नागपूरला रात्री अपरात्री बाहेरच्या प्रशस्त व्हरंड्यात येऊन बसलं की शांत वातावरणातून कुठून एक काळाशार शेकीटेल शेजारच्या खुर्चीच्या पाठीवर येऊन बसे. मीही आहे तुझ्यासोबत! नवीन घरात रहायला गेलं की आमच्यासोबत अनेक नवीन प्राणी पक्षी त्यांचाही डेरा टाकत. प्रत्येक घरी कुणास ठाऊक पण बुलबुलला कशी चाहूल लागे! त्याचं वाटीसारखं घर विणायला सुरवातच होई. आणि नंतर त्याच्या इवल्या इवल्या बाळांना त्याने घरट्यातून उडवलं की मांजरांपासून त्यांना वाचवण्याची एक नवी जबाबदारी माझ्यावर असे. ह्या प्राण्यांच्या जगात कुत्रा, मुंगस, खारुताई, उदमांजर, गाय अनेक पक्षी,प्राणी कधी समिल झाले कळलच नाही. दुरवरून येणार्‍या हॉन्क्स ऐकू भारतीय हॉर्नबिलला पिल्लं झाली आहेत, बडबड करणारे पोपट वडाच्या झाडाला लागलेली लाल लाल फळं खायला आले आहेत तर कधी पोपट आले आहेत म्हणजे जवळ कुठे तरी फळाला आलेली झाडं आहेत, हे सांगू लागले. सकाळपासून चालू झालेली खारुताईंची चुकचुक शेवग्याला फुलं आल्याची खबर देई. अमेरीकेत समोर असलेल्या उंच दिव्याच्या खांबावर राहणारा छोटुकला पक्षी रात्री दोन वाजता त्याला ठेवलेला चारापाणी खाऊन जातांना ``दोन वाजले मी आलो गं!’’ म्हणून त्याच्या तारस्वरात सांगून जाई.   अनेक अनेक बोल्या मनात फॉसिल होऊन उमटल्या. जिवंत राहिल्या. बोल्यांचे decoding   जमू लागले. नीळावंती न वाचतांही ह्या प्राणीपक्ष्यांनी मला वेडही लावलं आणि वेडंही केलं. 

----------------------------------------

Comments

Popular posts from this blog

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

भौमासुर / नरकासुर वध –

ललित लेख (अनुक्रमणिका)