सहस्रचंद्रदर्शन –

 

सहस्रचंद्रदर्शन

                  वयाची 81 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त (मी तर म्हणेन पूर्ण केल्या निमत्त. कारण अशा दीर्घ कृतकृत्य आयुष्यामागे कठोर यम नियमाच्या मार्गावर केलेली शिस्तबद्ध वाटचाल असते. /अपवाद सोडून) आपल्याकडे जो सहस्रचंद्रदर्शन सोहळा करतात तो मला फार हृद्य वाटतो. आपली हिंदु संस्कृती ही चार भिंतींमधे बंदिस्त संस्कृती नसून कायम निसर्गाशी सांगड घालणारी, निसर्गाच्या सूरात सूर मिळवून निसर्गाशी एकरूपता साधणारी संस्कृती आहे. पूर्वी शंभर पैशांचा रुपया नव्हता. सोळाआणे रुपया म्हटल जायचे. हे सोळा आणे चंद्राच्या सोळा कलांशी जोडून माणसाच्या व्यवहारातच चंद्राला आणून बसवले होते. रुप्यक म्हणजे चांदी आणि चंद्रसुद्धा.  चादीला चंद्राशी आणि सोन्याला सूर्याशी जोडून आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये त्यांना खुबीनी गुंफुन टाकलं होतं. तसाच हा सहस्र चंद्रदर्शन सोहळा. 

12 महिने- प्रत्येकी 1 पौर्णिमा ह्या हिशोबात 81 वर्षात  972 पौर्णिमा येतील

दर तीन वर्षांनी  1 अधिक महिना ह्या हिशोबात  81 वर्षात 27 पौर्णिमा येतील

 असा 972 + 27 = 999 पौर्णिमांचा हिशोब लागतो.

कमी पडणार्‍या ह्या एका पौर्णिमेचा हिशोब काय असावा?  हे पंचांग कर्तेच सांगू शकतील. माझं गणित चुकत असेल आणि एका पौर्णिमेचा हिशोब लागत असेल तर ठिकच लागत नसेल तर, --मी माझ्यापरीने त्याचे समाधान करून घेतले.

 म्हणजे बघा, पत्ते खेळतांना एखादा पत्ता बेपत्ता असेल तर त्या जागी आपण जोकर वापरून वेळ मारून नेतो. पत्त्याचा खेळही थांबत नाही. जोकर येणं ही विशेष आनंदाची बाब असे.  तशी पौर्णिमेच्या जागी एक पौर्णिमा घालता आली तर?

         आपल शरीर पंचमहाभूतांचं बनलं आहे. चंचल मन हे चंद्रापासून तयार झालं म्हणतो. त्यामुळे 1000 ह्या आकड्यासाठी त्या एका कमी पडणार्‍या  पौर्णिमेच्या चंद्राच्या जागी दीर्घ अनुभवानी पूर्णत्व आलेलं पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिक असलेलं मन धरलं तर ही उणीव भरून येऊ शकते. हा मनचंद्रमा हृदयातील भावसमुद्राच्या प्रत्येक भरती ओहटीचा साक्षी असतो. तर बाहेरचा चंद्रमा बाहेरच्या समुद्राच्या भरती ओहटीचा जनक असतो. हा बाहेरचा चंद्रमा आणि मनरुपी चंद्रमा ह्यांची एक मनोज्ञ युती 81 वर्षांनंतर सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याला होऊन ती व्यक्तीही चंद्राप्रमाणे शीतल आणि आनंददायी होणे अपेक्षित आहे.

                  हजार चंद्रांच्या स्निग्ध, संपृक्त चांदण्यात निळणार्‍या त्या व्यक्तीच्या रुपेरी केसांसोबत रुपेरी झालेलं आयुष्य असच मनोहारी असतं. हजार वेळेला पूर्ण चंद्र अनुभवणारी ती व्यक्ती हजार वेळा जीवनाचे चढउतार सोसून निराशेच्या आमावास्यांवर मात करून त्याच्या ह्या लक्ष्याप्रत आलेली असते.

                     मला सिंदबादच्या सफरींची गोष्ट सुरू होण्यापूर्वी त्याची सुरवात फार आवडते. एका  आलिशान प्रासादात एक भव्य स्वागत-समारंभ आयोजित केलेला असतो. एका जंगी मेजवानीचं आयोजन केलेलं असतं. त्यावेळेला एक होतकरु गरीब तरुण आत चाललेल्या सरबराईकडे, नाच, गाण्यांकडे, लोकांना दिल्या जाणार्‍या उंची पेयांकडे डोळे विस्फारून बघत असतो. आत एका उंची आसनावर आदर वाटावा असा एक वृद्ध बसलेला असतो. तो वृद्ध त्या तरुणाला बघतो. आत बोलावतो. त्याची विचारपूस करतो. त्या मुलाचं नाव सिंदबाद असतं. आणि योगायोगानी त्या उंची आसनावर बसलेल्या त्या वृद्धाचं नावही सिंदबादच असतं.  भांबावलेल्या तरुण सिंदबादला तो अनुभवानी पक्व झालेला सिंदबाद त्याच्या सपन्नतेचं रहस्य सांगायला सुरवात करतो. त्याच त्याच्या सात सफरी.

               ह्या सहस्रचंद्रदर्शन  सोहळ्याच्या आयोजनामागेही असाच उद्देश आहे. रस्त्यावरच्या गरीब अननुभवी सिंदबादला श्रीमंत अनुभवी सिंदबादच्या उंची आसनापर्यंत नेणारा प्रवास म्हणजेच सहस्र चंद्रदर्शन सोहळा. अनुभवांनी संपृक्त अशा ह्या वयोवृद्धाला आणि ज्ञानवृद्धाला भेटून तरुणांनी, किशोरांनी, बालगोपालांनी त्याचं मार्गदर्शन घेऊन त्यापासून स्फूर्ती मिळवून स्वतः मोठं व्हावं हा उद्देश त्यापाठी असेल. त्याच उद्देश्यानी लहानांनी अनुभवी व्यक्तीवर सोन्याची फुलं उधळण्याचा कार्यक्रम होत असावा. त्यानिमित्तानी त्या अनुभवी वृद्धाचे मनोगत, आयुष्यातील खाचाखोचांचा परिचय तरुण पिढीला होतो. बा.. बोरकरांच्या कुठल्याशा पुस्तकात वाचलं होत, गोव्यात वृद्ध माणसाला म्हान्तारो म्हणतात. हा म्हान्तारो शब्द महन्त पासून आला आहे. मला खूप पटलं. वयाच्या ह्या टप्प्यापर्यंत पोचतांना क्षणाक्षणांचे नवे अनुभव त्या म्हान्तारोला महन्तपदापर्यंत पोचवत असतात.

 

        महाभारत युद्ध संपल्यावर भीष्मरूपी ज्ञानसूर्याचा अस्त होईल आणि त्यांच्यासोबतच सर्व ज्ञान नष्ट होईल हे जाणून श्रीकृष्णाने पांडवांना पितामह भीष्मांना भेटून त्यांचं मार्गदर्शन घेण्यास सांगितलं. त्यांच्या मरणापूर्वी त्यांच्याकडून धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चारी पुरुषार्थांच्या स्वरूपाला जाणून घेण्यास सांगितलं. असा ज्ञानसम्पन्न, निर्मोही परत होणार नाही हे जाणून धर्मराजाला त्यांच्याकडून होता, उद्गाता, ब्रह्मा आणि अध्वर्युंशी संबंधित यज्ञादि कर्माच्या ज्ञानाचे मर्म समजून घेण्यास सांगितलं. त्याचप्रमाणे चार आश्रम आणि राजाच्या समस्त धर्माचे सूक्ष्म ज्ञान देणारा भीष्मांशिवाय कोणीही थोर प्रभावी पुरुष नाही हे जाणून कृष्णासह सर्व पांडव पितामह भीष्मांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी गेले. पितामहांचे अनुभवाचे बोल ऐकायला सारेजण कानांच्या ओंजळी करून उभे होते. बोलण्याचेही त्राण न राहिलेल्या, शरशय्येवर पहुडलेल्या भीष्मांना बोलतांना धाप लागणार नाही, बाधा येणार नाही अशी ताकद श्रीकृष्णाने दिली. धर्मराजानी मनात असलेले सर्व संदेह, किंतु, गहन प्रश्न भीष्मांना विचारले. त्यांनीही हातचं काही राखून न ठेवता सर्व ज्ञान पांडवांना दिलं.

             एकाने आपली ज्ञानलालसेची झोळी पूर्ण पसरावी आणि दुसर्‍याने संपूर्ण ज्ञान त्यात ओतून रिते व्हावे. घेता घेता घेणार्‍याने देणार्‍याचे हात घ्यावेत इतके एकाने घ्यावे तर दुसर्‍याने रिते व्हावे. वरतंतु ऋषिंचा शिष्य कौत्स रघुराजाकडे गुरुजींना देण्यासाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा मागायला गेला तेंव्हा; सर्व सम्पत्ती दान देऊन रघुराजा निष्कांचन झाला होता. कौत्साचे पाय धुण्यासाठी तो मातीच्या भांड्यात पाणी घेऊन आलेला पाहताव कौत्साने ते ताडलं. तो म्हणाला, ``हे राजा, ज्वारीचं भरघोस कणीस काढून घेतलेल्या खालच्या वाढ्यासारखा तू कृतकृत्य असा शोभुन दिसत आहेस.’’ सहस्र चंद्रदर्शनाचा सोहळा असा अनुपम असला पाहिजे. मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे ज्ञानाचा वारसा सोपवणं हे त्या सहस्रचंद्रदर्शनाचं फलित.

 

                 एका बिझिनेस मिटिंगमधे डायरेक्टरनी लोकांना प्रश्न विचारला की, जगातील सर्वात श्रीमंत जमीन कोठे आहे? प्रत्येकानी काही ना काही उत्तर दिलं. त्यावर नकारार्थी मान हलवत ते म्हणाले, ``नाही. जगातील सर्वात श्रीमंत भूमी म्हणजे स्मशानभूमी. कारण असे लाखो लोक मरण पावले आहेत ज्यांच्याजवळ अनेक मौल्यवान कल्पना होत्या. पण त्या कधीच प्रकाशात येऊ शकल्या नाहीत आणि समाजाला त्यांचा उपयोगही झाला नाही.’’ त्यांच्या ह्या उत्तराने प्रेरीत होऊन “Tod Henry”  या  लेखकाने “Die Empty”   नावाचे पुस्तक लिहीले.  “Tod Henry” च्या  “Die Empty”  पुस्तकात तो म्हणतो, ``तुमच्याकडे जे जे काही चांगलं आहे ते  जगाला देऊन जा.’’ त्यानी “Die Empty”   म्हटलं आहे. त्यापेक्षा आपल्या भाषेतील ``कृतार्थ जीवन’’ हा शब्द मला जास्त आवडतो. कित्येक वेळा देणारा द्यायला तयार असतो. घ्यायलाच कोणाची योग्यता नसते. अशी वेळ येऊ नये.

        सुहृदहो, प्राणी, पक्षी यांच्यात दिशांचे ज्ञान, स्थलांतरीत होण्याचे ज्ञान, घरटी बांधायचे ज्ञान, झाडांविषयीचे असे  अनेकविध ज्ञान गुणसूत्रातून जेनेटिकली त्यांच्यात येते. माणसाला मात्र  सर्व ज्ञान पूर्वसुरींकडून मिळवावे लागते. ज्ञानदानाचा हा सोहळा फक्त समारंभ, नको असलेल्या गिफ्टस् देणे घेणे आणि जेवणांपर्यंत मर्यादित न ठेवता त्या पूज्य महन्ताकडून  अनुभवांचे बोल ऐकण्याच्या दिशेनेही वळवायला हवा.

-------------------------

लेखणी अरुंधतीची -

                

 

Comments

  1. छान लेख. आवडला. ज्ञानाचं हस्तांतरण, कृतार्थ, die empty चे संदर्भ जोडणी छान.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -