प्राणप्रतिष्ठा -

प्राणप्रतिष्ठा -

                      साडेचार पावणेपाच! - --- -सायंकाळ होऊ लागलेली. हवेच्या झुळेकेसोबत बाल्कनीत गुलबक्षीवर उमललेल्या फुलाचा गोऽऽड सुगंध घरात शिरतो आणि मला मोहवून टाकतो. बरे, बाहेर जाऊन फुलाला नाक लावून वास घ्यावा तर तो सुगंध फुलाच्या कोशात असा काही दडून बसतो, मला चिडवत असा काही हसत राहतो की, मलाच माघार घ्यायला लागते.

                 बालपणीच्या आठवणीसुद्धा कोणी सांगा म्हटलं की ओढाळ गायीसारख्या मागेच रेटा देत रहातात. पण मधेच कधीतरी भूतकाळाची कुठलीशी झुळुक पकडुन तिच्यावर स्वार होऊन हळुच मनात शिरतात. मन सुगंधित करुन जातात.

         येणार्‍या प्रत्येक श्रावणासोबत बालपणीच्या आठवणींची एक मालिकाच सुरु होते. आईची व्रत, वैकल्य, रविवारी भल्या पहाटे मुक्याने उठणं, ( तिच्या न बोलण्यावर मी जाम खूश! तिने काहीतरी बोलावं या साठी माझे प्रयत्न. मग तिचे डोळे वटारणं आणि आमचा सूबाल्या.) पहाटे पहाटे झाडून पुसून घरही सुस्नात होऊन रांगोळ्यांनी सजलेलं, अंगणातल्या रांगोळ्या, पाटावर मांडलेली पूजा, शांत तेवणारी समई आणि निरांजन ,  -- ----आणि गूळखोबर्‍यावर डोळा ठेऊन हातात तांदुळाचे तीन दाणे तीन मोत्यासारखे सांभाळत ऐकलेल्या कहाण्या. कुठलीही कहाणी वाचायची असली तरी आधी  गणपतीची कहाणी पाहिजेच. `ऐका परमेश्वरा गणेशा तुझी कहाणी - - --

                             जरा शिंग फुटली आणि तिच्या कहाण्या न ऐकण्यासाठी काही तरी उपाय शोधून काढू लागले. `` आई पाठ आहेत कहाण्या.  --- मनीचा गणेश मनी वसावा.  - -- असा गणेश मनी ध्यायिजे; मनी पाविजे - -- -! ----''

                       तिने आग्रह केला नाही आणि तिचा नेमही चुकवला नाही. कासवी जशी नुसत्या नजरेनेच पिलांना पोसते असं म्हणतात तसे तिच्या आचरणातून ती आमच्या आयुष्यात संस्कारांचे जरीचे धागे विणत गेली. आमच्याही नकळत.

                    आज मैत्रिणीने विचारलं गणपतीची प्राणप्रतिष्ठा का करतात? आणि अचानक श्रावणातील कहाण्या मनात उलगडल्या. गणपतीच्या कहाणीतला श्रावण्या चौथीच्या वशातला `मनीचा गणेश' आठवला. मनात वसवलेला. हृदयाच्या कोनाड्यात मनानीच स्थापित केलेल्या , मनानेच वसवलेल्या ह्या संकल्परूप गणेशाचं मनातच ध्यान केल. जसजस ध्यान करावं तो तो मनातली ही अमूर्त आकृती सगुण साकार होऊन मूर्तरूपात आपल्यापुढे उभी रहावी हा विचार तीव्र होत गेला. विश्वरूप देवाला सगुण साकार रूपात बघायची ओढ नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम यांनाही लागली होती. पंढरीच्या विठोबामधे विश्वात्मक देवाला त्यांनी पाहिलं. अर्जुनालाही विश्वरूपानंतर कधी हरीचं चतुर्भुज रूप पहातो असं झालं होतं.

                        देव विश्वात्मक असला, सारं विश्व भरून उरला असला तरी ज्ञानदेव म्हणतात, जे जे अमर्याद आहे त्याचा उपयोग करता येत नाही. नदी वहात असेल तरी तहानेला भांडभर पाणीच त्यातून काढून घ्यायला लागत. पोट भरण्यासाठी अन्न घासाघासानेच खायला लागत. म्हणजेच समाधान मिळतं. त्याप्रमाणे मनाचं समाधान होण्यासाठी विश्वात्मकाला छोट्याशा मूर्तीत पहावं ही मनाची ओढ असते.

             भाद्रपदात `भद्र पदां'नी म्हणजे कल्याणाच्या पावलांनी आलेली ही गणेशमूर्ती आपण घरात स्थापित करतो. बाजारात गेल्यावर अनेक मूर्त्या न्याहाळतो. आणि आपल्या मनात वसवलेल्या गणेशाशी साधर्म्य साधणारी सुबक मूर्ती पसंत करतो. तिचे डोळे सुंदर पाहिजेत, ती निर्व्यंग पाहिजे हे सर्व पारखून आणतो. ही मूर्ती सुबक असली तरी आपल्या मनात साकार झालेली मूर्ती आणि ही बाहेरील मूर्ती ह्या वेगवेगळ्याच असतात.

 

                    प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला मूर्तीच्या हृदयाला हात लावून त्याच्या नेत्रांकडे बघत जणु नजरेची मालाच आपण तयार करतो. हृदयस्थ प्राणशक्ती बाहेरच्या मूर्तीत ओतून हृदयस्थ गणेश आणि बाहेरच्या मूर्तीला आपण एकरूप करत असतो.

                      शाळेत आपल्याला त्रिकोण ABC हा त्रिकोण XYZ बरोबर आहे हे दाखविण्यासाठी आपण ते एकमेकांवर असे ठेवायचो की त्यांच्या सारख्या बाजू सारखे कोन एकमेकांवर येतील. ते एकमेकांवर बरोबर बसले तर  ते दोन त्रिकोण सारखे आहेत असं आपण म्हणायचो. तशी प्राणप्रतिष्ठा म्हणजे मनीचा गणेश आणि बाहेरील मूर्ती एकरूप करणे. ह्या ह्दयीचे त्या हृदयी घातले. अशी मनातली मूर्ती आपण बाहेरच्या मूर्तीत ओतत असतो.

कशी?

नजरेने! 

नजरेने शक्य आहे का?

एक गोष्ट आठवली.

वसिष्ठ ऋषींच्या मुलाने रागाने एका माणसाला शाप दिला की, ` तू राक्षस होशील. आणि माणसे खाशील.' पश्चात्तापाने तो माणूस दुःखी झाला. विश्वामित्र हे वसिष्ठांचे कट्टर विरोधक असल्याने त्यांने प्रसंगाचा लाभ उठवत त्या राक्षसाला वसिष्ठांच्या मुलाला आणि गर्भवती सुनेला खाऊन टाकायचा दुष्ट सल्ला दिला. त्याप्रमाणे त्याने ताबडतोब वसिष्ठ पुत्राला, शिवाय वसिष्ठांनी सांभाळ केलेल्या शंभर मुलांनाही खाऊन टाकले. आता तो वसिष्ठांच्या गर्भवती सुनेला खाणार इतक्यात बाहेर गेलेले वसिष्ठ तेथे आले. राक्षसाच्या डोळ्याला डोळा भिडवत मोठ्या अधिकारवाणीने ते म्हणाले, `` थांब! पुन्हा माणूस हो.'' आणि काय आश्चर्य तो राक्षस परत माणूस झाला. त्याने वसिष्ठांचे पाय धरले.

राक्षसाचा माणूस बनवायचं अलौकिक सामर्थ्य असलेली नजर आपल्याजवळ जरी नसली तरी मनीचा गणेश सगुण साकार रूपात पहायची ताकद आपल्या नजरेत नक्कीच असते. मंत्र आपल्या अवतीभोवतीचं वातावरण पवित्र करतात. भारून टाकतात.  मनाला एकाग्र करायला मदत करतात. आणि मग सहजच मनीचा गणेश मूर्तीत उतरतो. तीच प्राणप्रतिष्ठा!

------------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची


Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -