शेवटचा अंक -

 

शेवटचा अंक -

काही दिवंसांपूर्वी व्हॉटसॅपवर B. R. चोप्रा आणि रवी चोप्रा ह्यांच्या महाभारतच्या शेवटच्या एपिसोड नंतरची एक क्लिप व्हायरल होऊन सगळ्या ग्रुप्स वर फिरत होती. 1988 साली सुरू झालेली प्रदीर्घ मालिका जेंव्हा संपत आली आणि शेवटच्या एपिसोडनंतर महाभारतचा सर्व सेट dismantle करायला सुरवात केली तेंव्हा प्रदीर्घकाळ एकमेकांच्या सहवासात राहिलेल्या ह्या कलाकारांना रडु आवरत नव्हतं. काहींच्या तोंडावरचे रंग पुसले होते. काहींना मेकप उतरविण्याचेही भान राहिले नव्हते. कधी दुर्योधन द्रौपदीला डोळे पुसत पुसत निरोप देत होता तर तिकडे धृतराष्ट्र विदुराला. कृष्ण कर्णाला आता परत कसं जायचं विचारत असावा तर धृतराष्ट्र अर्जुनाचं सांत्वन करत होता. भीमाला दुःशासन समजावत होता तर भीष्म आपले वैराग्याचे प्रतिक धवल कपडे उतरवून आणि आपली पांढरी दाढी सफाचाट करून जीन्समधे वावरत होते. मागचा महाभारताचा सेट काढून पुढल्या दुसर्‍या सिरीअलचा सेट चढवायचं काम सुरू झालं होतं.

इतके दिवस एकमेकांच्या सहवासाची सवय झालेले कलाकार परत साधीसुधी माणसं बनून एकमेकांचे मोठ्या प्रेमाने निरोप घेत होते. कदाचित एकमेकांच्या उत्तम अभिनयाबद्ल एकमेकांची प्रशंसा करत असतील. उत्तम खलनायकाचं काम केल्याबद्दल भीम दुर्योधनाची पाठ थोपटत असेल किंवा अभिनय करतांना तेथे घडलेल्या खर्‍या गमतींची आठवण काढत असतील ------

ती क्लिप मला बघता बघता किती मागे घेऊन गेली. एकत्र कुटुंबात झालेल्या अनेक कुरबुरी भांडण ह्यानी आमचे वेगवेगळे झालेले काका वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले. पण नंतर काही दिवसांनी परत भेटी होऊ लागल्या. मोठ्या काकू आईला भेटायला येत तेंव्हा जावाजावांचे डोळे भरून येत. ``कित्ती काम करायचो नाही काहो वासंतीबाई!'' म्हणता म्हणता दोघीही पन्नास माणसांच्या कुटुंबाचा गाडा कसा ओढला ह्या छाती दडपवून टाकणार्‍या आठवणीतही रमून जात. डझनभर नातवंडांच्या अंघोळी, जेवण, भांडी घासणं हे प्रत्यक्षातले प्रसंग कितीही कष्टदायी असले तरी तरी ते सर्वांच्याच एकत्रित कष्टामुळे निभावून गेल्याची कालांतराने झालीली जाणीव सुखद असे. अशा खडतर आयुष्यातले काही गमतीचे क्षण म्हणजे माझी आज्जी म्हणजे त्यांची सासू देवदर्शनाला गेली रे गेली की सुना कसा भराभरा चहा करून पीत,---- चहा पिणारी सून बाल्कनीत उभं राहून सासूबाई गेल्या किंवा आल्याची वर्दी देत जागल्याचं काम कस करे. अशा अनेक गोष्टी सांगता सांगता कित्तीवेळा दोघी पदराला डोळे आणि नाक पुसत, हसत किंवा रडत. हे पाहतांना मला मोठा प्रश्न पडे की ह्या भांडल्याच का ? आणि एकमेकांची तोंड पहायच्या शपथा घेऊन अशा एकमेकींच्या गळ्यात गळे घालून सार विसरल्या कशा? एक उलगडणारं कोडं माझ्यासमोर असे.

``काळजी घ्या हो शकुंतलाबाई. वाळला तुम्ही.'' असे काळजीचे उद्गार काढत निरोपाचं हळदीकुंकु लावायचा समारंभ पार पडे. तर ``वासंतीबाई सकाळपासून एक दिवस तरी रहायला या हो.'' म्हणत डोळे पुसत पुसत शकुंतलाबाई जिना उतरतांना दिसत. ह्यांचं भांडण खरं की प्रेम खरं? त्यांचं त्याच जाणोत.

------

आज इतक्या दिवसांनी वाटलं त्यांच्या जागी आता मी उभी आहे. अनेक तुटलेली माणसं, काही कारणाने पटलेली आणि दुरावलेली माणसं अचानक भेटल्यावर माझही असऽऽच होत असतं. मागचा राग, आढी काळासोबत क्षीण तरी होऊन गेलेली असते नाहीतर तिचं कारणच संपलेलं असतं. काही लोकं इतके जीर्ण झालेले असतात की त्यांच्या चेहर्‍यावर मागचा किनारा सुटत सुटत चालल्याचा भाव पाहून पोटात कुठेतरी तुटत तुटत जात. एकदा पायांना स्पर्श केल्याशिवाय मनालाही समाधान वाटत नाही. काळाने मागचं सर्व पुसलेल असत. फणकारे, फुणफुण, टोमणे, तुझं-माझं, राग द्वेश--------सगळं सगळं. -- - ! वाटत, प्रत्येकाने आपले आपले अभिनय उत्तम वटवले आणि आता ही मंडळी पडद्यामागील मेकअपरूममधे किंवा विंगेमधे आपल्या चेहर्‍यावरील सर्व रंग उतरवून आपापल्या गाडीची वाट पहात उभी आहेत. प्रयोग संपल्यावर प्रयोगाची property समजली जाणारी वेषभूषा, अंगरखे, साड्या बेगडी अलंकार उतरवत स्टेजवरचा शेवटचा डायलॉग संपून शेवटच्या टाळीची वाट बघत आम्हीही उभे आहोत. स्टेज पुढच्या पिढीच्या नाटकाच्या नव्या अंकासाठी सजून तयार होत आहे. नवे पडदे लागत असतांना नव्या नटांची एन्ट्री किती दमदार होतीए हे विंगेमधून डोकावत आमचे अनेकांचे मर्मज्ञ अनुभवी डोळे पारखत आहेत.

तेवढ्यात कोणीतरी बॅकस्टेज कलाकार धावत विंगेत येतो. ---- ``अहो बेलवलकर लवकर तुमचा अंगरखा आणि धोतर द्या. कित्ती शोधत होतो बेलवलकरांची costume ! तुम्ही अजून कपडे चेंज नाही केले? कमाले! नव्या गणपतराव बेलवलकरांच्या Entry ची वेळ झाली.'' `` अरे चला रे बस आली '' दुसरा आवाज. -----``अरे थांब रे एन्ट्री पाहून येतो ह्या नव्या पोरांची.'' `` अहो गणपतराव, रंग उतरवला तुम्ही सुगडावरचा --- चला मागे वळून बघू नका. गाडी आपल्यालाच न्यायला थांबली आहे. बाकीच्यांचे मार्ग वेगळे आहेत.'' कोणीतरी गणपतरावांना हसत हसत गाडीत चढायला हात देत. ``खरं आहे. सुगडावर रंग आहे तोवर त्या बुजगावण्याला पक्षी घाबरणार. रंग उडालेलं सुगड काठीवरून खाली पडलं की फक्त माती -----!!'' गणपतराव पायर्‍या चढतांना अखेरचा डायलॉग ऐकवून जातात.

``अरे गणपत कुठे गेला?''------त्यांचा कोणी लंगोटीयार धावत येतो. -----``काय गेला? अरे! अरे!!! निरोप घ्यायचा राहिला पठ्ठ्याचा ! ''

कोणीतरी माझ्यापाशी येऊन विचारत, चल येतेस? रंगमंदिराला लागून कलादालनही भव्य आहे.'' --- ``होय होय येते येते'' `घर घर' चे किती प्रयोग ह्या रंगमंचावर झाले पण त्या घाईत कलादालन पहायच राहून गेल.

आश्चर्यानी मी ही अजब कलादालनं एकामागून एक पालथी घालत असते. प्रत्येक दालन एक नवीन आश्चर्य-------

मागचे दरवाजे बंद करीत

मी पुढचे दरवाजे उघडत आहे

दिवस महिने वर्षं सरली

मी पुढे पुढे जात आहे

रोज नव दालन नवी खिडकी

त्यातून जग नवीन बघतांना

नवीन सूर्य नवीन प्रकाश

रोज दिसतं नवीन आकाश

नवीन क्षितीजं नवीन वाटा

हा तर केवळ सारा आभास

एक वृक्ष अश्वत्थाचा

रोज देतो आत्मप्रकाश

येतील त्यांच्यासवे ,

नाही येणार त्यांच्या शिवाय

मी पुढे पुढे चालत आहे

दिवस महिने वर्ष संपली

नवीन दालन उघडत आहे

कोण आहे बरोबर कोण राहिल मागे

ह्याची मनाला क्षिती नाही

किती दालनं मागे टाकली

ह्याचा हिशोब मला नाही

दालन बंद करतांना आज

दिसलं परिचित कोणी

होत फक्त शरीराच फोलकट

त्यात आत नव्हतच कोणी

आत्ताच चंद्र सूर्यही मागच्याच दालनात

थांबलेले पाहिले डोळ्यांनी आणि

विश्वाकार भरून राहिलेली मी

आणि म़ाझ्या सवे होती

ज्ञानोबाची अभंगवाणी

-------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -