काकोलूकीयम् (प्रस्तावना)

 

 ।। श्रीः ।।

पञ्चतंत्रातील तिसरे तंत्र 

काकोलूकीयम्  (प्रस्तावना)

मित्रांनो, आपलं रोजचं जगणं एक लढाई असते. वैय्यक्तिक आणि सामाजिक अशा दोन आघाड्यांवर एकाचवेळी लढलेली. त्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला वैय्यक्तिक नीतीनियम आणि सामाजिक नीतीनियम ह्या दोहोंचे उत्तम प्रकारे भान ठेवावे लागते.

वैय्यक्तिक जीवनाची मार्गदर्शक तत्त्व आपल्याला संतांनी चांगल्याप्रकारे सांगितली आणि त्यामुळेच बर्‍याच प्रमाणात आज भारत हा शांतताप्रिय देश  अजून तरी आहे. पण वैय्यक्तिक जीवनाची आणि सामाजिक जीवनाची तत्त्व पूर्णपणे वेगळी असतात. कित्येक वेळेला एकमेकाना छेद देणारी सुद्धा. वैय्यक्तिक आयुष्यात अत्यंत निर्लोभ, स्वार्थरहित, छक्के पंजे न करता, प्रसंगी आपल्या लोकांसोबत अत्यंत क्षमाशील असलं पाहिजे. पण एका देशाचा नागरीक म्हणून देशहितासाठी घ्यावे लागणारे निर्णय घेतांना देशासाठी साधलेला स्वार्थ निस्वार्थ असतो. स्वराज्यासाठी बोललेलं खोटं हे सत्य असतं. (अफजल खानाशी शिवाजीचा वकील बेमालूम खोटं बोलला म्हणून तर पुढची लढाई जिंकली.) नरो वा कुंजरो वा म्हणणं हीच सन्नीती असते. (त्यामुळेच अधर्म मार्गावरून जाणारे गुरू द्रोण रणांगणातून दूर होतात.) शत्रूला फसवणं हा विवेक असतो. (त्यानेच दुष्ट जयद्रथ धुळीला मिळतात.)

समाजात वावरतांना  सामाजिक जीवनाची मूल्यं काय असावीत, एका देशाचे नागरीक म्हणून वावरतांना देशाच्या नावाने कंठाळ्या जयघोषाच्या पलिकडे अजून काही करायचं असतं; आणि असलं तर ते काय? नागरिकांची कर्तव्य काय? हे आपल्याला फारसं माहित नाही. किंबहुना ते कळू नये ह्याची गुलामगिरीच्या काळात शासनकर्त्यांनी डोळ्यात ते घालून काळजी घेतली. आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या विदुरनीती, भीष्मनीती, चाणक्यनीती, कणीकनीती, आदि अनेक नीती आपण बाजूला ठेवल्या. दुर्लक्षित झाल्या. 

नेते ती नीती. कुठे नेते ती त्या त्या नीतीच्या तंत्रावर अवलंबून आहे. त्या अनेक नीतींपैकी पंचतन्त्र ही एक नीती. कावळा चिमण्यांच्या गोष्टी इतपतच त्याचा आवाका मर्यादित नाही. एखाद्या सुंदर चित्राची फ्रेमच बघत बसावी आणि चित्राकडे लक्षच देऊ नये तसं वर्षानुवर्ष आपण ज्ञानाच्या ठेव्याची नुसती गोष्टरूपी डबीच बघत बसलो. दागिन्याची मखमली डबी ठेऊन द्यावी आणि सोन्याचा हार फेकून द्यावा तसं आपण आजही वागतोय. त्यातील मुख्य सामर्थ्य आहे ते त्यातील संवादात, त्यातील अर्थगर्भ श्लोकांमधे. त्या काळात म्हणजे जवळ जवळ 2000 वर्षांपूर्वी सनातन धर्माची पिछेहाट होण्यामुळे, अहिंसेचं अवास्तव स्तोम माजल्याने येणार्‍या निष्क्रीयतेमुळे धार्मिक, राजकीय वातावरणात उत्पन्न झालेल्या दोषांमुळे, माणसांच्या वैयक्तिक विचार करण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेले दोष आचरणात आल्यावर काय महान उलथापालथी होऊ शकतात ते ह्या पुस्तकातून खूबीने मांडलं आहे.

 Verb / क्रिया म्हणून तन्त्र चा अर्थ पाहिल्यास तन्त्र म्हणजे प्रशासन करणे, नियंत्रण करणे तर noun/ नाम म्हणून पाहिल्यास शास्त्र, सिद्धांत असा आहे. तन्त्र ह्याचा अजुन एक अर्थ अध्याय, भाग असाही आहे. पाच भागात आहे म्हणून पञ्चतन्त्र. आणि  शास्त्र, सिद्धान्त ह्यांचे पाच वेगवेगळे प्रकार म्हणूनही हे पञ्चतन्त्र.

पंचतंत्रात पाच तन्त्र आहेत. मित्रभेद,  मित्रप्राप्ति, काकोलुकीयम्,  लब्धप्रणाश आणि अपरिक्षितकारक. पहिल्या दोन तंत्रांमधे अभ्यासलेल्या तंत्राचा प्रत्यक्ष उपयोग तिसर्‍या तंत्रात केला आहे. डोंगर चढता चढता शिखरावर पोचावं आणि तेथून सर्व जग तळहातावर ठेवलेल्या आवळ्यासारखं दिसावं, त्याची चोहोबाजूंनी नीट कल्पना यावी तसं पंचतंत्रातील तिसरं तंत्र म्हणजे काकोलुकीयम्. पंचतंत्रातील जणु शिखर, Master piece. मित्रभेद,  मित्रप्राप्ति अशी दोन तंत्र शिकवून झाल्यावर घेतलेलं एक प्रॅक्टिकल म्हणू या.

`काकोलुकीय' हे तिसरं तंत्र म्हणजे आत्ताच्या जमान्यातील एक model युद्धकथा! आत्ताही युद्ध कसं जिंकल जातं ह्याचं प्रात्यक्षिक दाखविणारी ही प्राचीन रणनीती.  बहुतेक वेळा युद्धे  रणांगणावर कमी आणि रणांगणाबाहेरच ज्यास्त जिंकली जातात. कित्येक वेळेस बुद्धिबळात आपण पहातो, पटावर सर्व सैन्य जिथल्या तेथेच राहून जातं. राजा आणि वजीर आपल्याच सैन्याच्या गराड्यात घुसमटत राहतात. हलुही शकत नाही; आणि प्रतिस्पर्ध्याचं एखादं छोटंसं प्यादं राजाला चेकमेट देऊन जातं.

                ह्या कथेतील युद्धाचे दोन प्रतिस्पर्धी आहेत - काक म्हणजे कावळा तर उलूक म्हणजे घुबड. हिंदीतला उल्लू हा शब्द उलूक ह्या संस्कृत शब्दावरूनच आला आहे. (+ = असा संधी असल्याने काक + उलूक = काकोलूक आणि त्यांची गोष्ट म्हणून काकोलूकीयम्) कावळे आणि घुबडं ह्याच्यात जन्मजात हाडवैर आहे. कुत्र आणि मांजर ह्या प्राण्यांमधे जसे अजिबात सख्य नाही तसे पक्षी वर्गात कावळे आणि घुबडांचेही सख्य नाही. कावळे हे दिवसा वावरणारे तर घुबड हे निशाचर. कावळा  हा सर्वसामन्य जमातीतला वा निम्न स्तरातील  किंवा मध्यमवर्गीयांच प्रतिक असलेला पण हुशार पक्षी!

कावळा हा काही आकर्षक पक्षी नाही. दिसायला अत्यंत सामान्य. इतर रूपगर्विता पक्ष्यांप्रमाणे त्याला आपल्या रूपाची घमेंड असणं संभवत नाही पण तो चाणाक्ष आहे. त्याचे पाय जमिनीवर आहेत. तो व्यवहारचतुर आहे. आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे हे तो अत्यंत सावधपणे बघतो आहे. ऐकतो आहे लक्ष्मण’च्या प्रत्येक कार्टूनमधे चाणाक्षपणे सारं टिपणार्‍या Common Man  सारखा! पृथ्वीवर अनेक पशुपक्ष्यांच्या जाती आज नामशेष झाल्या. कित्येक संपण्याच्या मार्गावर आहेत.  कधी त्या पक्ष्यांच्या चवदार  मांसामुळे त्यांची शिकार होते. कधी त्यांच्या सौंदर्यासाठी पकडले जातात. पोपटासारखे पक्षी त्यांच्या अति बोलण्याने गोत्यात येतात. काही नवीन परिस्थितीशी जुळवून घेऊ शकल्याने काळाच्या ओघात मरण पावतात. कावळ्याचं तसं नाही. कावळा हजार वर्षे जगतो असे आपल्या संस्कृत वाङ्मयात म्हटले आहे. त्याचा अर्थ असा लावता येईल की परिस्थितीशी जुळवून घेणे आणि हे त्या परिस्थितीवर मात करणे ह्या गुणांमुळे कावळ्याचा वंश आजही चिरंजीव आहे. आजही ते बदलत्या परिस्थितीत स्थिरपणे कालक्रमणा करत आहेत. म्हणूनच ह्या कथेतील कावळ्यांच्या प्रधानांची नावंही जीव् ह्या धातू पासून ठेवली आहेत.

घुबड अंधारातच कारवाया करणारा लबाड पक्षी. रात्री झोपी गेलेल्या एकट्या दुकट्या पक्ष्यावर अचानक हल्ला करून आपला डाव साधणारा हा पक्षी. रात्रीच्या अंधारात ह्याची नजर ज्यास्तच तीक्ष्ण होते. घुबडाच्या डोळ्यांचे एक वैशिष्ठ्य म्हणजे इतर पक्ष्यांप्रमाणे त्यांचे डोळे चोचीच्या दोन्ही बाजूंना नसून माणसासारखे एका रेषेत असतात.  माणसाच्या दृष्टीला Binocular Vision  असे म्हणतात. म्हणजे त्यांना Binocular मधून पाहिल्यासारखे एकच चित्र डोळ्यांना दिसते. बाकी पक्ष्यांना दोन्ही डोळ्यांनी वेगवेगळी दोन दृश्ये दिसतात ज्यांचा मेळ त्यांच्या मेंदूत घातला जातो. पक्षी दोन डोळ्यांनी 360 अंशात पाहू शकतात. माणूस नाही. घुबडाला माणसाप्रमाणे दिसते. शिवाय तो त्यची मान 180 अंशात फिरवू शकत असल्याने त्याला मागचेही सहज दिसते. घुबडाचे डोळे चमकदार लाल केशरी असल्याने रात्रीच्या अंधारात वाघ सिंहाच्या डोळ्यासारखे  Reflectors  असलेले असतात. त्यामुळे ते रात्रीही चमकतात. रात्रीच्या अंधारात पाहू शकतात. घुबड हा निशाचर (Nocturnal) पक्षी आहे. त्याची सर्व जीवनावश्यक कामे तो रात्रीच करतो.   त्या उलट कावळ्याला रात्रीच्या अंधारात पहायची सवयही नाही आणि पाहून दिसतही नाही.

थोडक्यात सर्वसामान्य जगाचे कुठचेही नियम पाळणार्‍या बलाढ्य अंडरवर्ल्ड  भाईंशी  हुशारीने झुंज देणार्‍या सामान्य नागरिकांची ही कथा आपल्याला नक्कीच प्रेरणादायी आहे.

ह्या एका तंत्रात अनेक गोष्टी असतात. काकोलूकीयं मधे 17 गोष्टी आहेत. पञ्चतन्त्राची गोष्ट संपली की त्याचे तात्पर्य, निष्कर्ष अजिबात काढू नयेत. कारण गोष्ट सांगणारा हा कोण आहे, तो कुठल्या उद्देश्याने सांगतो आहे, सांगणार्‍याच्या विचारांवर कोणाचा, कुठल्या संप्रदायाच्या, गटाच्या विचारांचा प्रभाव आहे ह्याचा सखोल विचार करून राजाने काय उचित निर्णय घेतला हे पाहण्यासारखे आहे. असे प्रसंग आजही आपल्याभोवती घडत असतात. अनेक देश अनेक खेळ्या करत असतात. त्यांच्या देशात तयार झालेली उत्पादनं आपल्या देशात खपवण्यासाठी आपल्याला असं तसं त्यांच्या जाळ्यात ओढत असतात. आपल्या चांगल्या उत्पदनांना निकृष्ट ठरवत असतात. आपल्या चांगल्या सवयींना गावंढळ ठरवून त्यांची उत्पादनं वापरल्याने आपण कसे सर्व जनसामान्यांमधे उठून दिसू, आकर्षक ठरू हे पटवून देण्यासाठी झटत असतात. आपल्याला फसवणार्‍या ह्या तंत्रांचं आकलन होण्यासाठी पंचतंत्राचा अभ्यास सर्वसामान्यांसाठीही उपयोगी आहे.

महाभारत युद्धात दुर्योधन पडला, हारला; पण मेला नव्हता. कौरंवांकडील कृप, अश्वत्थामा आणि कृतवर्मा तिघेच जिवंत शिल्लक होते.  ह्यांच्यासारखे शत्रू पराजित असले तरी विझत आलेल्या अंगारा सारखे होते. विझत आलेला निखारा मोठी आग लावण्याचे सामर्थ्य अंगी बाळगून असतो.  श्रीकृष्णाने अश्वत्थामा, कृपाचार्य रूपी शत्रूचं वळवळणारं शेपूट अजून बाकी आहे हे लक्षात घेऊनच युद्ध संपल्यानंतरच्या रात्री पांडवांना युद्ध शिबिरात झोपण्याचा सल्ला दिला.

कृप, अश्वत्थामा आणि कृतवर्मा  हे तिघे जीव बचावून रात्री  जंगलात वणवण फिरत असतांना रात्रीच्या अंधारात अश्वत्थाम्याने पाहिले की, बहुसंख्य कावळ्यांनी आश्रय घेतलेल्या एका झाडावर रात्री अचानक घुबडांनी हल्ला केला आणि बेसावध, झोपलेल्या असंख्य कावळ्यांचा फडशा पाडला. त्या प्रसंगापासून स्फूर्ती घेऊन अश्वत्थाम्यानेही युद्धाचे सर्व नियम बाजूस सारून झोपलेल्या पांडवांवर रात्रीच हल्ला केला. द्रौपदीच्या सर्व मुलांना , धृष्टद्युम्न आदि महारथींना कापून काढलं. कृतवर्मा आणि कृपाचार्यांनी त्याला साथ दिली.

कृष्णाच्या त्या एका छोट्याश्या वाटणार्‍या निर्णयानेच पांडव शेवटपर्यंत जिवंत राहू शकले. नाहीतर जिंकलेल्या लढाईचं पारडं क्षणात इकडचं तिकडे व्हायला वेळ लागला नसताच. देशाचे तुकडे तुकडे करण्याची बोली लावणारे, `ऋणं कृत्वा घृतं पिबेत' म्हणजे बँका लुटून मौज करा, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः? म्हणजे देह जळून गेल्यावर काही उरत नाही त्यामुळे देहाला जे जे गोड वाटत असेल ते ते करायला, ज्ञानेश्वरांच्या कडक शब्दांमधे सांगायचच झालं तर ``शिश्नोदरी घालायला’’ पुढे मागे न पाहणारे, त्यासाठी जनतेची लूट करून स्विस बँका भरणारे कणीक आणि चार्वाक त्याही वेळेला होते. तेंव्हाही दुर्योधनासाठी छाती पिटून आक्रोश करत होतेच. चुकून जरी पांडवांचं काही बरवाईट झालं असतं तर, ते परत एकदा पुढे सरसावले असते. त्यामुळे जे जे उत्तम ते ते  टिकून राहणे, सर्व समाजाने टिकवून ठेवणे, हे सर्वात आवश्यक आहे. मग ते तत्त्वज्ञान असो वा माणसे.

  रोजच्या व्यवहारात चाललेल्या घटनांमधे काही उत्तुंग घडलं, दुष्टांविरुद्ध कसोशीने मात देऊन सत्याचा जय झाला तर ती प्रेरणादायी गोष्ट म्हणून लोकांच्या हृदयात सत्याची निरांजन बनून तेवत राहते.


मित्रांनो,  आपल्या हिताचा सल्ला देणारे, आपलं चांगलं व्हावं अशी कळकळीची इच्छा असणारे, सतत सतर्क राहून बलाढ्य शत्रूंचा पूर्णपणे नाश कसा करायचा हे सांगणारे योग्य सल्लागार आपल्या जवळपास असतात. पण आपल्याला ते ओळखू येतात का नाही, आपला त्यांच्यावर विश्वास असतो का नाही हे महत्त्वाचं. कित्येक वेळेस गोड गोड बोलणारे तोंडपुजेच बरे वाटतात. अर्धवट सल्ला देणारेच खरे वाटतात. आणि खरी काळजी असलेले पण कठोर बोलणारे, कठोर निर्णय घ्यायला लावणारे सल्लागार नकोसे वाटतात. आपल्या हिताची चिंता खरोखरीच ज्याला आहे असा सल्लागार निवडणे ही राजाची फार मोठी जबाबदारी असते. किमान तेवढा विवेक त्याला असणे आवश्यक आहे. आणि एकदा का एखाद्या गुणग्राहक राजाने अशा सल्लागाराच्या वर्तनाची शहानिशा करून, त्यांच्या अनेक वर्षांच्या एकनिष्ठतेची परीक्षा घेऊन, त्यांचे गुण जाणून घेतले की, त्यांच्यावर पूर्णपणे श्रद्धा ठेऊन तो सांगेल तसं वागणं हे विजयासाठी अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे सल्लागार निवडण्यासाठी राजाचे डोके ठिकाणावर असण्याची, त्याला किमान स्वयंप्रज्ञा असायची गरज आहे त्याप्रमाणे सध्या लोकतंत्रात प्रजा हीच राजा असल्याने प्रधानमंत्री निवडतांना वैय्यक्तिक क्षणैक लोभांना दूर ठेवणे हे आवश्यक आहे. अयोग्य माणसाची निवड देशाचं अपरिमित नुकसान करून जाते.

 तसेच योग्य काळजी घेऊन आपण निवडलेला योग्य प्रधानसेवक जे जे करत असेल त्यावर किमान विश्वास ठेऊन त्याला साथ देणे आवश्यक आहे. त्याने सांगितलेल्या गोष्टी करताच `कुठे आहे स्वच्छ भारत? कुठे आहेत अच्छे दिन?' विचारणं म्हणजे एकाद्या चुकार मुलाने तुम्ही माझा पेपर कोणा चांगल्या मुलाकडून लिहून घेतला नाही म्हणून मी नापास झालो किंवा आईबापाने माझ्यासाठी काही `इश्टेट ठेवली नाही म्हणून माझ्यावर आज हे दिवस आले असं म्हणणार्‍या कृतघ्न आपत्याप्रमाणे आहे. 

वैयक्तिक पातळीवरही आपल्या आयुष्याला खरोखरीचे आकार देणारे योग्य गुरुजन कोण आहेत हे लहानपणापासूनच पालकांच्या मदतीने कळू लागते. नाहीतर `यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम्?' ज्याला स्वतःचा विवेक नाही त्याला किती उत्तम शास्त्र हाती आले तरी काय सुधारू शकणार? हेच खरे. विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य ह्यांना वेगळं करण्याची बुद्धीची कुवत. ती अभ्यासाने प्राप्त होते.

खूप खूप वर्षांपूर्वी विष्णुशर्मा नावाचे थोर ऋषि होऊन गेले. त्यांनी उनाड राजपुत्रांना शिकवून शहाणं करण्यासाठी `पंचतंत्र' हया अप्रतिम ग्रंथाची निर्मिती केली. विष्णुशर्मा ह्या अलौकिक गुरुजींनी केवळ राजपुत्रांनाच नव्हे तर आपल्यासारख्या सामान्य जनतेला राजपुत्रांच्या मिषाने शिकवलेला हा विवेक , योग्य अयोग्याची पारख करण्याची दिलेली दृष्टी ह्या तंत्रातून सामान्यांच्या सारासार विवेक बुद्धीची कुवतही वाढवणारी आहे.

 त्याच पंचतंत्रातील तिसरे तंत्र `काकोलूकीयम् ' मी येथे तुम्हाला सांगणार आहे.

---------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -