10 ब्राह्मण, चोर आाणि पिशाच्च यांची कथा

 

10 ब्राह्मण, चोर आाणि पिशाच्च यांची कथा

एका नगरात द्रोण नावाचा एक निर्धन ब्राह्मण रहात होता. अयाचित वृत्तीने राहताना, लोकांनी दिलेल्या दान, भिक्षा वा भेटस्वरूपातील वस्तूंवर त्याचा उदरनिर्वाह चालत असे. झुळझुळीत सुंदर वस्त्रे, सुगंधी उटी, सुगंधी तेल, गंध, माळा, दागदागिने, सुवासिक तांबूल ह्या सर्व गोष्टींचा त्याने कधीच त्याग केला होता. अशा चैनीच्या कुठल्याही वस्तू तो कधीच वापरत नसे. तेला अभावी व दुर्लक्षित राहिल्याने त्याच्या दाढी-मिशा, डोक्याचे केस राठ झाले होते व कायम वाढलेले असत. नखंही वाढलेली असत. कडक उन्हाळा, धो धो पाऊस, कडक थंडी असे सर्व ऋतु अंगावरच झेलल्याने पाठपोट एक झालेले त्याचे रूप अत्यंत दयनीय असच होतं. त्याचं ते दैन्य आणि गरीबी पाहून एका भल्या गृहस्थाला त्याची दया आली आणि त्यानी त्याला दोन वासरं दान दिली. त्यानीही लोकांकडून त्यांच्यासाठी गवत, पेंड, तेल तूप मागून आाणून त्यांची चांगली काळजी घेतली आणि बघता बघता चांगला आाहार व पोषण मिळाल्याने दोन्ही वासरं धष्टपुष्ट आणि लवकरच मोठीही झाली.

एक दिवस त्या धष्टपुष्ट वासरांवर एका चोराची नजर पडली आणि त्याच्या मनात हावही निर्माण झाली. त्याने विचार केला की, आज ब्राह्मणाची ही दोन्ही वासरं मी चोरून आणीन. रात्री त्यांना चोरायचा बेत पक्का करत त्यांना बांधायला दावं घेऊन तो रात्रीच्या अंधारात अर्ध अंतर चालून गेला असेल न असेल  तोच, त्या रात्रीच्या अंधारात त्याला एक भीषण आकृती दिसली. त्या आकृतीचे दात विरळ पण अत्यंत तीक्ष्ण होते. त्याचं लांब नाक, अंगार पेटावा तसे लाल लाल डोळे भीषण दिसत होते. अंगावरचं मांस ओरपल्यासारखा नुसता त्वचेचा पोपडा जणू हाडांवर चिकटला होता. त्यातून त्याच्या सगळ्या रक्तवाहिन्या प्रकर्षानी वर आल्या होत्या. गालफडं बसली होती आणि त्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलं होतं. भग भग करणार्‍या अग्निज्वाळांप्रमाणे त्याची पिवळट लालसर दाढी आाणि लालसर मिशा असा सर्वच अवतार पोटात भितीने गोळा येईल असा भीतीदायकच होता. त्याला पाहून त्या चोराच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. भीतीने थिजून जणू त्याचे पाय जमिनीला खिळले. पण तरीही सगळं बळ एकवटून त्यानी त्या व्यक्तीला विचारल, ``तू कोण आहेस?’’

ती आकृती म्हणाली, ``मी सत्यवचन नावाचा एक ब्रह्मराक्षस आहे. आपला काय परिचय?’’

तो म्हणाला, ``मी क्रूरकर्मा! मी चोर आहे. एका दरिद्री ब्राह्मणाचे गायीचे दोन बछडे चोरायला निघालो आहे.’’

 त्याच्या बोलण्यावर भरोसा ठेऊन राक्षस म्हणाला, ``मी गेले सहा दिवस उपाशीच आहे. मी दिवसाच्या फक्त सहाव्या प्रहरीच म्हणजे अपरात्रीच भोजन करतो.  माझी भोजनाची वेळ झालीच आहे. काय योगायोग जुळून आला आहे! जाता जाता आपली भेट व्हावी आणि दोघांचं उद्दिष्टही एकच असावं ह्याइतकी काही चांगली गोष्ट नाही. मी त्या ब्राह्मणाला खाऊन माझी भूक भागवीन.’’

ब्राह्मणाच्या घराच्या जवळ पोचल्यावर योग्य वेळेची वाट बघत दोघेही कोणाला दिसणार नाही, लक्षात येणार नाही अशा कोपर्‍यात लपून बसले.

ब्राह्मण गाढ झोपी गेलेला पाहून भुकेने कासावीस झालेला ब्रह्मराक्षस ब्राह्मणाला खाण्याच्या हेतूने उठलेला पाहून तो चोर म्हणाला, हे बघ बाबा!  तुझं हे वागणं काही योग्य नाही. पहिल्यांदा मी वासरं चोरीन. मग तू तुला काय हवं ते कर! माझं कार्य निर्विघ्न पार पडल्यावर तू खुशाल ब्राह्मणाला खा. ते ऐकल्यावर तो राक्षस म्हणाला, तू चोरून नेतांना वासरं हंबरली तर ब्राह्मण उठेल आणि सगळच मुसळ केरात जायचं! इथे येऊनही काही उपयोग होणार नाही.

चोर म्हणाला, ब्राहमणाला खायच्यावेळेस जरकाही गडबड झाली तर मी वासरं चोरून नेऊ शकणार नाही. तयामुळे मी पहिल्यांदा वासरं चोरून नेतो मग तू ब्राह्मणाला खा. अशाप्रकारे शब्दाने शब्द वाढतच गेला आणि मी आधी का तू आधीच्या भांडणाचा कोलाहल इतका वाढला की झोपलेला ब्राह्मण जागा झाला.

ब्राह्मण जागा झालेला पाहून तो चोर ब्राह्मणाजवळ जाऊन म्हणाला, भटजीबुवा, ``हा ब्रह्मराक्षस तुम्हाला गट्टम करायच्या इराद्याने येथे येऊन बसला आहे. तो तुम्हाला खाणार आहे.’’

चोराची चुगली ऐकून ब्रह्मराक्षसाने आता चोराचेही बिंग फोडले. तो ब्राह्मणाजवळ जाऊन म्हणाला, वा वा रे! वा! आणि हा मोठ्या सद्हेतूनेच येथे आला आहे नाही का! भटजीबुवा! हा तुमच्या वासरांना चोरायला  येथे आला आहे. आता ब्राह्मण सावध झाला. पलंगावरून उतरून त्याने आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करून मंत्र जपायला सुरवात केली. मंत्रशक्तीने राक्षसाला पळवून लावून त्याच्यापासून आपली सुटका करून घेतली. मग तेथे पडलेली काठी उचलून चोरालाही घालवून दिलं. अशाप्रकारे त्याने स्वतःचा जीवही वाचवला आणि वासरांनाही चोरापासून वाचवलं.

वर सांगितलेली कथा समाप्त करत वक्रनास म्हणाला, म्हणून मी म्हणतो की , कधी कधी शत्रूमुळेही आपलं हित होतं.

परस्परस्य मर्माणि ये न रक्षन्ति जन्तवः।

त एव निधनं यान्ति वल्मीकोदरसर्पवत् ।। 190

------------------------------------------

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -