11 वल्मीकोदरस्थसर्प कथा (वारुळात आणि उदरात लपलेल्या भुजंगाची कथा)

 

वल्मीकोदरस्थसर्प था

(वारुळात आणि उदरात लपलेल्या भुजंगाची कथा)

 

अशाच एका कुठल्याशा नगरीत देवशक्ती  नावाचा राजा राज्य करत होता. त्याला एक मुलगा होता. त्या मुलाच्या पोटात एक सर्प वस्ती करून राहिला होता. त्या उदरस्थ सर्पामुळे दिवसेंदिवस तो राजपुत्र अत्यंत अशक्त होत चालला होता. अत्यंत उत्तमोत्तम वैद्यांनी चिकित्सा करून शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या औषधांनीही त्याला गुण येत नव्हता.

खंगत चाललेला तो राजकुमार अत्यंत निराश होऊन राजवाडा सोडून दूर कुठेतरी परदेशात निघून गेला. तेथेच भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वाह करत असे आणि तेथेच असलेल्या विशाल देवालयात झोपून रात्र घालवत असे.

तो राजपुत्र ज्या नगरात वस्तीला आला होता, त्यानगराच्या राजाचं नाव ‘बली’ होतं. त्या राजाला दोन मुली होत्या. दोघींनी नुकतच तारुण्यात  पदार्पण केलं होतं. रोज सकाळी सूर्योदयाच्या सुमारास त्या मुली राजाजवळ येऊन राजाच्या पावलांना स्पर्श करून वाकून नमस्कार करत.  एकदिवस त्यातली एक विनम्रपणे राजाला नमस्कार करून म्हणाली, ‘‘महाराजांचा विजय असो! आपल्या कृपेनेच मला संपूर्ण सुख लाभले आहे.’’

त्यावर दुसरी म्हणाली, ‘‘महाराज! आपल्या केलेल्या कर्मफळाचा आपण उपभोग घ्यावा.’’

दुसर्‍या मुलीचे ते वाक्य ऐकून राजाला भयंकर राग आला. तो मंत्र्यांना म्हणाला, ‘‘मंत्रीवर, ह्या तिखट जिभेच्या मुलीला येथून घेऊन जा आणि कुठल्या भटकणार्‍या भणंगाशी हिचं लग्न लावून द्या आणि तिला म्हणावं भोग आपल्या कर्माची फळं!’’

‘‘ जशी आपली आज्ञा !’’ असं म्हणून राजपरिवाराचा आाधार सुटलेल्या, राजाने निर्वासित केलेल्या त्या राजकुमारीला एक दोन सेवक बरोबर देऊन त्याने  तिचा विवाह ह्या भिक्षा मागून देवालयात राहणार्‍या भटक्या (राजकुमाराशी) करून दिला. अत्यंत प्रसन्न चित्ताने राजकुमारीने हा वर जणु काही देवता असावी त्याप्रमाणे स्वीकारला; आणि त्याच्यासह दुसर्‍या राज्यात निघून गेली.

दूरच्या एका नगरीत पोचल्यावर तेथे तलावाकाठी ते वस्तीला थांबले. तेथे आपल्या पतीला त्या जागेच्या रक्षणार्थ ठेऊन ती स्वतः तेल, तूप, पीठ, मीठ, तांदूळ आणायच्या निमित्तानी सेवकांसमवेत बाजारात गेली. सर्व खरेदी आटोपून  ती परत येऊन बघते तो काय! – तो राजकुमार एका सर्पाच्या बिळावर डोकं ठेवून झोपला होता. त्याच्या मुखातून बाहेर डोकावत त्याच्या पोटातील सर्प हवा खात बसला होता. आणि ज्या बिळावर डोकं ठेऊन तो झोपला होता, त्याही बिळातून एक सर्प बाहेर येउन त्या पहिल्या सर्पाप्रमाणेच  हवा खात बसला होता.

त्या दोन सर्पांची नजरानजर होताच दोघेंचेही डोळे क्रोधाने लाल झाले. त्यांच्यापैकी तो बिळातला साप अत्यंत रागावून म्हणाला, ‘‘ अरे दुष्टा, ह्या सर्वांगसुंदर राजपुत्राला तू अशा प्रकारे का छळतोएस?’’

त्याला प्रत्युत्तर देत तो मुखातला सर्प म्हणाला, ‘‘ ह्या बिळात सोन्याच्या मोहरांनी भरलेले जे दोन हंडे आहेत त्यांना का तू का प्रदूषित करत आहेस?’’

अशाप्रकारे एकमेकांना प्रश्न करून दोघांनीही एकमेकांचे बिंग फोडलं. रहस्य प्रकट केलं.

बिळात राहणारा सर्प एवढ्यावरच थांबला नाही तर पुढे म्हणाला, ‘‘अरे दुष्टा, तुला काय वाटलं , शिळी कांजी आणि काळी मोहरी वाटून ती  गरम पाण्यासोबत प्यायल्याने तू मरशील हे काय कोणालाच माहित नाही?’’

त्यावर तो उदरात राहणारा सर्प ही आवेशाने म्हणाला, ‘‘अरे जा जा! तुझ्याही बिळात गरम तेल ओतलं तर तू मरशील हे काय कोणालाच माहित नाही की काय!’’

घाबरून झाडामागे लपलेली राजकन्या हा सर्व प्रसंग आणि वार्तालाप मोठ्या आश्चर्याने ऐकत होती. त्या सर्पांनी सागितलेले दोन्ही उपाय तिने अमलात आणले. अशाप्रकारे दोन्ही सर्प मरण पावले. तिचा पती खडखडित बरा होऊन निरोगी झाला. शिवाय बिळात असलेले सुवर्ण मोहरांनी भरलेले दोन हंडेही तिने बाहेर काढले. पुन्हा आपल्या पती आणि नोकरांसह ती आपल्या पित्याकडे परत आली. ती परत आलेली पाहून तिच्या मातापित्यानेही तिचा आदर सत्कार केला. अशाप्रकारे ती आपल्या पूर्वसंचित कर्माचं फळ  प्राप्त करून सुखाने राहू लागली.

ही कथा ऐकवून ‘प्राकारकर्ण’ म्हणाला, ‘‘महाराज म्हणून म्हणतो की, परस्परांमधे झालेल्या वादविवादात एकमेकांची रहस्य चव्हाट्यावर आणणारे लोक ह्या वर सांगितलेल्या सापांसारखे नष्ट होतात.’’

राजा अरिमर्दनानेही त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. त्याचं समर्थनही केलं आणि पुन्हा आपल्या बाकी मंत्र्यांनी दिलेल्या  सल्ल्यानुसार निर्णय घ्यायला आणि ते अमलात आणायला सुरवात केली. ते पाहून रक्ताक्ष अत्यंत खेदाने  हसून स्वतःशीच म्हणाला, ‘‘ ही मोठी खेदाची बाब आहे की, मंत्रीवर, आपण महाराजांना अत्यंत अयोग्य सल्ला देऊन  महाराजांचा आणि राज्याचा सर्वनाश ओढवला आहे. योग्यच म्हटलं आहे, जेथे अयोग्य व्यक्तींचा मानसन्मान केला जातो; गुणवान, योग्य व्यक्तीचा अपमान केला जातो तेथे तीन गोष्टी संभवतात – एकतर दुष्काळ तरी पडतो; नाहीतर मृत्यू तरी संभवतो; नाहीतर अत्यंत भयद परिस्थिती उद्भवते.(191)

अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यानां तु विमानना ।

त्रीणि तत्र प्रवर्तन्ते दुर्भिक्षं मरणं भयम् ।। 191 ।।

दुर्लक्षून गुणी व्यक्ती नीचाची चलती जिथे ।

दुर्भिक्ष, मृत्यु वा भीती ह्यांचे सावट त्या तिथे ।। 191 ।।

ह्या उप्पर अजून, वाईट मार्गानी काम करणारा पापी आपल्या दुष्कृत्यांचं काहीतरी उलटसुलट, गोलमाल बोलून,  समर्थन करून येर्‍या गबाळ्या, भोळसट, मूर्खाला असं काही पटवून देतो की, मूर्खही तेच खरं मानतो. त्याच्यासारखा स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणारा परम मूर्ख अजून कोणी नाही.

मला त्या रथ बनविणार्‍या वीरवर नावाच्या माणसाची  आणि त्याच्या बदफैली बायकोच्या गोष्टीची आठवण येत आहे. लोकांनी कितीही खरं सांगायचा प्रयत्न केला तरी त्यांच्यावर विश्वास न ठेवता आपला व्याभिचार लपविण्यासाठी बेमालूम खोटं बोलणार्‍या कुलटा पत्नीवर पूर्ण विश्वास ठेऊन, तिच्यावर अत्यंत प्रसन्न होऊन वीरवर त्याच्या बदफैली बायकोला आणि तिच्या जार प्रियकरालाच स्वतःच्या खांद्यावर बसवून गावभर फिरवत असे.(192)

प्रत्यक्षेऽपि कृते पापे मूर्खः साम्ना प्रशाम्यति ।

रथकारः स्वकां भार्यां सजारां शिरसाऽवहत् ।। 192 ।।

 

प्रत्यक्ष करुनी पापे । शब्दजालात घेरुनी

गोलमालचि बोलुनी । चलाख फसवे जयी ।।

रथकारचि तो भोळा । विश्वासे कुलटेवरी

खांद्यावरीच घेऊनी । पत्नी, जार फिरे पथी ।। 192 ।।

ते ऐकून रक्ताक्षाच्या सोबत असलेले बाकी मंत्री म्हणाले, ‘‘ ही कुठली गोष्ट आहे?’’

त्यावर रक्ताक्ष पुढील कथा सांगू लागला –

-------------------------------------


Comments

Popular posts from this blog

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

ललित लेख (अनुक्रमणिका)

राजा भोज आणि अमूल्य हिरा