3 ससा आणि चिमण्याची गोष्ट ( शशकपिञ्जल-कथा )

 

 3 ससा आणि चिमण्याची गोष्ट ( शशकपिञ्जल-कथा )

पूर्वी मी एका झाडावर रहात असतांना त्याच झाडावर खाली एका ढोलीत कपिंजल नावाचा एक चिमणा येऊन राहू लागला. आम्ही दोघे उपजीवीकेसाठी दिवसभर बाहेर हिंडून संध्याकाळी परत आल्यावर अनेक विषयांवर बराचवेळ गप्पागोष्टी करत असू. रोज अनेक दिशांना प्रवास करतांना आलेले विविध अनुभव, तर काही वैशिष्ट्यपूर्ण जागा, तर कधी पर्यटनासाठी निसर्गसौंदर्याची लयलूट झाली आहे अशा जागा ह्या बद्दल आम्ही बोलत असू.  तर कधी ब्रह्मर्षि, देवर्षि, पुराण- कीर्तनातील गोष्टी, निरनिराळी सुभाषिते अशा अनेक विषयांवर बोलता बोलता कधी रात्र होत असे हे आम्हालाच कळत नसे. अशाप्रकारे आमचा काळ अत्यंत आनंदात जात असतांनाच एक दिवस दूर कुठेतरी पीक हुरड्यावर आल्याचे कळल्याने माझा मित्र कपिंजल त्याच्या थव्यातील इतर चिमण्यांसवे तिकडे उडून गेला आणि बरेच दिवस झाले तरी परत आला नाही.

जेव्हा पहिल्या रात्री कपिंजल परत आला नाही तेव्हा कपिंजल अजून कसा आला नाही? म्हणून मलाही त्याची खूप काळजी वाटायला लागली. मग रोज संध्याकाळी मी त्याची वाट बघत असे. दुःखाने मला वाटे, `` हा का बरे हा आला नसेल? माझ्याशिवय तो इतके दिवस बाहेर राहू शकत नाही. हा शिकार्‍याच्या जाळ्यात तर अडकला नसेल? किंवा कोणी त्याला मारलं तर नसेल? तो जर कुशल असता तर मला सोडून असा एकटाच बाहेर राहिला नसता. रोज असा विचार करता करता खूप दिवस लोटले पण कपिंजल आलाच नाही. त्याच्या वियोगाने दुःखी होऊन अशा अनेक संध्याकाळी मी काढल्या. आणि अचानक एके दिवशी संध्याकाळी सूर्य अस्ताला जात असतांनाच एक शीघ्रगती नावाचा ससा धावत धावत झाडापाशी आला आणि तेथे ढोली पाहून पटकन उडी मारून त्यात शिरला. कपिंजलाचं काहीतरी बरवाईट झालं असणार असा विचार करून मीही त्याला थांबवलं नाही.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी धान्य खाऊन मस्त टुमटुमित झालेला कपिंजलही परत आला. बर्‍याच दिवसांच्या मस्त सहलीनंतर त्यालाही आता आपल्या घराची आठवण झाली होती. खरच आहे म्हणा, आपल्या दरिद्री देशात, छोट्याशा खेड्यात, मोडक्या झोपडीत जे सुख मिळतं ते स्वर्गातही मिळत नाही. प्रत्येक देहधारीला असचं वाटत असतं.

तादृग्जायते सौख्यमपि स्वर्गे शरीरिणाम्

दारिद्र्येऽपि हि यादृक् स्यात् स्वदेशे स्वपुरे गृहे ।। 90

स्वदेशी, आपुल्या गावी, । मोडक्या झोपडीतही ।

मिळे जो परमानंद । स्वर्गी  कैसा मिळे कधी ?।। 90

कपिंजलाने त्या शीघ्रगती नावाच्या  सशाला आपल्या घरात पाहिले मात्र, अत्यंत क्रोधित होऊन त्याला फैलावर घेत तो म्हणाला, `` अरे लुच्च्या सश्या, मी नाही हे पाहून तू लगेच माझ्या घरात घुसलास? हे वर्तन तुला शोभत नाही. ताबडतोब आपलं चंबुगबाळं उचल आणि येथून चालता हो. ''

ससाही तेथे तसाच पाय रोवून उभा राहिला आणि म्हणाला, ``उगीच तोंडाला येईल ते बोलू नकोस. कुठलं तुझं घर? हे माझं घर आहे.’’ तसंच

वापीकूपतडागानां देवालयकुजन्मनाम्

उत्सर्गात्परतः स्वाम्यमपि कर्तुं शक्यते ।। 91

( कुजन्मा- वृक्ष, उत्सर्गात्परतः - सोडल्यावर परत फिरून, स्वाम्यम् अधिपत्य, हक्क)

विहीर बावडी किंवा तळे देऊळ वृक्ष वा

जोवरी राहती प्राणी मालकी तोवरी असे ।। 91

दहा वर्ष जरी राही एका जागी जरी कुणी

अधिकार असे त्याचा पहावी ना लिखापढी ।। 92

असा न्याय मनुष्यांचा सांगताती ऋषीमुनी

निवास पशुपक्ष्यांचा जोवरी हक्क तोवरी ।। 93

 

तळे, विहीर वा कूप देवालय तरूवरी

जोवरी असते वस्ती मालकी त्यास तोवरी ।। 91.1

एकदा सोडता जागा हक्क संपेच तत्क्षणी

प्रजेच्या मालकीचे जे नसे मालक त्या कुणी ।। 91.2

तथा

तसेच -

प्रत्यक्षं यस्य यद्भुक्तं क्षेत्राद्यं दश वत्सरान्

तत्र भुक्तिः प्रमाणं स्यान्न साक्षी नाक्षरणि वा ।। 92

मानुषाणामयं न्यायो मुनिभिः परिकीर्तितः

तिरश्चां विहङ्गानां यावदेव समाश्रयः ।। 93

एका जागी दहा वर्षे राहे त्याची जमीन ती

नाही लिखापढीची ती जरुरी त्यास काहिही ।।92

असा न्याय मनुष्यांचा मुनींनी लिहिला असे

एकदा सोडता जागा पशुपक्ष्यांस  ना तसे ।।93.1

जगात पशुपक्ष्यांच्या पारंपारिक रीत ही

एकदा सोडता जागा हक्क ना उरतो कधी ।। 93.2

म्हणून हे घर माझं आहे.''

``काय? तू कायद्याची भाषा करतो आहेस? रागाने कपिंजल म्हणाला. तुला जर कायद्यानुसारच बघायचं असेल तर चल एखाद्या नामवंत कायदेपंडिताकडे किंवा न्यायालयात जाऊ. ( तेंव्हा धर्माचे ज्ञान असलेले धर्मज्ञ  असा पेच सोडवीत ) तो ज्याच्या बाजूने निर्णय देईल त्यालाच घर मिळेल.''

अशाप्रकारे दोघांमधील वाद विकोपाला गेल्यावर दोघांनीही कायदेपंडिताकडे जाण्याचा निर्णय घेतला.  हे सर्व मी झाडावर बसून बघत होतो. त्यांच्या वादाचा काय निर्णय होतो आहे हे पाहण्यासाठी मीही त्यांच्यामागून जाऊ लागलो. ह्या दोघांचाही वाद शेजारील देशात राहणारा तीक्ष्णदंत नावाचा बोका चोरून ऐकत होता. हे दोघे कायदेपंडिताच्या शोधात निघालेले पाहून धूर्त तीक्ष्णदंत बोका  शीघ्रगतीने आधीच पुढे जाऊन मधे येणार्‍या नदीच्या काठावर जाऊन बसला. त्याने सर्वांना सहज दिसेल असे जनेयु/ जानवे गळ्यात  धारण केले. रुद्राक्षांच्या फुलांच्या माळा घातल्या. कपाळावर गंधाक्षता लावल्या. किनार्‍यावर असलेल्या सर्व देवांना जाऊन त्याने त्यांचे दर्शन घेतले. नदीचीही आरती केली.  हातात दर्भ घेऊन, डोळे बंद करून, दोन्ही हात आकाशाच्या दिशेने वर करून, जमिनीला नुसता स्पर्श केल्याप्रमाणे एका पायावर उभे राहून श्रीसूर्यदेवांकडे पाहून उपदेश करू लागला,  -

``हा संसार असार आहे. प्राण क्षणभंगुर आहेत. आपल्याला प्रिय असलेल्या मित्रांचा सहवास स्वप्नवत् संपणारा  किंवा असत्य आहे. कुटुंब, परिवार हे जादुगाराने बनविलेल्या तात्कालिक जादूसारखे आकर्षक पण लगेचच नष्ट होणारे आहेत. किंवा मृगजळासारखे मिथ्या आहेत. संसार म्हणजे निव्वळ माया आहे. ह्या संसाराच्या मायेपासून वाचण्यासाठी धर्माशिवाय/ नियमांशिवाय तरणोपाय नाही. साक्षात वेदही म्हणतात,

अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः

नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसङ्ग्रहः ।। 94

नाशवंत असे काया लक्ष्मी चंचल सर्वदा

अधीर मृत्यु शेजारी म्हणुनी धर्म आचरी।। 94

यस्य धर्म विहीनानि दिनान्यायान्ति यान्ति

लोहकारभस्त्रेव श्वसन्नपि जीवति ।। 95

धर्मशास्त्राविना जोची आला दिवस घालवी

लोहाराचाच तो भाता श्वासोच्छ्वास करे जरी ।।95

नाश्चादयति कौपीनं दंशमशकाऽपहम्

शुनः पुच्छामिव व्यर्थं पाण्डित्यं धर्मवर्जितम् ।। 96

गुदद्वारास झाकाया श्वानपुच्छ जसे थिटे

चावणार्‍या माश्यांना उडवू ना शके जसे ।।

व्यर्थ पोकळ  शब्दांचे पांडित्य असुनी तसे

असे व्यर्थचि ते सारे   धर्मावीण नसे खरे ।। 96

पुलाका इव धान्येषु पुत्तिका इव पक्षिषु

मशका इव मर्त्येषु येषां धर्मो कारणम् ।। 97

धान्यात जैसे तृण तुच्छ वाटे पक्ष्यांमधे हीन पतंग भासे

प्राण्यात डासास गणे न कोणी सभेत तैसा अशिष्ट शोभे ।। 97

श्रेयः पुष्पफलं वृक्षाद्दध्नः श्रेयो घृतं स्मृतम्

श्रेयस्तैलञ्च पिण्याकाच्छ्रेयान् धर्मस्तु मानुषात् ।। 98

वृक्षाची महती राहे फुलाफळांमधे खरी

तूप श्रेष्ठ असे मोठे दुग्धामध्येच राहुनी ।।

घाण्यामध्ये महत्त्वाचे तेल एक असे परी

तैसेचि नरजन्माचे एक सार्थक धर्मची ।। 98

सृष्टा मूत्रपुरीषार्थमाहाराय केवलम्

धर्महीनाः परार्थाय पुरुषाः पशवो यथा ।। 99

हागणे, मुतणे, खाणे वाहणे भार, सोसणे

पशुंचे राहणे जैसे आळशाचे तसे जिणे ।। 99

 ससा आणि चिमणा आपल्याकडेच बघत आहेत हे पाहून त्यांचे लक्ष आपल्याकडेच वेधण्यासाठी तो धूर्त  आपण धर्मज्ञ, धर्ममार्तंड आहोत हे दाखविण्यासाठी धर्माबद्दल अजूनच लंबी चौडी भाषणबाजी करू लागला,

स्थैर्यं सर्वेषु कृत्येषु शंसन्ति नयपण्डिताः ।

बह्वन्तराययुक्तस्य, धर्मस्य त्वधरिता गतिः ।। 100

विचार पूर्ण सर्वांगी । करोनी कर्म आचरी

अनाठायी नको घाई । करावी  सावकाश ती ।। 100.1

विलंब धर्मकार्यासी । लवमात्र नसो कधी

गती चपल धर्माची । आणे बाधा कृतीतही ।। 100.2

धर्माचा फाफटपसारा कशाला? मी अगदि क्षोडक्यात धर्म म्हणजे काय ते सांगतो. पुण्य म्हणजे परोपकार आणि  दुसर्‍यांना त्रास होईल अशी कुठलीही कृती करणे म्हणजे पाप.

 संक्षेपात्कथ्यते धर्मो जनाः किं विस्तरेण वः

परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् ।। 101

रे फाफटपसारा हा  । नको व्यर्थचि लोकहो

सांगतो थोडक्यामध्ये धर्म काय असे अहो ।। 101.1

परोपकार हे पुण्य पाप ते परपीडन

धर्म सोपा असे ऐसा नको वाद वितंडन ।।101.2

मी जे काही धर्म नीतीबद्दल बोलत आहे. लोकहो ते मनात चांगल्याप्रकारे रुजू देत.

श्रूयतां धर्मसर्वस्वं श्रुत्वा चैवाऽवधार्यताम्

आत्मनः प्रतिकूलानि परेषां समाचरेत् ।। 102

सांगतो धर्म तत्त्वासी । बिंबवावे मनीच ते

आपुल्या अहिताचे  जे । अहिताचे दुज्यास ते ।। 102.1

करावे ना असे कर्म । दुजाच्या ना करी हित

असे योग्यचि हा धर्म । आचरावा सदोदित ।। 102.2

 

          ज्या कृत्यांनी आपल्याला त्रास होतो त्या कृत्यांनी दुसर्‍यांनाही होणार आहे हे लक्षात घेऊन दुसर्‍याच्या अहिताचे कधीही वागू नये.  जे जे आपल्याला प्रतिकूल असेल ज्या गोष्टींमुळे आपले अहित  होत असेल तसे आचरण आपण दुसर्‍यांसोबतही करू नये. ‘’

त्या वेश पालटलेल्या ढोंगी आणि धूर्त बोकोबाच्या उपदेशाने भाळलेला  शीघ्रगती नावाचा तो ससा म्हणाला, ``अरे कपिंजला, नदीच्या किनार्‍यावर बसलेला हा कोणी मोठा विरागी, धर्मशास्त्र प्रवीण, न्यायविशारद वाटत आहे. चल, त्यालाच आपला न्यायनिवाडा करण्यास सांगू या.’’

कपिंजल म्हणाला,  ``अरे हा तर निसर्गतःच आपला शत्रू आहे. त्याच्या टिळा, माळा, जनेयु , रुद्राक्षांवर जाऊ नकोस. हा आपल्या देशीचाही नाही आणि स्वभावानेही भिन्न आहे. त्याच्या जवळ जाऊ नकोस. आणि विचारायचच असेल तर लांबूनच विचार नाही तर त्याच्या नसलेल्या व्रतात बाधा आणली म्हणून तो आपल्यावर तुटून पडेल.’’

त्या दोघांनी लांबूनच त्याला हाक मारली, `` अहो तपस्वी महाराज, अहो धर्म आणि न्याय पंडित! आमच्या दोघांमधे काही कारणावरून झालेला वादाचा आपण निर्णय द्याल का?  आमच्या दोघांमधे ज्याचा दावा आपल्याला खोटा वाटेल, जो दोषी असेल त्याला तुम्ही मारून खाऊन टाका. ''

``अरेरे! असं बोलू नका बाळांनो! आता मी हिंसेचा मार्ग पूर्णपणे सोडून दिला आहे. हिंसा हे घोर पातक आहे. तो पातकाचा मार्ग मी कधीच सोडला आहे. अहिंसा हाच तर खरा धर्म आहे.

अहिंसापूर्वको धर्मो यस्मात्सद्भिरुदाहृतः

यूकामत्कुणदंशादींस्तस्मात्तानपि रक्षयेत् ।। 103

खरा/ योग्य धर्म अहिंसा हा  । संतानी अंगिकारला

उवा, ढेकूण डासांदि । जीवांसी रक्षिणे सदा ।। 103

सर्व संत सज्जनांनी अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म सांगितला आहे.  हे लक्षात घेऊन, उवा, लिखा, ढेकूण, डास ह्या दंश करणार्‍या, चावणार्‍या, आपले रक्त पिणार्‍या छोट्या छोट्या प्राणीमात्रांना सुद्धा मारणे पाप आहे. देवानी जे जे निर्माण केले आहे त्याचे आपण रक्षणच करायला पाहिजे. आपल्यावर हल्ला करणार्‍या वाघ, सिंह अशा हिंस्र प्राण्यांना मारलं तर माणूस नरकात जातो तर मग जे आपल्याला हानीकारक नाहीत त्यांना मारल्यावर तर काय होईल हे बोलायलाच नको.

 

 हिंसकान्यपि भूतानि यो हिनस्ति निर्घृणः

याति नरकं घोरं किं पुनर्यः शुभानि ।। 104

हिंस्र प्राण्यांस जो मारे । निर्दयी नर तो असे

पापाचारी दुरात्मा तो । खात्रीने नरकी पडे ।। 104.1

पशू हिंस्र कुणी मारी । त्यास शिक्षा जरी अशी

हानीरहित प्राण्यांसी । मारतो त्या असे कशी?  ।।104.2

  जे वैदिक लोक यज्ञामध्ये पशू बळी देतात ते मूर्ख आहेत. त्यांना खरा वेदार्थ समजलाच नाही. वेदामध्ये सांगितलं आहे की `अजा’ (म्हणजे बोकड) बळी द्यावा. पण अ जा म्हणजे जे जन्माला येत नाही ते किंवा जे जन्म देत नाही ते. म्हणजे सात वर्ष राहून गेलेल्या धान्यानी यज्ञ करावा. कारण ते धान्य उगवत नाही. धान्याच्या रोपांना जन्म देण्यास ते सक्षम नसते. अजाचा अर्थ बोकड किंवा कुठला पशू होत नाही.

वृक्षांश्छित्वा पशून् हत्वा कृत्वा रुधिरकर्दमम्

यद्येवं  गम्यते स्वर्गे नरके केन गम्यते ।। 105 ।।

वृक्ष तोडी पशू मारी रक्ताचे पाट वाहवी

तरीही जातसे स्वर्गी  कोण नर्का तरी धनी ।। 105

राम! राम!! राम !!! अशा प्रकारे सघन वृक्षांची कत्तल करून, वाट्टेल तशा पशुहत्या करून, रक्ताच्या नद्या वाहतील आणि ही सर्व पृथ्वी रक्तमांसाचा चिखल होईल असे अश्लाघ्य वर्तन करून जर कोणी स्वर्गात जात असेल तर असं अजून कुठलं दुष्कर्म राहून गेलं आहे ज्याने माणूस नरकाचा धनी होतो?

छे छे छे ! त्यामुळे तुमच्यातील ज्याचा दावा खोटा असेल त्याला मी मारून खावं हा विचारसुद्धा मी करू शकत नाही.  बाळांनो तुम्ही दोघंही निःशंक रहा. घाबरू नका. मी तुम्हाला ठार मारीन असं मनातसुद्धा आणू नका. तरीही तुमच्या भल्यासाठी मी तुमच्यामधील कलहाचा निर्णय करीन. पण मी वृद्ध झाल्याने मला तितकेसे ऐकू येत नाही त्यामुळे मी तुमचा वाद -प्रतिवाद नीट ऐकू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला जी काही तुमची बाजू मांडायची असेल ते माझ्या जवळ येऊन निर्धास्तपणे सांगा. तुमच्या दोघांचीही बाजू ऐकून घेतल्यावर मी माझा उचित निर्णय तुम्हाला सांगीन. मी कायम सत्याचाच स्वीकार केला आहे. जो माणूस आपल्याला मान सन्मान मिळावा, लोकांमधे आपली प्रतिष्ठा वाढावी, वा अहंकाराने वा कशाचा तरी लोभ धरून वा दुसर्‍यावरील रागाने, मत्सराने किंवा भयाने योग्य न्याय देत नाही, अनुचित न्याय देतो, तो नरकात खितपत पडतो.

मानाद्वा यदि वा लोभात्क्रोधाद्वा यदि वा भयात्।

यो न्यायमन्यथा ब्रूते स याति नरकं नरः ।। 106

अहंकार प्रतिष्ठा वा मिळो सन्मान ह्या  जनी

ईर्षा आसक्ति वा गर्व क्रोध मत्सर वाटुनी ।। 106.1

लोभाने वा भयाने जो न्याय देई अयोग्यची

दुराचारीच तो ऐसा नरकाचा असे धनी ।। 106.2

 

पञ्च पश्वनृते हन्ति दश हन्ति गवाऽनृते ।

शतं कन्याऽनृते हन्ति सहस्रं पुरुषाऽनृते ।। 107

पशुंच्या निर्णायामध्ये न्याय योग्य जो करी।

तो पाच पशुहत्येच्या पापाचा होतसे घनी ।। 107.1

निवाड्यातच गायींच्या खोटा निर्णय जो करी।

लागे पाप दहा गायी मारल्याचे तया शिरी ।। 107.2

विवाद कन्यकांचा ना करे उचित जो कधी

तयास शत कन्यांच्या हत्येचे पाप ये शिरी ।। 107.3

मनुष्याच्या विवादाचा निवाडा योग्य ना करी

तो हजार नरांचा त्या हत्यारा मानणे  भुवी ।। 107.4

 

उपविष्टः सभामध्ये यो न वक्ति स्फुटं वचः ।

तस्माद् दूरेण सा त्याज्या न्यायं वा कीर्तयेदृतम् ।। 108

खरे-खोटेचि संदिग्ध  वाटे सभ्रम ज्यामुळे

स्पष्ट ना होतसे काही न्यायालयी असे वदे ।। 108.1

अशावेळीच त्यागावे न्यायालयचि वा सभा

त्याग ना शक्य झाल्यासी द्यावे उचित निर्णया ।। 108.2

 

तरी आता माझ्या जवळ येऊन खरी खरी काय हकिकत आहे ती मला सविस्तर स्पष्टपणे सांगा.’’

अजून काय सांगाव? थोड्याच वेळात त्या दोघांचाही विश्वास संपादन करून त्या नराधमाने त्यांना इतकं जवळ बोलावलं की ते दोघेही त्याच्या मांडीवर जाऊन बसले. तेव्हा एकाचवेळेस त्या दुष्टाने एकाला पायाखाली दाबून तर दुसर्‍याला आपल्या तीक्ष्ण दातांनी जबड्यात पकडून ठार मारलं.

सर्व गोष्ट सांगून झाल्यावर एक दीर्घ सुस्कारा सोडत कावळा मला म्हणाला, म्हणून सांगतो, नीच, कपटी, क्रूर, दुष्ट, हलक्या मनाच्या, राजाला निवडून देऊन जर त्याला सिंहासनावर बसवलं तर प्रजेचा सर्वार्थाने नाशच होतो. आपापसातील भांडणाने अंध झालेल्या शशक आणि कपिंजलाने एका  दुष्टबद्धी बोक्याची त्यांच्या भांडणाचा निवाडा करण्यासाठी आपणहून निवड केली. त्याला निवाडा करण्यासाठी ग्राह्य मानून त्याच्यावर न्याय देण्याचे काम सोपवल्याने दोघेही  यमलोकी गेले. त्याप्रमाणे तुम्हीही ह्या दिवांध घुबडावर विश्वास ठेऊन त्याला राजा करण्यासाठी अनुमोदन दिलं तर एक ना एक दिवस तो तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही.

 जो तुमच्या देशाच्या संस्कृतीहून भिन्न आहे, जो मुळातच तुमच्या देशाच्या शत्रू राष्ट्रांशी संधान ठेऊन त्यांचीच भाषा बोलत असेल अशा अधमाच्या गोडगोड बोलण्यावर विश्वास ठेऊन त्याला मते देऊ नका. नाहीतर तुमचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही.

मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. ह्याच्या उप्पर तुम्हा लोकांना जो योग्य वाटत असेल तो निर्णय घ्यायला तुम्ही मोकळे आहात.

 कावळ्याचं ते अत्यंत तारतम्याने विचारपूर्वक केलेले सुयोग्य भाषण ऐकून सगळेच पक्षी विचार करू लागले म्हणू लागले, कावळ्याचे विचार योग्यच आहेत. योग्य राजाच्या नेमणुकीसाठी आत्ताच निवडणुक घ्यायची जरुर नाही. परत कधीतरी त्याचा विचार करू. असे म्हणून सगळेच पक्षी आपापल्या इष्ट जागी निघून गेले. केवळ तो दिवांध घुबड कृकालिकाच्या सोबत सिंहासनावर बसून राज्याभिषेकाची वाट पहात होता. राज्याभिषेकाला उशीर होत असलेला पाहून तो म्हणाला, ``अरे, कोण आहे रे तिकडे? माझ्या राज्याभिषेकाला इतका वेळ वाया का दवडत आहात?’’

 उलूकाचे ते बलणे ऐकून कृकालिका म्हणाली, ``महाराज, आपल्या राज्याभिषेकात त्या कावळ्याने खोडा घातला आहे. पक्षीगण आपल्या इच्छित स्थळी कधीच निघून गेले आहेत. हा एकमेव कावळा मात्र कशासाठीतरी येथे बसलेला दिसतोय. चला, आपणही लवकरच इथून निघावे. मी आपल्याला आपल्या  घरापर्यंत पोचवते.’’

 ते ऐकून संतापाने तो उलूक कावळ्याला म्हणाला,अरे दुष्टा, मी काय तझं असं वाकडं केलं होतं/ घोडं मारलं होतं म्हणून तू माझ्या राज्याभिषेकात खोडा घातलास? इतःपर तुमचं आणि आमचं हे वंशपरंपरागत हाडवैर चालू राहील. अरे!

रोहति सायकैर्विद्धं छिन्नं रोहति चासिना।

वाचा दुरुक्तं बीभत्सं न प्ररोहति वाक्क्षतम् ’’ ।। 109 ।।

होता जखम बाणाने । होते हळुहळू बरी

घावही तलवारीचा । येतो भरुन खोलही

घृणायुक्तचि वाणीने । परि जो घाव होतसे

कधीही ना भरे तोची । सदा भळभळे हृदी ।। 109

बाणांनी झालेली जखम एक वेळ भरून येईल, तलवारीचा घाव सांधला जाईल पण कडवट आणि मनावर घाव घालणार्‍या बिबत्स शब्दांनी झालेली जखम कधीही भरून येत नाही. कायम भळभळतच राहते.

 एवढं बोलून उलूक कृकालिकेच्या बरोबर  त्याच्या त्याच्या घरी निघून गेला. उलूक निघून गेल्यावर मात्र कावळा आपाद मस्तक भीतीने शहारून गेला. आणि विचार करू लागला, अरे, खरं बोलायच्या नादात मी हे काय करून बसलो? मी उलूकाचा राज्याभिषेक थांबवला खरा पण त्याच्यासारख्या बलाढ्य पक्षाशी विनाकारण कायमचं शत्रुत्व घेऊन बसलो.  मी असं काय बोललो की ज्याच्यामुळे ह्या उलूकराज घुबडाचा राज्याभिषेक थांबावा?

अदेशकालज्ञमनायतिक्षमं,

यदप्रियं लाघवकारि चात्मनः ।

यच्चाब्रवीत्कारणवर्जितं वचो,

न तद्वचः स्याद्विषमेव तद्वचः ।। 110

अयोग्य स्थानीच अयोग्य वेळी

वदे विनाकारण  जे नको ते

विरुद्ध होई परिणाम ज्याने

वक्त्यास येई लघुता जयाने ।। 110.1

 

रुचे न कोणा सलते मनाला

जरी खरे! ना उपयोग त्याचा

न तेचि वक्तव्य असे हिताचे

विनाशकारी विष उग्र भासे।। 110. 2

 

बलोपपन्नोऽपि हि बुद्धिमान्नरः,

परं नयेन्न स्वयमेव वैरिताम् ।

भिषङ्ममास्तीति विचिन्त्य भक्षयेत्

अकारणात्को हि विचक्षणो विषम् ।। 111

असे घरी वैद्य म्हणोनि कोणी। उगा कधी का विष घेतसेची

अफाट सामर्थ्य असे म्हणोनी। उगा न चाणाक्षचि वैर घेई  ।। 111

परपरिवादः परिषदि न कथञ्चित्पण्डितेन वक्तव्यः ।

सत्यमपि तन्न वाच्यं यदुक्तमसुखावहं भवति ।। 112

दरबार, सभेमध्ये । निंदावे ना कुणासही

मुद्दा सत्य असो काही । वाच्यता ना करी गुणी  ।। 112

असो! पण विश्वासू मित्रांसोबत तसेच आपल्यावर प्रेम करणार्‍या आप्त बंधु आणि स्वकीयांसोबत वारंवार विचार विमर्ष करून नक्कीच काही चांगले मुद्दे हाती येतात. तसेच अत्यंत विवेकाने सर्व साधकबाधक विचार करून जो कुठल्याही कामाची सुरवात करतो तोच बुद्धिमान समजला जातो. त्यालाच यश आणि लक्ष्मी दोन्हीही प्राप्त होतात.

 

सुहृद्भिराप्तैरसकृद्विचारितं,

स्वयं च बुद्ध्या प्रविचारिताश्रयम् ।

करोति कार्यं खलु यः स बुद्धिमान्

स एव लक्ष्म्या यशसां च भाजनम् ।। 113

पुन्हा पुन्हा आप्तजनांसवेची

तसे हितैषी सुहृदांसवेसची

करून चर्चा अन चिंतनासी

स्वबुद्धिने निर्णय जो करेची ।। 113.1

 

करेचि आरंभ विचारपूर्णा

सदैव कार्यासचि जो शहाणा

असेचि चाणाक्ष हुशार तोची

तयास लाभे यश आणि लक्ष्मी ।। 113.2

असा विचार करून शेवटी तो कावळाही तेथून निघून गेला. तेंव्हापासून ह्या घुबडांबरोबर आपलं वंशपरंपारगत पिढ्यानुपिढ्या कायमचं वैर चालत आलं आहे.

मेघवर्ण म्हणाला, काका आता ह्या परिस्थितीत आपल्याला काय करायला पाहिजे?

त्यावर स्थिरजीवी म्हणाला, वत्सा! संधि, विग्रह, यान, आसन, द्वैधीभाव आणि समाश्रय ह्या सहा नीतींपलिकडे अजूनही एक नीती आहे. ती म्हणजे छल/ कपट! त्या नीतीचा प्रयोग करून शत्रूला फसवून  मी त्याचा विनाश करीन.

बहुबुद्धिसमायुक्ताः सुविज्ञानाश्छलोत्कटाः ।

शक्ता वञ्चयितुं धूर्ता ब्राह्मणं छगलादिव!  ।।  114

चातुर्यातचि वैविध्य । असे नाना प्रकारचे

ठावे उपायही ज्यासी । सुचती ना जनांस जे ।।  114.

नामीच योजना ज्याच्या । खेळे कुटिल डावही

चलाख धूर्त तो कोणी । फसवे चतुरासही ।।  114.2

आपुल्या बकर्‍यासंगे । जाता ब्राह्मण तो कुणी

जैसे ठगविले होते । चोरांनी त्या लबाडिनी ।।  114.3

 

अनेक प्रकारचं चातुर्य अंगी असलेले, अनेक प्रकारचे उपाय जाणणारे, छल, कपटात अत्यंत निपुण, धूर्त कुटिल असलेलेच कोणालाही ठकवू शकतात. एका बोकडाला घेऊन जाणार्‍या ब्राह्मणाला अशाच धूर्तांनी चार ठकसेनांनी चांगलच ठकवलं.

मेघवर्ण महणाला, ते कसं काय?

सांगतो! असं म्हणून स्थिरजीवीनी कथा सांगायला सुरवात केली -

 

 

 

(` बापूंनी सांगितलेला अहिंसा हाच खरा धर्म आहे' हे लक्षात घेऊन उवा-लिखा, ढेकूण, डास ह्या त्रासदायक वाटणार्‍या प्रजातींचेही रक्षण करायला हवे. दहशतवाद्यांनाही संरक्षण द्यायला हवे. देशद्रोह्यांची दाढी खाजवायला आपल्याला AFSPA  हा सशस्त्रदलाला विशेष अधिकार देणारा कायदा ही रद्द करायला लागला तरी चालेल. CAA (citizenship amendment act /नागरी संशोधन कायदा) चा कडाडून विरोध करायला हवा. National Register of Citizens (NRC) च्या विरोधात एकदिलाने उभे रहायला हवे नाहीतर आपल्या देशात घुसलेल्या रोहिंग्यांना, अवैधपणे देशात शिरकाव करून नाना धंदे करणार्‍या, देशभर पसरलेल्या बिच्चार्‍या बांगलादेशींना देश सोडून जायला लागेल. त्याने मतदारयादीचे सारे संख्याशास्त्रीय गणितच   demography बदलून जाईल. आपण (NPR) National population Register हा दर दहा वर्षांनी जनगणनेचा (Census) चा प्रकार हाणून पाडायला पाहिजे. नाहीतर देशात घुसलेल्या बिच्चार्‍यांना देशोधडीला लागावे लागेल.)

हिंसक कारवाया करणार्‍या प्राण्यांना मारणाराही निर्दय असतो. मग ह्या छोट्या छोट्या उपद्रवी  किंवा निरुपद्रवी जीवांना एअरस्ट्राईक करून मारणारा तर नरकाचाच धनी आहे. )

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -