4 धूर्तब्राह्मणछाग-कथा (ठग, ब्राह्मण आणि बोकडाची गोष्ट)

 

4 धूर्तब्राह्मणछाग-कथा

(ठग, ब्राह्मण आणि बोकडाची गोष्ट)

एका गावात मित्रशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहात होता. त्याच्या घरी तो अग्निहोत्राचे पालन करत असे. माघाचा महिना होता. गार वार्‍याच्या मंद मंद झुळकांनी अंगावर शिरशिरी येत होती. त्यातच आकाश ढगांनी भरून आलं होतं. भुरभुरु पाऊसही पडत होता. आमावास्या जवळ आली होती. मित्रशर्मा आमावास्येला एक यज्ञ करणार होता. यज्ञात बळी देण्यासाठी त्याला एका पशूची गरज होती. म्हणून त्या रिमझिम पावसात तो जवळच्या दुसर्‍या गावात त्याच्या एका यजमानाकडे गेला. आणि त्या यज्ञासाठी त्याने यजमानाकडे एका पशूची याचना केली. 

 त्यानेही शास्त्रोक्त विधीनियमाचे पालन करून त्याला एक तगडा बकरा दान दिला. तो बकरा चांगलाच पोसलेला असल्याने भरभर आणि खूप अंतर चालू शकत नव्हता, नवीन माणूस, नवीन रस्ता पाहून मधेच तो बिथरून इकडे तिकडे पळत होता. शेवटी मित्रशर्मानी त्याला खांद्यावर घेतलं आणि झपाझप तो चालू लागला. 

त्याच वेळेला त्याला तीन ठगांनी पाहिलं. ते तिघेही भुकेने कळवळले होते. थंडीनी कुडकुडत होते. त्यांनी विचार केला की, ह्या ब्राह्मणाकडे असलेला बकरा तर एकदम धष्टपुष्ट दिसतोय. आपल्याला जर हा बकरा मिळाला तर आपली भूकेची तजवीज होईल. थंडीनी आपण हे जे असे गारठून गेलो आहोत ते पोटात चार घास जाऊन अंगात जरा धुगधुगी येऊन आपली थंडीही कमी होईल. जरा उबदार वाटेल. त्यासाठी कसंही करून ह्या ब्रह्मणाला ठगवून त्याच्याकडचा तो बकरा मिळवायला हवा. त्या तिघांनी आपला बेत पक्का करत एक कुटील डाव रचला. त्याप्रमाणे त्यातील एक जण दुसर्‍या मार्गाने पुढे जाऊन वेश पालटून त्या मित्रशर्माच्या समोरून चालत आला. त्याच्याकडे अश्चर्याने पहात तो म्हणाला, ``अरेरे हे रे काय? अरे तू तर अग्निहोत्री ब्राह्मण मुलगा दिसतोस. मग ह्या अपवित्र कुत्र्याला खांद्यावर बसवून का नेतोयस? तुझं हे वागणं हास्यासपद तर आहेच पण लोकप्रवाहाच्याही विरुद्ध आहे. कुत्रा, कोंबडा, अंत्यज ह्यांना शिवू नये. विशेष करून तर गाढव आणि उंटाला तर नाहीच नाही कारण ते तर जास्तच अस्पृश्य असतात. (खोटे लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी एखादया शहाण्याला मूर्खात काढतात. त्याच्याच धर्माचा आधार घेऊन त्यात असलेले नसलेले विचार घुसडून त्यालाच भ्रमित करत असतात. त्यालाच तो लोकप्रवाहाविरुद्ध वागल्याचे भासवून त्याच्यावर त्याच्याच धर्माचा दबाव निर्माण करत राहतात. प्रत्यक्षात त्यांचा उद्देश वेगळाच असतो. खरेतर कुत्रा, कोंबड्या, हे सर्व पाळीव प्राणी आहेत. गाढव आणि उंटाइतके तर माणसाला मदत करणारे दुसरे प्राणी नाहीत. पण मी मी म्हणणार्‍यांनीही आपल्याच धर्माचा म्हणावा तसा अभ्यास केलेला नसतो. एखादा श्लोक असलाच तर तो कोणाच्या तोंडी आहे, त्याचा संदर्भ काय आहे? हे ही महत्त्वाचे आहे. एकादा श्लोक रामायणातील असूही शकेल पण तो रावणाच्या तोंडचा असेल आणि रावण म्हणत असेल की, ``परस्त्रीला पळवून आणणे ही योग्यच गोष्ट आहे.’’  तर तो आपल्या धर्माशी निगडीत समजण्याचे काही कारणच नाही. पण काही स्वार्थी लोक असेच संदर्भहीन वेचे शोधून आपल्यालाच ऐकवतात आणि परत हे तुमच्याच धर्मग्रंथात आहे अशी हाकाटीही पिटतात. समुद्र ओलांडू नये अशी  खोटीच हूल इंग्रजांनी उठवली. त्यावर वेदशास्त्र पुराणोक्त अशी आपल्याच धर्माची खोटी मोहोर उठवून  एकेकाळी दर्यावर्दी असलेल्या भारतीयांचे जणु पंखच छाटून टाकले.)  

श्वान कुक्कुट चाण्डालाः समस्पर्शाः प्रकीर्तिताः ।

रासभोष्ट्रौ विशेषेण तस्मात्तान्नैव संस्पृशेत् ।। 115  

अरेरे! कोंबडा कुत्रा । त्याज्य अंत्यज सर्व हे

उंट गाढव यांनाही । शिवावे ना कधीहि ते ।। 115.1

अस्पृश्य मानले त्यांसी । असती अपवित्र ते

शिवावे न कधी त्यांना । शास्त्र सम्मत हे असे ।। 115.2

त्या ठगाचे ते बोलणे ऐकून रागाने तो ब्राह्मण मुलगा म्हणाला, ``अरे तुझ्या डोळ्यांच्या काय खाचा झाल्याएत का? का आंधळा आहेस? तुला माझ्या खांद्यावरचा चांगला चुंगला बकरा कुत्र्यासारखा वाटतोय का? चल! चालता हो!’’

अत्यंत समजूतीच्या स्वरात तो धूर्त त्याला म्हणाला, मान्यवर आपण जिथे जायचं असेल तिथे आपल्या मर्जीनुसार जाऊ शकता. आपण काय करावं ह्याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही. देणं घेणं नाही. आपण योग्य अयोग्य चांगलं जाणता. मी अजून काय सांगणार? असं म्हणून तो निघून गेला. तो ब्राह्मण युवक थोडं अंतर चालून गेला असेल नसेल तोवर दुसरा कपटी, वेश बदलून  दुसर्‍या रस्त्याने त्याच्या समोरून आला. आणि त्या ब्राह्मणपुत्राला पाहून  चेहर्‍यावर आश्चर्य, खेद, भय, किळस असे संमिश्र भाव  आणत अचानक त्या ब्राह्मणपुत्राला म्हणाला, ``छी छी छी छी! अरे तू ब्राह्मण मुलगा न? मग हे काय करतोयस? आपल्या गायीचा आवडता बछडा मेला म्हणून त्याला का कोणी असं खांद्यावर घेऊन जातं का? अरे, मनुष्याचं असो वा पशूचं! प्रेत ते प्रेतच!  कोणी मूर्खानी जर मृत शरीराला स्पर्श जरी केला तरी पंचगव्यानेच त्याची शुद्धी होते वा त्याला शुद्ध होण्यासाठी चांद्रायण व्रत करावं लागतं. 

मृताच्याच शरीरासी । स्पर्श ना करणे कधी

असो मनुष्य वा प्राणी । प्रायःश्चितचि तो करी ।। 116.1

दुर्बुद्धाने कुणी केला । स्पर्श तो कधिही मृता

शुद्धी हो पंचगव्याने । चांद्रायण व्रतेचि वा ।। 116.2 

तो ब्राह्मण मुलगा चिडून म्हणाला, अरे तू अजून दुसरा आंधळा का? तुला हा बकरा काय मेलेला बछडा दिसतोय काय? 

त्यावर अत्यंत नम्रपणाचा आव आणत खाली मान घालून तो धूर्त म्हणाला, ब्राह्मण महाराज, क्षमा करा. मीच अडाणी आहे अन् काय! आपल्याला जे योग्य वाटेल ते करा! मी मला जे मोडकं तोडकं शास्त्र ज्ञान आहे ते बडबडलो इतकच. आपण प्रज्ञावंत आहात. असे म्हणून तो निघून गेला.

तो ब्राह्मण युवक जरा काही अंतर चालून जातो न जातो तोवर तिसरा धूर्त वेश बदलून समोरून येत त्याच्याकडे बघत एकदम् किंचाळलाच!  अरे! अरे! अरे! अरे! हे अत्यंत अयोग्य आहे! महाराज अशाप्रकारे गाढवाला खांद्यवर घेऊन जाणं अत्यंत नींदनीय, अश्लाघ्य, कुळाला बट्टा लावणारं आहे. फेकून द्या! फेकून द्या ते गाढवाचं ओझं! आपण तर ब्राह्मण, उच्च वर्णीय आहत. जाणूनबुजून वा काही वेळेला नकळत जरी गाढवाला स्पर्श झाला असेल तर वस्त्रासकट सचैल स्नान करायला पाहिजे. त्यानेच हे असलं पाप धुतलं जातं. 

यः स्पृशेद्रासभं मर्त्यो ज्ञानादज्ञानतोऽपि वा ।

सचैलं स्नानमुदिष्टं तस्य पापप्रशान्तये ।। 117 

शिवे गाढवासी जो । जाणता वा अजाणता

वस्त्रासहित स्नानाने । मिळे शुद्धीच त्या नरा ।। 117

आपल्याला कोणी हे असं गाढवाला पाठीवर घेऊन जातांना पाहण्या आधीच आणि आापली निंदा, टवाळी करण्याआधीच आपण हे गाढवाचं ओझं फेकून द्या आणि निर्धास्तपणे जा. आता मात्र चिडण्याऐवजी त्या युवकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आत्तापर्यंत तीनतीन जण आपल्याला पाठीवरचा बकरा नसून हा वेगळाच प्राणी आहे हे सांगत असले तर नक्कीच त्यात तथ्य असणार, कदाचित ह्या रानामध्ये एखाद्या भूत पिशाच्चाने तर ह्या बकर्‍यात प्रवेश नसेल केला? त्यामुळेच मला तो बकरा दिसत असला तरी समोरून येणार्‍यांना हे पिशाच्च वेगवेगळी रूपे दाखवत असावे. आपल्या मानेवर पिशाच्च—!  असा विचार मनात येताच तो ब्राह्मणकुमार भीतीने शहारून गेला. त्याने तो बकरा मागचा पुढचा विचार न करता तेथेच खाली टाकून दिला आणि तो आापल्या घराकडे पळत सुटला. मग त्या तिघाही ठगांनी एकत्र येऊन त्या बकर्‍यावर यथेच्छ ताव मारला. म्हणून म्हणतो, कुटिल माणसं कोणालाही फसवू शकतात. हे राजा, सेवेत नवीन नवीन रुजू झालेला एखादा नम्र, विनयशील, मन जिंकून घेणारा नोकर असो वा अतिथी म्हणून आलेला एखादा नवखा मिठ्ठास वाणीचा पाहुणा असो किंवा रडून रडून तुमच्या मनात कणव उत्पन्न करणारी स्त्री असो; हे कधी त्यांच्या जाळ्यात तुम्हाला फसवून जातील हे सांगता येत नाही. नवीन नोकर कितीही गुणी, कामसू, नम्र, चांगला वाटलाा तरी त्याच्यावर लगेच विश्वास ठेऊ नये. काही दिवस त्याच्याावर न कळत देखरेख ठेऊन त्याची पारख करत रहावी मगच त्याच्यावर थोडी थोडी जबाबदारी वाढवून बघावी. आगांतुकाच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नये. तो कोण?   कुठला? त्याचा उद्देश्य काय? हे जाणून घेतल्याशिवाय त्याला जवळचा मानू नये. आपल्या शत्रूला फसवण्यासाठी स्त्रीचा वापर हा अनेक प्रकारे केला जातो. स्त्री रडू लागली की सहाजिकच कोणालाही तिची कणव येते. अशा स्त्रीचा वापर करून शत्रू तुमचा नायनाट करण्यासाठी टपलेलाच असतो.मला तर म्हणायचं आाहे की अशांच्या जाळ्यात आाजपर्यंत एकदाही फसला नाही असा कोणी माणूस अजून तरी ह्या पृथ्वीतळावर नसेल. 

अगदी योग्यच म्हटलं आहे- 

अभिनवसेवकविनयैः प्राघुणिकोक्तैर्विलासिनीरुदितैः ।

धूर्तजनवचननिकरैरिह कश्चिदवञ्चितो नास्ति ।। 118 

 नम्र, गुणी तत्पर तो, सेवक रुजू झाला नव्याने जो

अपरिचित पाहुणा वा, गोड वाणीने रिझवी जो

नारी नयनी अश्रू, पत्थरास ज्याने पाझर फुटतो

ऐशा धूर्तांकडुनी, न ठगला असा न कोणी तो ।। 118

धूर्त माणसं हा हा म्हणता कोणाच्याहि डोळ्यात धूळ फेकून त्याला फसवून जातात. धूर्तांचं तर ठीकच पण समाजातील दुर्बल वाटणारे घटक जर संघटित झाले तर, त्यांच्याही विरोधात उभे राहू नये. कारण संघटनेने मजबूत झालेले हे दुर्बळ बघता बघता तुमचा पाडाव करतात. जनसमूहाला जिंकणं सोपं काम नाही. सतत आपला फणा उगारून फुत्कार करणार्‍या, स्वतःच्या ताकदीच्या मस्तीत असलेल्या बलाढ्य आणि महाविषारी सर्पाला झुंडीने आलेल्या मुंग्यांनी होत्याचं नव्हतं केलं.

बहवो न विरोधव्या दुर्जयो हि महाजनः ।

स्फुरन्तमपि नागेन्द्रं भक्षयन्ति पिपीलिकाः ।। 119

फणा काढून तो मोठा । फुत्कारे सर्प तो जरी

येता मुंग्याच झुंडीने । चाले मात्रा न काहिही

 विराट समुदायासी । दुखवावे न ते कधी

प्रचंड ताकदीने तो । करे आक्रमणासही

( जनसमुदायाचे मत योग्य आहे वा अयोग्य आहे ह्याला महत्त्व नसते. एकदा का एखाद्या विचाराने जनसमुदाय प्रेरित झाला तर तो एखादी चांगली असामान्य आाणि अशक्य गोष्टही करुन दाखवू शकतो वा सगळ्याची राखरांगोळीही करू शकतो. जनसमुदायाची ताकद हीच `जनता जनार्दना’चे रूप आहे म्हणतात ते काही वावगे नाही. इंग्रजांविरुद्ध झालेले भारत छोडो आंदोलन असेल; वा भारतातील 1977 सालच्या निवडणुका असतील; वा 2014, 2019 च्या निवडणुका असतील; एखाद्या विचारांनी प्रेरित झालेला समाज सत्ताबदल कसा घडवून आणू शकतो ह्याचेच उदाहरण आाहे. शेतकरी आंदोलनाने घेतलेले हिंसक वळण आणि उसळलेली दंगल, जाळपोळ, लाल किल्ल्यावर चढून केलेली देशविघातक कृत्ये वा समुदायाच्या नेत्यालाही न जुमानता समुदायाने पाडलेली बाबरी मशिद अशी कितीतरी समुदायाकडून झालेली कृत्ये सांगता येतील.)

कावळ्यांच्या राजा मेघवर्णानी विचारलं, अजून ही काय गोष्ट आहे? 

स्थिरजीवी म्हणाला,

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -