5 पिपीलिका भुजङ्गम कथा (मुंग्या आणि भुजंगाची कथा)

 

5 पिपीलिका भुजङ्गम - कथा

मुंग्या आणि भुजंगाची कथा

एका भल्यामोठ्या वारुळात एक `अतिदर्पनावाचा महाकाय सर्प राहत होता. त्याच्या वारूळाला आत बाहेर करायला चांगली भली मोठी अनेक बिळं असतांनाही एक दिवस तो त्यातील अत्यंत अरुंद बिळातुन कसा बसा बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. त्याचं शरीरही आता चांगलं धष्टपुष्ट झालं होतं.  त्यामुळे त्या अरुंद मार्गातून येतांना त्याचा देह  ठिकठिकाणी घासून त्याला चांगलच खरचटलं. जखमा झाल्या. जखमा चिघळून त्या जास्त खोल झाल्या. त्या जखमांमधून येणार्‍या रक्ताचा गंध चहूकडे पसरला. आणि बघता बघता रक्ताच्या वासाने, गंधाने हजारो हजारो मुंग्याच्या झुंडी त्याच्या भोवती जमा झाल्या; आणि बघता बघता त्या मुंग्यांनी अतिदर्पाचं सगळ शरीरच झाकून जाईल अशी मुंग्यांची महा फौजच त्याच्यावर तुटून पडली. मुंग्यांमुळे अत्यंत हैराण झालेला साप तडफडू लागला. पण तो काहीच करू शकत नव्हता. मुंग्या घालवायचा वा मारायचा त्यानी कितीही प्रयत्न केले तरी सर्व प्रयत्न फोल ठरले. मुंग्यांची संख्या इतकी वाढली होती की बघता बघता त्यांनी त्याच्या जखमा मोठ्या करून त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण करून टाकली.  छिन्नभिन्न झालेला तो साप तडफडून तडफडून मरण पावला.  

म्हणून मी सांगतो की जनसमूहाच्या विरोधात जाऊ नये.

 राजा, ह्या विषयी मला तुला काही थोडसं सांगायचय. तू ते ऐकून घ्यावं असं मला वाटतं. त्यानुसार तू पुढचे निर्णय घेऊन कार्य करावे.’’

 मेघवर्ण म्हणाला, ``मंत्रीवर आपण मला आदेश द्यावा.  आपला आदेश मला कायम शिरोधार्य आहे. आम्ही आपल्या आदेशाचं उल्लंघन करू शकत नाही.’’

स्थिरजीवी म्हणाला, राजा!  साम, दाम, दंड भेद हे चार उपाय तर आहेतच पण त्याच्याशिवाय छळ-कपट हा जो पाचवा उपाय आहे तो वापरण्याचं मी ठरवलं आहे. त्याचं स्वरूप कसं असेल ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही मला घरभेदी ठरवून, अत्यंत हीन व कडक शब्दात सर्वांसमक्ष माझी यथेच्छ निंदा नालस्ती करा. निर्भर्स्थना करा. त्यामुळे आपल्यामधे लपलेल्या शत्रूच्या गुप्तहेरांना योग्य तो संदेश जाईल. प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदारच असल्याने मला राजाने पदच्युत केलं आहे असा ते नक्कीच निष्कर्ष काढतील. डोळ्याने पाहिलेल्या घटनेवर माणसाचा लगेचच विश्वास बसतो. तुम्ही कठूनतरी रक्त मागवून घ्या. त्या रक्तामधे मी लडबडला जाईन अशाप्रकारे माझ्या अंगावर ते रक्त फासून, ``ह्याला मृत्यूदंडच दिला पाहिजे; हा ठार मारायच्याच लायकीचा आहे; ह्या अस्तनीतल्या निखार्‍याला  नरकातच लोटलं पाहिजे.’’ असं म्हणत मला आपल्या वटवृक्षाच्या पायथ्याशी टाकून दिलं आहे असे दृश्य उभे करून  आपण सर्वजण ऋष्यमूक पर्वतावर वास्तव्यास जा.

 तुम्ही सगळे आपापल्या कुटुंबियांसमवेत त्या पर्वतावर आनंदानी राहा. मी इकडे माझ्या पूर्वनियोजित योजनेप्रमाणे माझ्या गोड गोड बोलण्याने शत्रूला माझ्या जाळ्यात फसवून माझ्याबद्दल त्यांना विश्वास उत्पन्न होईल अशी चाल खेळेन. आणि शत्रूच्या गुप्त निवासस्थानाचा छडा लावून,  एखाद्या सुयोग्य दिवशी, शत्रू जेव्हा नीट पाहू शकत नसेल अशा वेळेला सकाळी,  शत्रूचा समूळ नाश करीन. मी सर्व बाजूंनी तावून सुलाखन विचार केला आहे. अन्य मार्गांनी आपल्याला यश मिळणं मला दुरापास्तच दिसत आहे. शत्रूच्या  दुर्गाला/ निवासस्थानाला जर बाहेर पडण्यासाठी दुसरा दरवाजा नसेल तर  तेच त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरतील, नितीशास्त्राप्रमाणे ज्या दुर्गाला वेळ आलीच तर पळून जाण्यासाटी गुप्त द्वार आहे तोच दुर्ग श्रेष्ठ समजला जातो. ज्या दुर्गाला अशी पळून जाण्यासाठी गुप्त वाट नसते असा दुर्ग आपल्यासाठीच कारागृह ठरतो. आणि आपल्याच विनाशासाठी कारणीभूत होते.

 अपसारसमायुक्तं नयज्ञैर्दुर्गमुच्यते ।

अपसारपरित्यक्तं दुर्गव्याजेन बन्धनम् ।। 120  

संकटी जीव रक्षाया । पलायन करावया

गुप्त द्वार असे ज्यासी ।   तोची दुर्ग असे खरा ।। 120.1

गुप्तद्वार न ज्या दुर्गा । तोची कारागृहासमा

नीतीज्ञांमते हाची । ठरे कारण मृत्युला ।। 120.2

 ( महाबळेश्वरला एक गाईड सांगत होता की महाराष्ट्रातील सर्व किल्ले हे एकमेकांना जोडणार्‍या डोंगर रांगांमधे असल्याने एकमेकांना शिखरांवरून जोडले गेलेले आहेत. हे सर्व किल्ले शिवाजीमहाराजांच्या कितीतरी आधीपासून अस्तित्त्वात होते. पण या किल्ल्यांना जोडणार्‍या गुप्त पायवाटा तेथे नेहमी हिंडणारे कातकरी, गुराखी ह्यांनाच फक्त माहित होत्या. शिवाजीमहाराजांच्या सैन्यात असे कातकरी, गुराखी महाराजांनी सामावून घेतले होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ते आपल्या हालचालीकरत असल्याने शिवाजी इतक्या थोड्या वेळात कुठेही कसा पोचतो हे शत्रूला कळत नसे.)

 ह्या अशा संकटाच्या वेळी माझ्यावर दया दखवू नका माझ्याविषयीच्या प्रेमाने, आपुलकीने तुम्ही थोडेही विचलीत होऊ नका. राजाचे हे कर्तव्यच आहे. आपला सेवक कितीही प्राणप्रिय असला, कितीही लाडका, कितीही जवळचा असला, त्याच्याबद्दल मनात कितीही आदर असला, त्याच्या सर्व हव्या नको त्या गोष्टींची राजाने खूप चांगल्याप्रकारे काळजी घेतली असली तरी, युद्ध प्रसंगी राजाने त्याच्यात आपला जीव जराही गुंतवू नये.  त्याचे कसे होईल हा विचारही करू नये. ज्याप्रमाणे वाळलेली लाकडं इंधन म्हणून अग्नीत टाकतात त्याप्रमाणे युद्धात एखाद्या प्राणसंकट असलेल्या कामातही त्याचा इंधनाप्रमाणे  वापर करून घ्यावा. ज्या निर्ममपणे आपण शुष्क समिधा यज्ञात टाकतो तितक्याच कोरड्या मनाने राजाने सेवकाच्या मृत्यूचे दुःख न मानता त्याचा संकटात उपयग करून घ्यावा.

 

अपिप्राणसमानिष्टान् पालिताँल्लालितानपि

भृत्यान् युद्धे समुत्पन्ने पश्येच्छुष्कमिवेन्धनम् ।। 121

वाढवीले जया प्रेमे । प्राणप्रिय जरी असे

संग्रामी सेवकाचा ह्या । मोह ना धरणे नृपे ।। 121.1

शुष्ककाष्ठासमा त्यासी । युद्धाग्नीत समर्पिणे

युद्ध-धर्म सदा हाची । राजाने अवलंबिणे ।। 121.2

अजूनही मी सांगतो ते ऐका, किंबहुना हे राजा, राजा सर्व सेवकांना  आपल्या प्राणाप्रमाणे जपत असतो आणि स्वतःच्या शरीराइतकी त्यांची काळजी घेऊन त्यांचे पालनपोषण करत असतो ते  ह्या एकमेव दिवसासाठीच! शत्रूचे आक्रमण हाच तो दिवस!

प्राणवद्रक्षयेद् भृत्यान् स्वकायमिव पोषयेत्

सदैकदिवसस्याऽर्थे यत्र स्याद्रिपुसङ्गमः ।। 122

सेवका नित राजाने । प्राणांसमचि रक्षिणे

स्वतनू सम पोसावे । एकमेव दिनास्तवे ।। 122.1

संग्राम ज्या दिनी होई । शत्रू चालून येतसे

अर्पावे रणयज्ञी त्या । रणनीतीच ही असे ।। 122.2

म्हणून तुम्ही माझ्या प्रेमापोटी मला थांबवू नका. ‘’

             इतकं बोलून स्थिरजिवी आपल्या राजाबरोबर मेघवर्णासोबत खोटं खोटं पण कडाक्याचं भांडण करू लागला. अश्लाघ्य  आणि अत्यंत हीन शब्दात राजाची निंदा करू लागला. त्याची ती निंदा ऐकून राजाचे सेवक स्थिरजीवीला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेले. त्यांना अडवून क्रोधाने मेघवर्ण म्हणाला, ``थांबा! ह्या देशद्रोह्याला तुम्ही नको मी स्वतःच अशी अद्दल घडवतो की मरतांना त्याला त्याचा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही.’’ असं म्हणत त्याला एक धोबीपछाड देत मेघवर्ण त्याच्या उरावरच बसला आणि आपल्या चोचीने त्याला टोचून टोचून ठार मारत आहे असं दाखवून प्रत्यक्षात मात्र मागवलेले कृत्रिम रक्त चोचीने त्याच्या अंगावर शिंपडून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्थिरजीवीला  झाडाखाली तसेच टाकून आधी ठरल्याप्रमाणे  सपरिवार ऋष्यमूक पर्वताच्या दिशेने निघून गेला.

   त्यावेळी शत्रू पक्षाची हेर कृकालिका वेश बदलून तेथे हजर होतीच. ती हे सर्व नाट्य आपल्या डोळ्यांनी बघत होती. तिने ह्या सर्व जोरदार भांडणाची माहिती ताबडतोब उलूकराज अरिमर्दनला दिली. शत्रू आपल्या भीतीने राज्य सोडून सपरिवार पळून गेल्याची बातमीही तिने दिली.

  कृकालिकाने दिलेली बातमी ऐकून आश्चर्यचकित आणि आनंदित झालेला उलूकराज सूर्यास्त होताच आपल्या आमात्याना, सेवकांना आणि सैन्याला घेऊन पळून जाणार्‍या कावळ्यांच्या थव्यावर मधेच हल्ला करण्यासाठी सुसज्ज तयारीनिशी निघाला. आपल्या सैन्याला उत्साह यावा, त्यांच्यात वीरश्री संचारावी म्हणून तो म्हणाला, ``चला, लवकर चला,  आपापला वेग वाढवा. असा पळून जाणारा शत्रू  मोठ्या भाग्यानेच लाभतो.’’

``पळणार्‍या शत्रूचे दोन फायदे असतात. एक तर तो स्वतःची अत्यंत परिचित, सुरक्षित, आरामदायक, सोयीस्कर जागा सोडून दुसर्‍या अपरिचित जागी जात असतो. एका ठिकाणचं बस्तान आवरून  दुसर्‍या ठिकाणी बस्तान बसवण्यामधे त्याचे बहुतांश लोक गुंतलेले असतात. सर्वचजण कामात अत्यंत व्यग्र असल्याने लढण्यासाठी त्याला उत्तम पाठबळ मिळत नाही. लोक थकलेले बेसावध असतात. त्याचे सैन्य कामात गुंतल्यानी पुरेशी सेनाही लढण्यासाठी उपलब्ध नसते. नव्या दमाचे सैन्यही नसते. अशावेळी शत्रूवर विजय मिळवणे सहजसोपे असते.

शत्रोः प्रचलने छिद्रमेकमन्यच्च संश्रयम्

कुर्वाणो जायते वश्यो व्यग्रत्वे राजसेविनाम् ‘’ ।। 123

पलायन करे शत्रू । दोष त्यातचि दोन हे

 सर्वकाही असे हाती । ज्ञात स्थान असे सुटे ।। 123.1

कोण्या अज्ञात स्थानाचा । घ्यावा लागेचि आसरा

सैन्य सेवक ह्या कामी । राहती व्यग्र सर्वथा ।। 123.2

सैन्य ताज्या दमाचे ना । लढाया उरते पुरे

मधेच गाठुनी त्यासी । बिमोड करणे जमे ।। 123. 3

 

अशा प्रकारे आपल्या सैन्याला प्रोत्साहन देत हा हा म्हणता त्याने त्या भल्या मोठ्या वटवृक्षाला सर्व बाजूंनी वेढा दिला आणि बाकीच्या सैन्यासह झाडाखालीच आपला डेरा टाकला. त्यांना एकही कावळा नजरेस पडला नाही. ``आपल्या उलूकराजाच्या नावाच्या नुसत्या दबदब्यानेच शत्रू पळून गेला. हा आपला केवढा मोठा पराक्रम!’’ असे म्हणून  सारे मांडलिक राजे त्याचा जयजयकार करु लागले. त्याने मनोमन सुखावून अरिमर्दन उलूकराज झाडाच्या सर्वात उंच फांदीवर जाऊन बसला. तेथे बसून चौफेर नजर टाकत, आपल्या सैन्याला आदेश देत तो म्हणाला,  शत्रू ज्या मार्गाने गेला तो लवकर शोधून काढा. हे कावळे गेले तरी कोणत्या मार्गाने? ते त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत पोचून तेथे स्थिर-स्थावर होण्या आगोदरच त्यांचा पाठलाग करून त्यांना कापून काढा. तुम्हाला सांगतो,

 एकदा का शत्रूचे रोजचे व्यवहार मार्गी लागले, शत्रूच्या पोटापाण्याची चांगली सोय झाली आणि तो दुसर्‍या जागी स्थिरस्थावर झाला तर इतरवेळेला जो बलाढ्य शत्रू त्याच्यावर सहज विजय मिळवेल तोही सहजासहजी त्याला जिंकू शकत नाही. आणि एकदा का जर त्याला सर्व साधनसामुग्रीने समृद्ध असलेल्या दुर्गाचा आश्रय लाभला तर मग विचारायलाच नको! मग तो अवध्यच होऊन जातो. त्याला जिंकणे दुरापास्त होते.

वृत्तिमप्याश्रितः शत्रुरवध्यः स्याज्जिगीषुणा

किं पुनः संश्रितो दुर्गं सामग्र्या परया युतम् ।। 124

बस्तान बसता सारे । नव्या जागीच शत्रुचे

व्यवहारहि होताची । सुरळीतचि रोजचे ।। 124.1

सर्व साधन सामुग्री । लाभे विपुल शत्रुसी

शत्रु-सामान्य तो होतो । अवध्य आणि दुर्जयी ।। 124.2

अजूनही स्थिरजीवीकडे शत्रूसैन्यातील कोणाचे लक्ष गेले नव्हते.  माझ्याकडे लक्ष न जाताच शत्रू येथून तसाच निघून जाईल हे लक्षात येताच स्थिरजीवी मनाशी म्हणाला, ``आता जर शत्रू माझा पुरा वृतांत न ऐकताच निघून गेला. तर माझी सर्व मेहनत फुकट समजावी लागेल. एक तर मोठे आह्वान स्वीकारू नये. असे आह्वानात्मक काम स्वीकारण्यापूर्वी आपण ते काम करण्यास समर्थ आहोत ना ह्याचा विचार केला पाहिजे.

(काही वेळा अहंकाराने माणूस कुठलेही काम करायला तयार होतो. रावणासारख्या महाबळीने शिवधनुष्य उचलणे म्हणजे माझ्यासाठी पोरखेळ आहे असे समजत धनुष्य उचलायला हात घातला मात्र; ते धनुष्य उचलले गेले नाहीच पण तोल जाऊन तोही पडला. धनुष्यही त्याच्या छातीवर पडले आणि रावण रक्त ओकू लागला. हे आह्वान त्याने स्वीकारले नसते तरच बरे झाले असते.

अफजलखान शिवाजीच्या चातुर्याबद्दल ऐकून होता. आणि म्हणूनच शिवाजीचा बंदोबस्त करण्यास पहिल्यांदा तयार नव्हता. पण बडी बी च्या  आग्रहामुळे तयार झाला. निघण्यापूर्वीही त्याला विजयाची खात्री नसल्याने त्याने आपल्या जनानखान्यातील साठच्या वर स्त्रियांचा कत्ले आम केला. त्यानेही हे आह्वान त्याने स्वीकारले नसते तरच बरे झाले असते. )

मोठी आह्वानं स्वीकारतांना प्रचंड तयारीनिशी त्या संकटाची, त्या आह्वानात्मक कामाची शिंग धरूनच त्याला भिडावं लागतं. नाहीतर शत्रूला अचिंत्य असे काही उपाय योजून शत्रूला नामोहरम करावं लागतं. काही  प्रारंभ केलेलं काम तडीस नेणं हे बुद्धीमानाचं दुसरं लक्षण आहे.

  अनारम्भो हि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणम्

आरब्धसयान्तगमनं द्वितीयं बुद्धिलक्षणम्’’ ।। 125

ह्वान मोठे न स्विकारणेची

ही बुद्धिमानी पहिली असेची ।

स्वीकारले काम तडीस नेणे

हेची दुजे लक्षण शाहण्याचे ।। 125

एकदा काम अंगावर घेऊन करायला सुरवात केली की मधेच त्यात विघ्न उत्पन्न झाले म्हणून ते सोडून देणे हे उचित नाही. त्यापेक्षा कुठले काम अंगावर न घेणे बरे.  आता मी इथे आहे हे ह्या शत्रूसैन्याला कळण्यासाठी मी हळू हळू काही तरी आवाज करत राहतो. मी हळु हळू काहीतरी बोलत राहतो आणि माझ्या इथे असण्याची जाणीव ह्या शत्रु सैन्याला करून देतो. असा पूर्ण विचार करून कह्णत कह्णत त्याने हळु हळू बोलायला सुरवात केली. तो आवाज घुबडांच्या कानावर गेल्याने सर्वजण आवाजाचा कानोसा घेऊ लागले. त्याला झाडाखाली पडलेला पाहून अनेकजण त्याला मारण्यासाठी त्याच्यावर धावून गेले. त्यांना आपल्याकडेच येतांना पाहून तो त्यांना उद्देशून म्हणाला, अरे बाबांनो, मी स्थिरजीवी आहे. मी मेघवर्णाचा मुख्य मंत्री! पण त्या मेघवर्णाची काय दशा केली बघा. म्हणून मला माझी सगळी दुःखद कहाणी तुमच्या राजाला सांगायची आहे, कृपया तुमच्या राजाला जाऊन सांगा की, मला माझा सारा इति वृंतांत कथन करायचा आहे. मला त्याला खूप काही सांगायचे आहे.

उलूकराजाच्या सैनिकांनी सर्व इतिवृतांत उलूकराजाला जाऊन सांगितला. उलूकराजही अत्यंत आश्चर्यचकित झाला आणि स्थिरजीवीपाशी आला. त्याला  रक्ताने माखलेलं पाहून, त्याचं कह्णत कह्णत बोलणे ऐकून तो स्थिरजीवीला म्हणाला, “आपली अशी ही दुर्दशा कशी झाली? कोणी आपले प्राण घेण्याचा प्रयत्न केला? आणि कशासाठी?”

स्थिरजीवी म्हणाला, महाराज माझी अशी अवस्था कोणी केली ही एक अत्यंत दुर्दैवी कहाणी आहे. तीच मी तुम्हाला ऐकवतो. अहो काय सांगू? काल आपण आमच्यावर अचानक हल्ला करून अनेक कावळ्यांना ठार मारलं हे पाहून तो मेघवर्ण शोकाकूल झाला. दुःखाने विवेक घालवून बसला.  आणि अत्यंत क्रोधित होऊन तो दुष्ट आपल्यावर चढाई करण्यासाठी निघाला. मी त्याला खूप समजावण्याचा आणि थांबवण्याचा प्रयत्न केला. मी म्हणालो, “हे राजा, शत्रूवर चढाई करणं हे उचित होणार नाही. एकतर शत्रू आपल्यापेक्षा खूप बलवान आहे. त्याच्या तुलनेत आपले सामर्थ्य तर अगदीच फिके आहे.

बलीयसा हीनबलो विरोधं

न भूतिकामो मनसाऽपि वाञ्छेत् ।

न वध्यतेऽत्यन्तबलो हि यस्माद्-

व्यक्तं प्रणाशोऽस्ति पतङ्गवृत्तेः ।। 126

समर्थ शत्रूवर दुर्बळाने । चालून जाणे कधि योग्य का ते

हवेच ऐश्वर्य जयास मोठे । विरोध काही करणे न त्याने ।। 126.1

शत्रूस मोठ्या ललकारतोची । आह्वान जो देचि लढावयासी

ज्योतीवरी झेप पतंग घेई । तैसा तयाचाच विनाश होई ।। 126.2

आपल्याला जर सुखानी राहायचं असेल, आपलं ऐश्वर्य टिकून रहावं असं वाटत असेल तर आपल्यापेक्षा कितीतरी पटीनी ज्यास्त शक्तिशाली, बलाढ्य शत्रूवर चालून जाणं म्हणजे आपणच आपला घात करण्यासारखे आहे. एकतर अशा लढाईत शत्रूचा बिमोड होणे तर दूरच पण तेजस्वी ज्योतीवर पतंगाने झेप घेतली तर तो जसा जळून जातो त्याप्रमाणे आपला सर्वनाश ठरलेला आहे. त्यापेक्षा आपण  त्याला भारी भारी नजराणे देऊन त्याच्याशी तह करणेच योग्य होईल.

बलवन्तं रिपुं दृष्ट्वा सर्वस्वमपि बुद्धिमान् ।

दत्त्वा हि रक्षयेत्प्राणान् रक्षितैस्तैर्धनं पुनः ।। 127

शत्रुसामर्थ्य पाहूनी । ओळखून रिपूबला

प्राण वाचविण्यासाठी । जावे शरण शत्रुला ।। 127.1

सर्वस्व त्यास अर्पावे । बुद्धिमानीच ही असे

ऐश्वर्य प्राप्त होतेची । वाचता प्राण आपुले ।। 127.2

 अहो मोठ्यामोठ्या विद्वानांनी हेच सांगितलं आहे. शत्रू बलाढ्य आहे  हे आधीच ओळखून, समजून घेऊन शाहण्याने सत्वर त्याच्यासमोर नमते घ्यावे. आपले सर्व काही त्यास अर्पण करावे आणि आपले प्राण वाचवावेत. प्राण वाचले तर  धन, ऐश्वर्य परत मिळवता येईल. पण प्राणच उरले नाहीत तर बाकी सर्वच गोष्टी व्यर्थ आहेत.

पण तो मेघवर्ण माझं एक ऐकेल तर शपथ! तेथे कोणीही माझं ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. मेघवर्णालाही त्यांची चापलुशी करणारे खोटारडे तोंडपुजेच आावडत होते. आपणच घुबडांपेक्षा श्रेष्ठ आहोत फार बलवान आहोत असं सांगणारेच त्याला योग्य वाटले. ते त्याला हरबर्‍याच्या झाडावर चढवत आहेत हे त्याला कळलच नाही. त्याच्या सोबतच्या त्या चांडाळचौकडीने मी त्यांच्या मताला विरोध करत आहे हे पाहून उलट मलाच देशद्रोही ठरवलं. शत्रूपक्षाचा पक्षपाती गुप्तहेर ठरवून माझयावरच हल्ला चढवला आणि माझी ही दुर्दशा केली.  अजून काही क्षण माझ्या शरीरात प्राण शिल्लक आहेत तोपर्यंत मी आपल्या चरणांवर शरण आलो आहे. जर नशिबाने मला साथ दिली आणि मी जर चालण्या, फिरण्यासारखा ठिकठाक झालो तर मी आपल्याला त्याच्या निवासस्थानापर्यंत घेऊन जाईन आणि त्याचा संपूर्ण विनाश झालेला पाहीन. आता त्याचा विनाश झाल्याशिवाय माझया मनाला स्वस्थता लाभणार नाही.’’

त्याचं ते बोलणं ऐकून उलूकराज अरिमर्दन थोडा गप्प बसला. विचार करत एक दीर्घ श्वास सोडत आपल्या मंत्र्यांकडे तोंड वळवत त्याने एक दृष्टिक्षेप टाकला. उलूकराज अरिमर्दनाकडे त्याच्या आजोबा आणि वडिलांपासून असलेले अत्यंत विश्वासू असे पाच मंत्री होते. त्यांची नावं होती, 1 रक्ताक्ष, 2 क्रूराक्ष, 3 दीप्ताक्ष, 4 वक्रनास आणि 5 प्राकारकर्ण. उलूकराजाने पहिल्यांदा रक्ताक्ष नावाच्या मंत्र्याला  विचारलं, ``मंत्रीवर, शत्रूपक्षाचा एक मंत्री माझ्या कब्जात आला आहे. ह्याचं काय करावं?’’ त्यावर रक्ताक्ष म्हणाला, विचार कसला करायचा? कुठलाही विचार न करता त्याला ठार मारून टाका.

शत्रू दुर्बल असतो तेव्हाच त्याला ठार मारावं. त्याला बलशाली होण्याची आपल्याकडून आपण संधी देऊ नये. एकदा का तो बलवान झालाच तर त्याला जिंकणं, त्याच्यावर विजय मिळवणं अजुन अजूनच अवघड आणि कठीण होत जाईल. आणि बघता बघता तो अजेय होईल.

हीनः  शत्रुर्निहन्तव्यो यावन्न बलवान् भवेत् ।

प्राप्तस्वपौरुषबलः पश्चाद्भवति दुर्जयः ।। 128

घायाळ शत्रू जरी जायबंदी  वाटे जरी दुर्बळ हीन तोची ।

दया तयासी  नच दाखवावीत्या मारणे सत्वर योग्य हेची ।। 128.1

काळासवे त्यास मिळे उभारीयेते पुन्हा ताकद भांडण्याची

 होता पुन्हा तो बलवान त्यासीहोते महा दुष्कर जिंकण्यासी ।। 128.2

आणि अजून काय सांगू? स्वतःहून चालत आलेल्या लक्ष्मीचा जो स्वीकार करत नाही; त्याच्या हातून ती निघून जातेच पण जाता जाता शापही देऊन जाते असे जे बोलले जाते, असा जो समज आहे तो काही खोटा नाही.

प्रतीक्षा करणार्‍याकडे काळ संधीरूपाने एकदा तरी येतोच. त्या संधीचा योग्य फायदा उठवला नाही आणि आळसाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर संधीरूपात आलेला काळ निघून जातो. परत कधीही येत नाही.

कालो हि सकृदभ्येति यन्नरं कालकाङ्क्षिणम् ।

दुर्लभः स पुनस्तेन कालः कर्माऽचिकीर्षता ।। 129

दार ठोठावते संधी । एकदा नच ये पुन्हा

त्यावेळी जरि ना केले । तिचे स्वागत तत्परा

री ना ये फिरूनी ती । केली आळवणी तरी

गेला समय जातोची । पुन्हा येतो न तो करी ।। 129

 

एका गोष्टीची आठवण झाली त्यातील श्लोकाची आठवण झाली. ही जळणारी चिता बघ. माझा हा जखमी फणा बघ. एकदा प्रेमानी जमलेली मैत्री तुटली तर नंतर कितीही प्रेमाचा वर्षाव केला तरी ती परत जुळत नाही. काच फुटली की ती जोडता येत नाही.

चितिकां दीपितां पश्य फटां भग्नां ममैव च ।

भिन्नश्लिष्टा तु या प्रीतिर्न सा स्नेहेन वर्धते ।। 130

ज्वाळा चितेच्या उठती  वरी ह्या

पहा धडाडूनचि पेटत्या ह्या

हा छिन्न विछिन्न फणा हि माझा

तू एकदा घे बघुनी समस्ता ।। 130.1

 

सांगेल हे सर्व तुलाच सारे

मैत्री तुटे ती फिरुनी न सांधे

 केले जरी स्नेह-प्रदर्शनासी

ना भंगली काच जुळे कधीही ।। 130.2

अरिमर्दन म्हणाला, हे तू काय सांगतो आहेस? कुठला श्लोक? ही कुठली गोष्ट?

  मग रक्ताक्ष पुढील गोष्ट सांगू लागला

-----------------------------------

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -