6 ब्राह्मणसर्प-कथा

 

6 ब्राह्मणसर्प-कथा

कुठल्याशा एका गावात हरिदत्त नावाचा ब्राह्मण रहात होता. रोज तो त्याच्या शेतात काम करत असे. पण त्याची शेती कधी फायद्याची होत नसे.  जेमतेम पोटापाण्यापुरते धान्य हाती लागत असे.  त्याचा सर्व दिवस शेतात राबराब राबतच संपून जात असे. उन्हाळ्यात एक दिवस सूर्याच्या झळयांनी त्रस्त झालेला हरिदत्त दुपारी एका झाडाच्या सावलीत गाढ झोपला. त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याला जवळच असलेल्या वारुळावर फणा पसरून बसलेला एक भलामोठा नाग दिसला. त्यानी विचार केला की, कदाचित हा नागच ह्या क्षेत्राची देवता असावा. मी कधी ह्याची पूजा केली नाही म्हणूनच माझे कष्ट निष्फळ होत असावेत. आणि मला फायदा होत नसावा. आज मी ह्याची मनोभावे पूजा करीन.

असा विचार करून त्यानी कुठुन तरी दूध मागवलं. ते एका मातीच्या वाडग्यात घालून त्या सापाच्या वारुळाजवळ गेला आणि म्हणाला, ``हे क्षेत्रपाल, आजपावेतो आपण माझ्याच शेतात निवास करता हे मला माहित नव्हतं. म्हणून मी कधी आपली पूजा केली नाही. न कळत माझ्या हातून झालेल्या ह्या अपराधाला आपण क्षमा करावी.’’ असं म्हणत त्याने तो मातीचा दुधाने भरलेला वाडगा त्या वारुळाजवळ ठेवला आणि तो घरी परत आाला. दुसर्‍या दिवशी सकाळी तो शेतात आला तेव्हा काय आश्चर्य त्या दुधाच्या वाडग्यातलं दूध नाहिसं झालं होतं आणि त्या बदल्यात एक सोन्याची मोहोर त्या वाडग्यात चमकत होती. अत्यंत आनंदानी त्यानी ती मोहोर उचलून घेतली आणि रोज त्या नागदेवतेला तो वाडगाभर दूध त्याच्या वारुळाजवळ तो ठेऊ लागला. त्याच्या बदल्यात रोज एक सोन्याची मोहोर त्याला मिळू लागली.

नंतर काही कामानिमित्त काही दिवस हरिदत्त गावाला जाणार होता म्हणून त्याने आपल्या मुलाला दुसर्‍या दिवशी न चुकता त्या वारुळापाशी दूध नेऊन ठेवायला सांगितलं आाणि तो गावाला गेला. वडिलांच्या सांगण्याप्रमाणे मुलगा शेतात वारुळापाशी दूध ठेऊन परत आला. दुसर्‍या दिवशी तो शेतात गेला आाणि वाडग्यात पाहिलं तर एक सुवर्णमुद्रा चमकतांना पाहून ती हातात उचलून घेत त्यानी विचार केला, हे वारूळ ह्या सुवर्ण मोहरांनी भरलेलं दिसतयं. मी जर ह्या नागाला मारून जर हे सर्व वारूळ खणून काढलं तर मला आतल्या सर्व मोहरा एकाच वेळेला मिळतील. असा विचार करत त्याने तो दुधाचा वाडगा काळजीपूर्वक त्या वारुळापाशी ठेवला आणि हातात काठी घेऊन नागबाहेर येण्याची वाट पाहात राहिला. दुधाच्या वासाने नाग वारुळातून बाहेर येताच त्याने त्या नागाच्या डोक्यावर हातातल्या काठीने जोरदार प्रहार केला. अनपेक्षित झालेल्या प्रहाराने नाग मेला नाही पण  अत्यंत क्रुद्ध होऊन त्या ब्राह्मण पुत्राला असा काही डसला की काहि क्षणातच तो तडफडून तेथेच मरण पावला. त्याच्या शेताच्या आजुबाजूच्या लोकांनि हा प्रकार पाहिला आणि तेथेच चिता रचून त्या मृत बाहमणपुत्रावर अग्निसंस्कार केले. दुसर्‍या दिवशी तो ब्राह्मण गावाहून परत आला. त्याच्या शेजार्‍यांकडून सर्व खरी खरी हकिकत जाणल्यावर सापाच्या डसण्याचं समर्थन करत तो म्हणाला, जे झालं ते उचितच म्हणावं लागेल कारण जो आपल्याला शरण आलेल्या, आपल्यावर विश्वास ठेवणार्‍याचा असा विश्वासघात करतो, लोभापोटी त्याचं रक्षण सोडून त्यालाच ठार मारण्याचं कृष्णकृत्य करतो; त्याचं वैभव, संपत्ती कमलवनातील सुवर्णहंस जसे उडून गेले त्याप्रमाणे हातून निसटून जाते.

``भूतान् यो नाऽनुगृह्णाति ह्यात्मनः शरणागतान् ।

भूतार्थास्तस्य नश्यन्ति हंसाः पद्मवने यथा’’ ।। 131

लोभामुळे जो शरणागताच्या

उठेचच जीवावर त्या कृतघ्ना ।

सोडून जाती धन सौख्य सारे

ते कांचनी हंस जसेचि गेले।। 131

त्याची ती प्रतिक्रिया ऐकून त्याच्या जवळ जमलेले शेजारी त्याला विचारू लागले, तू हे काय म्हणतो आहेस? कुठलं कमलवन? कुठला हंसांचा राजा? जरा आम्हाला समजेल असं नीट सांग बरं----! आणि तो ब्राह्मण पुढची गोष्ट सांगू लागला,

-----------------------

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -