1 काकोलूकवैरकथा

1 कावळे आणि घुबडे यांची कथा. (काकोलूकवैरकथा)

काक(कावळे)–उलूक(घुबडे)ह्यांच्या आपापसातील वैराची कथा

कोणे एकेकाळी राजहंस, पोपट, बगळे, कोकीळ चातक, कबुतर, पारवे, कोंबडे  अशा सगळ्या पक्षांनी एक सभा भरवली. सारे पक्षी तेथे एकत्र येऊन आपले दुःख व्यक्त करू लागले. त्यांच्या राजाबद्दल अत्यंत उद्विग्न होऊन बोलू लागले. त्यांच्या शब्दाशब्दातून त्यांचा राग, संताप, दुःख आणि हताशपणा व्यक्त होत होता. पक्षीराज गरुड आमचा राजा आहे. तो भगवान वासुदेवाचा भक्त आहे. तो कायम वासुदेवाच्याच बरोबर असतो. रोज शिकारी येथे येऊन पक्ष्यांची शिकार करतात किंवा त्यांना पकडून नेतात. तरी पक्षीराज गरुडाला ना आमची चिंता आहे ना तो त्या सुटकेसाठी तडफडणार्‍या पक्ष्यांचे शिकार्‍यापासून रक्षण करतो.

 

यो न रक्षति वित्रस्तान् पीड्यमानान्परैः सदा।

जन्तून् पार्थिवरूपेण स कृतान्तो न संशयः ।। 70

( वित्रस्तान्भयग्रस्तान् ; पार्थिवरूपेणनृपतिरूपेण )

अत्याचारात शत्रूच्या । जाता भरडली प्रजा

रक्षणार्थ न ये राजा । कृतांत समजा तया ।।70

 

यदि न स्यान्नरपतिः सम्यङ् नेता ततः प्रजा ।

अकर्णधारा जलधौ विप्लवेतेह नौरिव ।। 71

नावाडी नसता नौका । समुद्री फुटते जशी

तशी प्रजा विना राजा । नेतृत्वावीण नष्टची ।।71

 

षडिमान् पुरुषो जह्याद्भिन्नां नावमिवार्णवे ।

अप्रवक्तारमाचार्यमनधियानमृत्विजम् ।। 72

अरक्षितारं राजानं भार्या चाऽप्रियवादिनीम्।

ग्रामकामञ्च गोपालं वनकामं च नापितम् ।। 73

जैसे सत्वर त्यागावे । जहाज भंगता तया

तैसे सत्वर त्यागावे । सहा व्यक्तींस सर्वथा ।।

उपदेश न देई जो ।  गुरू ना शिकवे कधी

पुरोहितच अज्ञानी । मंदबुद्धी अजाणची ।।

संरक्षण प्रजेचे जो । करेना योग्य भूपती

तुसडी कर्कषा पत्नी । गोड ना बोलते कधी ।।

सदैव राहतो ग्रामी । गुराखी जाय ना वनी

वनीच राहतो न्हावी । त्यागावे त्यांस सत्वरी ।। 72, 73

   म्हणून आपल्याला विचार विमर्ष करून पक्षांसाठी दुसरा राजा निवडायला हवा. तेवढ्यात सर्वांची नजर गोर्‍यागोमट्या उलूक राज घुबडाकडे गेली. त्या गोर्‍यागोमट्या घुबडाला पाहून सारे एकस्वराने म्हणू लागले, ``हा राजबिंडा उलूकराज घुबडच आमचा राजा होईल. त्याच्या राज्याभिषेकासाठी सारी तयारी करा. राज्याभिषेकाला लागणार्‍या सार्‍या सामग्रीची जमवाजमव करायला पाहिजे.

एकदा निर्णय झाल्यावर राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. विविध तीर्थांचं जल आणलं गेलं. 108 औषधी मुळ्या मिळवल्या. योग्य जागी सिंहासन ठेवलं गेलं. सात द्वीप, सात पर्वत रांगा दाखवणारी, मनोहर रंगसंगती असलेली पृथ्वी चित्रित केलेली रांगोळी रेखाटण्यात आली. व्याघ्रचर्म उलगडून टाकलं गेलं. सुवर्णकलश जलाने काठोकाठ भरले. दीपमाळा उजळल्या. सगळीकडे मंगलवाद्ये वाजू लागली.  आणलेल्या सर्व मंगल वस्तू  त्यांच्या त्या त्या योग्य स्थानावर ठेवल्या. सारे स्तुतिपाठक, भाटगण स्तुती गाऊ लागले. सर्व वैदिकांनी एकसाथ सुरू केलेल्या धीरगंभीर मंत्रघोषाने दशदिशा दुमदुमून गेल्या. सुंदर युवतींनी गाणी म्हणायला सुरवात केली. उलूकपत्नी कृकालिकेला आणून तिला पट्टराणीच्या आसनावर बसवलं गेलं. अशी राज्याभिषेकाची सर्व तयारी पूर्ण करून उलूकाला आणून सन्मानाने सिंहासनावर बसवत असतांनाच कुठुनतरी उडत उडत एक कावळा आला. आणि त्या महोत्सवाच्या जागी येऊन उतरला.

कावळ्याने विचार केला, हे सर्वपक्षीसम्मेलन का बरं भरलं आहे? येथे हे काय चालू आहे? कशाची एवढी गडबड उडाली आहे? कावळ्याला पाहून इतरही पक्ष्यांनी विचार केला, अरे, हा कावळा अगदी योग्य वेळेलाच येथे आला. कारण, मनुष्यांमधे जसा न्हावी फार चतुर असतो तसा पक्ष्यांमधे कावळा फार हुशार असतो. हिंस्र पशूंमध्ये कोल्हा धूर्त असतो तर साधुंमधे जैनभिक्षु फार चतुर असतात.

नराणां नापितो धूर्तः पक्षिणाञ्चैव वायसः ।

दंष्ट्रिणाञ्च श्रृगालस्तु श्वेतभिक्षुस्तपस्विनाम् ।। 74

नरांमध्ये असे न्हावी । धूर्त चाणाक्ष धोरणी

पक्ष्यांत कावळा तैसा । आहे फार चलाखची ।। 74.1

हिस्त्र प्राण्यांमधे कोल्हा । कावेबाज असे अती

भिक्षूत जैन भिक्षू तो । श्वेतांबर हुशारची ।। 74.2

त्यामुळे ह्या कावळ्याला बोलावून त्याचा ही विचार घेतला पाहिजे. कारण अनेकांनी साधकबाधक विचार करून दिलेला निर्णय आणि विद्वानांनी केलेल्या सूचना वा सुचवलेले चांगले उपाय कधिही वाया जात नाहीत.

बहुधा बहुभिः सार्धं चिन्तिताः सुनिरूपिताः ।

कथञ्चिन्न विलीयन्ते विद्वद्भिश्चिन्तिता नयाः ।। 75

(सार्धम् - एकमेकांसमवेत)

चर्चा करून सर्वांनी । विचारांती ठरेचि जो

विद्वानांच्या मतानेची । तो न निर्णय व्यर्थ हो ।। 75

तो कावळाही त्या सर्वांपाशी जाऊन विचारू लागला, ``हा एवढामोठा जनसमुदाय येथे का बरं जमला आहे?  कसल्या मोहोत्सवाचं आयोजन चालू आहे?’’

तेंव्हा त्या जमलेल्या पक्ष्यांनी सांगितलं, `` महाशय, दुर्दैवाने पक्ष्यांना कोणी राजाच उरलेला नाही. तेव्हा सर्व पक्ष्यांच्या सम्मतीने आम्ही उलूकराज घुबडाला राजा करण्याचा निर्णय घेतला. आपण अत्यंत योग्यवेळीच येथे हजर झाला आहात. आपणही आपली सम्मती जाहीर करा.’’

तेंव्हा उपहासाने हसून कावळा म्हणाला, `` हे काही योग्य नाही. येथे  मोर, हंस, कोकीळ, चक्रवाक, पोपट, बदक, हारीत, सारस असे एकाहून एक सरस पक्षी असतांना ह्या दिवसा ढवळ्या पाहू न शकणार्‍या, दिवांध, भयानक तोंडाच्या घुबडाला राज्याभिषेक करणं हे सर्वस्वी अयोग्य आहे.

वक्रनासं सुजिह्वाक्षं क्रूरमप्रियदर्शनम् ।

अक्रुद्धस्येदृशं वक्त्रं भवेत् क्रुद्धस्य कीदृशम् ।। 76

नासिका वाकुडी ज्याची । डोळे अंगार ओकती

छवी भयद अत्यंत । वाटे क्रूर लबाडची  ।। 76.1

नाही रागावला तेंव्हा । नकोसा वाटतो मनी

क्रुद्ध होता दिसे कैसा । कल्पना करवे नची ।। 76.2

 

स्वभावरौद्रमत्युग्रं क्रूरमप्रियवादिनम् ।

उलूकं नृपतिं कृत्वा का नः सिद्धिर्भविष्यति ।। 77

स्वभावेच असे जोची । क्रूर रागीट राक्षसी

घुबडाला अशा राजा । करुनी साध्य कायची ।। 77

दुसरं म्हणजे पक्षीराज वैनतेय गरुड आपला राजा असतांना ह्या दिवाभीताला राजा का बनवल जातय? आणि समजा, एकवेळ हा घुबड सर्वगुण सम्पन्न आहे असं जरी मानलं तरी एक राजा असतांना दुसरा राजा राज्यावर बसवणं हे योग्य ठरणार नाही. एकच तेजस्वी राजा पृथ्वीचं कल्याण करायला पुरेसा आहे. प्रलयकाळी  आकाशात  बारा सूर्य एकदम उगवल्यावर पृथ्वीवरची जीवसृष्टीच जशी नाश पावेल तसे अनेक राजे  आपल्यावर राज्य करू लागले तर आपली काही धडगत राहणार नाही.

एकएव हितार्थाय तेजस्वी पार्थिवो भुवः ।

युगान्त इव भास्वन्तो बहवोऽत्र विपत्तये ।। 78

डझनाने नभी येता । भानू देदिप्यमानची

येतील संकटे मोठी । घडे प्रलय भूवरी

पुरे एक तसा राजा । नको पुष्कळ भूपती

कल्याणास्तव राज्याच्या । हिताची गोष्ट ही खरी ।। 78

  अत्यंत सामर्थ्यशाली गरूडराजाचे नुसते नाव जरी घेतले तरी कोणी सहजासहजी तुम्हाला दबवू शकणार नाही. तुमच्या वाट्यास जाणार नाही. वा  तुमच्यावर गाजवू शकणार नाही. जेंव्हा महान व्यक्ती राजा असते तेंव्हा नुसत्या त्याच्या नावाचाच इतका दबदबा असतो की त्याचे नाव जरी ऐकले तरी दुष्ट व्यक्तीसुद्धा त्रास देणे तर सोडूनच द्या पण उलट मदतीलाच धावून येते. 

गुरूणां नाममात्रेऽपि गृहीते स्वामिसम्भवे

दुष्टानां पुरतः क्षेमं तत्क्षणादेव जायते ।। 79

व्यक्ती पराक्रमी मोठी । राज्यारूढ असे तरी

त्याचे नाम मुखावाटे । येता दुर्जन घाबरी

 धमकावेच जो कोणी । शत्रू क्रूर सदाकदा

बिनबोभाट प्रजेचेही । करे रक्षण तो अता ।। 79

 

अजून पण एक गोष्ट आहे. अशा मोठ्या व्यक्तींच्या नाव घेण्यानी सुद्धा कधी कधी मोठी मोठी अशक्यप्राय वाटणारी कामं सहज, सुरळीत होऊन जातात. चंद्राच्या नुसत्या नावाच्या उल्लेखानेच ससे परत एकदा त्यांच्या सरोवरात सुखानी राहू लागले.

व्यपदेशेन महतां सिद्धिः सञ्जायते परा ।

शशिनो व्यपदेशेन वसन्ति शशकाः सुखम् ।। 80

नाव घेताच श्रेष्ठांचे । कार्य ते सहजी घडे

घेता नावचि चंद्राचे  । जसे झाले सुखी ससे।। 80

पक्षी म्हणाले ते कसे काय?

कावळा सांगू लागला ,

------------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -