16 मण्डूकमन्दविषसर्प कथा - ( बेडूक आणि मंदविष नावाच्या सापाची कथा -)

 

 

मण्डूकमन्दविषसर्प कथा -

बेडूक आणि मंदविष नावाच्या सापाची कथा -

वरुणाद्रि नावाच्या पर्वताजवळच्या परिसरात एक मंदविष नावाचा कृष्णसर्प राहत होता. त्याचं वयही बरच झालं होतं. त्याच्या सर्वच हालचाली क्षीण झाल्या होत्या. त्यामुळे त्याच्या पकडीत आलेलं भक्ष्यही सहज सुटून जात असे. अनेक दिवस मंदविष भुकेने कासावीस होऊन उपाशीच रहात असे. एक दिवस त्यानी मनात विचार केला, काय केलं म्हणजे माझ्या पोटपाण्याचा प्रश्न सुटेल? मला काही तरी उपाय शोधायला लागेल. असा उपाय की ज्यामुळे मला विनासायास रोज भोजन मिळेल आणि माझी खाण्याची ददात मिटेल. मग मनात एक योजना  निश्चित करून तो जवळच असलेल्या एका मोठ्या तलावाजवळ गेला. तो तलाव पाण्याने काठोकाठ भरला होता. त्यात खूप बेडूक खेळत होते, उड्या मारत होते, पोहत होते त्या तलावाच्या काठावर तो मंदविष साप दुःखाने अत्यंत व्याकूळ होऊन, उद्वेगाने  इकडून तिकडे फेर्‍या मारण्याचे नाटक करू लागला. त्याला असं विमनस्कपणे हिंडतांना पाहून सरोवराच्या काठावरच बसलेल्या काही बेडकांनी त्याला विचारलं,  मामू!  आज आपल्याला झालं तरी काय? आज आपल्या पोटापाण्याची काळजी न करता, जेवणाची व्यवस्था न करता आपण अशा फेर्‍या का मारत आहात? आज आपलं काहीतरी बिनसलेलं दिसतय.

त्यावर अत्यंत बदमाश असा तो मंदविष मोठ्या विरक्तीचा आव आणून दुःखद अंतःकरणाने म्हणाला,  अरे बाळांनो माझ्यासारख्या अभाग्याला आता काही खायची इच्छाच उरली नाही. मग सगळ्या बेडकांच्या प्रश्नार्थक चेहर्‍यांवरून नजर फिरवत तो सांगू लागला,

मित्रांनो आज तिन्ही सांजेला मी माझं भोजन शोधण्यासाठी म्हणून बाहेर पडलो होतो. मी शिकार शोधत फिरत असतांनाच मला एक बेडूक दिसला. त्याला पकडण्यासाठी मी त्याच्या मागावर राहून त्याचा पाठलाग करत होतो पण कशी कोण जाणे त्याला  माझी चाहूल लागली. मरणाच्या भयाने तो तेथे काही आचार्य आणि त्यांचे शिष्य अभ्यास करत बसले होते त्यांच्यामधे जाऊन कुठेतरी लपून बसला. आणि परत मला काही दिसला नाही. पण त्याला शोधत फिरत असतांना  तलावात अंघोळ करणार्‍या एका शिष्याचा अंगठा हलला आणि मला बेडूकच आहे की काय असं वाटून मी त्याचा चावा घेतला. माझ्या विषाने तो मुलगा तात्काळ मरण पावला. त्या मुलाचे वडील शोक करू लागले. मी तेथच एका दगडामागे लपून तो प्रसंग बघत असतांना त्या मुलाच्या वडीलांचे लक्ष माझ्याकडे गेले.  त्या मुलाचे वडील शोक अनावर होऊन अत्यंत दुःखाने व क्रोधाने मला शाप देत म्हणाले, माझ्या मुलाने तुझा काहीही अपराध केला नव्हता. माझ्या निरपराध मुलाला तू  ठार मारलस. ह्या अपराधाचा दंड म्हणून आजपासून तू येथील बेडकांचे वाहन होऊन राहशील. त्यानेच तुझी जीवीका पण चालेल. म्हणून तुम्हा सर्व बेडकांचे वाहन बनून मी तुमच्याकडे आलो आहे.

सापाकडून ही आश्चर्यकारक कथा ऐकल्यावर तेथील बेडूक इतर बेडकांनाही तिखटमीठ लावून मोठ्या खुमासदारपणे ही कथा सांगू लागले. त्या बेडकांनी आपला राजा जलपादाकडे जाउन त्यालाही ही आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. हा सर्व अद्भुत वृतांत  ऐकल्यावर जलपादही मनातून अत्यंत प्रसन्न झाला. मोठ्या आश्चर्याने तो तलावातून बाहेर आला आणि तलावाच्या काठी बसलेल्या मंदविषाच्या फण्यावर मोठ्या ऐटित बसला. त्याची ती कृती पाहून बाकीही बेडूक सापाच्या अंगावर जिथे जागा मिळेल तिथे तिथे उड्या मारून बसू लागले. शेवटी ज्या बेडकांना मंदविषाच्या अंगावर बसायची संधी मिळाली नाही  ते त्याच्या पाठीमागे उड्या मारत  पळू लागले. मन्दविषही ह्या बेडकांना खूष करण्यासाठी  आपल्या अनेक प्रकारच्या चाली चालून दाखवू लागला. सारे बेडूक त्यामुळे हरखून गेले. त्यांना त्यापुढे स्वर्गाची सुखंही फिकी वाटू लागली. सापाच्या कोमलशा स्पर्शाने पुलकीत होऊन अत्यंत प्रसन्नचित्त झालेला जलपाद म्हणू लागला,  

न तथा करिणा यानं तुरगेण रथेन वा।

नरयानेन नावा वा यथा मन्दविषेण मे ।।233

आजवरीच मौजेने । गेलो ज्या वाहनातुनी

हत्ती घोडे रथातूनी । नौका वा  अन्य वाहनी ।।

त्या सर्व वाहनांमध्ये । सर एका नसे अशी

ह्या मंदविष सर्पाच्या । चालीत दुडक्या जशी ।। 233

दुसर्‍या दिवशी तो धूर्त, दगलबाज मंदविष साप अत्यंत हळु हळु सरपटायला लागला. ते पाहून जलपाद त्याला म्हणाला, मित्रा, काल विविध चाली मोठ्या कौशल्याने चालून दाखवतांना तुझ्या चालीत दिसणारं चैतन्य आज कसं काय हरवलं? महाराज, मी आज काहीच खाल्लेल नाही. भूकने माझ्या अंगातील त्राण जाऊन मी अगदी गलितगात्र झालो आहे. ते ऐकून जलपाद म्हणाला, असं असेल तर जे छुटपुट, छोटे छोटे वा विकलांग बेडूक असतील ते तू खा. ते ऐकताच मंदविषाच्या अंगातून जणु काही चैतन्याची लाटच सरसरत गेली आणि तो अत्यंत  आनंदित होत म्हणाला, त्या मृत मुलाच्या अध्यापक वडिलांनी मला असाच शाप दिला होता. आता आपल्या कृपाप्रसादाने मी उपकृत झालो आहे. महाराज, मी अत्यंत प्रसन्न आहे. धन्यवाद!

अशा प्रकारे जलपादाच्याच आशीर्वादाने रोज भरपूर बेडूक खाऊन काही दिवसातच मंदविष चांगलाच हट्टा कट्टा  बलवान झाला. गालातल्या गालात हसत अत्यंत प्रसन्न मनाने तो गुणगुणु लागला,

मण्डूका विविधास्वादाश्छलपूर्वोपसाधिताः ।

कियन्तं कालभक्षीणा भवेयुः खादतो मम ।। 234

किती विविध स्वादाच्या । चविष्ट बेडकांस मी

चवीने खात राहिलो ।  मनसोक्त किती जरी ।।

पुरतील मला सारे । निःश्चिंत खूप काळ मी

ह्या मूर्ख बेडकांना हो । सहजी फसवीन मी ।। 234

मंदविषाच्या फण्यावर बसून हिंडण्यासारख्या छोट्याशा आमिषालाच अहो भाग्य मानून, मंदविषाच्या वरवर गोड बोलण्याला  भुललेल्या जलपाद हा बेडकांचा राजाला मंदविष आपल्या संपूर्ण कुळाचा नाश करत आहे हेही कळले नाही.

एक दिवस योगायोगाने एक भला मोठा सर्प त्या तलावात आला. त्यानी मंदविष सापाच्या अंगावर बसून जलविहार करणार्‍या बेडकांना पाहिलं आणि तो चकितच झाला. अत्यंत आश्चर्याने आणि हे काय चाललं आहे हे कुतुहल त्याला स्वस्थ बसू देईना. तो मंदविष सर्पाजवळ येऊन विचारू लागला, मित्रा अरे हे बेडूक तर आपले भक्ष्य आहे आणि तू तर त्यांच्या जलविहाराची नौका असल्याप्रमाणे त्यांना तुझ्या पाठीवरून आनंदाने फिरवतो आहेस? हे विपरीत असं काम तू कशासाठी आणि का करतोएस?

 त्याचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेत मंदविष म्हणाला, मित्रा,  मी काय करतोय, मी बेडकांचं वाहन होऊन त्यांना हिंडवतोय हे मी चांगल्याप्रकारे जाणून आहे. पण मी त्या तूपामुळे आंधळ्या होणार्‍या पतीप्रमाणे योग्य वेळ येण्याची अजून काही काळ प्रतीक्षा करत आहे.

सर्वमेतद्विजानामि यथा वाह्योस्मि दर्दुरैः ।

किञ्चित्कालं प्रतीक्षेऽहं घृतान्धो ब्राह्मणो यथा ।। 235

जाणितो सर्व मी चित्ती । वाहतो बेडकां जरी

 प्रतीक्षा  योग्य  वेळेची । असे माझ्या हृदी परी ।।

 तूपाने अंध झाल्याचे । सोंग घेई जसा पती

साधाया कार्य तो जैसी । प्रतीक्षाच करे जशी

 

 ती कशी काय? नवागत सर्पाने विचारताच मंदविष गोष्ट सांगू लागला,

-------------------------------

मंदविषाप्रमाणे अनेक देश भारतीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची वा त्यांच्या देशात नोकरीची लालूच दाखवून त्यांचे विचार ह्या विद्यार्थ्यांच्या मनात पेरुन, गळी उतरवून, त्यांना भारताविरुद्ध प्रचारासाठी वापरत आहे. मंदविषाच्या अंगाखांद्यावर खेळणार्‍या बेडकांप्रमाणे आपले लोकही त्यांच्या देशात सुखसुविधा मिळवतात आणि तात्पुरत्या सुखाला भाळून देशाचा विनाश करण्यास उद्युक्त होतात.

चीन ने अनेक छोट्या देशांना कर्ज देऊन तेथे विकास करण्याचे आश्वासन देऊन, चिनी सैन्याच्या संरक्षणात अफ्रिकेतील अनेक गरीब देश, पाकिस्तान, श्रीलंका यासारखे छोटे  देश गळास लागले व  नंतर त्यांचे भरमसाठ व्याज देऊ न शकण्याने त्यांचे अनेक प्रॉजेक्टस् चीनने आपल्या घशात घातले. जसे हंबनटोटा हे श्रीलंकेचे बंदर 99 वर्षाच्या कराराने चीनने आपल्या ताब्यात घेतले. नेपाळचा बराचसा भूभाग चीनच्या ताब्यात घेतला. पाकिस्तानला भारताविरुद्ध मदत करतो असे दाखवून बराचसा पाकव्याप्त भारताचा भागही गिळंकृत केला. रस्ते बांधण्याचे अमिष दाखवून चिनी सैन्याच्या संरक्षणात चिनी कामगार नेमून प्रत्यक्ष आपलेच उखळ पांढरे करून घेतले.

अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल

 ( ललल /गलल नको ) न आणि भ गण नको

233 - 235  = 3 श्लोक

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -