18 स्थिरजीवीचा राजा मेघवर्णाला उपदेश -

 

स्थिरजीवीचा राजा मेघवर्णाला उपदेश -


गोष्ट सांगून झाल्यावर स्थिरजीवी म्हणाला, ``महाराज, म्हणून मी म्हणतो की आवश्यकताच पडली तर  शत्रूला उचलून आपल्या खांद्यावरही बसवावं’’

हे राजा,

मन्दविष सर्पाने ज्याप्रमाणे अत्यंत धोरणीपणे, कल्पकतेने, मोठ्या खुबीने आपली बुद्धी पणाला लावून जसा त्या सगळ्या बेडकांचा फन्ना उडवला त्याप्रमाणे मीही  अत्यंत कौशल्याने डावपेच आखून, त्यांची योग्य अम्मलबजावणी करून शत्रूचा समूळ नाश केला आहे.

निसर्गाचं नीट अवलोकन केलं तरी हेच दिसून येईल की, अत्यंत कडक, कठोर उपाय योजूनही योग्य तो परिणाम साधेलच असं नाही. रानं च्या रानं जाळणारा वणवा रानातील झाडांच्या मुळांना धक्का लावू शकत नाही. त्यामुळे वरवर सर्व जंगल जळलं आहे असं वाटलं तरी जमिनीखाली त्याची मूळं सुरक्षित असतात. त्यांना धक्का लागत नाही. नवीन पावसाचा शिडकावा होताच जमिनितून फूट वर येते आणि वृक्ष आपल्या मूळ आकारावर येतात. कित्येक वेळा तर पहिल्यापेक्षाही जास्त तरारून येतात. पण कडाक्याच्या थंडीच्या शीतलहरीत येणार्‍या मंद मंद थंड झुळकांनी अनेक झाडांची मुळं गोठून, सुकून वाळून जातात. आणि परिणामी वृक्ष नाश पावतात.

वने प्रज्वलितो वह्निर्दहन्मूलानि रक्षति ।

समूलोन्मूलनं कुर्याद्वायुर्यो मृदुशीतलः ।। 236

जाळी जो वणवा राना इजा मूळांस ना करी

सुकवी तरु मूळांसी वारा शीतल तो परी ।। 236

राजनीतीचा जो जाणकार असतो त्याला, शत्रू कसा आहे? चारित्र्यसम्पन्न आहे, आपला शब्द पाळणारा आहे का धूर्त कुटिल आहे, आपल्यावर आलेली वेळ कशी आहे ह्या सर्व गोष्टींचे ज्याला उत्तम आकलन असते. त्यानुसार जो शत्रूशी सलोखा करावा का कुठली खेळी खेळावी हे जाणतो. अशा राजनीतिज्ञावर अनेक प्रकारच्या नीति जणु अलंकारांप्रमाणे शोभत असतात. एकदा का खेळी खेळली की तो आपला डाव कधीही अर्ध्यात सोडत नाही. कितीही संकटं आली तरी त्यांना तोंड देत, ती पार करत तो यशस्वी होतोच. मोठ्या लोकांचं मोठेपण (महत्त्वमेतन्महतां) ह्यातूनच दिसून येतं.

महत्त्वमेतन्महतां नयालङ्कारधारिणाम् ।

न मुञ्चति यदारब्धं कृच्छ्रेऽपि व्यसनोदये ।।237

राजनीती महा शोभे दागिन्यासम ज्या नरा

संकटांची घडो वर्षा मागे पाऊल घेइ ना

घेतले कार्य जे हाती अर्ध्यात सोडी ना कधी

थोरांची थोरवी ऐशी दिसे आचरणातुनी ।। 237

 

छोटे, खोटे आणि अधम प्रतीचे कातडी बचावू लोक कामाचं स्वरूप पाहून, करू की नको करू? ह्या मार्गात संकटच संकटं आहेत. मग नकोच ते जीवघेणे प्रकल्प म्हणत कामाला हातच लावत नाहीत. तर मध्यम प्रतीचे प्रारम्भशूर लोक काम करायला उत्साहाने सुरवात तर करतात पण, जराशी अडचण जरी आली तरी नकोच ते काम म्हणून माघारही घेतात. पण एखादाच खरा उत्साही मोठ्या हिमतीने काम अंगावर घेतो. येणार्‍या सर्व सकटांना हिमतीने तोंड देतो. चिवटपणे झुंजतो, प्रत्येक संकट म्हणजे  नवीन गोष्ट शिकायला मिळायची पर्वणीच आहे असं समजून संकटांना खंबीरपणे तोंड देत संधीमधे परिवर्तित करतो.

प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः वनानि

प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः ।

विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः,

प्रारभ्य चोत्तमजना न परित्यजन्ति ।। 238

 

 आरंभ ना करिति विघ्नभयेचि क्षुद्र

माघार मध्यमचि घे बघताची विघ्न।

वर्षाव तो घडुनही शिरि संकटांचा

तो श्रेष्ठ ना डगमगे; करि पूर्ण कामा॥238

मेघवर्ण स्थिरजीवीला म्हणाला,  ``हे मंत्रीवर, आपण आपल्या चाणाक्ष बुद्धीने आणि कुटिल नीतीने माझ्या सर्व शत्रूंचा पूर्ण निःपात केला आणि माझं हे राज्य पूर्णपणे निष्कंटक केलं.’’

जो माणूस घेतलेल्या कर्जाची लवकरात लवकर फेड करून त्यातून पूर्णपणे मुक्त होतो तोच सुखाने जगू शकतो. कारण उरलेलं थोडसं व्याज फेडता दुर्लक्ष केलं तर कधी महा रक्कमेचं रूप घेईल हे सांगता येत नाही. त्या प्रमाणे अग्नीची राखेखाली उरलेली एक ठिणगीही प्रचंड आग लावण्याची क्षमता बाळगून असते. त्यामुळे अग्निही पूर्णपणे विझवायलाच लागतो. अर्धवट बंदोबस्त केलेला शत्रूही योग्य वेळ येईपर्यंत दबा धरून बसतो आणि शत्रू असावधान आहे पाहून पूर्ण तयारीनिशी हल्ला चढवतो. शरीराला जरा कमजोरपणा, अशक्तपणा आला की  सर्व रोग उफाळून येतात हे लक्षात ठेऊन उरलेलं चुटपुट व्याज,  अग्नीचा उरलेला अंश वा नाममात्र उरलेला शत्रू वा व्याधी यांचा योग्यवेळी योग्य बंदोबस्त करून त्यांचा पुरता नायनाट करणेच आवश्यक आहे. जो चाणाक्ष हुशार, दूरदर्शी आहे तो ह्या ऋण अग्नी, शत्रू, व्याधी ह्यांचा अंशमात्र शिल्लक ठेवत नाही म्हणूनच तो कधीही पस्तावत नाही. दुःखी होत नाही.

ऋणशेषं चाग्निशेषं शत्रुशेषं तथेव च ।

व्याधिशेषञ्च निःशेषं कृत्वा प्राज्ञो न सीदति ।। 239

व्याधी, रिपू, कर्जचि, अग्नि यांचे।

समूळ उच्चाटन सौख्य देते॥239

नंतर मंत्रीवर स्थिरजीवी म्हणाला,

हे भूपते, भाग्यवान मी नाही तर आपणच आहात. आपण प्रारंभ केलेले कार्य आज स्वतः पूर्णत्त्वाला जातांना दिसत आहेत. केवळ युद्धभूमीवर नुसत्या पराक्रमाने तळपत राहूनही कार्ये तडीस जात नाहीत. जी कामे चोहोबाजूंनी येणार्या संकटांचा विचार करून बुद्धीपूर्वक केली जातात, तीच कामे यशस्वी होतात.

शक्तीने, शस्त्राने शत्रूचा कधी पूर्ण निःपात होत नाही. कारण शत्रूचा वाचलेला परिवार वा  शत्रूप्रति निष्ठा असलेला त्याचा मोठा सेवकवर्ग हे कधी परत वर डोकं काढतील हे सांगता येत नाही. पण तेच शत्रूशी गोड बोलून, त्याच विश्वास संपादन केला; शत्रूच्या जनतेत, निष्ठावंतामधे फूट पाडली, शत्रूची सारासार विवेक बुद्धी नष्ट केली तर भ्रमित झालेला शत्रू आपणहून आपला नाश ओढवून घेतो. शस्त्राने नुसता देह पडतो पण बुद्धीभेद केल्याने शत्रूची विचार क्षमताच खुंटते.  शत्रूचा समूळ बिमोड होतो. तो सुयोग्य प्रकारे नष्ट होतो. त्याचं वैभव कुळ सर्व नाश पावतं. म्हणून बुद्धी आणि पराक्रम ह्या दोहोंच्या मदतीनेच कार्य सिद्धीस जातं.

शस्त्रैर्हता न हि हता रिपवो भवन्ति,

प्रज्ञाहतास्तु रिपवः सुहता भवन्ति ।

शस्त्रं निहन्ति पुरुषस्य शरीरमेकं

 प्रज्ञा कुलञ्च विभवञ्च यशश्च हन्ति ।। 240

शत्रू संपे कधि शस्त्रयोगे

बुद्धी करे नाश समूळतेने।

काया पडे ती, जरि आयुधेची

प्रज्ञा विनाशी कुळ, कीर्ति, लक्ष्मी240

हे राजा,

ज्याचे भाग्य अनुकूल असेल, तो यशाच्या शिखरावर पोचतो. त्याचीच उन्नती होते. तोच यशस्वी होतो. त्याची सदसदत् विवेक बुद्धी जागृत होते. त्याला सत्कर्मांमधे रुची प्राप्त होते. त्याची स्मरणशक्ती तीव्र होते. बुद्धी कुशाग्र होते. त्याच्या योजना आकाराला येतात, संकल्प सिद्धीस जातात. सर्वांच्या हिताचे प्रकल्प तो हाती घेतो.  त्याचे विचार चोहो बाजूंनी परिपूर्ण असल्याने कधीच विफळ होत नाहीत. त्याचा तर्क सुयोग्य विचारधारेवर उभा असल्याने नीतिमत्तेच्या, गुणवत्तेच्या, समयोचितपणाच्या कुठल्याही कसोटीवर तो खरा ठरतो. प्रगति आणि यशाच्या दिशेने होणारी त्याची वाटचाल, मनामधे प्रगतीच्या वाटेवर पुढचे पाऊल ठेवण्याचा विचार आणि आत्मविश्वास ह्यामुळे तो सदैव प्रसन्न असतो आणि उत्साहाने सळसळत असतो. अजुन अजुन अशी प्रशंसनीय कामे करण्याची ओढ त्याच्या मनात निर्माण होते.

( वृत्त हरिणी , अक्षरे 17, गण- , यति- 6,4,7 )

प्रसरति मतिः कार्यारम्भे दृढी भवति स्मृतिः,

स्वयमुपनमन्त्यर्था मन्त्रो न गच्छति विप्लवम् ।

स्फुरति सफलस्तर्कश्चित्तं समुन्नतिमश्नुते,

भवति च रतिः श्लाघ्ये कृत्ये नरस्य भविष्यतः ।। 241

 ( वृत्त- शार्दूलविक्रीडित )

कीर्तीच्या शिखरावरीच नर जो जाणार त्याची मती

ऐसी हो तळपे; प्रभाव तयिचा लोकी पडे तत्क्षणी

सत्कर्मी रुचि  घेतसेचि सुमती; देई प्रकल्पा गती

बुद्धी तल्लख हो कुशाग्र तयिची त्याला स्मरे सर्वही ।।

 

त्याचे तर्क खरे सदा उतरती सार्‍या कसोटींवरी

कर्मे निष्फळ ना कधीच घडती; होई यशस्वी कृती

राहे चित्त प्रसन्न नित्य तयिचे; येता यशोमंदिरी

 वाढे कार्यरुची मनीच तयिच्या त्या स्तुत्य कामांप्रती ।। 241

सन्नीती (म्हणजेच योग्य नीतीचे ज्ञान), त्याग आणि पराक्रम ज्या पुरुषाकडे आहे त्यालाच राज्यलाभ होतो.

जो अत्यंत निस्पृह आहे, ज्याला कसलाही स्वार्थ राहिलेला नाही, ज्याने आपल्या सर्व कामनांचा त्याग केला आहे  अशा त्यागी व्यक्तीच्या संपर्कात, तसेच जो निरनिराळ्या विषयात पारंगत आहे अशा विद्वानाच्या सान्निध्यात, तसेच निधड्या छातीच्या, ज्याला भय माहित नाही अशा शूर वीर माणसाच्या सहवासात येणारा माणूस गुणवान होतोच होतो. ज्याच्याजवळ गुण असतात त्यालाच त्याच्या गुणाच्या मूल्याच्या मोबदल्यात अमुप धन प्राप्तीही होते. अशा प्रचुर धनप्राप्तीनेच समृद्धी, गौरव, महिमा व समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते. प्रतिष्ठित व्यक्तीच्या शब्दांना वजन प्राप्त होते. त्याने सांगितलेल्या कामाची अम्मलबजावणी होऊ लागते. ज्याच्या शब्दांचा असा मान ठेवला जातो, त्याची आज्ञा हळुहळु लोक शिरसावंद्य मानून त्यालाच राज्याचं स्वामित्त्वही मिळतं. तो राजा म्हणून राजसिंहासनावर आरूढ होतो.

त्यागिनि शूरे विदुषि च संसर्गरुचिर्जनो गुणो भवति ।

गुणवति धनं धनाच्छ्रीः श्रीमत्याज्ञा  ततो राज्यम् ।। 242

त्यागी शूरचि पंडितांसह मिळे ज्याला रहाया जरा

तो होतो गुणवंत श्रेष्ठचि धनी सन्मान्य सर्वांस हा

त्याचा शब्दचि पाळती सकलही मानून आज्ञासमा

तोची राज्यपदावरी चढतसे सिंहासनाधिष्ठिता ।। 242

 मेघवर्ण म्हणाला,- ``नीतीशास्त्र खरोखरच एक अमोघ शस्त्र आहे. त्याचा सुयोग्य वापर केला तर काही अशक्य नाही. नीतीशास्त्र अत्यंत फलदायी आहे. त्या नीतीशास्त्राच्या  जोरावरच आपण अरिमर्दन जो माझा कट्टर शत्रू होता, त्याचा संपूर्ण विश्वास संपादन केला. त्याचा विश्वासातला माणूस म्हणून त्याने कायम आपल्याला जवळ ठेवले. आपण त्याचाच सुयोग्य फायदा उठवून त्याच्या अनेक गुप्त गोष्टी जाणून घेतल्या; आणि सरते शेवटी त्याच्या परिवारासहित त्याचा संपूर्ण पाडाव केला.‘’   

स्थिरजीवी मंत्री म्हणाला,

कित्येक कार्य युद्धासारख्या कडक, कठोर, अत्यंत कठीण उपायांनीच साध्य होण्याजोगी असतात. पण अशासुद्धा कामांमधे अनेक वेळेला `` संश्रय ही युद्धनीती जास्त उचित आणि उपयोगीही असते. वनामधे जाऊन विशाल अशा वृक्षाची प्रथमतः साग्रसंगीत पूजा करतात आणि मगच तो कापतात. ही परंपरागत चालत आलेली पद्धतच आहे. त्याप्रमाणे शत्रूचाही मानसन्मान करून, त्याच्या मनात आपल्याविषयी पराकोटीचा विश्वास उत्पन्न करून मग त्याचा घात करणे ही संश्रय नावाची युद्धनीती कुटिल शत्रूला मारण्यास योग्यच आहे.

( वृत्त शालिनी, अक्षरे – 11, गण- म त त ग ग, यति- 4, 7 )

तीक्ष्णोपायप्राप्तिगम्योऽपि योर्थ-

स्तस्याप्यादौ संश्रयः साधु युक्तः ।

उत्तुङ्गाग्रः सारभूतो वनानां,

नानभ्यर्च्य च्छिद्यते पादपेन्द्रः ।। 243

कार्ये सिद्धचि व्हावया कधिकधी युद्धा न पर्यायची

ऐशाही समयीच संश्रयचि ये कामास सर्वोपरी

जैसा वृक्ष महान तोचि वनिचा जातोच की पूजिला

त्याच्या नंतर वृक्ष तोडति भला ही रीत आहे सदा ।। 243

महाराज, नाहीतर काम न करताच नुसता फुकटचा सल्ला देऊन काय उपयोग? ज्या सल्ल्यानुसार वागल्याने सुखाची आशा सोडाच पण दुःखच पदरात पडत असेल अशा वांझ सल्ल्याने काय साधणार? महाराज, असा अनुचित सल्ला जर मी आपल्याला दिला असता तर आपण ही मला असेच म्हणाला असता. असो!

अत्यंत योग्य असच म्हटलेलं आहे की,

ज्याचं मन कायम दोलायमान राहतं, विचार पक्के नसतात, तळ्यात का मळ्यात असा चंचल स्वभाव असतो, कठोर परिश्रम (अध्यवसाय) करायची ज्याची तयारी नसते किंबहुना काम करायला लागेल ह्या भीतीनेच जो मागच्यामागे पसार होतो पण दुसरा जर काम करत असेल तर तो त्याच्या कामात पावला पावलावर शेकडो चुका दाखवत राहतो; असा छिद्रान्वेशी माणूस काही काळानंतर त्याच्या विसंवादामुळे, वाचाळपणामुळेच तोंडावर आपटतो. एखादं काम पूर्णत्त्वाला पोचतांना अशा लोकांनी ठामपणे केलेली चुकीची विधाने, वक्तव्ये जेव्हा खोटी ठरतात तेंव्हा अशा चहाटळ लोकांची सर्वत्र सारेजण यथेच्छ निंदा करतात. ते लोकांच्या उपहासाचा विषय होतात. ।। 244

( वृत्त वंशस्थ, अक्षरे- 12, गण- ज त ज र, यति- पाद. )

अनिश्चितैरध्यवसायभीरुभिः,

पदे पदे दोषशतानुदर्शिभिः ।

फलैर्विसंवादमुपागता गिरः,

प्रयान्ति लोके परिहासवस्तुताम् ।। 244

स्वभाव ज्याचा अति चंचला असे

परिश्रमाचे नित ज्यास वावडे

जया दिसे दोष पदापदावरी

सदैव कामात दुजाचिया परी ।।

प्रकल्प आकारचि घेतसे निका

सदोष ऐसे हिणवी जरी हा

जगी तया हासति लोक सर्वही

करून त्याचा उपहास तो जनी ।। 244

आणि म्हणूनच अगदि साध्या साध्या वाटणार्‍या कामांना कोणी कमी लेखू नये. कोणी त्यांची उपेक्षा करू नये. प्रत्येक काम त्वरीत, जलद गतीने, उत्साहाने, अत्यंत चोखपणे पार पाडावे.

``हे काम तर काय माझ्या डाव्या हातचा मळ आहे. ते करायला कितीसा वेळ लागतोय?; हे काम अगदीच क्षुल्लक आहे; ह्या कामात तर मी फार लक्ष घालायची आणि वेळ वाया घालवायची जरुरी नाही.’’ अशी कुठल्याही कामाची उपेक्षा करू नये. अशा छोट्या छोट्या कामांकडे केलेलं दुर्लक्ष फार महागात पडतं.  अशी वरवर नगण्य वाटणारी कामे दुर्लक्षित वा अपूर्ण राहण्यानी एक वेळ अशी येते की फार मोठ्या संकटांचा सामना करायला लागतो. कामाची टाळाटाळ करणार्‍या कामचुकार माणसावर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने त्याला पश्चात्ताप करायची वेळ येते. कायमचे दुःख भोगावे लागते. ।।245

( वसंततिलका )

शक्ष्यामि कर्तुमिदमल्पमयत्नसाध्यम्

अत्रादरः कं, इति कृत्यमुपेक्षमाणः ।

केचित्प्रमत्तमनसः परितापदुःखम्

आपत्प्रसङ्गसुलभं पुरुषाः प्रयान्ति ।। 245

आहे अशक्य मजला नच कार्य ऐसे

आहेच क्षुल्लक अती मम योग्य ना हे

दुर्लक्ष योग्यचि असे!  अनिवार्य ना हे

हे क्षुद्र कार्य करण्या न प्रयास लागे ।।

 

शेखीच जो मिरवि  कामचुकार ऐशी

दुर्लक्ष जो करि चुका अवहेलना ही

त्याचे ढिसाळ अति काम न पूर्ण होई

ना मंत्रणा सफळ; बारगळे कृतीही ।।

 

आपत्ति सोडति न त्या मनुजा कधीही

पस्तावतो नरचि तो नित दुःख भोगी ।। 245

              जर घरामधे क्षणभर ओझरता एखादा साप सळसळत जातांना दिसला आणि निमिषार्धात वळचणीत कुठेतरी अदृश्य झाला, परत दिसला नाही अशा घरात शांत चित्तानी झोप लागणं कसं शक्य आहे?  पण एकदा का सर्व अडगळ काढून तो साप पकडला किंवा घराबाहेर काढला वा ठार मारला तर मात्र त्याच घरात सुखाने झोप लागते. ।।246

निःसर्पे हतसर्पे वा भवने सुप्यते सुखम् ।

दृष्टनष्टभुजङ्गे तु निद्रा दुःखेन लभ्यते ।।246

क्षणकाळ दिसे नेत्रा । दिसेना पुढच्या क्षणी

विषारी सर्प ऐसा तो । लपून राहता घरी ।।

शांत झोप कशी यावी । कोणालाही कशी बरी

मारीता घालवीता वा । झोप निःशंक ये खरी ।। 246

अजून सांगायचं झालं तर,

           काही कामं असंभाव्य, अशक्यप्राय वाटत असतात. ती पूर्ण होण्यासाठी अनेक तज्ज्ञांचं मार्गदर्शन व मोलाचा सल्ला आवश्यक असतोच पण त्यासोबत ते काम हाती घेणार्‍याला एक दूरदृष्टी आवश्यक असते. राजनीतीचं चांगल्याप्रकारे ज्ञान आणि भान आवश्यक असतं. प्रयत्नांची आणि पराक्रमाची पराकाष्ठा करावी लागते. जोडीला चिकाटी, धैर्य, साहस, प्रचंड मेहनत, कष्ट करावे लागतात. अशी काम साध्य होण्यासाठी अनेक हितचिंतकांचे आशीर्वादही आवश्यक असतात. ज्याच्या जवळ अशी कामं पूर्ण करण्याची जिद्द असते, ज्याच्या धमन्यांमधून उत्साह सळसळत असतो, पराक्रम, साहस ज्याच्या नसानसात भिनलेला असतो, जो धैर्याचा महामेरू असतो, नीतीमान असतो; अशा धुरंधराला अशी अशक्यप्राय वाटणारी काम जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत चैन पडत नाही. मनाला शांती मिळत नाही. आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवल्याशिवाय तो थांबत ही नाही.।। 247

( वृत्त शार्दूलविक्रीडित, अक्षरे -19, गण- म स ज स त त ग, यति- 12, पाद )

विस्तीर्णव्यवसायसाध्यमहतां स्निग्धोपयुक्ताशिषां,

कार्याणां नयसाहसोन्नतिमतामिच्छापदारोहिणाम् ।

मानोत्सेकपराक्रमव्यसनिनः पारं न यावद्गताः,

सामर्षे हृदयेऽवकाशविषया तावत्कथं निर्वृतिः ।। 247

जे जे काम असाद्ध्य, दुष्कर असे; वाटे जना शक्य ना

लागे प्रेमळ हात पाठिवरती; लागे शुभाशीष ज्या

साधाया अति घोर कष्ट पडती; मेरूपरी धैर्यही

नीतीही अवलंबिणे पडतसे त्या त्या प्रसंगापरी ।।

 

कामे तीच अशक्यप्राय करण्या द्रष्टा गुणी ये पुढे

नेण्या कार्य तडीस ध्यास हृदयी; दुर्दम्य इच्छा असे

ना विश्राम असे तया क्षणभरी; शांती, सुखे जीवनी

प्रत्यक्षातचि स्वप्न ते उतरवे; थांबे न तो तोवरी ।। 247

                           तेंव्हा, हे राजा! हाती घेतलेलं काम तडीस नेल्यावर आता माझ्या मनाला पूर्ण शांतता लाभली आहे. मला राज्यावर संकटांची कुठलीही आशंका वाटत नाही. आता माझं मन पूर्ण शांत झालं आहे. माझं हृदय समाधानाने काठोकाठ भरलं आहे. आता मी तुझी रजा घेतो. हे वंशपरंपरागत आलेलं तुझं राज्य पूर्ण निष्कंटक झालं आहे. तुझ्या शत्रूंचा पूर्ण निःपात झाला आहे. तुझ्या प्रजेच्या पालनात कायम तत्पर राहून अचल छत्र चामर सिंहासन युक्त राज्यलक्ष्मी असलेल्या ह्या राज्याचा पुढच्या अनेक पिढ्या तुम्ही उपभोग घ्या.

 राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवणं हे राजाचं कर्तव्य आहे. राजा परचक्रापासून आपलं संरक्षण करेल असा प्रजेला राजाबद्दल विश्वास वाटायला हवा. आणि राजानेही प्रजेच्या विश्वासाला पात्र आहोत हे त्याच्या गुणांनी आणि कर्माने दाखवून द्यायला हवे. प्रजेला कष्ट होणार नाहीत ह्याकडे राजाचे लक्ष पाहिजे. प्रजा कायम सुखी समाधानी पाहिजे. राजा दुश्चरित्र, छंदिफंदी, नेभळट असेल, त्याची जर राज्यकारभारावर योग्य पकड नसेल तर अशा राजाचं राज्यावर बसणं म्हणजे बोकडाच्या हनुवटीला लटकणार्‍या वृथा स्तनासारखं ( अजागळाप्रमाणे) व्यर्थच म्हणावं लागेलं. ।।248

प्रजा न रञ्जयेद्यस्तु राजा रक्षादिभिर्गुणैः ।

अजागलस्तनस्येव तस्य राज्यं निर्थकम् ।। 248

जरी प्रजा-मनी राहे । असुरक्षित भावना

 दिलासा जनतेला जो । राजा देऊ शकेचि ना ।।

भयाच्या सावटाखाली । राजाची ज्या असे प्रजा

अजागला समा त्याच्या । राज्या ना अर्थ त्या जरा ।। 248

राजा स्वतः सद्गुणी पाहिजे तसा गुणग्राही आणि दोषज्ञही पाहिजे. दुसर्‍याच्या योग्य गुणांची त्याला पारख पाहिजे. लोकांचे दोषही त्याला वेळीच हेरता आले पाहिजेत. राजा व्यसनी नको. व्यसनात बुडालेला राजा राज्याची वाट लावतो. गुणांना प्रोत्साहन आणि अनिष्ट वृत्तींना वेळीच पायबंद राजाने घातला पाहिजे.

राजा गुणी, योग्य कर्मचार्‍यांमधे रुची घेणारा त्यांना योग्य तो आदर सन्मान/ मान देणारा, त्यांना प्रोत्साहन देणारा असावा. वेळीच दोषींना शिक्षा करण्यात दक्ष असावा. अशाच राजाला वरखाली हलणार्‍या चंचल चौरीचे वस्त्र परिधान केलेली आणि श्वेत छत्राचा सुंदर अलंकार धारण केलेली राज्यलक्ष्मी चिरकाल लाभते.

( वृत्त वंशस्थ, अक्षरे 12, गण- ज त ज र, यति- पाद )

गुणेषु रागो व्यसनेष्वनादरो,

रतिः सुभृत्येषु च यस्य भूपतेः ।

चिरं स भुङ्क्ते चलचमरांशुकां,

सितातपत्राभरणां नृपश्रियम् ।। 249

असोचि दोषज्ञ गुणज्ञ भूपती

जया भला दास विशेष आवडी

गुणांस प्रोत्साहन दे सदैवची

लगाम घालेचि अनिष्ट वृत्तिसी ।।

 

सदैव चौरी वरखालती हले

सुवस्त्र तेची परिधान जी करे

असे जिचे भूषण श्वेत छत्र ते

सुराज्य लक्ष्मी चिरकाळ त्या मिळे ।। 249

 

हे राजा,

मी इथला राजा आहे; मी काहीही करीन अशा मस्तीत कोणी राहू नये. ह्या उच्चपदासोबत येणारं वैभव, ऐश्वर्य, मान-मरातब पाहून, भुलून कोणी त्याच्या आहारी जाऊ नये. ही घमेंड तुम्हाला कुठल्या संकटाच्या खाईत लोटेल सांगवत नाही. उच्चपदासोबत चिकटलेला महिमा, येणारं वैभव, ऐश्वर्य, मान-मरातब, प्रतिष्ठा काही क्षणात होत्याची नव्हती होते.

बांबूवर कोणी चढू शकतो का? ज्या क्षणी कोणी चढेल त्या क्षणीच लवचिक बांबू वाकतो. वर चढलेल्याला खाली जमिनीवर आणतो, पाडतो. बांबूच्या झाडावर चढणं जितकं असाध्य, दुरारोह (दुर् + आ+ रुह् ) असतं. तितकीच ही प्रतिष्ठा मानमरातब आणि लक्ष्मी टिकून राहणं !

टोकावरीच बांबूच्या चढे तो ये धरेवरी

यशाच्या शिखरी तैसा स्थिर ना राहतो कुणी

 

कितीही शिकस्त केली तरी पारा हातात पकडणं, हातात धरून ठेवणं अशक्य, दुर्धर असतं. त्याप्रमाणे राज्यलक्ष्मीला रोखण्याचा, थांबवण्याचा, अडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी राज्यलक्ष्मी दुर्धर असते. तिला धरून ठेवता येत नाही. ती आपल्याकडे रहावी म्हणून तिची कितीही प्रार्थना केली, आराधना केली तरी ती हा हा म्हणता फरार होते. कारण ती गमनशीलच असते. वियोगाचं दारूण दुःख मात्र देऊन जाते.

मर्कटलीला करणार्‍या माकडाच्या मनात काय येईल आणि ते काय करेल हे सांगता येत नाही त्याप्रमाणे राज्यलक्ष्मी अत्यंत चंचल व अस्थिरबुद्धी असते. कमळाच्या किंवा आळवाच्या पानावर पडलेलं पाणी ज्याप्रमाणे पानाला जराही चिकटत नाही, जसं संपर्कहीन असतं त्याप्रमाणे हे क्षणैक ऐश्वर्य तुम्हाला स्पर्शही न करता ओघळून जातं. पाण्याचा थेंब मातीत पडून शोषला जावा त्याप्रमाणे मातीमोल होतं.

वारा कुठून कुठे जाईल हे थोडचं सांगता येत? वारा आणि वाळूची गाठ मारणं अशक्य! त्याप्रमाणे हे मोठेपण कायम गाठीला बांधून ठेवता येईल असं कोणी समजू नये. दुष्टांची संगत वा मैत्री जशी ऐन युद्धजन्य परिस्थितीत, अत्यंत गरजेच्या वेळेला वा महत्त्वाच्या क्षणी तुमचा घात करते, तुमचा समूळ नाश करते त्याप्रमाणे उच्च पदासोबत येणारा मोठेपणाचा अहंकार नेमका चारी बाजूंनी समस्यांनी घेरलेले असतांना तुमचा घात करतो. ``तुला माहित नाही का मी कोण आहे’’ असा मोठेपणाचा ज्वर सापाच्या विषासारखा असतो. त्यावर उपचार फार कठीण असतात. हा सगळा मानमरातब इतका क्षणभंगुर असतो की पाण्याचा बुडबुडा फुटावा इतक्या लवकर तुमचा भ्रमनिरास होतो. मी बलवान आहे म्हणता म्हणता क्षणात कॅन्सर वा करोनासारखा रोग एखाद्या पैलवानालाही काळाच्या पडद्याआड लोटतो त्याप्रमाणे हे मोठेपण मोठं कृतघ्न असतं. स्वप्नात लाभलेला खजिना डोळे उघडताच नाश पावतो त्याप्रमाणे हा हा म्हणता प्रतिष्ठा, मोठेपण लयाला जाते

हे राजा,

राजा म्हणून एकदा तुमची नियुक्ती जाहीर झाली की  परिस्थितीचा चहु बाजूंनी आढावा घेत सर्व बांजूंनी येणार्‍या संकटांचा विचार डोक्यात घोळवत ठेऊन त्यांना कसा पायबंद घालता येईल, कसं तोंड देता येईल, आपत्ती कशा दूर करता येतील ह्याचा आधी पासूनच आराखडा मनात तयार ठेवावा. सर्व लक्ष पुढे येणार्‍या व आपल्याला तोंड द्यायला लागेल अशा संभाव्य आणि असम्भाव्य अशा संकटांवर केंद्रीत करावं. कारण राज्याभिषेकाच्या वेळी कलशामधून जे ठिकठिकाणच्या नद्यांचं पवित्र जल राजाच्या शिरावर ओतलं जातं त्या पाण्यासोबतच त्या त्या जलासोबत आलेल्या त्या त्या भागातील अनेक विपत्ती, संकटं राजाच्या शिरावर बरसत असतात.  अशावेळेला मी तर आत्ताच राजा झालो आहे, मी नवीन आहे, अजून मला अनुभव नाही असं म्हणून चालत नाही. कोणती विपत्ती कधी आक्राळविक्राळ रूप धारण करेल हे सांगता येत नाही.

( वृत्त- इंद्रवज्रा , अक्षरे 11, गण त त ज ग ग )

यदैव राज्ये क्रियतेऽभिषेकस्तदैव बुद्धिर्व्यसनेषु योज्या ।

घट हि राज्ञामभिषेककाले सहाम्भसैवापदमुद्गिरन्ति ।। 250

 

राज्याभिषेकासमयीच माथी जलासवे वर्षति संकटेही

नाना उपायांसह सज्ज राही हे भूपते संकट-मोचनासी ।। 250

संकटांना कुठलच स्थान अगम्य नसतं. ती कुठेही कशीही चंचुप्रवश करू शकतात. कुठला माणूस वा विषय त्यांना वर्ज नसतो.

रामासारख्या एकवचनी अत्यंत सत्शील राजपुत्रालाही संकटांनी सोडलं नाही. त्याच्या राज्याभिषेकाच्या दिवशी डोक्यावर अभिषेकाचं पाणी पडण्यापूर्वीच त्याला वनात जावं लागलं. बळी सारख्या महाबलवान राजाला सुद्धा एका छोट्याशा बटुने स्वतःच्या नियंत्रणात आणून त्याचं दमन केलं. त्याला पाताळात जायला भाग पाडलं. पराक्रमी पांडुपुत्रांना इंद्रप्रस्थ गमावून वनात जायला लागलं. श्रीकृष्णाच्या सर्व वंशजांचा, वृष्णी कुळाचा नाश झाला. बाहुबली, अनेक विद्यासम्पन्न नल राजा बघता बघता द्यूतात हरला आणि सर्व राज्य घालवून बसला. पदच्युत झालेल्या नलराजाला त्याच्या अत्यंत लावण्यवती आणि पतिव्रता पत्नी दमयंतीसह रानोमाळ भटकत परागंदा व्हावं लागलं. कुठे सव्यसाची सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन ! पण त्याच्यावरही बृहन्नडा बनून नृत्य शिकवण्याची पाळी आली. ज्याच्या गर्जनेनी सारे राजे हादरून जात, ज्याने सर्व ग्रहांना आपल्या पायतळी तुडवले, तो दशनन रावणही हीन दीन होऊन रणांगणात अनाथासाखा मरण पावला. प्रत्येकाच्या कपाळी काळानी काय लिहीलं असेल हे सांगवत नाही. ज्याच्या ज्याच्या दैवात ज्या ज्या आपत्ती असतील त्या त्या  आपत्तींचा सामना त्याला एकट्यालाच करायला लागतो. आणि ती संकटं त्याला एकट्यालाच भोगायला लागतात.  त्याच्या मदतीला, त्याची संकट आपल्या माथी घेणारा कोणी पुढे येत नाही.  

 रामस्य व्रजनं बलेर्नियमनं पाण्डोः सुतानां वनं,

वृष्णीनां निधनं नलस्य नृपते राज्यात्परिभ्रंशनम् ।

नाट्याचार्यकमर्जुनस्य पतनं सञ्चिन्त्य लङ्केश्वरे,

सर्वं कालवशाज्जनोऽत्र सहते कः कः परित्रायते ।।251

 

रामाचा वनवास ना चुकतसे; पाताळ पाहे बळी

 वृष्णींचा घडतोच अस्त सकला; राहे न तो श्रीहरी

 राज्यभ्रष्टचि होतसे नल कसा, तो पार्थ नृत्या करी

नाट्याचार्य बनून नृत्य शिकवी, तो सव्यसाची तरी ।।

 

कैसा श्रेष्ठ बलाढ्य रावण रणी गेलाच मृत्यूमुखी

साम्राज्यासह सर्व सर्व मुकला; ना राहिला वंशही

भाळी जे लिहिलेच भाग्य जयिच्या त्यासी तशी संकटे

देई तोंडचि एकटा नच कुणी त्याच्या सवे हो लढे ।।

 

सार्‍या ह्या घटना करी कथन हो, जे जे नशीबी असे

 ते ते संकट झेलणे पडतसे  त्या एकट्यासी तसे ।।251

तो महान दशरथ राजा! सर्व देवांच्या राजाचा तो मित्र! अनेक युद्धांमधे त्याने देवेंद्राला मदत केली. इंद्राच्या सिंहासनावर इंद्रासोबत बसण्याएवढी त्याची मैत्री आणि थोरवी ---पण आज तो कुठे आहे? ज्या सगर राजाने असीम समुद्राच्या सीमा निश्चित केल्या तो सगर तरी कुठे वाचला? तो ही गेला. तळहातापासून तयार झालेल्या त्या महा पराक्रमी राजा वैन्याची नामोनिषाणी राहिली नाही. सूर्यपुत्र मनु! पण, एखादं कमळ उमलावं आणि मिटून जावं त्याप्रमाणे महाबळी काळाच्या स्पर्शाने त्यांना जागवलं, उठवलं आणि पुन्हा मिटवूनही टाकलं

( वृत्त- हरिणी, अक्षरे -17, गण- न स म र स ल ग, यति- 6, 4, 7 )

क्व स दशरथः स्वर्गे भूत्वा महेन्द्रसुहृद् गतः,

क्व स जलनिधेर्वेलां बद्ध्वा नृपः सगरस्तथा ।

क्व स करतलाज्जातो वैन्यः सूर्यतनुर्मनुः

ननु बलवता कालेनैते प्रबोध्य निमीलिताः ।। 252

 

असुनि नृपती, देवेंद्राला सहाय्यकरी सखा

दशरथ महाराजा गेला  धरेवरुनी कसा?

सगर-नृपती जो सिंधूला करेचि सुसीमिता

नच कळतसे कोठे गेला जगामधुनी कसा? ।।

 

अवचित कसा वैन्यानेही निरोप जगा दिला

असुनि मुलगा सूर्याचा त्या मनूहि नच राहिला

बघुनि घटना काळाहूनी दिसे कुणि ना बळी

उठवि मिटवी तोची सर्वा अखंड महाबळी ।।252

 

त्रैलोक्यावर विजय मिळवणारे सम्राट मान्धाता आज कुठे आहेत? भीष्म प्रतिज्ञा करून सत्यव्रत हे नाव सिद्ध करणारे गंगापुत्र पितामह भीष्म तरी कुठे आहेत? इंद्रपदावर आरूढ झालेले नृपति नहूष आज कसे दिसत नाहीत? महायोगिराज भगवान कृष्ण कुठे गेले? हे सर्व एकाहूनही एक बलवान, सरस नृपति, महान योद्धे, बलाढ्य चतुरंगसेनेचे आणि महान गजदळांचे सेनानी, इंद्रपदावर ज्यांनी आरूढ व्हावं अशी योग्यता असलेले हे नरशार्दूल काळानेच बनवले आणि काळानेच नष्टही केले.

 

मान्धाता क्व गतस्त्रिलोकविजयी राजा क्व सत्यव्रतो,

देवानां नृपतिर्गतः क्व नहुषः सत्छास्त्रवित्केशवः ।

मन्ये ते सरथाः सकुञ्जरवराः शक्रासनाध्यासिनः ,

कालेनैव महात्मना ननु कृताः कालेन निर्वासिताः ।। 253

 

मान्धाता अति शूर भूप सहजी त्रैलोक्य जिंके जरी

नाही आज हयात तो नृपति हो; पत्ता न पृथ्वीवरी

बोले सत्यचि नित्य सत्यव्रत जो; जो भीष्म नामे जगी

होता फार प्रसिद्ध थोर तरिही ना राहिला या जगी ।।

 

देवांचा नृपती नहूष जगती आहे कुठे ना कळे

तो योगीश्वर कृष्णही जगत हे सोडून गेला कुठे

आज्ञेनेच विशाल ती गजदळे धाकात ज्यांच्याचि ते

योद्धे थोर महारथीच अवघे इंद्रासमा साजिरे ।।253

 

तेची वीर शिरोमणी हि सगळे ना राहिले या जगी

त्यांचा तो बघुनी प्रवास सगळा उत्कर्ष वा नाश ची

मानावेचि मनास लागत असे काळापुढे ना कुणी

काळानेच तयांस हो घडविले वा नष्ट केले भुवी ।। 253

 

आणि अजुन ही बोलायचं झालं तर-

ज्यांच्या पराक्रमाच्या, ऐश्वर्याच्या चर्चा आजसुद्धा ऐकू येतात, असे अत्यंत कर्तृत्त्ववान ते एकसेएक पराक्रमी राजे, त्यांचे ते राजनीतीतज्ज्ञ,  राज्यकारभारप्रवीण मंत्री, त्यांच्या त्या लावण्यवती, चतुर स्त्रिया, त्यांनी निर्माण केलेली ती अत्यंत रमणीय वनं , त्या मनोहारी फुलबागा, त्या फळबागा कुठे गेल्या? त्यांची आज कुठे नामोनिशाणी तरी शिल्लक आहे का? कालौघात सर्व काही नष्ट होत आज त्याची फक्त स्मृती शिल्लक आहे. कालांतराने काळाच्या मुखात कधीच गेलेल्या , कालवश झालेल्या ह्या लोकांची ही स्मृतीही एक दिवस विरून जाईल.

स च नृपतिस्ते सचिवास्ता प्रमदास्तानि काननवनानि ।

स च ते च ताश्च तानि च कृतान्तदष्टानि नष्टानि ।। 254

तो राजा, ते मंत्री, त्या लावण्यवति, ती उद्याने

तो, ते, त्या, ती सारे गिळले कसेचि काळाने ।। 254

 

म्हणून, हे राजा! माजलेल्या हत्तीच्या सतत पुढे मागे हलणार्‍या कानांप्रमाणे  अत्यंत चंचल असलेली राज्यलक्ष्मी आपल्याला प्राप्त झाल्याचा जराही गर्व न करता, अत्यंत न्यायनिष्ठ राहून ह्या राज्याचा उपभोग घे आणि प्रजेचे कल्याण कर.

असे हे काकोलूकीयं नावाचे पंचतंत्रातील तिसरे तंत्र समाप्त झाले.

---------------------------------

236 - 254 = श्लोक 19

 

अ‍ॅ  र्‍या र्‍यां तॄ

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ ०

अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल

 ( ललल /गलल नको ) न आणि भ गण नको

ग ग ग । ल ल ग । ल ग ल । ल ल । ग ग ल । ग ग ल । ग

ल ल ल । ल ल ग । ग ग ग । ग ल ग । ल ल ग । ल ग

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -