सत्याची धार –

 

सत्याची धार

 

सर्वात धारदार शस्त्र कोणत? असं जर कोणी विचारलं तर मी म्हणेन की सत्याची नजर. सत्याची धार फार लखलखित असते. सत्याच्या नजरेला नजर देणं किती अवघड असतं हे मी अनेकवेळेला अनुभवलं आहे. गोष्टही तशीच होती.

आम्ही त्या बंगल्यात नव्याने रहायला जाण्यापूर्वी बंगला ठीकठाक आहे ना? म्हणून पहायला गेलो होतो. बंगला जुना असल्याने आणि अनेक वर्ष वापरल्यामुळे साफसफाई, रंगरंगोटी आवश्यक होती. त्यामुळे घर उघडतांना PWD चे Engineer आणि सफाई कामगार अशी काही मंडळी उभी असतांना त्या घोळक्याचा भाग म्हणून तीही तेथे उभी होती. तिची उगीचच लुडबुड आणि घर पहायची अनाठायी उत्सुकता मला पसंत नव्हती. दिसायला छान होती पण मला माझ्या घरात ती पसंत नव्हती. घराच्या दरवाजाचं कुलूप उघडून जरा फट किलकिली झाल्या झाल्या आमच्या सर्वांच्या पायातून पुढे जाऊन ती सर्वप्रथम घरात घुसली. श्शुक श्शुक करून सर्वांनी तिला घालवून द्यायचा प्रयत्न केले पण तिचे मोठ्ठे डोळे आमच्यावर रोखून तिने आधीच सांगितले, "प्राण्यांच्या नियमानुसार पहिला प्रवेश मी केलेला असल्याने हे घर माझं आहे." आम्ही जसे घराचं निरीक्षण करत होतो तसं तिनेही वर, खाली, छताकडे, कोपर्‍याकोपर्‍यात जाऊन निरीक्षण चालवलं होतं. मोकळ्या हवेसाठी सर्व दरवाजे खिडक्या उघडल्याने ती घराबाहेर जाणं तर शक्यच नव्हतं. आमच्या सोबत तीही घराचे माळेबिळे पाहून आली. एखाद्या गृहिणीप्रमाणे छपरापासून जमिनीपर्यंत घर, ओटा, कपाटं, मोर्‍या , पाण्याचे नळ निरीक्षण करणारी ती मांजर आता सर्वांनाच कुतुहलाचा विषय वाटू लागली होती.

``असू दे. एकदा घराचे दरवाजे खिडक्या जाळ्या लावून सुरक्षित झाले की ती जाईल अजून कुठे'' म्हणत मीही दुर्लक्ष केलं. सामान लागेपर्यंत मला दुर्लक्ष करणं भाग होतं. नंतर मात्र मी तिला बाहेर थोपवण्यात यशस्वी झाले. म्हणजे मला आपलं उगीच तसं वाटलं. सात आठ दिवस व्यवस्थित गेले. सात आठ दिवसांनी ती तिची डोळे उघडलेलं बाळ तोंडात धरून हजर झाली. मी ज्या खोलीत असे त्या खोलीच्या खिडकीत तिची धारदार नजर माझ्याकडे लावून ती बसून राही. `` तुला सत्य माहीत आहे ना? की पहिला गृहप्रवेश मी केला होता. माझ्यासोबत तुला रहायला मी नाही म्हणत नाही पण तू मला प्रवेश नाकारून योग्य करत नाहीस. '' मी काम करतांना सतत तिची माझ्यावर रोखलेली नजर मला अस्वस्थ करत राहे. पण मला तिच्या जाळ्यात अजिबात सापाडायचं नव्हतं. मधे काही दिवस परत ती गायब झाली आणि मी सुखाने कालक्रमणा करत एक दिवस बाहेरून सामान घेऊन आले. सामान दरवाजाशी टेकवून कुलुप उघडलं आणि तिरासारखं काहीतरी आत गेल्यासारखं वाटलं. पाहिलं तर एक पांढरा लोकरीचा गुंडा आत धावत होता. मी सामान आत घेईपर्यंत तीन लोकरीच्या गुंड्यांनी आत प्रवेश मिळवला होता. समोरच्या झाडाच्या फांदीवर बसून घशातून कसले कसले घोगरे आवाज काढत तिचं त्या तिघांना सूचना देणं चालू होत.

मी त्यांना बाहेर काढलं की ती माझ्याकडे असं काही बघत राहायची की मला ती चिनी तत्त्ववेत्ता कनफ्यूशियससारखी वाटे. त्याला राजाने त्याचे राजाविरुद्धचे विधान मागे घेण्यास सांगितले तेंव्हा तो म्हणाला, ``सत्य हे कायम एकच असतं. ते ह्यानी किंवा त्यानी सांगून बदलता येत नाही. अगदी राजाला पाहिजे म्हणून सुद्धा सत्य बदलत नाही. राजाची मर्जि राखण्यासाठी सत्य म्हणून बोलली गेलेली गोष्ट सत्य ठरत नाही. मी पहिला गृहप्रवेश केला होता. घर माझं आहे.'' थोड्याच दिवसात घरात जो कोणी दरवाजा उघडून आत येईल त्याच्या आधी पिलांनी आत घुसायचं अशी क्ऌप्ति तिने पिलांना शिकवली. "घर आपलं आहे. त्यांचं नाही. तुम्हाला न्याय मिळेल. मी मिळवून देईनच" ह्या कणखरपणे तिने पिलांना आणि यथावकाश स्वतःलाही घरात प्रवेश मिळवला.

आम्ही सुखाने एकत्र राहू खाऊ लागलो. मनीच्या निर्णयामुळे तिचं ऐकून मी पिलांसाठी एक माप दूधही वाढवलं. दीक्षित रोज फिरून आले की तासभर सर्व वृत्तपत्रे वाचतात ही वेळ तिने स्वतःच्या बाहेरच्या कामांसाठी ठेवली. जातांना ती घशातून विशिष्ट आवाज काढून पिलांना बोलावून दीक्षितांच्या मांडीवर व्यवस्थित बसवून जाई. त्यांना ढकलून बिकलून दिलं की तिचं समोर बसून एकटकं बघणं आणि बघत राहणं आणि बजावणं की, ``तुम्ही माझ्या घरात रहात आहात तो पर्यंत पिलांना सांभाळावं लागेल'' हे मान्य करावं लागे.

एकदा घरी आलेल्या पाहुण्यांना हे कापसाचे शुभ्र गोळे भारी आवडले. मी घेऊन जाऊ का एक पिल्लु? निळ्या डोळ्याचा पांढरा गोळा घ्यावा की हिरव्या डोळ्याचा जाड शेपटीचा पांढरा गोळा न्यावा ह्या त्याच्या कनफ्यूजनचा फायदा घेत मी दोन्ही गोळे पिशवीत घालून देऊन टाकले. मनी नाही तोवरच घेऊन जा म्हणून सांगितले.

थोड्यावेळाने घशातून नेहमी प्रमाणे गुरगुरण्याचा आवाज काढीत मनी आली आणि एकच पिल्लू धावत गेलेलं पाहून ती घराचा कोपरान् कोपरा शोधून आली. मी तिला दूध आणि तिचा आवडता मासा द्यायचा प्रयत्न केला.पण ती सरळ माझ्यासमोर येऊन बसली. मी माझ्या कामात खूप गर्क असल्याप्रमाणे तिच्याकडे दुर्लक्ष करत होते. पण ती माझ्यामागे चारी पायांवर आवरून सावरून शेपुट अंगाभोवती व्यवस्थित गुंडाळून बसली होती. काम करतांनाही तिची माझ्यावर रोखलेली नजर मला सहन होईना. `` अगं, तुझी बाळं सुरक्षित छान आहेत बर. '' मी तिला अंगावर हात फिरवून सांगायचा प्रयत्न केला. पण ती उठून दुसर्‍या कोपर्‍यात बसली. नजर मात्र हटवायला तयार नाही. शेवटी एक क्षण असा आला की तिच्याकडे बघतांना माझी नजर झुकली. ``चुकलं बाई. तुला विचारता तुझी बाळं दिली.'' माझी नजर झुकताच ती उठून बाहेर निघून गेली.

किती जरी ठरवलं तरी दर सहा महिन्यांनी माझ्यासमोर हा पेचप्रसंग असे. माझ्या पाठीमागे बसून माझ्याकडे एकटक बघणार्‍या त्या मनीच्या भेदक नजरेला मी नजर देऊ शकत नसे. ज्या क्षणी माझी नजर झुके त्याक्षणी ती तेथून निघून जाई.

माणसाचे आणि प्राण्यांचे नियम भले वेगवेगळे असतील त्यांचे लिखित करार नसतीलही पण नियम हे असतातच. ते पाळले नाही तर पश्चात्तापाची शिक्षा ठरलेली. तिच्या माझ्यावर रोखलेल्या जळजळीत डोळ्यांकडे बघायची मला क्षणभर तरी हिम्मत होत नसे. हीच माझ्या अपराधाची कबुली. ती माझ्याकडून घेतल्याशिवाय मनी हलत नसे.

*  🐈🐈🐈🐈🐈

*   -------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -