गंगा -

 

          गंगा-

               कुठल्याही नदीच्या काठावर अथवा पुलावर उभं राहून नदीचा तो कमनीय नीरदेह निरखत उभं राहणं अपार आनंदाची अनुभूती देणारं असतं. श्रीरंगाची तीन ठिकाणी लवलेली काया / त्रिभंगाकृती मूर्ती असो वा नदीचा वळणं वळणं घेत जाणारा (meandering) प्रवाह असो. नाकासमोर सरळ फक्त आपल्यापुरतं जीवन चालत राहणं हे त्या दोघांनाही मान्य.  दरवेळेला स्वतःची वाट वाकडी करून आपल्या आजूबाजूच्या निसर्गाची, पशु पक्ष्यांची, लोकांची अगदी किडामुंगीचीही दखल घेत, खुशाली विचारत,  त्यांची दुःख जाणून घेत, ती दूर करत, जास्तीत जास्त भूतमात्रांना सुखी समाधानी करत, आनंदी करत जाणारे त्यांचे जीवनप्रवाह पाहतांना ते स्वतःच परमानंदाच अखंड वाहणारे, कधीही आटणारे, अत्यंत निर्लेप स्त्रोत वा निर्झर आहेत असं वाटतं. दुसर्‍याला देण्याचा आनंद विलक्षण असतो. नाहीतर एवढा मोठा जलधी सागर बघा. केवढा हा पाण्याचा साठा! पण दुसर्‍याला दिला नाही की तो बेचव खारट होऊन जातो. त्याउलट जेंव्हा एखादा मेघ त्याच्यातीलच पाणी शुद्ध करून घेतो, ते दारोदारी वाटत जातो तेंव्हा ते जीवन होऊन जातं सर्वांचं. सारेजण मेघाची वाट बघतात. समुद्राची नाही.

                  दुसर्‍यांना आनंद वाटत फिरणार्‍या ह्या विभूतींचं आनंदानी बागडत जाणारं शैशव/लहानपण असो वा अचाट कार्य करून दाखवणारं तारुण्य असो वा  शांत धीरगंभीर प्रौढपण असो --- सगळं कसं फुल उमलत गेल्यासारखं अगदी सहज सुंदर--  `अखिलं मधुरम्असच असतं. त्यांनी टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे  डौलदार, सुंदर पदन्यास असतो. त्यांचं सारं सारं जीवन एक आनंदयात्राच असते. कपारीतून जाणारा गंगेचा प्रवाह जसा डमरुचा झंकार करत पुढे जातो त्याप्रमाणे त्यांनी घेतलेल्या प्रत्येक वळणावर मधुर संगीत झंकारत असतं. गंगेच्या बालपणापासून सुरू होणारी ही आनंदयात्रा पञ्झटिका सारख्या सुरेख नादमय वृत्तात गुंफत श्री जगद्गुरू शंकराचार्य म्हणतात,

ऐश्वर्यवती तू भगवति गंगे  अमरपुरीची तू सुरनदी गे

फुलविसि तूचि त्रिभुवन सारे  जीवन देत फिरे तव जल हे

अवखळ लहरी शुभ्र अती गे  शंभुजटांतुन खेळति अमले

तव पद-कमलि मम मन राहे  विनती हीच तुला मम माते।।1

 

 कधी ह्या बाल गंगेचं अवखळपण, तिचं पित्याच्या मांडीवर/ हिमालयाच्या अंगाखांद्यांवर बागडणं बघता बघता आपणही त्यात रंगून जातो.   दगड गोट्यांवरून तिचं खळाळत जाणं, हिमालयाच्या कडेखांद्यावरून उड्या मारत धावणं सर्वच मनोरम असतं. खेळणारी ही सलील-बालिका कौतुकाने बघतांना सगळ्याचा विसर पडतो.

 

प्रकट होसी तु शुभ्र हिमातुन। हरिचरणांना करीसी निर्मळ

कर्पूरगौरा  धवल हिमासम   चंद्रासम तव तरंग उज्ज्वल

सर्वांगावरी तुषार उधळित  मुक्त विहरते मंदाकिनी  जल

थुई थुई नाचे कटिखांद्यावर। हिमालयाच्या जल तव निर्मल ।।3

 

या रूपगर्विता वसुंधरेच्या। कंठातिल तू मोत्यांचा सर

मूर्तिमंत वैराग्य तुझे जल। अनघा अमला पापरहित गं

 

तर तारुण्यातील तिच्या कर्तृत्त्वावर नजर ठरणार नाही इतकं ते नेत्रदीपक आहे. तिने सुपीक, समृद्ध केलेला परिसर पाहतांना नजर ठरत नाही.

 

पतित-पावना हे जननी मम। परोपकारास्तव तव जीवन

जलधारांनी फोडुनि गिरिवर। हिमालया तु घडविसी सुंदर

धन्य धन्य हे तव जल-जीवन  दैन्य दुःख तु करिसि निवारण।।5

 

अवखळ बालिका एका चंचल युवतीत बदलते.  तिला नापसंत असलेला युवक जर तिला मागणी घालायला पुढे आला तर तिच्या मनातील नापसंती, कृतक कोप, नाराजीही  ती प्रकट करते.  ----- पण!  तिचा हवा असलेला जोडीदार समोर दिसताच ती गंभीरही होते. त्याचप्रमाणे तारुण्यात प्रवेश करणार्‍या अवखळ चंचल युवतीप्रमाणे भासणारी ही जललता सागराला पाहून शांत गंभीर होतांना दिसते.

 

पसंतीस आला  युवक तर। कोप कृतक करी नेत्रां चंचल

तव लहरी या तशाच अवखळ। सागर दिसता होती सुस्थिर।।6

 

दुसर्‍यांच्या दुःखाने द्रवणारी ही द्रवमय कन्या साक्षात अलकापुरीचे भाग्य आहे. मोक्षाच्या नगरीची सारी प्रसन्नता आहे.

 

कुबेरकृत अलकापुरीचे या  सौख्य भाग्य मांगल्य तुझे जल

मोक्षनगरीची प्रसन्नता नित। तूच असशी हे करुणासागर

 

हे त्रिभुवनस्वामिनी! हे पुण्यश्लोक  मुनिकन्ये!  हे जलमय सुंदर अशा सुरनदी, तुझी किती स्तुती करावी तेवढी कमीच आहे. मला धन नको. मला राज्य नको. मला उच्च कुळात जन्मदेखील नको. पण माते तुझा वियोग मला कधी न घडो.  तुझ्या तीरावर काहीही बनून राहणे मला मान्य आहे. पण तुझ्याविना मला महासाम्राज्यही तुच्छ आहे.

 

बरे राहणे तुझ्या तिरी ग। होऊन मासा अथवा कासव

होईन दुबळा सरडा मी   अथवा दीन भिकारी ही 

नको नको ते राज्य मला   उच्च कुळी वा जन्म नको 

असह्य मज तव वियोग माते  तुझ्या विना हे नाही जीवन ।।11

 

हे माय! माझी मती कायम तुझ्या चरणांवरच राहू दे.

 

देवि सुरेश्वरि भगवति गङ्गे त्रिभुवनतारिणि तरलतरङ्गे 

शङ्करमौलिविहारिणि विमले मम मतिरास्तां तव पदकमले ।।1

 

#लेखणीअरुंधतीची-

 ----------------------------------

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -