अन्तर्यात्रा -

 

अन्तर्यात्रा -

मला स्त्रियांच्या सम्मेलनांना जायला खूप आवडतं. तिथलं उत्साही वातावरण, नवीन झुळझुळीत साड्या, गजर्‍यांचे सुवास, सेंटस् चा दरवळ ह्या पलिकडे त्यांच्या अखंड गप्पांमधे मला तीन वाक्य फार अनमोल वाटतात.

एऽऽ! तुला माहितिए?” ------

एऽऽऽ! काय झाल गं?” ------

अगं काय सांगु तुला ------

मला वाटतं ही तीन वाक्य स्त्रियांची खूप टेन्शन्स कमी करतात.

पुरुषही ही तीन वाक्य बोलतात पण त्याचा टोन खूप वेगळा असतो.

ऐऽऽऽ तुला माहित नाही का मी कोण आहे?”

हॅ हॅ हॅ काय झाल? तरी मी सांगत होतो ----

तिसरं वाक्य त्यांच्या तोंडून कधी निघत नाही. कोपर्‍यावर एकटं उभं राहून सिगारेटच्या धुरांच्या वलयात ती व्यथा लपवली जाते किंवा शेवटी एकच प्यालात ती बुडवली जाते.

स्त्रियांचं तसं होत नाही. घरी तिला कुठलं स्थान आहे हे तिला माहित असतं. अजून ती चिकित्सा करत नाही. पण ही जी एकमेकीत गुजगोष्टी करण्याची क्रिया आहे ती मला खूप टेन्शन घेण्यासाठी तयार केल्या जाणार्‍या लोखंडासारखी वाटते. लोखंडावर ताण दिला जातो. हळु हळु काढला जातो. परत ताण देतांना ते लोखंड थोडा जास्त ताण सहन करू शकतं. परत तो ताण आस्ते आस्ते काढला जातो. अशा प्रकारे त्या लोखंडामध्ये ताण सहन करूनही तुटण्याची एक स्प्रिंग अ‍ॅक्शन तयार होते. त्याप्रमाणे स्त्री असंख्य ताण तणावांना तोंड देत राहते. पुरूषही मोठा ताण तणाव सहन करतात पण ते मोडून पडायची शक्यता जास्त असते. कारण ताण काढून टाकणं हे स्त्री इतकं लीलया त्यांना जमत नाही.

मी जेंव्हा माझ्या नातवंडांना भेटते किंवा फोनवर बोलते तेंव्हाही नातू म्हणतो, ``आऽऽज्जी ! तुला माहितए का?---’’ आणि मीही नाही रे मला तर काहीच माहित नाही म्हणून त्याच्या फुललेल्या अहंकाराचा आश्चर्याने अनुभव घे असते. तेच नात फोनवर बोलायला आली की `` आऽऽज्जी तुला सांगु का?’’ --- मी ही ``काय पिलु?’’ म्हणून तिचं ऐकून घ्यायचं काम करते.

मझी अमेरीकेतील 72 वर्षांची मैत्रिण मला जेंव्हा म्हणाली, ``Arundhati! Do you know?’’ म्हटल्यावर मी आश्चर्याने ``काय झालं गं?’’ विचारताच आमच्याकडेही स्त्रियांना कशी दुय्यम वागणुक मिळते, नोकरीत पुरुषांना प्राधान्य मिळतं कारणं त्यांच्यावर परिवार अवलंबून असतो.’’ . . ती खूप सांगत राहिली. मी ऐकत राहिले. तर पंचविशीच्या ब्राझिलियन मुलीनी  ``अगं काय सांगु तुला’’ हया स्टाईलमधे तिची सासू येणार असल्याची खबर दिली. आता पुढचे काही दिवस माझा नवरा कसा आनंदात आणि मी कशी दुःखात हे ऐकतांना मला भारतात आहोत असं वाटलं.

एकंदर ही तीन वाक्य सगळ्या खंडातील आणि सगळ्या वयाच्या स्त्रियांना जोडणारी वाटतात. सगळे समुद्र कसे जोडले गेले आहेत तशी सार्‍या स्त्रियांना जोडणारी ही वाक्य वाटतात. सगळे समुद्र जोडले गेलेले असल्याने  कायम एका पातळीत राहतात. समुद्रसपाटी किंवा झिरो सपाटी पासून उंच्या मोजतात ना तसं! म्हणजे सार्‍या स्त्रिया कायम एका पातळीवर एकत्र येऊ शकतात.  त्यामुळेच समुद्राप्रमाणे अनेक भूभागांना, अनेक घरांना अनेक माणसांना एकत्र जोडून ठेऊ शकतात. एकत्र येऊन सहजपणे एखादं काम कुठलाच अभिनिवेश आणता करू शकतात.

समुद्र नाही असं जर गृहीत धरलं तर ह्या भूभागांना  दूर करणार्‍या  मरिना ट्रेंच सारख्या खायाच उरतील.  एक अशक्य जीवन समोर उरेल.

पुरूषांचा अहंकार इगो त्यांना ह्या पर्वतांसारखं कोणाला लहान मोठं बनवत राहतो. पुरुषांमधे एक राम असेल तर दुसरा हनुमान किंवा हात जोडून उभा लक्ष्मणच असतो. कृष्ण बलरामाच्या जोडीतही वारंवार खटके उडून बलराम अनेक वेळेला दूर दूर निघून गेला आहे. ( मी पुरुषांविरुद्ध विधान करत नाही. त्याच्यातही सर्वांना बरोबर घेऊन काम करायचा गुण असतोच पण स्त्रीकडे तो नैसर्गिक असतो. त्याच प्रमाणे भांडकुदळ स्त्रिया नसतात असेही नाही. तो अनेक अनैसर्गिक कारणांमुळे वाढीस लागलेला दोष असतो.)

 

त्यामुळे स्त्रियांचा हा खूप महत्त्वाचा आणि मोठा घटक/गुण आहे. स्त्रिया एकत्र येऊन एखादा उद्योग अत्यंत यशस्वीपणे करू शकतात. सासुरवाडीला गेलेला पुरुष छान निवांत गार वारं, झुळका येतील अशी जागा शोधून शांत झोपी जातो.  स्त्री कोणाकडेही गेली की दोन स्त्रिया एकत्र येऊन लगेच ``तुला सांगु का?’’ नी सुरवात होते.

अणुची रचनेमधे प्रोटॉन मधे असतो तर काही अंतरावर इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. त्यांच्यामधे असलेली पोकळी काढून टाकली तर अणुला अस्तित्त्व राहणार नाही. प्रत्येक नात्यात ठराविक अंतर ठेवायचं काम बाई सहजपणे तिचं अस्तित्त्व जाणवून देता करत असते. त्याचा फार बभ्रा करायचीही जरुर नाही. पण  ते अस्तित्वहीन असणं प्रत्येकाच्या अस्तित्वाचं गमक असतं.

-----------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -