नेतापर विश्वास अटल हो!

 

नेतापर विश्वास अटल हो!👏👏

विक्षिप्त लोकांचं पुणं, चमत्कारीक पाट्यांचं पुणं ही सर्वांना असलेली पुण्याची ओळख जुनीच आहे. एक पुणं असंही होतं जिथे नामवंतांची व्याख्यानं, वसंत व्याख्यान-मालांसारख्या असंख्य दर्जेदार व्याख्यानमाला अत्यंत आखीव रेखीवपणे आयोजित केल्या जात. सवाईगंधर्व सारख्या गायन, वादन, नृत्य मैफिली मोठ्या रसिकपणे ऐकल्या जात. .. पुरंदरे उत्साहाने महिनाभर रोज रात्री दोन दोन तास राजा शिव छत्रपतींबद्दल बोलतांना थकत नव्हते तर प्रा. शिवाजीराव भोसल्यांचा महिनाभर चाललेला रामकृष्ण परमहंस किंवा विवेकानंद या विषयांवरचा वाग् यज्ञ विना श्रोते विझत नव्हता. येणारे हजारो पुणेकर बरोबर छोटी आसनं/बस्कर घेऊन येत असत. रस्ता झाडून साफ असे. आपापल्या सतरंजी किंवा आसनावर मांडी घालून खाली बसावे लागे.

व्यासपीठावर उभा असलेला वक्ता हृदयापासून बोलत राहे आणि श्रोते तल्लीन होऊन ऐकत राहात. व्यासपीठावरचा वक्ता विठ्ठल असे तर श्रोते वारकरी. ह्या विठ्ठल आणि वारकर्‍यांमधे जातीयतेचा साप सोडायचं पाप मनात आणण्याइतका कोणाच्या बुद्धीवर किटाळांचा राप चढलेला नव्हता. किंबहुना समाजाचा एवढा धाक होता की धर्माचा छाप मारून ताप द्यायचीही कोणाची टाप नव्हती.

बिजलीसारखी कडाडणारी इंदिराजी असो वा आपल्या अमोघ वक्तृत्वाने मंत्रमुग्ध करणारे अटलजी असो. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे असो, बाळासाहेब ठाकरे असो वा जगन्नाथराव जोशी! शनिवारवाड्यासमोरील पटांगण असो, भावेस्कूल, हिराबाग वा रमणबागेचं मैदान असो वा .. कॉलेजच भव्य मैदान. पाऊले चालती पंढरीची वाट त्याप्रमाणे सारे पुणेकर आवर्जून सार्‍या सभांना उपस्थिती लावत. ह्या सर्वांची भाषण ऐकता ऐकता आम्ही घडत गेलो.

अटलजींचं भाषण ऐकण हा एक अमृतानुभव असे. त्यांचं सारं सारं पारदर्शक व्यक्तिमत्व त्यांच्या भाषणातून साकार होत असे. ते नुसते तोंडाने बोलत नसत तर काया, वाचा मनाने साकार होणारी त्यांची देहबोली मोठी लोभस असे. विचारांचा खरेपणा, कृतीची सकरात्मकता शब्दातून ठायी ठायी प्रकट होत असे. जलधारांची बरसात व्हावी तसे शब्द बरसत राहात. श्रोत्यांची मन त्या आनंदात चिंब भिजून जात.

धबधब्यासारखे कोसळणारे शब्द अचानक एक दीर्घ विराम घेत. शब्दांचा असा अधांतरी राहिलेला धबधबा `आता काय', `पुढे काय' म्हणून श्रोत्यांची उत्सुकता ताणून धरे. आकाशातून अवतरलेल्या गंगेंचा धुवाँधार प्रवाह शंकराच्या जटेत थोडा विराम घेऊन मग त्याच्या अंगाखांद्यांवरून उड्या मारत, नर्तन करत, गोल-गोल गिरक्या घेत, त्याला प्रदक्षिणा घालत खाली उतरावा तसा अटलजींचा थबकलेला अमल, विमल शब्दांचा प्रवाह अचानक गोल-गोल गिरक्या, मुरक्या घेत श्रोत्यांच्या मनःपटलावर आनंदाचे तुषार उधळत, भिजत भिजवत श्रोत्यांच्या मनात उतरत असे.

फुलमार्केटच्या बाहेर फुटावर गजरा विकणार्‍या स्त्रीला तिच्या टोपलीतील नीट गुंडाळून ढिगासारखा ठेवलेला गजरा `आहे तरी कसा दाखव बर' म्हणावं, आणि तिने मोगरा, मरवा, अबोलीचा ताजा ताजा गजरा उलगडत जावं तसा, शब्दांचा धुवाँधार बरसत असतांना अचानक अटलजींच्या मुखातून कवितांच्या ओळींच्या लगडीच्या लगडी उलगडत जात. त्यांच्या शब्दांना रंग, रूप, वास, स्वाद आणि कोमल स्पर्शही आहे असं भासत राहे. त्यांच्या शब्दांच्या कोमलपणाला कमळाच्या कळीसारखा एक भेदकपणा असे. हातांना मऊ मुलायम वाटणारी कमळकळी चिखल, पाणी भेदून वरती यावी तसे सार्‍या श्रोत्यांच्या हृदयांना भेदून त्यांचे शब्द उमटत असत.

अत्यंत हजरजबाबी असलेल्या अटलजींना एकदा एका वार्ताहाराने एक खोडसाळ प्रश्न विचारला, `अटलजी तुमचा कमकुवतपणा weak point काय? त्यावर ते उत्तरले, `` मी कोणाच्या कमरेखाली वार करत नाही. माझा हाच कमकुवतपणा-- माझा हा weak point हीच माझी खरी ताकद strength ही आहे. ''

तर एकदा त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या गळ्यात सुवासिक फुलांचा हार घातला. त्यांनी तो लगेचच काढून ठेवला. त्यांच्या आधी बोलणार्‍या वक्त्याने गळ्यात हार तसाच ठेवला. आपला रसिकपणा दाखवत तो म्हणाला, ``काही लोक इतका सुंदर हार गळ्यात साप घातल्यासारखा काढून टाकतात. ''

अटलजी बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, `` फुलं अत्यंत पवित्र, निर्मळ असतात. त्यांच्या पावित्र्याचा भार फक्त दोघेच सहन करू शकतात. एकतर पाषाणाची देवाची मूर्ती किंवा पाषाणवत् कलेवर! किंबहुना देवाची मूर्ती त्यासाठीच पाषाणाची बनवलेली असते."

 

दिल्लीला  अटलजींचं भाषण ऐकायची दोनदा संधी मिळाली.   दिल्लीला श्री दीक्षितांना दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण असे आम्ही एकही स्वातंत्र्यदिन चुकवत नसू.  त्या काळात अनेक पंतप्रधानांची भाषणं ऐकायला मिळाली. आमच्या सुदैवानी तेव्हा अटलजी पंतप्रधान होते. समोर बसून अटलजींना अनुभवणं ही एक मेजवानी असे. त्यांचं भाषण ऐकायला जेवढं गोड तेवढच बघायलाही  मोठं आनंददायी असे. स्फुर्तीदायक असे.

एकदा दिल्लीला India International Centre मधे त्यांच्या कवितांचा कार्यक्रम होता म्हणून अनेक वर्षांनंतर मी गेले होते. जागा मिळावी म्हणून थोडी लवकरच पोहोचले. हॉल रिकामाच होता. काही वेळाने हॉलचा दरवाजा उघडला म्हणून पाहिलं तर अटलजी. त्यांच्या स्वागताला नेमलेली मंडळीही पोचली नव्हती. मनमोकळेपणाने हसत मला नमस्कार करून माझ्या पुढच्या खुर्चीवर बसत अटलजी म्हणाले, ``चला माझ्या कार्यक्रमाला एक तरी श्रोता आहे ह्याचा मला आनंद आहे.'' ``नाही नाही अटलजी आपण दोघेही खूप लवकर आलो आहोत. थोड्यावेळात प्रचंड गर्दी होईल आणि बसायलाही जागा मिळणार नाही. म्हणूनच मी लवकर आले.'' नंतर श्रोत्यांनी सभागृह ओसंडून वाहात होतं हे सांगायलाच नको. कायम वेळेआधी पोचायच्या सवयीमुळे अटलजींची झालेली ती भेट माझ्या कायम स्मरणात राहील.

जणू काही त्यांच्या जीवनाचंच प्रतिक असलेल्या बहुधा त्यांच्याच कवितेच्या ओळी माझ्या मनात तरळत आहेत -

प्रश्न हो कब तक पथ चलना, प्रश्न हो कब तक यूँ जलना

प्रश्न हो क्यों अणु-अणु गलना,

तन मन का कर पूर्ण समर्पण, आदेशोंकी साध प्रबल हो॥

नेता पर विश्वास अटल हो!

------------------------------------------

#लेखणीअरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती