एका झावळीदार झाडाचं बाळंतपण

 

एका झावळीदार झाडाचं बाळंतपण

कुठल्याही नवीन जागी रहायला गेलो की आम्ही थोडेफार व्यायामप्रकार करण्यासाठी जागा शोधतो. ह्या नवीन सोसायटीतही एक छोटीशी बाग आम्ही निवडली. शेजारी एक पाम सारखा झावळीदार तरु एका पायावर आनंदे उभा! काही दिवसात मला त्याची आणि त्याला माझी सवय झाली असावी. तोही आमच्या सोबत ताडासन, वृक्षासन करत, झावळ्या हलवत बटरफ्लाय सारख्या कृती आनंदाने करत आम्हाला साथ देत असावा. रोज आम्हीही त्याचं वार्‍यासोबत अंग घुसळणं, उगीच थरथरणं अनुभवत असू. दिसामाशी त्याच्या बुंध्यांचा वाढता गोलावा  थोडासा जाणावायला लागला. लहान मुलाचे कपडे घट्ट होऊन अचानक टरकावेत तसं त्याचं झाडाला गोल गुंडाळलेलं पान अचानक मधेच टरकलेलं पाहून हसूही आलं. हल्लीच्या फाटक्या जीन्स घालणार्‍या तरुणाईत तेही सामील झालं. काही दिवसात मधेच फाटलेली त्याची सर्वात खालची फांदी थोडी पिवळी पडल्यासारखी वाटली आणि दुसर्‍या दिवशी झाडापासून सुटत सुटत झाडावर तिच्या अस्तित्त्वाची गोलाकार निशाणी सोडून अचानक खाली गळून पडली. फांदी गळून पडली तिथे फादीच्या आतल्या बाजूला आता नागोबाच्या फण्याच्या आकाराची खुंटी दिसू लागली. झाडाचा हा अवयव मला नवीनच होता. नागोबाचा फणावाला हा कोंब असावा काय? --- काही कळत नव्हतं. फांदी फुटणारा कोंब तर नक्कीच नाही. कळेल कधीतरी पण  वा ! आत्तातरी छान आहे ही खुंटी पिशवी अडकवायला. घराची किल्ली, फोन खिशात ठेवण्यापेक्षा उद्या पिशवीत घालून आणू या. ह्या नागोबाच्या फणा खुंटीवर टांगता येईल. दुसर्‍या दिवशी नागोबाच्या खुंटीला मी पिशवी अडकवायच्या आधीच कोळ्यानी त्याचं अद्ययावत सुंदर घर खुंटीला बांधलं होतं. प्रकाशाच्या तिरीपीत चमकत होतं. शेजारून मुंग्यांची रांग झाडावर वरखाली करत होती.

कधी मधी त्या खुंटीवरील एक आवरण गळून पडे.   त्या खुंटीचे प्रयोजन अजून कळलं नव्हतं. वर्षभरात अजून चारएक फांद्या पडून फांदी पडली की त्याच्याखाली अशीच खुंटी तयार असे. अचानक दिड वर्षांनी ही खुंटी एकदमच वाढायला लागली. खूप उंच वाढली. पाऊस सुरू झाला आणि आमचंही बागेत जाण जरा कमी झालं. एक दिवस पाऊस नाही म्हणून बाहेर फिरत असतांना अचानक झाडाकडे लक्ष गेलं. त्या भल्या मोठ्या उंच वाढलेल्या कोंबाचं आवरण गळून पडलं होतं. आणि नवजात अर्भकाची केवड्याच्या कणसातील आतल्या पानासारखी तजेलदार कांती घेऊन एक हसरा पुष्पगुच्छबाळ आईच्या कडेवर विराजमान झाला होता. हे पाहतांना  ‘‘राम जन्मला गं सखे राम जन्मला!’’ असा मलाच कोण आनंद झाला. त्याच्या वाढीचे सर्व टप्पे  तुमच्यासाठी ठेवत आहे. 4 ऑक्टोबर 2021 ते 7 जुलै 2023.

 









 













------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-











Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -