पेन्ग्विन

 

27 ऑगस्ट 2018

पेन्ग्विन🐧🐧🐧 -

गेल्याच आठवड्यात मी प्रेस्टिजची नवी अॅटोमॅटिक गॅस शेगडी घेतली. माझ्या LG च्या डबल डोअर ब्लॅक granite door फ्रिजला आणि kitchen platform च्या sparkle Black granite ला एकदम मॅचिंग!

तिच्याकडे कौतुकाने बघत मी फ्रिजमधून कालची राहिलेली पावभाजी, मटार उसळ, वरण, भाताच्या वाट्या, छोटे डबे काढत असतांनाच कोणीतरी बोलत असल्याचा भास झाला, ``ए पेन्ग्विन!''😉🐧 इकडे तिकडे पाहिलं तर कोणीच नाही. असेल कसला तरी भास झाला असेल म्हणत सर्व डबे फुडप्रोसेसरमधे रिकामे करून त्यात थोडं डाळीच पीठ, थोडी कणीक, थोड ज्वारीच पीठ घालून छान मऊ मळून घेतलं. मस्तपैकी आज मी पराठे करणार होते. गोळाही जरा जास्तच मोठा झाला होता. ‘‘आज पराठा डे होणार तर! ’’ म्हणत गॅस ऑन करायला गेले तर चक्क नवीन गॅसची शेगडी तिचे दोन्ही डोळे रोखून आणि तिसरा मिचकावत म्हणाली, ``ए पेन्ग्विन!''

 🐧``पेन्ग्विन?--- कोण मी? तुला माझं नाव माहित नाही का?  बरोबर! नवीन आहेस नं तू! पण काही हरकत नाही मला आवडलं हे नवीन नाव. राणीच्या बागेतही आणले आहेत पेन्ग्विन. त्यांचं लुटुलुटु एकदा ह्या एकदा त्या पायावर डुलत चालणं भारी गोड दिसतं.’’

 ‘‘त्या बागेत ज्याला तिकीट लावून बघायला जातात म्हणतेस, तो नाही म्हणत मी.......तर त्या बागेत कोपर्‍या कोपार्‍यात बसलेला, फुटपाथवर ठिकठिकाणी बसलेला असतो ना-- तो!!! त्याची बहीण आहेस तू!

 ``शीऽऽऽऽ! तो? माझा खाऊ मला द्या म्हणणारा?'' कचराकुंडी पेन्ग्विन? 😳😈 -- रागाने मी!

``ख्यॅक्! ख्यॅक्!!''😝😝 ती हसली.

 तू `ती' शेगडी आहेस. स्त्रीलिंगी! स्त्रियांच्या जातीला असं ख्यॅक् करून हसणं बर दिसत नाही. मी खोचकपणे ! आणि मी का बर गं कचराकुंडी पेन्ग्विन?

आज सगळा फ्रिजमधला कचरा तू तुझ्या पोटात टाकणार आहेस ना म्हणून! म्हणून म्हटलं मी तुला पेन्ग्विन! तुझा डब्बल डोअर फ्रिज आणि त्यातील शिळवण---- किती दिवसांपूर्वीचं आहे ह्याचा तुलाही पत्ता नाही.

वा गं वा! ``हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली--- त्यातलं उरलं थोडसस पीठ त्याचं केलं थालपीठ! किती छान गाणं आहे!! उरलेल्या बिघडु गोड जिलबीला तिखट थालिपीठामधे बदलवणार्‍या पूर्वजांच्या परंपरा जपत आज कचराची स्वीट, कामा हलवाई, फिकानेर स्वीटस् अमुक स्वीटवाला, तमुकवाला इत्यादि आणि ------ तमाम- हाटेलांची सक्सेसफुल सुरवात झाली हे कोणी सांगायला नको. फाफडा बिघडला की जिलबी, जिलबी बिघडली की फाफडा! पण टाकून दिलं नाही त्यांनी कुठलं उरलेलं पीठ बीठ काही. आजसुद्धा आमचे बंगाली बंधू बंगाली मिठायांच्या दुकानात उरीव मिठायांचं सतत रिसायक्लिंग करत असतात आणि रोज जुन्यातून नवनव्या लुसलुशीत मिठाया नव्याने जन्म घेत असतात. TV चॅनेलवरही उरलेल्या भात, वरण, भाज्या ह्याच्या रिसायक्लिंग रेसिप्या नामवंत शेफ महाराज दाखवत असतात. ---- मी.

अन्न वाया तर अजिबात घालवू नये. पण आमचे पतिदेव कसचे काय!-----ते तर एक घास जास्त खात नाहीत. म्हणे, `मी उरलेल्या शिळवणाचे पराठे पोटात कोंबणार नाही.' म्हणून मोकळे! शेवटी मला मेलीला एकटीलाच सर्व निस्तारत रहावं लागतं. शेवटी परंपरा बर! बिचार्‍या शेतकर्‍याला एक एक दाणा उगवण्यासाठी कित्ती कष्ट कित्ती कष्ट सोसावे लागतात. आणि आपण अशी उधळ माधळ करवी. छे छे ते माझ्या रक्तातच नाही. आता बघ हे पराठे दिवसभर मला संपवायला लागणार. उरले तर उद्याच्या चहाबरोबर मस्तच! ''

परत ``ख्यॅक्! 😝😝--- ते एका दिवसात रस्त्यावर ओतून देतात टँकरच्या टँकर दूध!, ट्रकच्या ट्रक टोमॅटो, पपया, बटाटे, कांदे. तेवढं अन्न तू एकटी खा खा खाऊन वाचेल?''

``ते मला माहित नाही.😳 आई कायम सांगायची अन्न टाकणं म्हणजे अन्नाचा अपमान आहे. आज नशीबानं मिळत आहे त्याचा असा अपमान करू नका.''

माझं वाक्य अर्ध्यातच तोडत ती म्हणाली,- बरोबरच आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच अन्न बनवा आणि घ्या. पानात टाकून द्यायला घेऊ नका असा तिचा उद्देश्श होता. ``आणि बाबा म्हणायचा , `खाऊन माजा टाकून माजू नका लेको!' -- हो ना?'' परत तिचं ख्यॅक्! 😝😝``आई बाबा म्हणायचे म्हणून नाही तर तुलाच असलं कदान्न आवडतं म्हणून तू खातेस. आजच्या पराठ्यांमधे आठवड्यापूर्वीची भाजी घातलीस पण कालची भेंडी आणि कारल्याची भाजी कचर्‍यात टाकून देतांना तुझा जीव नाही तिळ तिळ तुटला तो शेतकर्‍यासाठीही! अजून तेल, अजून मसाले, अजून तूप अजून साखरा घालून. सोईस्करपणे स्वतःला आवडणार्‍या गोष्टींवर आईबाबांच्या सम्मतीची आणि आदेशाच्या शिक्क्याची खोटी मोहोर कशाला?

``आई बाबा अजूनही बरच काही काही म्हणायचे ते नाही आठवत तुला?

ज्या अन्नावरून रात्र गेली आहे( यात यामम्) शिळे (गत रसम्) असं अन्न खाऊ नये हे प्रत्यक्ष वेदवचन मात्र तुला आपलं वाटत नाही. आपण म्हणजे किती काटकसरी अशी स्वतःची पाठ थोपटण्यापुरतं हे ढोंग आहे. बाहेर गेलीस की तुझा काटकसरीपणा घरात कुलुप घलून बंद करून जातेस. ज्या अन्नावर घरखर्चातला सर्वात छोटा भाग खर्च होतो तेथे तुझा काटकसरीपणा, व्यवस्थितपणा ओतू जातोय 

हल्ली तुझी लाडकी लेक म्हणते, मॉम, सगळ्या झिरझिरीत साड्यांमधून टायर्स ओसंडून वाहतांना दिसतात तुझी. असल्या साड्या आता तुला शोभत नाहीत. परवाला तर शेजारची भोचक एवढीशी चिमुरडी म्हणाली, `आंटी, ह्या साडीत एवढे थोरले दागिने घालून तुम्ही पेनग्विन सारख्या डाव्या उजव्या पायावर रेलत चालायला लागला की फारच फनी दिसता'. तिचे बनी सारखे पुढचे फारोळे दोन दात तिच्या घशात घालावेसे वाटत होते तुला. डॉक्टरही सांगताएत, `अहो वजन केवढं वाढलय तुमचं! शुगर कमी नाही केली तर गोळी वाढवायला लागेल तुमची. ब्लडप्रेशरची गोळी उंबर्‍यावर उभं राहून आत येऊ का म्हणून वाटच बघत आहे.

``मग काय ओतून देऊ कचरापेटीत इतक सोन्यासारखं अन्न?'' - मी. `` दोन घास कमी कर. दोन घास कमी खा. नाहीतर दे ना कोणाला तरी. नसलं जर कोणी देण्यासारखं तर क्रशर बसवून घे तुझ्या सिंकला. जाऊन आलीस ना फॉरिनला? पाहिला आहेस की तेथील किचनच्या सिंकला. ओला कचराही संपेल तुझा. नाहीतर कर त्याचं कंपोस्ट. प्लॅस्टिकमधे गुंडाळून टाकयलाही काही उरणार नाही आणि गाईंच्या पोटातही प्लॅस्टिक जाणार नाही.''

तिरीमिरी आलीए मला. एवढ्याशा शेगडीने माझी खिल्ली का उडवावी. माझी ओसंडून जाणारी टायर्स, वाढणारं वजन, उंबर्‍यावर उभी असलेली BP ची गोळी --- म्हणताएत विचार तर करून बघ! तुम्हीही सांगा बर तिचं खर का माझंच आपलं बर?

-------------------------

#लेखणीअरुंधतीची -🐧🐧🐧🐧😳😈😝

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -