तंत्रज्ञानदेवाची कहाणी –

 

तंत्रज्ञानदेवाची कहाणी –

श्रावण आला की कहाण्या हे ठरलेलं समीकरण आहे. आज मी पण तुम्हाला एक कहाणी सांगणार आहे........ तंत्रज्ञानदेवाची!

ऐका परमेश्वरा तंत्रज्ञान देवा तुमची कहाणी. आटपाट एक देश होता. एकेकाळी तो देश महान आणि सुखसम्पन्न होता. तेथील `लोक अतिथी देवो भव' म्हणत राहिले. सार्‍या अतिथींनी त्याला लुबाडलं. देश भणंग भिकारी झाला. सार्‍या देशात निराशा, दुःख, दारिद्र्याचा प्रकोप झाला. त्या देशात एक नगर होतं. तेथे एक चहावाला रहात होता. त्याने आपला विचार केला की आपण देशाटनास जावे. तो फिरत फिरत जात असतांना त्याला एका झाडाखाली काही तरुण मुले मुली आनंदात बागडतांना दिसली. तो त्यांच्यापाशी जाऊन त्यांना म्हणाला, मुलांनो, मुलींनो तुम्ही इतके आनंदी कसे? सारा देश तर दारिद्र्याने सडत आहे. मधे मधे तुम्ही खाली मान घालून काय पहात आहात? मुले म्हणाली आम्ही तंत्रज्ञानदेवाचा वसा वसत आहोत. त्याने आम्ही सारे आनंदी आणि सुखी झालो आहोत. चहावाला म्हणाला, तुम्ही काय वसा वसता तो मला पण सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही. मग मुलांनी त्याला मनोभावे वसा सांगितला. चहावाल्याने चित्तभावे ऐकला. त्याप्रमाणे तो वागत राहिला.

 पुढे असाच आपला फिरत असतांना त्या देशाच्या निवडणुका होत्या. देशाच्या प्रधानांनी आणि मंत्र्यांनी निवडणुक नावाच्या हत्तिणीच्या सोंडेत माळ देऊन तिला फिरवलं तिने आपली चहावाल्याच्याच गळ्यात माळ घातली.  आधीच्या राजाच्या मंत्र्यांनी हा तर चहावाला ! ह्याला काय कळत? म्हणत त्याला घालवून दिलं. परत हत्तिणीला सोंडेत माळ घेऊन फिरवलं परत आपली तिने चहावाल्याच्याच गळ्यात माळ घातली. आधीच्या राजाच्या चापलूस मंत्र्यांनी त्याला शिव्या घालून तुरुंगात डांबायचा प्रयत्न केला. .... पण सोंडेत माळ घेऊन हत्तीण तेथवर पोचली शेवटी नाईलाजानं चहावाल्याला प्रधानमंत्री म्हणून राज्यावर बसवलं.

पहिल्याच दिवशी अनेक उपटसुंभ आणि बागडबिल्ले चहावाल्याच्या अवतीभवती जमा झाले. आपण आता सारे खूप मज्जा करू म्हणू लागले. पण चहावाला म्हणाला. माझं व्रत आहे.  मी तुमच्यासोबत येणार नाही. तुमच्याबरोबर उनाडक्या करणार नाही. त्याने मौज मस्ती केली नाही. नस्ते शौक पुरे केले नाहीत. तो जेथे जाई तेथे माझा देश सुखात राहो असं म्हणत राहिला.  त्याने तंत्रज्ञानदेवाची स्थापना केली. तंत्रज्ञानाचा वसा घेतलेल्या मुलांना बोलावू धाडलं. आपण सारे एकत्र वसा वसू म्हणू लागला. मुले आनंदाने तयार झाली.  सारेमिळून पहाटेच उठले. देशभर वायफायचे जाळे उभे केले. रात्रंदिवस सारे मेहनत करू लागले. , घरात कॉम्प्युटर देवाची आणि हातात मोबाईल फोन देवाची स्थापना केली. निरनिराळ्या अ‍ॅप्सनी मोबाईलला सजवले.  गुगल फेसबुक इ इ डाऊनलोड करून सतत विश्वसंपर्कात राहू लागले. नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून परावलंबित्व सोडले. सार्‍यांचे आधार कार्ड बनवले. ते बँकेला जोडले. सर्वांची बँक अकाउंटस् काढली. सर्व योजनांचे पैसे गरीबाला थेट त्याच्या अकाउंट मधेच देऊ लागले. पैशाला फुटणारे पाय थांबले.   

महिन्याचा शेवटचा रविवार आला. चहावाल्या राजाने तंत्रज्ञान देवाची `मन की बात' कहाणी सांगायला सुरवात केली. करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का त्याचा शोध घ्या. उपाशी नाही काही नाही. एक मळेवाला चिंताक्रांत बसला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलावले. तो म्हणाला, बाबांनो उस कापूस लावून जमिन बरड झालिए. विहीरीला पाणी लागत नाहीए. तुझ्या राजाची कहाणी ऐकून काय करू? बरं चल येतो. राजाने सहा नवीन संकल्प हाती घेतले. तीन आपण केले तीन सर्वांना करून पहायला सांगितले. माळ्याला `सॉईल हेल्थ कार्ड' दिलं. शेततळं घ्यायच तंत्रज्ञान शिकवलं. सोबत मधमाशी पालनाची मधुमख्खी पेटी दिली. माळ्याचा मळा पिकू लागला, त्याचं उत्पन्न दुप्पट झालं. तो म्हणू लागला, राजा राजा कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फळं? मला वसा सांग. राजाने मनोभावे त्याला वसा सांगितला. त्याने चित्तभावे ऐकला. माळी रोज तंत्रज्ञान देवाला पूजू लागला. त्याला आलेली बरकत पाहून त्याच्या आजुबाजुचे शेतकरीही त्याला वसा विचारू लागले. त्यांची वाया जाणारी भाजी आता प्रोसेसिंगच्या तंत्राने जास्त काळ टिकू लागली.

पुढच्या महिन्याच्या आदितवारी कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा पिटारे डांगोरा. एक मोळीविक्या चालला होता. त्याला बोलावलं. त्याला जंगलातल्या बांबूपासून नवनवीन वस्तू बनवायचं तंत्र शिकवलं. मोबाईल फोनवरून मार्केट सर्व्हे करायला शिकवलं. बघता बघता त्याचा माल फॉरिनला जाऊ लागला. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तोही म्हणू लागला, राजा राजा कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फळं? त्यालाही राजाने तंत्रज्ञान देवाचा वसा सांगितला. वसा घेऊन तो सुखी झाला.

 

पुढच्या आदितवारी कहाणीची वेळ झाली. करारे हाकारा पिटारे डांगोरा म्हणत दंवडी पिटवली. एक म्हातारी भेटली. तिचा एक मुलगा बहारिनला होता. एक सिंगापूरला होता. एक UAE  ला होता. चहावाल्या राजाने तिनही मुलांना `रूपे कार्ड' दिलं तिघंही तिला नियमीत पैसे पाठवू लागले. ती म्हणाली, राजा राजा, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ तर वसा घेतल्याचे काय फळ? मला वसा सांग. राजाने तिला वसा सांगितला. तिनेही BHIM अ‍ॅप गुगल पे, पेटिएम् फोनवर डाऊनलोड केले. सर्व बँक व्यवहार ती घर बसल्या करू लागली. News on Air, All India Radio,  आणि विविध News papers ची अॅप्स तिला दिवसरात्र सोबत करू लागली. ती सुखी झाली.

राजा पुढचे मजलेस गेला.  आदितवार आला आणि कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा पिटारे डांगोरा---. एक काणा डोळा मासाचा गोळा, हात नाहीत पाय नाहीत असा माणूस रस्त्यात पडला होता. तो पालथा होता त्याला उलथा करून उचलून घेऊन आले. जन आरोग्य योजनेतून त्याच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याला हात आले पाय आले. त्याचा देह दिव्य झाला. जेनेरिक औषधांमुळे त्याला 10,000 रु किमतीची औषधं 500 रुपयात मिळु लागली. तो म्हणू लागला, राजा राजा, मला वसा सांग. राजाने त्यालाही वसा सांगितला.

एक दिवस राजाने त्याच्या `टेकी' मुलांना देशभर फिरून यायला सांगितले. मुले परत आल्यावर विचारलं, जनता कशी आहे? मुलं म्हणाली ज्यांनी कहाणी ऐकली ते घनघोर नांदत आहे. जे जे काही अति शहाणे परत परत बोलावूनही कहाणी ऐकायला आले नाहीत ते दारिद्र्याने पिडले आहेत.

ज्यांनी हातावर फोन ठेऊन त्यात अनेक उपयुक्त अ‍ॅप्स डाऊनलोड केली आहेत. ते  एका क्लिकवर वीजबिल, गॅसबिल भरत आहेत. घरच्या घरीच सारे बँकेचे व्यवहार करत आहेत. जे पेटिएम्, भीम ‍ अ‍ॅप्स वापरत आहेत ते फोनवरून दूधबिल, पेपरबिल, घरवाली बिल देत घेत आहेत. ज्यांनी News on air लोड केलं आहे. ते नवनवीन माहिती, बातम्या ऐकून update आहेत. छान छान गाणी आणि कार्यक्रम ऐकून आनंदात आहेत.

 जे कहाणीप्रमाणे वागत नाहीत ते दारिद्र्याने पिचले आहेत दुःखाने वाकले आहेत. खेटा मारून मारून वैतागले आहेत.त्यांनी ATM मधून काढलेले पैसे चोर चोरत आहेत. पर्स/ वॅले मधे ठेवलेले पैसे त्यांना भय उत्पन्न करत आहे.

काहींनी जनतेला फसवून मिळालेले धन नारळ पोखरून त्यात रत्नमाणंकांच्या रूपात भरून ठेवले. पण ते नारळ ED च्या कारवाईची समुद्राची लाट येऊन हातून घेऊन गेली. काहींनी काठी पोखरून धनाने भरून ठेवली. पण CBI सूर्यनारायण गुराख्याच्या रूपात येऊन काठ्या घेऊन गेला. काहींनी शिदोरीत धन लपवलं ते घारीच्यारूपात सरकार सूर्यनारायण येऊन घेऊन गेला. 

नोटाबंदी नावाचा भिक्षु येऊन सर्वांना पाचशे आणि हजारच्या नोटा मागू लागला. ज्यांनी पैसे असतांना जनतेला दिले नाहीत. उलट त्यांनाच फसवलं त्यांचा काळा पैसा भिक्षुने नाहिसा होईल असा शाप दिला. ते डोक्याला हात लावून बसले आहेत.

तर माळी, शेतकरी, म्हातारी आजी, काणा डोळा मासाचा गोळा ह्यांना तंत्रज्ञान देव जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हास होवो ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.

---------------------------

लेखणीअरुंधतीची

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -