प्रार्थनेचे महत्त्व आणि ध्यान

 

प्रार्थनेचे महत्त्व आणि ध्यान.

                       कुठल्याही चांगल्या कामाची सुरवात आपण प्रार्थनेने करतो. सकाळी उठल्या उठल्याच दोन्ही तळहात एकमेकांवर चोळून  ते डोळ्यावर धरत `कराग्रे वसते लक्ष्मीः - -'  अशी प्रार्थना करतो. सर्व देवांचं म्हणजे सर्व कल्याणकारी शक्तींचे अधिष्ठान आपल्या हातातच आहे हे स्वतःलाच परत परत सांगतो. दिवसभर आपल्या हातून होणारं प्रत्येक कार्य  हे कल्याणकारीच व्हावे असे जणु आपल्यालाच बजावतो. ज्या धरणीवर दिवसभर आपण पाय ठेवणार, पहिल्यांदा तिची क्षमा  मागून मगच आपले पाय धरणीवर ठेवतो. आपल्याला दिलेल्या सुंदर जीवनासाठी प्रार्थनेतून आपण देवाकडे कृतज्ञता व्यक्त करतो. उत्सव असो, पूजा असो, त्याची सुरवात आणि सांगता प्रार्थनेने होणे अपेक्षित असते. उत्सव किंवा सण जरी घराघरात  साजरा होत असला तरी प्रार्थना ही विश्वकल्याणासाठीच केली जाते.

                   सर्वजण निरोगी, सुखी होवोत, सर्वजण चांगल्या गोष्टींचा विचार करून सन्मार्गावर चालोत आणि ह्या जगात कुठलाही जीव दुःखी राहू नये (सर्वेत्र सुखिनः सन्तु। सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःखमाप्नुयात्।।) अशा प्रकारची प्रार्थना केली जाते.

ॐ तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात्॥

सार्‍या विश्वाला प्रकाशित करणार्‍या त्या परमोच्च शक्तिचे आम्ही ध्यान करतो. तीच शक्ती आमची प्रज्ञा जागृत करो

वरील गायत्री मंत्र आजही कोट्यवधी हिंदू आणि इतर धर्मियांचा प्रेरणास्त्रोत आहे.

गुरू-शिष्य परंपरेत अशीच एक सुंदर प्रार्थना केली जाते.

देव आम्हा दोघांचे रक्षण करो. परमेश्वर आम्हा दोघांचेही पालन करो. आमच्या हातून प्रेरणादायी कार्य अखंडपणे होत राहो. आम्हा दोघांचे ज्ञान नेहमी तेजस्वी असो. आम्हा गुरू-शिष्यांमधे कुठलाही विद्वेष नसो. ( ॐ सह ना अवतु । सह नौ भुनक्तु। सह वीर्यं करावहै । तेजस्वि ना अवधीतम् अस्तु । मा विद्विषावहै ॥ )

भगवताचं स्मरण मनात सतत तेवत राहण्यासाठी कुंतीने कृष्णाला विनंती केली, -

``कृष्णा आम्हावर सतत संकटे येऊ देत म्हणजे आमच्या मनात तुझाच विचार, तुझेच स्मरण कायम राहील''.  संत तुकोबारायांनीही `हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा॥' ह्या पलिकडे अजून काय वेगळे मागणे मागितले आहे. श्रीमद् आद्य शंकराचार्यांच्या षट्पदीतील `अविनयम् अपनय विष्णो' म्हणजे हे भगवंता माझ्या मनातील उद्धटपणाचा लवलेशही दूर कर ही विनवणी फारच भावस्पर्शी आहे.

विनोबाजींच्या विचारात प्रार्थना म्हणजे मनाचे स्नान, भोजन आणि झोप आहे.'' स्नानामुळे शरीर स्वच्छ होते तसे प्रार्थनेने मन निर्मळ होते. भोजनाने शरीराला पोषण मिळते तसे प्रार्थनेने आत्मबल वाढून मनाला पुष्टी मिळते. झोपेने जशी शरीराला विश्रांती मिळते त्याप्रमाणे प्रार्थनेने मनाला शांती प्राप्त होते.

                             सामुदायिक प्रार्थना सर्व समुदायाला एका विशिष्ट ध्येयासाठी प्रेरित करते. जपानसारख्या अत्यंत प्रगत देशातही कचेरीत काम सुरू करण्यापूर्वी प्रार्थना म्हणून दिवसभराच्या कामाचा आराखडा तयार करून मगच कामाला सुरवात केली जाते. अमेरिकेतील एका प्रोफेसरांकडे आम्ही पतिपत्नी जेवायला गेलो असता जेवणापूर्वी टेबलाभोवती बसलेल्या सर्वांनी डोळे मिटून, एकमेकांचे हात हातात घेऊन प्रार्थना म्हटली. जेवणापूर्वी तुमच्याकडे काय प्रार्थना म्हणतात असं विचारल्यावर आम्हीही ``सर्वत्र उत्तम पाऊस पडो, नद्या वाहोत, उत्तम धान्य येवो -- (यन्तु नदयः वर्षन्तु पर्जन्याः सुपिप्पलाम् ओषधयोः भवन्तु - --) अशा अनेक सुंदर प्रार्थना म्हणून दाखविल्या.  

             प्रार्थनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे परंतु सामान्य लोक आपल्या समोर दिसणार्‍या बाह्य गोष्टींमधेच सुख शोधत राहतात. त्या आपल्याला खरे सुख कधीच देऊ शकत नाहीत. आणि जे थोडेसे मिळते तेही आळवावरच्या पाण्यासारखे घरंगळून जाते. हे त्यांच्या लक्षात येत नाही. ते देवाची प्रार्थना करून देवाकडे सतत काही ना काही गोष्टींची मागणी करत असतात. देवा मला पास कर, मी तुला पेढे ठेवीन; देवा मला प्रमोशन मिळू दे, मी मैलोन्मैल अनवाणी चालत तुझ्या दर्शनासाठी येईन. माझा धंदा चांगला चालला तर मी तुला सोन्याचा मुकुट करीन. इत्यादि इत्यादि. कधी एखादि गोष्ट मिळते कधी मिळत नाही. पाहिजे असलेली गोष्ट न मिळाल्याने दुःखी झालेले लोक देवालाच निष्ठूर ठरवितात, जगात देवच नाही म्हणतात. ईश्वर हा चांगलं-वाईट, शुभ-अशुभ ह्या सर्वाच्या पलिकडे आहे. तो बोधस्वरूप आणि आनंदस्वरूप आहे.

            प्रार्थना ही पाण्यात फिरवलेल्या निवळीसारखी असते. मनातील सर्व किल्मिषं, हृदयात इतरांविषयी वाटणारा विद्वेष, मत्सर, मनात इतस्ततः फिरत राहणारे सर्व विचार खाली बसवून मनाला पारदर्शक स्थितीत नेणारी असते. या नितळ मनात स्वतःचं प्रतिबिंब आपल्यालाच बघता येतं. प्रार्थना आपल्यामधेच असलेल्या सुप्त शक्तींना जागृत करते. एखादे काम विशेष चांगल्या रितीने घडविण्याची कल्पनातीत ताकद माणसाला देते.  

                प्रार्थनेमधे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे नियमितपणा आणि श्रद्धा. ईश्वराला अनन्यभावाने शरण जाऊन प्रार्थना केली पाहिजे. अन्तस्थ कुठला तरी वेगळाच हेतू धरून केलेली प्रार्थना म्हणजे आपण आपलीच केलेली फसवणूक होय. कारण देव बाहेर नाही आपल्या हृदयातच असतो.

ध्यान -

              प्रार्थनेची परमोच्च अभिव्यक्ती म्हणजे ध्यान. प्रार्थना ही ध्यानाकडे घेउन जाणारी प्रथम पायरी आहे. आपल्या हृदयातच खर्‍या सुखाची निस्यंदिनी सतत पाझरत असते. ती कधीच आटत नाही. तो आपला जन्मसिद्ध वारसा आहे. प्रार्थना आणि ध्यानाच्या विविध पायर्‍या चढत त्या परमोच्च सुखाचा, त्या परमात्म्याचा अनुभूतीचा म्हणजे पर्यायानी आपण आपलाच शोध घेत असतो.

          मन हे प्रवाहासारखे असते. परंतु मनाचे अनेक प्रवाह अनेक दिशांना स्वैर धावत असल्याने त्याची शक्ती क्षीण होऊन जाते. आणि परिणामी एखाद्या वाळवंटात जिरून जाणार्‍या ओहोळांप्रमाणे त्याची ताकद हवेतच विरून जाते. मनाचे सतत बाहेर धावणारे हे प्रवाह परत हृदयाकडे वळवून भगवद्भक्तीच्या असीम सागराला जाऊन मिळाले की येणारी विश्वात्मक जाणीव म्हणजेच ध्यान.

                         बहिर्गोल भिंगामधून एकत्रित झालेले सूर्य किरण ज्याप्रमाणे खाली धरलेल्या कागदालाही जाळू शकतात. त्याप्रमाणे ईश्वर चिंतन ह्या एकाच विषयावर केंद्रित झालेले मन मनातील सर्व बाकी विकार जाळून टाकतात. सोन्याला वारंवार मुशीत घालून तापवल्यावर त्यातील हीण जळून शुद्ध सोने फक्त बाकी राहते. रस्त्यावरून वाहणारा सांडपाण्याचा ओहोळ गंगेला मिळुन गंगाच बनून जातो; त्याप्रमाणे प्रार्थना आणि ध्यानाच्या मुशीतून बाहेर पडलेल्या जीवाला, हा अवयवरूपी देह म्हणजे मी नसून `ते सर्वव्यापी ब्रह्म म्हणजेच मी आहे' ( तद् ब्रह्म निष्कलमहं नच भूतसङ्घः)  हया आद्य शंकराचार्यांच्या `प्रातःस्मरणम्' मधील ओळींचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.

संदर्भ ग्रंथ - ज्ञानेश्वरी,  चैतन्य चिंतने - श्री. वासुदेवराव चोरघडे ;  ध्यान आणि अध्यात्मिक जीवन - स्वामी यतीश्वरानंद. अनु.- स्वामी ब्रह्मस्थानंद,

-------------------------------------------------------------------------------

 

अरुंधती ताईना,

नमस्कार,

तुमचा कालनिर्णय जानेवारी २०१७ मधील लेख ‘प्रार्थनेचे महत्त्व आणि ध्यान’ वाचला. लेख अतिशय माहितीपूर्ण आणि सुंदर होता. आजच्या युगात ध्यान किती आवश्यक आहे हे प्रत्येक संताने आधीच सांगून ठेवले आहे. पण आजकाल वेळेअभावी काही जणांना जमत नसल्याने ‘प्रार्थना’ हा अतिशय सोपा मार्ग बनला आहे. आपण या दोन्ही गोष्टी अतिशय उत्तम पद्धतीने समजावल्याबद्दल आपले आभार.

 

असेच आमचे वाचन समृद्ध करत रहा. ख्रिस्ती नववर्षाच्या विलंबित शुभेच्छा.

सन्मित घुगरे,

नाशिक - 

--------------------------------------------------------------------------

Hello Arundhati,

I just read your Kalanirnay article on the importance of praying & meditation. In the nuclear family setting & fast paced life, it's very important to have this kind of reminder. You've written it beautifully & in a way that touched my heart..


Thanks.
Aarti Hardikar
N.J. U.S.A

-------------------------------------------------------------------------------

       

Jatish Mulay 

11/28/16

to me


           .  Warm Greetings of the Day !!

 

            Just finished your article ' Prarthaneche Mahatwa & Dhyan ' published in the Kalnirnay - 2017.  It is wonderful and informative too.  Theme is good.  Words and examples chosen are beautiful and appropriate.  Please accept my heartiest congratulations .  Please keep it up .  By the way my father used to write such type  of articles for Tarun Bharat, Nagpur a couple of years ago.  He is too old to write now. 

               With regards,

 

JATISH MULAY

RAIPUR

CHHATTISGARH STATE


--
 
REGARDS,

JATISH MULAY

      -------------------------------------------------------------------------------

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -