सत्यकाम जाबाली
सत्यकाम जाबाली
माझ्या बालमित्रांनो,
मी एक पुस्तक वाचत होते. नाव होत- `कोल्हाट्याचं पोर.'
लेखकाच्या नावावर मात्र माझी नजर खिळून राहिली. – `किशोर शांताबाई काळे!' मनात आलं,
ह्या मुलानं वडिलांच नाव लावायच्या ऐवजी आईचं नाव का बर लावल असेल? त्याची स्वतःची
कहाणी त्या पुस्तकरूपाने माझ्या हातात होती. `किशोर शांताबाई' ह्या मुलाने माझं सारं
भावविश्व ढवळून काढलं होतं. पूर्वीही असं काही घडलं असेल का? असा विचार करत असतांनाच माझं मन मला खूप खूप मागे
घेऊन गेल. अगदी पुराण काळात. माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला सात आठ वर्षांचा एक चुणचुणीत
मुलगा.
आज मी तुम्हाला त्याच त्या छोट्या
मुलाची गोष्ट सांगणार आहे.आपण शिकावं, ज्ञान मिळवावं अशी प्रचंड आंतरीक ओढ त्याला स्वस्थ
बसू देत नव्हती. रात्रंदिवस त्याला ध्यास लागला होता की मला ज्ञान मिळालच पाहिजे. जिथे
इच्छा असते तिथे मार्ग असतोच .नदीकडेच बघा बर! नदी वाहते.मधे येणार्या दर्या, डोंगर
पार करतांना तिला तरी ते अडथळे आहेत असं कुठे वाटत? त्या प्रमाणे तो लहानगा मुलगा उठला
आणि थेट ऋषि गौतमांच्या आश्रमात दाखल झाला. नम्रपणे गुरुजींच्या पायावर डोकं ठेऊन तो
म्हणाला, -
``गुरुजी मला आपला शिष्य करून घ्याल?
मला शिकायचं आहे. मला खूप शिकायचं आहे. मला ज्ञान पाहिजे, मला ब्रह्मज्ञान पाहिजे.''
``उठ बाळ ! तू कोण? कोणाचा मुलगा?
तुझं गोत्र काय? '' गुरुजींनी विचारलं. आज जसं आपण आडनाव विचारतो तसं पूर्वी गोत्र
विचारलं जाई.
``गोत्र? - - -वडिलांचं नाव? मला काहीच
माहित नाही गुरुजी. मी माझ्या आईला विचारून येतो.''
तो छोटा मुलगा आईकडे आला. ``आई -
-आई गुरुजी विचारत आहेत तुझ्या वडिलांचं नाव
काय? तुझं गोत्र काय? आई कोण आहेत माझे बाबा? आपलं गोत्र काय ?''
निर्मळपणे आईने मुलाच्या केसातून हात
फिरवला. आणि म्हणाली,``बाळ मी दासी आहे. जाबाल! शरीरविक्रयावर पोट भरणारी दासी. तुझे
वडिल कोण हे मलाही ठाऊक नाही. तू तुझ्या गुरुजींनाही
हेच सत्य सांग की - - मी सत्यकाम जाबाली. आपण
नेहमी सत्यच बोलावं.''
छोटा मुलगा परत आपल्या शिक्षकांकडे
गेला आणि म्हणाला,``आचार्य मी सत्यकाम जाबाली. मला माझे वडिल कोण हे माहित नाही. पण
मला शिकायचं आहे. खूप खूप शिकायचं आहे. जाबालीचा प्रामाणिकपणा, शिकण्याची जिद्द, चिकाटी,
निर्भयपणा आणि त्याच जोडीने असलेला नम्रपणा पाहून विद्यार्थ्यांची पारख असलेल्या गौतम ऋषींनाही त्याच्यात लपलेला एक महान विद्वान
दिसून आला.
``ये बाळ! आज पासून तू माझा विद्यार्थी
झालास. गौतम ऋषींनी जाबालीचे आपल्या आश्रमात स्वागत केले. विद्यार्थ्याची दिनचर्या
कशी असायला पाहिजे. हे त्याला समजाऊन सांगितले. विद्यार्थ्याने पाळायचे नियमही सांगितले.
विद्यार्थी असण्यासाठी पूर्वी फार कडक नियम असत. सूर्योदयापूर्वी उठावे लागे. सर्व
मौज मजा सोडून अभ्यास करावा लागे. रुचकर अन्नाचा त्याग करून रोज भिक्षा मागून उदरनिर्वाह
करावा लागे. कुशाग्रबुद्धी आणि कुठलीही मेहनत करायची तयारी असलेल्या जाबालीने गुरूजींवर
श्रद्धा ठेऊन सर्व नियमांचा स्वीकार केला.
आचार्य गौतमांना जाबालीच्या
व्यक्तिमत्वामधे एक वेगळीच चुणुक दिसत होती. निसर्गाची ओढ जाबालीच्या स्वभावात मुळातच होती. उन, वारा,
पाऊस, आकाश, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रं, डोंगर, दर्या, प्राणी, पक्षी ह्या सर्वांसोबत
जाबालीच्या मनाची नाळ अशी काही जुळलेली होती की जणु पंचमहाभूतच स्वतः पालक बनून बालकाप्रमाणे
त्याचा सांभाळ करत असावीत. त्याला निसर्गाचं ज्ञान पितृतुल्य अशा निसर्गाकडूनच दिलं
जात होतं. त्याला वेगळ्या गुरूची आवश्यकताच नव्हती. हा बालक स्वतःच अनेक गोष्टी निसर्गाकडून उत्तम शिकू शकेल हे त्यांच्या
लक्षात आलं. एकदिवस त्यांनी जाबालीला बोलावलं आणि सांगितलं,``बाळ जाबाली! आज मी माझ्या चारशे गायी तुझ्या हवाली करतो. त्यांची
आपल्या आश्रमात देखभाल होणं कठीण काम आहे. तू ह्या गायींना घेऊन रानात जा. तिथे त्यांची
चांगली काळजी घे. ह्या चारशे गायींच्या जेंव्हा हजार गायी होतील तेंव्हा तू रानातून
परत ये.''
जाबालीच्या जिद्दीची आणि
चिकाटीची आता खरी कसोटी होती. चारशे हडकुळ्या गायी घेऊन जाबाली रानात निघाला. आचार्यांविषयी
त्याच्या मनात एवढी श्रद्धा होती की आचार्याँनी ज्ञान शिकविण्या ऐवजी मला हे काम का
दिल? असं चुकूनही जाबालीच्या मनात सुद्धा आलं नाही. मला दिलेलं हे काम मी नीट पार पाडलं
पाहिजे अशा उत्साहाने गाईँना घेऊन तो रानात जायला निघाला.
बाल मित्रांनो वाल्मीकी ऋषींनीही उत्साह
हा माणसाचा सर्वात उत्तम गुण मानला आहे. माणसाच्या अंगात बाकी गुण थोडे कमी असले तरी
एका उत्साहाच्या जोरावर बाकी सर्व गुण तो संपादन करू शकतो. उत्साहाचं बोट धरून बाकी
सर्व गुण त्याच्यामागोमाग येतातच. अर्थात उत्साह म्हणजे, नुसताच गडबडगुंडा, काम करण्यापूर्वीची
शोभेचीच लगबग किंवा आरंभशूरपणा नव्हे. कार्य तडीस जाई पर्यंत टिकून राहणारं धैर्य आणि
प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणजेच उत्साह.
रानात गेल्यावर जाबालीने स्वतःसाठी एक
झोपडी बांधली. गुरांसाठीही निवारा तयार केला. दररोज गुरांना घेऊन तो वनात जिथे चांगलं
गवत असेल तिथे त्यांना चरायला नेई. त्यांना
नदीचे अग्रोदक पाणी पाजे. त्यांना कुठले गवत जास्त मानवते, आवडते हे ही त्याला अनुभवाने
कळू लागले. बघता बघता सर्व गाईगुरांच्या तब्बेती सुधारू लागल्या. सर्व वनस्पती शास्त्राचा
अभ्यास निसर्गाने जणू जाबालीकडून करवून घेतला. जाबाली समोर जणु निसर्गाची प्रयोगशाळाच
मांडून ठेवली होती. जाबालीची जिज्ञासा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याचं निसर्गवाचन
सुरू झालं. निसर्गाच्या सूक्ष्म निरीक्षणासोबत निसर्गचक्रात घडणार्या बदलांची नोंद
तो ठेऊ लागला. ह्या घडणार्या घटनांची एक तर्कसंगत संगती लावायचा जाबालीला नादच लागला.
त्यावरून अनेक अनुमानं काढणे, वारंवार त्या अनुमानांना तपासून पहाणे आणि अनुमानाची
सत्यता सिद्ध झाली की त्याचे नियमात रूपांतर करणे ह्यात जाबाली रमून गेला. आकाश, सूर्य,
चंद्र, तारे, ग्रह यांच निरीक्षण करता करता ह्या विश्वाचा अफाट पसारा त्याला जाणवू
लागला. बरीच वर्ष लोटली. जाबालीने प्रेमाने
घेतलेल्या काळजीमुळे, गाई बैल धष्टपुष्ट झाले होते. त्यांना कालवडी आणि गोर्हे ही
झाले होते. अनेक वासरांसह तो कळप खूपच मोठा झाला होता. जाबाली आपल्या कळपाकडे मोठ्या
प्रेमाने बघत असतांना अचानक एक बैल बोलू लागला. ``जाबाली आता आम्ही सर्वजण मिळून हजार
आहोत. आपण आश्रमात परत जायची वेळ झाली.'' बैलाच्या
बोलण्याने भानावर आलेल्या जाबालीने पाहिले चार पायावर बैल सुरक्षित उभा होता. जाबाली आकाशाचं निरीक्षण करू लागला. चारही दिशांवर
आधारलेला ब्रह्माडांचा डोलारा किती सुरक्षित आहे नाही! तो बैल परत बोलू लागला, ``सत्यकाम! ह्या दिशांचा अभ्यास तुला प्रकाशाची दिशा दाखवेल.
ह्या चार दिशांचा विस्तार किती अफाट आहे! अनंत ----अनंत! मोजताच येणार नाही. ह्या ब्रह्मांडाचेही
नियम आहेत. काटेकोरपणे पाळले जाणारे. कोणीही चुकत नाही म्हणूनच हे सार जग सुरळीत चालू
आहे.`` जाबालीला वाटलं ह्या बैलाच्या चार पायांनी मला थोडसं ज्ञान दिल पण ते फार अपूर्ण
आहे. बैलाच्या चार पायांपैकी एका पायासारखे एक चतुर्थांश! बैल म्हणाला, ``बाकी एक चतुर्थांश
ज्ञान तुला अग्नी देईल.''
मुलांनो निसर्ग खरोखरच एक मोठा शिक्षक
आहे. सफरचंदाच्या झाडाखाली बसलेल्या न्यूटनला फळ खालीच का पडल? हा प्रश्न पडला आणि
उत्तर शोधता शोधता गुरुत्त्वाकर्षणाचा सिद्धांतही उत्तरादाखल सापडला. झाडाखाली बसलेल्या
सिद्धार्थाला मी कोण आहे ह्याचं ज्ञान झालं. म्हणजेच आत्मबोध झाला.
जाबली आपल्या गुरांच्या कळपाला घेऊन
आश्रमाची वाट चालू लागला. मधेच रात्र झाली.
अंधार झाला. जाबालीने अग्नी पेटविण्यासाठी दोन लाकडे एकमेकांवर घासायला सुरवात केली.
अग्नी प्रकट झाला. जाबाली विचार करू लागला, ` हा अग्नी लाकडात कुठून आला? दिवसभर सूर्यापासून
घेतलेल्या ऊर्जेतून ही ऊर्जा लाकडात आली. सूर्य, झाडातील अग्नी ,वीज ह्या सर्वातील
अग्नी एकच आहे. प्रत्येक प्राण्यात हे अग्नितत्त्व आहेच. आपण सर्व जीव ह्या सूर्याचे
अंश आहोत. अनेक विचारांनी त्याला मी म्हणजे फक्त माझं शरीर नाही तर मी एक विश्वात्मक
आहे ह्या विचारांनी मन भरून गेलं. अग्नीने त्याला संपूर्ण पृथ्वी, समुद्र, वायूमंडल,
वायूमंडलापलिकडील निर्वात आकाश म्हणजेच अंतराळ ह्या सर्वांचं ज्ञान दिलं. अग्नीने जाबालीला
अजून एकचतुर्थांश ज्ञान दिलं.
रात्र सरली आणि जाबालीला जाग
आली तीच हंसाच्या कलकलाटाने! समोर कमनीय असे हंस पक्षी उडत होते. जग किती कलात्मक आहे.
पण त्या कलात्मकतेमागे मोठ विज्ञान आहे. विज्ञान ही एक कलाच आहे. तेवढयात तो पांढरा
शुभ्र हंस जणु जाबालीशी बोलू लागला. त्याने ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या स्वयंप्रकाशी
अशा सूर्य, तारे, परप्रकाशी चंद्र,ग्रह आणि
त्यांच्या कलांचे ज्ञान जाबालीला दिले.
ब्रह्मदेवाने निर्माण
केलेल्या ह्या जगाचं वैविध्य आणि त्यामधेही असलेला सारखेपणा बघत असतांनाच पर्वताच्या
कड्यावरून कोसळणार्या, एका मनोरम अशा धबधब्याने त्याचं लक्ष वेधून घेतलं. जणु धीरगंभीर
आवाजात तो वेगवान पाण्याचा ओघ बोलू लागला
, `` जाबाली, डोळे, कान, तोंड, स्पशेंद्रिये, प्राण, मन ह्या सर्वांनी तू हे अनंत ब्रह्म
जाणून घेऊ शकतोस. त्या ब्रह्माचा तू अनुभव घे. पाणी जसे सतत वाहते तसा हा जीवनाचा प्रवाहही
अखंड वाहतच असतो. उरलेलं एक चतुर्थांश ज्ञान मिळवून सत्यकाम जाबाली एक ज्ञानी मुलगा
झाला होता.
एक हजार गायी घेऊन सत्यकाम आश्रमात
परत आला. त्याला पाहून गौतम ऋषींना खूप आनंद झाला. एखाद्या जाळीदार भांड्यात दिवा ठेवला तर प्रत्येक
भोकाभोकातून त्याचा प्रकाश बाहेर पडतो त्याप्रमाणे सत्यकामाच्या हृदयात प्राप्त झालेलं
ज्ञान त्याच्या डोळ्यातून त्याच्या चेहर्यावर पसरल्याचं आचार्यांच्या लक्षात आलं.
झाडाची मुळं पाण्यापर्यंत पोचली हे झाडाच्या पानांवर आलेल्या टवटवीवरूनच लक्षात येत.
वसंत ऋतू आल्याचं वेगळं सांगायला लागत नाही. मोहरलेल्या बहरलेल्या झाडांना पाहून वसंतऋतु
आल्याचं जगजाहीर होतं. जाबाली ज्ञानी झाल्याचं आचर्यांचं अनुमान खरचं होत. सत्यकाम
जाबालीने आचार्यांचे पाय धरले आणि त्यांच्या पायावर आपलं डोक टेकवलं. `` आचार्य आता
तरी मला ब्रह्मज्ञान द्याल ना? जाबालीने काकुळतीने विचारले. `` सत्यकाम तुला पाहिजे
ते ज्ञान तू आपणहून मिळवलेलच आहेस. अजून मी तुला काही ज्ञान देण्याचं बाकी आहे असं
मला वाटत नाही.'' आचार्य म्हणाले. `` गुरू शिवाय ज्ञान नाही आचार्य! आता तरी आपण ज्ञान
देऊन माझ्यावर कृपा करा. तो पर्यंत मी हे पाय सोडणार नाही.'' आचार्य गौतमाने सत्यकामला
उठवून हृदयाशी धरलं. ``सत्यकाम तू मोठी परीक्षा पार पाडलीस. प्रामाणिकपणा, अढळनिष्ठा,
सचोटी ह्या गुणांचं मूर्तिमंत उदाहरण आहेस. पुढच्या अनेक पिढ्या, अनेक युगं तुझ्या
सत्यनिष्ठेसाठी लोकं तुझं नाव घेतील. आचार्यांनी सत्यकामला सोळावी कला म्हणजेच ब्रह्मज्ञान
पूर्णपणे शिकवले.ज्ञान संपादन करून जाबली कृतार्थ झाला. आणि इतका जिज्ञासू विद्यार्थी
मिळून आचार्य गौतमही!
मुलांनो असा हा सत्यकाम जाबाली ज्ञान
संपादन करून थोर ऋषी झाला. माझ्या बालमित्रांनो! कोणालाही,`हे ज्ञान फक्त माझं आहे
' असा ज्ञानावर दावा करता येत नाही. ज्याला ज्ञान संपादन करायची तीव्र जिज्ञासा आहे
त्याला ज्ञान मिळाल्यावाचून रहात नाही. निसर्ग आपल्या सर्वांचाच गुरू आहे. सर्वप्रकारचं
उदंड ज्ञान तो आपल्याला देतच असतो. फक्त ते आपल्या डोळ्यांनी आपण पाहिलं पाहिजे. कानांनी
ऐकलं पाहिजे स्पर्शाने अनुभवलं पाहिजे, मनाने जाणलं पाहिजे. आणि बुद्धीने ग्रहण केले
पाहिजे.
--------------------------------------
#लेखणीअरुंधतीची -
Comments
Post a Comment