विनायक ते गजानन प्रवास

 

विनायक ते गजानन प्रवास

गणेशाची उत्पत्ती 

आपल्या हिंदू/सनातन धर्मात अनेक सत्य घटना /वस्तुस्थती, निसर्गातील अनेक नियम, सूर्य,चंद्र, तारे ह्यांची माहिती ही अत्यंत आकर्षक अशा गोष्टींसोबत अशी काही सुंदर रीत्या गुंफली जाते की भल्याभल्यांनीही अचंबित व्हावं धृव तारा उत्तर दिशेला एका जागी स्थिर आहे हे ज्ञान सर्वसामान्यांना गोष्टीरूपातून किती सहज पचनी पडतं. तशीच ही गणेशाची कथा.

 

 शिव आणि पार्वती हे ह्या गणेशाचे तात आणि माय. शिव हा सार्‍या विनाशाचं प्रतिक तर पार्वती जगातील सार्‍या नवनिर्मितीचं प्रतिक. वरवर पाहता दोघांच्या कृती एकमेकांच्या विरुद्ध. पण छे! विनाश आणि नवनिर्मिती दोन्हीही एकाच कृतीची अभिन्न अंगे. एक कृती घडत असतांनाच दुसरी कृती अपोआप होत असते. नदी डोंगरावरून वाहत येतांना डोंगराची झिज होते. धूप होते. त्याचमुळे पुढे सुपीक गाळाची जमिन तयार होते. दोन्ही कृती एकमेकांवर इतक्या अवलंबून आहेत की एक झाली तरच दुसरी होणार. तसेच विनाशरूपी शिव आणि  नवनिर्मितीची मूर्ती उमा एकमेकांत इतके एकरूप झाले आहेत की त्यांना एकमेकांपासून कोणी दूर करू शकत नाहीत.                 

 

  ह्या पार्वतीने एक गोड गोंडस बाळ बनविला. तिचा बाळ! तिच्या अंगाला लावायच्या चंदन, केशर, कस्तुरीच्या सुवासीक उटीपासून  बनविलेला तिच्या एकटीचा बाळ! बाळाच्या अंगात प्राणही घातले. बाळ जिवंत झाला. माघी चतुर्थीला आपण त्याचं विनायक म्हणून बारसंही केलं. त्या चतुर्थीला आपण तिलकुंद चतुर्थी म्हणतो. आत्तापर्यंत तो फक्त उमानंदन होता. पण त्याने अजून मृत्यूचाही काळ असलेल्या त्याच्या तातांना पाहिलं नव्हतं. त्याच्या तातांनीही  विनायकाला पाहिलं नव्हत.

             ते समोरासमोर आले तेंव्हा साक्षात मृत्यूसमोर हा बालक न घाबरता लढण्यासाठी उभा राहिला. मृत्यूला स्वतःचा काय किंवा दुसरयाचा काय काही फरकच नाही. त्याने एका फटक्यात विनायकाला मृत्यू म्हणजे काय ह्याचा परिचय करून दिला. पार्वतीच्या काळजाचं पाणी पाणी झालं. शिवाने विनायकाला जिवंत केलं पण त्याचं मस्तक त्याला सापडलं नाही म्हणून हत्तीबाळाचं मस्तक बसविण्यात आलं. बाळ जिवंत झाला. आता तो गजानन झाला  आत्ता पर्यंत फक्त पार्वतीचा बाळ होता तो आता ``उमामहेशनंदन’’ झाला. दोघांच्या मांडीवर बसून खेळू लागला.

विनाश आणि उत्पत्ती ह्यांचा सुवर्णमध्य साधून दोन्हीचाही तोल सांभाळत निर्माण झालेली अलौकिक कृती म्हणजे गणेश. शिवाच्या विनाशकारी नृत्याला तांडव म्हणतात तर पार्वतीच्या नवनिर्मितीच्या मनमोहक नृत्याला लास्य म्हणतात. तांडव आणि लास्य ह्या दोन्हीची आद्याक्षरे घेतली तर ताल हा शब्द तयार होतो. अशा ह्या स्वतःच्या आदि तालावर  अखंड आणि आनंदानी नाचणारा हा गणपती आहे. सर्व संकटांवर मात करणारा , अगदी मृत्यूच्या मांडीवरही आनंदाने खेळणारा हा गणेश आहे. नव चैतन्य, नव उर्जा यांच प्रतिक म्हणजे हा गणेश ! दगडाला फोडायची उर्जा एका छोट्याशा बीजाच्या अंकुरातच असते. चिखल भेदून वर यायला कमळकळीच लागते. म्हणून गणपती हा जास्त करून बालस्वरूपातच दाखवला जातो.

काहींच्या मते पार्वतीने आपल्या आंगच्या मळापासून म्हणजे अपवित्रापासून बनविलेला हा बाळ. पर्वतावर राहते ती पार्वती, पर्वताची मुलगी असं धरलं तर पार्वतीचा दुसरा अर्थ म्हणजे जी पर्वतात उगम पावते ती नदी. ह्या पर्वतपुत्री नदीनी येता येता पर्वतातला गाळ खाली आणला. जेंव्हा ती उंचावरून खाली येत होती तेंव्हा गुरुत्वाकर्षणाच्या रेट्याने खूप गाळ ती वाहून नेऊ शकत होती. तीच नदी  सखल प्रदेशात आल्यावर तिच्यात मिसळलेला हा खूपसा गाळ तिला काढून टाकायला लागला. प्रवाहाबरोबर पुढे न जाता हा गाळ खाली बसून सुपीक जमिन बनली. माणसं, प्राणी, पक्षी तेथे आनंदाने राहू लागले. नदीचा हा सुपीक समृद्ध गाळाचा प्रदेश म्हणजेच गणेश.  पण निसर्गप्रकोपापुढे कोणाचे चालणार? शिवरूप निसर्गाने अनेकवेळा ओठावर जीभ फिरवून चाटून घ्यावं इतक्या सहज रीतीनी नदीकाठच्या अनेक मानव संस्कृतींचा नाश केला.

कितीही भीषण संहार झाला तरी माणूस कधी गप्प बसतो का?  परिस्थितीनी त्याला नेस्तनाबूत केलं, सारया सार्‍याची राखरांगोळी झाली तरी त्या राखेतून तो फिनिक्स पक्षासारखा परत उभा राहतो अजून कणखरपणे. आणि भरारी घेतो गगनाला स्पर्श करण्यासाठी.  तो मानवजातीचा इतिहास म्हणजेच गणेश.

  सुहृदहो, आज पृथ्वीतलाचा विचार केला तर काश्मिरमधे बहरणारी सफरचंदे आणि केशर आपल्याकडे तग धरत नाही. मलयगिरीचा चंदन हिमालयात उगवत नाही. उत्तरध्रुवावर जगणारा प्राणी विषुववृत्तवर जगत नाही तर पाण्यात राहणारा जलचर पृथ्वीवर टिकाव धरू शकत नाही. प्राणी असो, पक्षी असो अथवा वृक्ष असो ते त्यांच्या ठराविक हवामानातच चांगल्याप्रकारे जगू शकतात. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे जो उत्तर ध्रुवावरही राहू शकतो, विषुववृत्तावरही राहू शकतो, पाणबुडीच्या आधारे पाण्याखालीही अनेक दिवस राहू शकतो. पृथ्वीप्रदक्षिणा जिंकण्याची प्रचंड ताकद हया मानवात आहे. पृथ्वीप्रदक्षिणा जिंकणारा गजानन सार्‍या मानव जातीचं प्रतिक आहे. कुठल्याही संकटावर मात करण्याची मानवी मनात दडलेली विजिगीषु वृत्ती,  मृत्यूच्या मांडीवर बसूनही खेळण्याची भयरहीत धाडसी वृत्ती,

 

आलेल्या कितीही मोठ्या संकटावर मात करण्याची जिद्द, नवनिर्मितीची जागवत ठेवणारी स्वप्न आणि आस हे सारे गुण म्हणजेच आपल्या आंतरात्म्यातील गणेश! मनातील ही जगण्याची उर्मी, जिजीविषा,  जिवंत ठेवण्याची अनंत जिद्द------

हम होंगे कामयाब! मनमें पूरा है विश्वास! हम होंगे कामयाब एक दिन!  ही म्हणजे गणेशाची पूजा. ‘‘देवा मला पाव’’ ही गणेशाची पूजा नाही.

 

                  आपण जसं ठरवतो तसं कधीच घडत नाही. अनेक विपरीत गोष्टी घडत राहतात. परत परत मनन चिंतन करून परत एकदा योग्य दिशेने प्रयत्न करावे लागतात. मृतप्राय झालेले संकल्प नव्या विचारांच्या योग्य दिशेवर येताच सिद्धीस जात असल्याचं दिसून येतं.

              पार्वतीनी केला होता तसा बाळ तिला परत नाही मिळाला. पण नवीन विचारांची धारा सोंडेच्या रूपाने जोडताच बाळ जिवंत झाला. बुद्धी आणि अनुभव ही दोन गंडस्थळे लाभून बाळ सुंदरही दिसायला लागला. पहिल्यांदा तो  आपल्या तातांबरोबर वडिलांपुढे लढण्यासाठी उभा राहिला, साक्षात विनाशाला जराही न घाबरता सामोरा गेला तेंव्हा त्याच्याकडे कुशाग्र बुद्धी होती पण अनुभव नव्हता. शिवासोबत लढण्याने त्याला प्रचंड अनुभव मिळाला.   कृतीरूप गणेशाला दृढसंकल्प आणि योग्य अनुमान म्हणजेच सत्तर्काचे अजून दोन हात त्या बाळाला मिळाले आणि त्याची ताकद द्विगुणीत झाली. सूक्ष्म विचार करू शकणारे आणि वर्तमानाच्या पलिकडे डोकावणारे डोळे  गणेशाला मिळाले. भूत भविष्य वर्तमानात मागे पुढे हालणारे आणि सर्व बदलांची नोंद घेणारे कान गणेशाला लाभले.  आणि पुढच्या जीवनप्रवासासाठी हा बाळ सज्ज झाला.

त्याच्या जीवनप्रवासासाठी शिदोरी म्हणून सृजन आणि संहार ह्या मातापित्यांनी , शिवपार्वतीनी विवेकाचा गोड मोदक त्याच्या हातावर ठेवला. असा हा विवेकी, बुद्धिमान गणेश बाळ  शिव आणि पार्वतीच्या अंकावर आरूढ झाला.

                  संकल्प ते सिद्धी हा खडतर प्रवास अत्यंत कष्टप्रद असतो. कुठलीही गोष्ट सहजासहजी साध्य होत नाही. अनेक अडचणी येतात. अनेक वेळेला अपयश येतं.  ह्या सर्वांवर मात करूनच हाती घेतलेला प्रकल्प पूर्ण होतो.

                कुठल्याही चांगल्या कामाचा, योजनेचा आरंभ म्हणजेच गणेश. गणपतीची बारा नावं असलेल्या संकटनाशन स्तोत्रात धूम्रवर्ण हे गणेशाचं आठवं नाव आहे. (प्रथमं वक्रतुंडं च - - -धूम्रवर्णं तथाष्टमम्). गणेशाची अंगकांती धूराप्रमाणे आहे. अग्नी पेटवायचा असला तरी तो एकदम पेटत नाही. आधी धूर येतो. ``यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः।‘’ जिथे जिथे धूर दिसतो तिथे तिथे अग्नि असतोच ह्या न्यायाने एखाद्या योजनेचा शुभारंभ केला की काही काळ जरी अपयशाचा धूर दिसला तरी बळकट, मजबूत, जोमदार संकल्पामागे उत्साहाची अशी ठिणगी दडलेली असते की ती त्या प्रकल्पला पूर्णत्त्वास नेल्याशिवाय राहात नाही. लाकडातून आधी धूर जरी निघाला तरी थोड्याच वेळात लाकडं पेट घेतात. म्हणून अग्नीला धूमध्वज असं म्हणतात.

        गीतेत 18 व्या अध्यायात 48 व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण पार्थाला सांगतात,

सहजं कर्म कौंतेय सदोषम् अपि न त्यजेत् ।

सर्वारम्भा हि दोषेन धूमेनाग्निरिवावृता ।।

``हे पार्था, स्वधर्म म्हणजेच आपण स्वीकारलेलं काम, विहित कर्म सुरवातीला कितीही अडचणीचं वाटलं, त्यात दोष आहेत असं वाटलं, योग्य दिशेने त्याची प्रगती होत नाहीए असं जरी वाटलं तरी सोडून देऊ नये. चिकाटीने करत रहावं. सर्वच कामांच्या आरंभी दोष असतातच. अग्नी जरी पेटवायचा म्हटलं तरी तो लगेचच पेटत नाही. काही काळ नाक,डोळ्यांना त्रास देणारा धूर येतोच. कामच सोडून दिलं तर त्याच्यात सुधारणा तरी कशा होणार?

          मूल चालायला लागलं तरी अडखळत, पडत, परत उठत मगच चालायला शिकतं. त्याप्रमाणे कामात आरंभी चुका होतात. त्या दुरुस्त करत करत कामाचा व्याप वाढत जातो. कुठलीही विशाल कृती  पहिल्यांदा छोट्या प्रमाणावर सुरू केलेली असते. तो कामाचा आरंभ म्हणजेच गणेश.

             कामात वारंवार सुधारणा करून ते दोषरहित करता येतं. अनेक प्रकारचं संस्करण झाल्यानंतरच एक परिपूर्ण कलाकृती तयार होते. एका छोट्याशा गढूळ निर्झराचीच नंतर पवित्र गंगा नदी तयार होते. म्हणूनच कामाची सुरवात लहान, दोषयुक्त असली तरी तेच काम तुला तारून नेईल. असं सांगणार्‍या गणेशाला आपण आरंभी वंदन करतो. संकटातून मार्ग काढण्याची उमेद मिळवतो.

 असा हा विनायक ते गणेश/गणनायक किंवा गजानन हा संकल्प ते सिद्धी असा प्रवास आहे. वसंतपंचमीचा आदला दिवस म्हणजेच माघी चतुर्थी ते ऋषीपंचमीचा आदला दिवस म्हणजेच गणेशचतुर्थी  असा हा (माघ, फाल्गुन, चैत्र,, वैशाख, जेष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद) सात महिन्यांचा प्रवास आहे. तेव्हा सहन करावा लागणारा अत्यंत कडक उन्हाळा, पावसाळा व त्यासोबत येणारी वादळे ह्यांचा प्रकोप हा शिवाच्या तांडवाचं जणु प्रतिक आहे. गणेश चतुर्थी ही विनायक ही ओळख मिटून जाऊन नवीन गणेश ही ओळख मिळण्याचा हा दिवस.

हा सर्व निसर्गाचा प्रवास आपल्याकडे पार्थिव गणेशाच्या मूर्तीतून साकार केला जातो. पार्थिव म्हणजे मातीची. ( आता अनेक कारणांनी ही मूळ परंपरा आपण मानत नाही.) कार्य पूर्ण झाल्यावर उरलेल्या सामानाची विल्हेवाट लावणे जसे आवश्यक तसेच ह्या प्रवासात मनात साचलेले अनेक दुःखदायक, कष्टदायक विचारही मातीत मिळणे, विसरून जाणे ही सिद्धी मिळाल्यावर आपोआप ( आप म्हणजे पाणी. आपात आप मिळणे- पाण्यात पाणी मिसळणे) घडणारी सहज क्रिया आहे. विनायकाचं विसर्जन हे सिद्धिविनायकाच्या जन्मानंतर आवश्यक आहे.

दुसर्‍या प्रकारे विचार केला तरी ज्या उत्साहाने  पाच दहा दिवस मूर्तीचा सत्कार होतो तो पुढचे 365 दिवस होणे कठीण. मातीच्या मूर्तीची विटंबना नको.

शेतकर्‍यांमधे एक म्हण प्रचलित आहे ‘आखातीला आळं आणि बेंदराला फळं’ म्हणजे अक्षय तृतियेला लावलेला भाजीपाला वा फळझाडं बैलपोळ्याला (श्रावण आमावस्या) तयार होतो वा फळं देतात.  त्यानंतर जमिन परत नव्या नांगरणीला तयार होते. नवीन संकल्पाच्या पूर्वी जुन्या गोष्टी मातीत मिळणे आवश्यक.

गणेशाची स्तुती करतांना श्री आद्यशंकराचार्य म्हणतात,

‘‘भजे पुराणवारणम्’’ म्हणजे जुने करीच नित्य नष्ट किंवा ``जुने जाऊ द्या मरणालागून’’ असे सांगणारा हा नित्य नूतन गणेश आहे.

----------------------

लेखणीअरुंधतीची-

                 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -