सवतिमत्सर -

 

सवतिमत्सर -

दोन सवतींमधलं प्रेम ही कदाचित सशाच्या शिंगाइतकीच अशक्य गोष्ट असावी सवतीमत्सराचं वर्णन करावं ते जगन्नाथ पंडितानेच. ह्या सवति सुद्धा साध्यासुध्या नाहीत. एक आहे ती हिमालयाची कन्या पार्वती. तर दुसरी स्वर्गातील सौंदर्यवती गंगा.

एकीनी शिवाच्या प्राप्तीसाठी खडतर तप केलं , इतकं की काळजीने तेथील ऋषिवर म्हणत, `अग नको ( उ ऽऽ मा ! ) बाळे!  इतकं खडतर तप नको करूस.' तिच्या जिद्दीपुढे साक्षात महादेवालाही शरण यायला लागलं. आपल्या खडतर तपश्चर्येने साक्षात देवांच्याही देवाला महादेवाला जिंकून घेतलं अशी उमा. प्रत्यक्ष भूमाता.

            तर दुसरी स्वर्गातील सौंदर्यवती गंगा. लावण्य आणि पावित्र्य ह्या दोन्ही विरोधी वाटणार्‍या गुणांचा संगम म्हणजे गंगा. `खंडपरशोः महैश्वर्यम्'( शिवाला त्या वाटे तव सलिल ऐश्वर्य बहु हे )  असे जगन्नाथ पंडिताने तिला संबोधले आहे. म्हणजे शिवालाही त्याचे महान ऐश्वर्य वाटावे अशी ही ऐश्वर्याची साम्राज्ञी !

``स्वर्गातून भूतलावर उतरेन पण माझा आवेग पृथ्वी सहन करू शकणार नाही. भोलेनाथांनी आपल्या जटा पसराव्यात त्यावरच मी माझे पाय ठेवीन'' म्हणणारी  गंगा!

                    या दोघींचा भ्रातारही तेवढ्याच तोलामोलाचा. दोघींना सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत. हे जाणून भोलेनाथांनी एकीला आपल्या वामांगी स्थान दिलं तर दुसरीला मस्तकावर जटांमधे बांधून ठेवलं. आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर एकीला `ग्राऊंड फ्लोअर फ्लॅट विथ गार्डन' तर दुसरीला `टॉप फ्लोअर विथ टेरेस' देऊ केला. पण दोघींना एकमेकींचा वाटणारा हेवा कसा कमी व्हावा?  जगन्नाथ पंडित म्हणतात,  हे गंगे, उमेने तुझ्यावर टाकलेल्या जळजळीत नेत्रकटाक्षांमुळे तू सतत थरथर कापत आहेस.  तुझं हे थरथर कापणही इतकं सुंदर आहे की जणु काही शिवाच्या मस्तकावर तू पदन्यास करत आहेस असं मला वाटत. तू कुठल्याही रूपात असलीस तरी सर्वांच कल्याणच करतेस. माझंही कल्याण कर माते.  

जशी लाली प्राचीवर पसरते सूर्य उदयी

उमा टाकी ऐशी जळजळित दृष्टी तुजवरी

कटाक्षाने त्या तू थरथरचि का कापत असे

जणू वाटे गंगाधर-शिरि पदन्यास करिते ।।3.1

 

नभाशी लाटा या तव सहजि स्पर्धाच करिती

जणू त्या स्वर्गाचा अति सहज सोपान बनती

तुझ्या या उत्तुंगा लहरी मम कल्याण करु दे

धुवोनी पापांसी  विमल मजसी तूच करिगे ।।3.2

 

                 सवती मत्सराचा हा आरंभ इथेच संपत नाही. टॉप फ्लोअर वरच्या गंगेला खाली रहाणारी आपली सवत जास्त सवलती मिळवते का? ती कशी आहे ह्याची उत्सुकता स्वस्थ बसू देत नाही. म्हणून ती खाली उतरत आहे. सवतीला भेटायला जायचं म्हणून हजार नखरे तिने केले आहेत. लचकत मुरकत शिवाला बिलगुन, त्याच्या हातात हात गुंफून, जलबिंदुंच्या मोत्यांनी सजलेली ही गंगा जल मोती उधळत आपलं ऐश्वर्य दाखवत खाली येत आहे. खाली उतरता उतरता जल-बिंदु-मौक्तिकांची माळ तिने उमेच्या भांगात हळुच माळली. तिचा हा लाडीकपणा पार्वतीला मान्य नाही. `लहान आहेस अजून. नीट वागायला शिक. उगाच मस्करी मला आवडत नाही. पार्वतीने तिच्यावर उडालेले गंगेचे तुषार हातानीच निपटून टाकले.  

 

 

शिवाच्या वामांगी बसलि युवती कोण म्हणुनी

तिला भेटाया तू उतरलिस खाली शिवसखी

जटाजूटातूनी उसळत शिवाच्या लहरि या

उमेच्या केसांना जल-निकर हे स्पर्श करिता।।40.1

 

तिच्या भांगामध्ये तव जलमणी माळ दिसता

बघे कोपाने ती तुजसि रमणी रक्तनयना

तुषारांसी टाकी निपटुनिच ती कोमलकरा

अशा या लाटांचा जगति जय होवो सतत हा।।40.2

(जल-निकर – जलबिंदुंचा समुदाय)

पार्वतीचे कोमला हात लागून पवित्र झालेले हे गंगाजल कायम विजयीच होईल ह्यात शंका नाही. ह्या भूमातेचा स्पर्श सर्वांनाच पुनित करणारा आहे.

 

            पार्वती थोरली आहे. सौंदर्यासोबत तिची कुशाग्र बुद्धी तिला स्वस्थ बसू देत नाही. प्राणनाथ चला, आपण सारिपाट खेळु. असं म्हणत लाडिकपणे पार्वतीने सारिपाट मांडला. जीवनात जिंकायचं असेल तर अर्धांगीसोबत हार मानलेलीच बरी. शिवशंभूं प्रत्येक डावात हरत गेले. आधी होतच काय जवळ! कटीस गुंडाळलेलं चर्मवस्त्र, मुंडमाळा, म्हातारा नंदी, अर्धवट चंद्र, भूतगण सगळे पार्वतीने जिंकून घेतले. ``आता तुला द्यायला माझ्याकडे काही उरलं नाही'' म्हणत भोलेनाथांनी शरणागती पत्करली. पण पार्वती कुठली ऐकायला. ``प्राणनाथ! अजुन गंगा उरली आहे ना मस्तकावर. लावता का पणाला?'' म्हणत तिने एक विजयी कटाक्ष गंगेकडे टाकला मात्र, शिवाच्या मस्तकावर गंगा क्रोधाने उसळायला लागली. जगन्नाथ पंडित म्हणतात, `` हे गंगे तुझ्या आनंदाने थुईथुई नाचणार्‍या लहरींइतक्याच क्रोधाने उसळणार्‍या या लहरीही पवित्र आहेत. त्या जगाची सर्व पापे धुवून काढायला समर्थ आहेत. त्याच माझीही पापे दूर करतील माते.

 

द्यूता मध्ये हरोनी; शशि, वृषभ, मणी, चर्मवस्त्रे गणांसी

शंभू झाला भिकारी हसुनि समयि त्या पार्वती बोलली ती

`गंगा लावा पणाला' बघुनि तुजकडे `प्राणनाथा त्वरेनी'

ऐकोनी शब्द क्रोधे उसळति लहरी, नाशु दे पाप राशी।।51

 

सवतीमत्सर आणि त्यातून निर्माण होणारा क्रोध शेवटी दोन पत्नींच्या भ्रातारालाही भोवतोच! चुकून इकडचा शब्द तिकडे झाला तर त्याची काही खैर नाही. एकीबरोबर असताना चुकून दुसरीलाच हाक मारली गेली तर जे काही भोग नशिबी येतील ते भोगणे क्रमप्राप्तच आहे. शिवावर आलेला हा बाका प्रसंग श्री जगद्गुरू शंकराचार्य मोठ्या रसिकतेने वर्णन करतात.  ते म्हणतात,

हे जगज्जननी पार्वती! तुझी आळता लावलेली पावले कोमल, मनोहर आहेत हे खरे. तुझ्या पदाघातासाठी इंद्राच्या नंदनवनातील अशोकही आसुसलेला असतो हे ही खरे पण तुझ्या चरणकमलांचा अचानक होणारा आघातही मोठा स्पृहणीय आहे.

पतीपत्नीमध्ये गप्पा गोष्टी करतांना पतिदेवांना हमखास काही खोचक बोलायची हुक्की येते. तशीच तुझी थट्टा करायची लहर शंभूदेवांना आली खरी पण चुकून त्यांच्या जिभेवरून प्रिय उमे ह्या संबोधनाऐवजी ‘‘प्रिये गंगे’’ असे शब्द निसटले मात्र!  आणि पुढच्या घडणार्‍या प्रसंगांची त्यांना कल्पना आली. आता सपशेल शरणागती! त्याशिवाय उपायच नाही. पण माते ही थट्टा जरा जास्तच झाली. तुझ्यासारख्या तेजस्वी लावण्यवती, मानिनीला आपल्या पतिमुखातून सवतीचा इतक्या प्रेमळपणे झालेला उल्लेख कसा बरं सहन होईल? सर्व विश्वाचा कारभार चालवणार्‍या, तुझ्यासारख्या मोठा अधिकार असलेल्या पत्नीला तर हे कधीच रुचणार नाहीत. ते शब्द एखाद्या शल्यासारखे तुझ्या हृदयात घुसले.

महा भयंकर क्रोधाने तुझी तनुलता थरथरतांना पाहून शिवाला आपल्यावर होणार्‍या अंगार-वर्षावाचा अंदाज आला. थट्टा करता करता चुकून जिभेवरून निसटलेले शब्द पुढे घडणार्‍या दारूण प्रसंगाला ``आ बैल मुझे मार’’ म्हणून स्वतःहून दिलेले जणु निमंत्रण होते. त्यानी तात्काळ तुझ्या पायांवर त्याचे मस्तक झुकवून क्षमायाचना केली. पण हाय रे हाय! तुझ्या पायांची जोरदार लाथ त्याच्या कपाळावर बसली. कपाळावर असलेल्या तिसर्‍या डोळ्यावर म्हणजे साक्षात अग्नीवर ही लाथ बसली.

पती-पत्नीच्यामधल्या ह्या भांडणप्रसंगाला कोणी शेजारी प्रेक्षक लाभला तर तो मात्र त्याचा चांगलाच आस्वाद आणि आनंद घेतो. त्यातल्या त्यात तो जर कोणी शत्रुपक्षातला असेल तर मग काय विचारता! त्याला हास्याच्या उकळ्या नाही फुटल्या तरच नवल! येथेही ‘‘ईशानरिपु’’ म्हणजे शिवाच्या कपाळावरील धनंजय नामक अग्निनेत्राचा कट्टर शत्रू हजर आहे. बोलून चालून त्याला शरीर नसल्याने तो गिरिजेच्या लोभस चेहर्‍याचा तर कधी सुंदर अवयवांचा आश्रय घेऊन राहतो.  शिवाच्या कपाळावरील अग्निनेत्राने त्याला जाळून अनंग /अंगहीन केले हे शल्य त्याच्या मनात खूप काळापासून होते. त्या अग्निनेत्रावर असा सणसणित लत्ताप्रहार होताना पाहून, आपल्या शत्रूची अशी फटफजिती होताना पाहून, अनंगाला खुदुखुदु हसू येऊ लागले.  शिवमस्तकावरील प्रहारावेळी तुझ्या पायातील पैंजणांमधून त्यावेळी जो किलकिल आवाज झाला तो पैजणांचा नसून आनंदाच्या उकळ्या फुटणार्‍या मदनाच्या उपहास गर्भ खुदुखुद हसण्याचा असावा असे मला वाटते. माते अशा तुझ्या चरणारविंदाना नमन!

कधी गप्पागोष्टी करित असता गे तुजसवे

जरा खोटे खोटे हसत वदता खोचकपणे

मुखी शंभूच्या ये चुकुन ‘‘प्रिय भागीरथि’’ असे

रुचावे कैसे ते वचन अपमानीत करि जे ।। ८६.१

 

ढळे जिह्वा ऐसी दुखवि गिरिशाची तव हृदी

तनु कापे त्याने, विपुल उसळे क्रोध हृदयी

कळाले शंभूसी धडगत न त्याची लव मुळी

इलाजासी त्याच्या शरण तुज जाणे उचितची ।। ८६.२

 

 

 

जरी घाली लोटांगण तव पदी शंभुशिवही

कपाळी शंभूच्या त्वरितचि पदाघात करिसी

अनंगासी होई सुख बघुन हे दृश्य भलते

म्हणे तो आहाहा! मम विजय हा थोरचि असे

(श्लोक ८६ सौंदर्यलहरी)

----------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -