समृद्ध अडगळ का समृद्धीची अडगळ

 

मृद्ध अडगळ का समृद्धीची अडगळ

 

एका नांदत्या घरात कुठे कुठे नीट ठेवलेली समृद्ध अडगळ असतेच. माझ्या लहानपणी आई दिवाळीच्या आधी सर्व कपाटं आवरायला काढायची तेव्हा त्यात दडलेला खजिना पहायला मी कुतुहलाने तिच्यासोबत बसत असे.

आज मीही अनेक गोष्टी इतक्या सहजासहजी टाकून देत नाही.

छोट्या मोठ्या रिकाम्या डब्या कशाला कामाला येतील सांगता येत नाही. घरी आलेल्या पाहुण्यांना येणारी खोकल्याची ढास पाहून जातांना त्याच्या हातात चिमुकल्या डबीत चार लवंगा घालून दिल्यावर तेही खूश!

गावाला जाताना एखादी कानातल्या टॉप्सची जोडी पटकन  ह्या चिमुकल्या डबीत बसून जाते. अंगठी वा कानातल्याचा निसटलेला खडा वा चष्म्याचा निसटलेला अगदी बारीकसा स्क्रू न हरवता डबीत बसून सोनाराच्या वा चष्म्याच्या दुकानापर्यंतचा प्रवास बेस्टमधे बसायला सीट मिळाल्यासारखा ऐशोआरामात करतो.

सॅलडला चवीपुरतं मीठ डबीत बसून डब्यासोबत जातं. अशा डब्या दिल्या, हरवल्या वा विसरल्या तरी मनाला यत्किंचितही दुःख होणार नसतं. लोणी, चीज, हिंग, लिपबाम अशा छोट्‌या मोठ्या डब्ब्या डुब्ब्या तर भाजी, चटणी, लाडू अनेक गोष्टी इतरांना द्यायच्या कामी येतात.

आयुर्वेदाच्या कुठल्याशा भस्माच्या छोट्या उभ्या बाटली आकाराच्या डब्या खललेले केशर वा वेलदोडापूड ठेवायला मस्त असतात.

पूर्वी वेगवेगळ्या आकाराचे स्क्रू, खिळे, हुक मी बाळगून असायचे. आता छोटे मोठे चिपको हुक्स पटकन काम करून टाकतात. अनेक बटणं, हुक्स, प्रेस बटणं, दोर्‍याची रिळं कधी कामाला येतील सांगता येत नाही. इतकच कशाला सारख्या बदल्यांमधे उपयोगी पडणारे वेगवेगळ्या आकाराचे लाकडी पातळ तुकडे नव्या जागी डगडगणार्‍या कपाटाखाली, फ्रिजखाली सहज सरकवले जात आणि त्यांना आपल्या पायावर खंबीर उभे करत. सततच्या बदल्यांमधे ही समृद्ध अडगळ भारी कामाला येत असे.

थर्मामिटर फुटल्यावर उरलेली बॉलपेनच्या आकाराची डबी हार ओवायच्या लांब सुयांना सामावून घेते. आणि 10 किलोच्या आट्याच्या पिशवीचा फर्रर्रकन निघणारा दोरा छान गुंडाळून ठेवला की वेळेवर हारासाठी उपयोगी पडतो. एका थर्मामिटरच्या डबीमधे दाभणही लपलेला असयाचा. पूर्वी दर बदलीच्या वेळी पोती शिवायला उपयोगी पडायचा. आता पॅकर्स आणि मूव्हर्सनी त्याचं महत्त्व कमी केलं असलं तरी; नवीन आलेल्या कुंच्याला जर टांगून ठेवायची सोय नसेल तर थोडा गरम करून प्लॅस्टिकच्या मुठीला आरपार भोक पाडून त्यातून लग्नपत्रिकेला बांधून आलेला रंगिबेरंगी गोफ ओवला जाऊन कुंचाही फ्रेंडशिप बँड बांधल्यासारखा आनंदून त्याच्या हुकवर मजेत लोंबत राहतो.

 हनीच्या चौकोनी, षट्कोनी काचेच्या बाटल्या, जामच्या बाटल्या घरी चटण्या लोणची, मुरंबे ठेवायला किंवा नातेवाईकांना वा अतथींना लोणचे, चटणी, मुरंबे घालून द्यायला उपयोगी पडतात. कढवलेलं तूप जरा निवलं की ह्या पारदर्शी बाटल्यांमधे ओतल्यावर त्याचा क्रिस्टलाइन होण्याचा प्रवाास पहायला मजा येते. आणि रिकाम्या झाल्या की परत डिश वॉशर मधे चकाचक!

 सेटमधला उरलेला एखादाच विजोड बाऊल चिंच भिजत घालून कोळ करण्यासाठी वा चटणी काढून ठेवण्यासाठी छान असतो. आजच्या फुलपुडीच्या कागदात कालचे निर्माल्य बसून जाते.

आइस्क्रिमसवे मागून आणलेला अजून एक लाकडी चमचा मिठासाठी परफेक्ट असतो कारण बाजारात फक्त एकच बरोब्बर आकाराचा छोटासा लाकडी चमचा मिळणार नसतो. तर विमानात कॉफी हलवायचा मिळालेला लांबदांडीचा चिमुकला चमचा ताकात मीठ/ताकमसाला घालून हलवायलाच बनवलेला व मिळालेला असतो.

दुधी भोपळ्यासमवेत येणारी लांब प्लॅस्टिकची पिशवी नीट धुवून पुसून ठेवली की पुढच्यवेळेस दोडकी, पडवळ, गाजर, मुळे अशा लांब भाजा ठेवायला कामी येते. कशाकशासोबत आलेली रबरबँडस् अशीच कशा कशाला लावायला उपयोगी पडतात

पाठकोरी बिलं बाजारातून पुढच्यावेळेस काय आणायचं आहे त्याची लिस्ट करायला उपयोगी पडतात. बर्‍याचवेळेला मीठ, गूळ, चिंचच्या लिस्टखाली माझ्या अचानक सुचलेल्या काव्यपङ्क्तिही गुण्यागोविंद्यानं नांदत असतात. कचर्‍यातून कला वा टाकावूतुन टिकावू म्हणतात ते हेच असावं!

 टाकुन द्यायला झालेली जुनी पातळ सुरी जमिनीवर चिकटलेले डाग छान खरवडून काढते. जुन्या नेलकटरला असलेला बॉटल ओपनर ऐनवेळेला पाहुणे आल्यावर नवीन सॉसची बाटली उघडण्याच्या कामी येतो. एका फुटलेल्या बाटलीचं झाकण दुसर्‍या तुटक्या झाकणाच्या बाटलीला परफेक्ट बसतं!

वर्षानुवर्षे आपली बारी कधी येणार म्हणत खोल हात घालून काढायला लागणार्‍या जुन्या  डबलबेडच्या चादरी,  रंग द्यायला काढला की  सर्व सामानावर पदर पसरून आपलेपणाने काळजी घेतात. विभूती योगाप्रमाणे ह्या काही आठवलेल्या थोडक्या गोष्टी आहेत. प्रत्येकाच्या कामाच्या स्वरूपानुसार ही समृद्ध अडगळ वेगवेगळी असू शकते.

सर्व गृहिणी ‘‘अयोग्यं वस्तु नास्त्यैव’’ म्हणजे ह्या जगात अयोग्य काहीही नाही, म्हणत अशा अनेक वस्तुंचा सुनियोजित संचय करत असतात. त्यांच्या पतिदेवांना ते जरी आवडत नसलं तरी ऐनवेळेला लागणारा लिफाफा, लिफाफा कापायला कात्री वा लिफाफा चिकटवायला फेव्हिकॉल, कागदांना जोडायला टाचणी, कुठेसा लागणारा हुक वेळेवर पुरवून ‘‘योजकः तत्र दुर्लभः।’’ म्हणजेच टाकावू वाटणार्‍या गोष्टींचा सुयोग्य वापर करून दाखवणारा योजक दुर्लभ असतो  हे पटवून देत असतात.

ही सगळी वेळोवेळी जमवलेली अडगळ रोजच्या जगण्याला समृद्ध करत राहते. पण----- कित्येक वेळा वाढत जाणारी समृद्धी घराला हे घे ते घे च्या मार्‍याने अडगळ बनवून टाकते. ही समृद्धीची अडगळ मात्र निरुपयोगी , दयनीय , केविलवाणी असते.

कोणा एका द्रष्ट्याला आपला धर्मही एक समृद्ध अडगळ वाटते. मला वाटते त्यातच सर्व मर्म आले. ह्या वरवर भासणार्‍या अडगळीमुळेच देवाच्याही कापल्या बोटाला चिंधी बांधण्याची क्षमता आपल्या धर्मात आहे;  जमिनीवर पडलेल्या क्षुल्लक अडगळीसमान दर्भाच्या काडीने शुक्राचार्यांनाही दूर करून (प्रसंगी त्यांचा डोळा फुटला तरी चालेल पण---!) विश्वाची त्रिपाद भूमी मिळवण्याचे चातुर्य आपल्या धर्मात आहे; काठ्या काटक्यांच्या मदतीने  गोवर्धन  उचलून धरायला गिरीधारीलाही मदत करण्याची धमक आहे.   फाटलेल्याला टाके घालण्याची, डगडगणार्‍याला खंबीर करण्याची, तुटलेल्याला उठवण्याची, प्रेमाने खांद्यावर हात ठेवायची, दुःखिताला दिलासा द्यायची  ताकद आपल्या धर्मात आहे. ती आपल्या धर्मात असलेल्या समृद्ध अडगळीमुळेच!

-----------------------------------

#लेखणीअरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -