दशसुन्दरीचरितम् -

 

दशसुन्दरीचरितम् -

माझ्या जिवाभावाच्या सख्यांसह—म्हणजे ह्या--- दहा दिशांच्या सोबतीने माझं मन कायम विहरत असतं आनंदाच्या लाटांवर आनंदाचे तरंग होऊन! कधी कुठली दिशा माझ्या खांद्यावर हात टाकून तर, कधी कुठली दिशा माझा हात हातात घेऊन, तर कधी कोणी तिच्या तळव्याने माझे डोळे झाकून निसर्गाचा कुठला सर्ग माझ्या डोळ्यांसमोर सर्रर्रऽऽऽकन  उघडून, उलगडून मला अचंबित करून टाकेल हे सांगताच येत नाही.

गुंडाळलेल्या गालिचाची गुंडाळी माझ्या घरासमोर अलगद उलगडत पश्चिमेने माझ्या घरासमोर विशाल निळाशार जिवंत समुद्र पसरला. सोनेरी पुळणीचे सुंदर काठ विणलेला. चैतन्यमय लाटांची गाज माझ्या कानात गुंजत राहील असा. समुद्राच्या काठाकाठानी सुरू, नारळी पोफळीच्या बागांनी गर्दी केली तर केवड्याच्या बनांनी समुद्राच्या किनार्‍यावरील वाळूत मुक्काम टाकला.

 कधी माझ्यासोबत बदलीच्या गावी येत ‘‘अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा’’ म्हणत उत्तरेने हातातील चित्राची गुंडाळी उलगडत माझ्या घरासमोर आकाशाच्या पोटात शिरलेली गोलबकांग्रीची भव्य दिव्य रांगच उलगडून ठेवली...... चंद्रप्रकाशात चांदीची तर सूर्यप्रकाशात सोन्याची होणारी गूढ, रम्य! तर कधी सज्जाचा दरवाजा उघडताच ध्रुवानं स्वागतासाठी खडी ताजिम दिली. मी इथेच आहे तुझ्या स्वागतासाठी! कधीही ये सज्जात. इथेच असेन तुझी वाट बघत. मीही  रात्री अपरात्री हळूच, न कळत दरवाजा किलकिला करून बघत राहिले..... आहे ना तो तिथेच उभा सांगितल्याप्रमाणे! तो खळखळून हसायचा ‘‘माझ्या इतका दृढ अजून तुला कोणी सापडणार नाही. म्हणूनच हे विश्व माझ्याभोवती भ्रमण करतं.’’ कधी पंतंगाच्या आकृतीत सामावलेले सप्तर्षी तर कधि इंग्रजी W आकारात शर्मिष्ठा आलटून पालटून  त्याच्या भोवती फिरतांना दिसत. कधीकाळी लेव्ही शूमेकर ह्या धूमकेतूनेही अचानक उत्तरेला दर्शन देऊन मला आश्चर्यचकित केलं.

चित्र काढून झालं की चित्रकारानं देखणी स्वाक्षरी करून हातातला कुंचला हळुच चित्रावर ठेऊन जावं त्याप्रमाणे पहाटे मी घराचे पडदे दूर सारत असतानाच पूर्वा सोन्याचा गोळा क्षितिजावर ठेऊन जायची. प्राचीवर गुलाबपाणी शिंपता शिंपता प्रभात तार्‍याचं चमचमतं पांढर शुभ्र कुंदाचं फूल अलगद तिथेच सोडून .....!.... तिच्या सुंदर स्वाक्षरीसारखं!

तू शुभ्र धवल रंग पाहिलाएस? मी प्रभात तार्‍यास निरखतांना दिशांनी मला विचारल? त्यांच्यासोबत मी कुंदाच्या फुलासारखा धवल पहात होते. ‘‘तडित्वाससं नीलमेघावभासं’’ म्हणजे काळ्या ढगात चमकणार्‍या वीजेसारखं शुभ्र धवल वस्त्र नेसलेल्या विठ्ठलाला आठवत होते. नोव्हेंबर मधे काश्मिरच्या  सरोवरं, नद्यांच्या पाण्याच्या पृष्ठभागांवर तयार होणारे बर्फाचे स्फटिक झेले, नुकतं पडलेलं हिम, स्वयंपाकघरतील घट्ट दह्याची वाटीत घेतलेली कवडी बघत होते. अ—हं! पश्चिमा म्हणाली, आज तुला लवण-धवल कसा असतो ते दाखवते. कच्छच्या रणात समुद्रकिनारी पसरलेली विशाल लवणभूमी पाहतांना माझ्या मनातील शुभ्रतेला अजून एक परिमाण लाभलं---- लवण धवल!

अजुन सुदक्षिणेची पुरती ओळख झाली नव्हती  ‘‘मला भेटायला पृथ्वीच्या पोटावरला विषुववृत्ताचा कमरपट्टा ओलांडून तुला खाली दक्षिण गोलार्धात यावं लागेल तरच तुझी माझी खरीखुरी भेट होईल.’’ सुदक्षिणा कानात कुजबुजून गेली.

               मॉरिशसमधे सुदक्षिणेचा प्रथमच परिचय झाला. दिक्षणदिशा! सुदक्षिणा!  सगळ्यांपेक्षा उजवी! लोकांनी तिला मृत्यूची दिशा, यमाची दिशा म्हणून बदनाम केलं असलं तरी तिचं अद्भुत सौदर्य पहायला मिळणं मोठं भाग्याचच! मॉरिशस विषुववृत्ताच्या खाली दक्षिणेला वीस अंशावर असल्यानी ती मला भेटणार होती. आम्ही मॉरीशसमधे असेपर्यंत ध्रुवतारा तर दोन वर्षांच्या लाँग लिव्ह वर गेला होता. 

                    भारतात कायम दक्षिण क्षितिजावर रेंगाळणार्‍या वृश्चिक राशीनी येथे ठळकपणे दक्षिण आकाशात एन्ट्री घेतली होती. भारतात नेहमी दक्षिण क्षितीजावर असलेली ही सर्वात मोठी रास इथे कितीतरी वरती सरकली होती. मान उंचावून बघायला लागत होती. वृश्चिकाची गोल वळलेली बाकदार नांगी चमचमत होती. तिच्यातला सर्वात सुंदर ज्येष्ठाचा तारा तेजानी सर्वांपेक्षा ज्येष्ठ असल्याची जाणीव करून देत होता. आणि अचानक लक्षात आलं की ह्या वृश्चिक राशीच्या खाली कधी न दिसलेलं दक्षिणसौंदर्य - -तीन तीन डायमंडस्! ठळक हिरे! दक्षिणेच्या गळ्यात असलेला हार , - -  रत्नजडित अमूल्य कंठा मी प्रथमच बघत होते. डायमंड क्रॉस, सदर्न क्रॉस आणि फॉल्स क्रॉस. सदर्न क्रॉस (crux)   आणि ते दाखवणारे दाखवणारे अल्फा आणि बीटा हे पॉईंटर स्टार्स. सुदक्षिणेचं हे सौंदर्य पहायला पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातच यायला लागतं. माझ्या समोर हिर्‍या माणकांनी मढलेली सुदक्षिणा पाहून सगळं सगळं विसरायला झालं. सहज घराच्या बाल्कनीचा दरवाजा उघडावा आणि हिर्‍यांचा कंठा घातलेली सुदक्षिणा समोरच हसत उभी असावी. आहाहा! मॉरिशसच्या दोन वर्षांच्या वास्तव्यात सुदक्षिणेला भेटल्यावाचून माझा एकही दिवस गेला नाही.

दरवेळी ह्या ऐश्वर्यसम्पन्न दशसुंदरी--- माझ्या सख्या मी जिथे जाईन तिथे मला त्यांच्या ऐश्वर्याची चुणुक दाखवत राहतात.

धी समुद्राची गाज, तर कधी मौन पर्वतराज; कधी मखमली हिरवळ, तर कधी फुलांचा दरवळ; कधी चांदण्यांची बरसात तर कधी ओल्याचिंब पावसात; कधी भव्य ओसाडी तर कधी हिरवीगार दाट झाडी, कधी नागसापांची, बिबट्याची सळसळ तर कधी निर्झराची खळखळ; कधी किर्र अंधार तर कधी किरणांचे तुषार; कधी काजव्यांनी चमचमणारे वृक्ष तर कधी झाडांवर डोलणारे भरगच्च पुष्पगुच्छ; कधी वायूवेगाने धावणारे वारू तर कधी तर कधी शिडात वारं भरून लाटांवर सुसाट चाललेले तारु, कधी फुलपाखरांचे थवे कधी लाखो पेलिकन्सच्या सवे; कधी रत्नमालेप्रमाणे पसरलेला ग्रहपथ तर कधी रोज ठराविक वेळेला भेटणार्‍या सॅटेलाइटचा नियोजित पथ; कधी निळ्याशार आकाशावर झुलणारी बलाकमाला तर कधी कावळ्यांची शाळा

मला भेटलेल्या ह्या विश्सुंदरींची ही फक्त झलक! त्यांच्या ऐश्वर्याचा मला झालेला इवलासा परिचय! अनेकांनी त्यांच्या वैभवाची शिखरंही पाहिली आहेत. अनुभवली आहेत. त्यांच्या ऐश्वर्याची नुसती झलक पाहूनही हे सगळं ऐश्वर्य मला माझ्या घरात पाहिजे असा माझा हट्ट होता. मलाजपाकुसुमसङ्काशम्म्हणजेजास्वंदीच्या फुलासारखा लालबुंद सूर्याचा गोळा घराच्या भिंतीवर टांगून ठेवायचा होता. मला चंद्रानी माझा शयनकक्ष सजवायचा होता. चांदण्यांची झुंबर पेटवायची होती. हिरव्यागार मखमली हिरवळीचा गालिचा अंथरायचा होता. ध्रुवावर बसून निवांत सगळी गम्मत पहायची  होती. कस शक्य आहे हे? दुसरं मन प्रश्न विचारत होत. त्याच वेळी माझ्या सख्या पुढे आल्या. “एवढच ना! सहज शक्य आहे. आमचा हात धर. डोळे मिट. तुझ्या घराच्या तूच उभारलेल्या काल्पनीक  भिंती आता अदृष्य होतील बघ. कसली तरी जादू होत होती. त्याच्यात सगळ्याच दगडा मातीच्या भिंती विरघळत विरघळत चालल्या होत्या. डोळे उघड. भारावून गेल्यासारखे मी डोळे उघडले. “आमच्या विस्तीर्ण आवारात तुझं स्वागतच आहे.” अगं वेडे छप्पर सुरक्षित ठेवत नाही. तुझ्यातील मानसिक शारिरीक बळ तुला सुरक्षा देतं. पक्षी पिलांपुरतच घरटं बांधतात. त्यांच्या पंखात भरारी येईपर्यंतचाच तो थांबा. पंखात बळ आलं की तेही त्याचा त्याग करतात. माणसं मात्र निर्बळ होऊन घरात बसून राहात.

माझी भिरभिरती नजर दाही दिशांच सौंदर्य टिपून घेत असतांनाच त्यांनी बनविलेला मनोरम प्रासाद माझ्या डोळ्यासमोर साकार होत होता. अग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य ह्या भव्य, कलापूर्ण खांबांवर तोलून धरलेला गगनाचा प्रकाशमान घुमट तर पूर्वा, पश्चिमा, उत्तरा आणि सुदक्षिणेनी उभारलेल्या चित्रल भिंती, वायुंचे पडदे, अधरेनी घातलेल्या हिरव्यागार पायघड्या, पायघड्यांवर रेखलेले फुलांचे झेले, लतामंडप, डौलदार तरुंचे खांब!

सख्यांनो!.... कोणाचा हा प्रासाद?

``श्री शंकर-प्राणवल्लभेचा! त्रिभुवन-सम्राटाच्या पट्टराणीसाठी त्यानी बांधलेला महाल! ‘’

मला पहायचय तिला. मला दाखवाल एकदा? -मी

सगळ्याच जणी हसल्या- - खळखळून!

का?- - नाही दाखवणार मला? -मी

अगं वेडे, साखरेपासून गोडी वेगळी का काढता येते? सूर्यापासून तेज वेगळं का करता येतं? पाण्यातून पातळपण निवडून काढता येतं का? तरंगांना गाळून समुद्र घेता येतो का? सोन्याच्या दागिन्याच्या नक्षीतून सोंनच काढून टाकता येत का? तुला ठायी ठायी घडणारं सौंदर्याचं दर्शन ह्या त्रिपुरसुंदरीचच”! तुपाच्या कण्या आणि तूप, अग्नीच्या ठिणग्या  आणि अग्नी वेगळं होऊ शकतं का कधी?

 कसं शक्य आहे”? विचारत हरवून आश्चर्यानी डोळे विस्फारून मी खाली पाहिलं. डोक्यावर दवबिंदूची घागर घेऊन हिरवी रेशीम वस्त्रे लेऊन गवत पाती उभी होती. किरणोत्सव सुरू होता. प्रत्येक दवबिंदूतून सूर्याचे साती रंग प्रभा फाकत होते. ‘त्रिभुवन सुंदरी आलीवार्‍यानी वर्दी दिली. कमरेत वाकत सार्‍या गवत पात्यांनी आपल्या डोईवरचे घडे क्षणात तिच्या पायी रिकामे केले. प्रत्येक गवताच्या पात्याच्या माथ्यावरून आपला प्रेमळ हात फिरवित ती पुढे चालली होती. जाता जाता माझ्या मनाची कुठलाशी तार झंकारून गेली कळलच नाही. मनाची जव्हार निघाल्यासारखं मन कंप पावत होत. विलक्षण नाद कानात घुमत होता. समुद्राची धीर गंभीर गाज होती का ती? का भेडाघाटच्या कोसळणार्‍या नर्मदेच्या प्रपाताचा घोष? का अलकनंदेच्या दरीत कोसळणार्‍या धबधब्याचा ध्वनी? का पश्चिमेच्या वार्‍याची बासरी?

              बघता बघता ती माझ्या मनाच्या गाभार्‍याच्या पायर्‍या चढत, हृदयसिंहासनावर विराजमान झाली. माझ्या नेत्रातून होणार्‍या जलधारांच्या अभिषेकात चिंब झालेलं तिचं ते ओलेतं, अनुपम सौदर्य निरखत गंगेत सोडलेल्या दिव्यासारखी मी आद्य शंकराचार्यांच्या स्तोत्रगंगेच्या आनंदलहरींवर हेलकावे घेत होते. अंग अंग रोमांचित झालं होतं. सार्‍या शरीरातूनच आनंदलहरी उठत होत्या. हे श्री शंकरप्राणवल्लभे!ऽऽ श्रीशंकरप्राणवल्लभे! शंकराचार्यांच्या आनंदलहरी मुखातून बाहेर पडत होत्या -

 

चार मुखांचा ब्रह्मा निष्प्रभ । भुवनत्रयाचा प्रजापती

त्रिपुरारी तो पंचाननही । करु शकेना स्तुति तुझी

सहा मुखांचा सुर सेनानी स्कंदही स्तब्ध तुझ्यापुढती

शत जिह्वांचा शेषही येई शरण तुझ्या चरणावरती

तुझ्या गुणांच्या प्रभावळीने ।भल्या भल्यांची अशी स्थिती

एकमुखाने कशी करु गे आई भवानी तुझी स्तुति

मंदारपुष्पमालांची दाटी गं झाली तुझीया वक्षस्थली

नादमधुर झंकार वीणेचा ऐकुन कुंडल तव डुलती

बाल रवी सम तेजस्वी अति रत्नभूषणे तव जननी

सुवर्ण वर्णावरी शोभती कनकभूषणे सुंदरशी

पीत वस्त्र हे तुझे पार्वती सौदामिनी जणु पांघरली

तालात पावले पडतां या पायी पैजण रुणझुणती

स्फटिकांच्या भिंतीनी सजले मंदिर हे रमणीय तुझे

जडविली नाना रत्ने भारी त्यात दिसे तव रूप नवे

प्रासादाच्या शिखरांवरती दिसे चंद्रकला प्रथमेची

मुकुंद ब्रह्मा इंद्र देवगण परिवार शोभा वाढविती

त्रिभुवन सम्राटाची राणी अद्भूत सुंदर भवन तुझे

शब्दच नाही तुझ्या स्तुतीला नमन तुला हे मुकेपणे

आल्हादक या वसंतात अति फुलल्या वेली नवरंगांनी

नाना कमळे तलाव बहरे उपवनी हंसाची गर्दी

मलयपर्वतावरील येई मंद पवन  आनंदमयी

वायु स्पर्शे जलात निर्मळ तरंग उच्छृंखल उठती

अशा जलाशयी सख्यांसवे तू जलक्रीडा जेंव्हा करीशी

आठविता ते रूप तुझे संसारदुःख विलया जाई

एकमुखाने कशी करु गे आई भवानी तुझी स्तुति

-----------------------------------------------------------

#लेखणीअरुंधतीची -


Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)